Top Post Ad

कुलकर्ण्यांची ममता गेली कुठे ? ठाणे पोलिस अद्यापही शोधात


  •  इडियाज मोस्ट वांटेड हिरोईन 
  • ममता शोधात ठाणे पोलीस
  • दोन हजार कोटीच्या ड्रग्ज प्रकरणात ममता आहे मुख्य आरोपी

    ठाणे पोलिसांनी 2016 साली सोलापूर येथून जप्त केलेल्या 2 हजार कोटींच्या एफेड्रीन ड्रग्ज तस्करी प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक आरोपी असलेली माजी बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचा गेली पाच वर्षे पोलीस शोध घेत आहेत. ममता कुलकर्णी सध्या विदेशात असून तिला भारतात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. ममता कुलकर्णीच्या अटकेसाठी ठाणे पोलिसांनी न्यायालयात ठोस पुरावे सादर केले असून त्यानंतर न्यायालयाने ममताला फरार घोषित केले आहे. ममता विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच तिचे मुंबईतील फ्लॅट व बँक खाती देखील सील करण्यात आली आहेत. त्यामुळे ती फार काळ विदेशात लपून राहू शकत नाही, ममता लवकरच भारतीय तपास यंत्रणांच्या ताब्यात येईल अशी शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. 

       ठाणे पोलिसांनी 2016 साली जप्त केलेल्या दोन हजार कोटीच्या एफेड्रीन अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील मुख्य मास्टरमाइंड विकी गोस्वामी आणि त्याची पत्नी तथा पूर्व बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी यांच्या विरोधात अंतरराष्ट्रीयस्तरावर रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. या दोघांपैकी विकी गोस्वामी यास यूएस पोलिसांनी कोरोनाकाळापूर्वी केनियामधून अटक केल्यानंतर त्याच्या विरोधात भारतासह वेस्ट आफ्रिकन आणि अरब देशात दाखल असलेल्या गुन्ह्यांचा धांडोळा अमेरिकन तपास यंत्रणा एफबीआय कडून तपासण्यात येत आहे. भारतात दिल्ली, गुजरात आणि ठाणे आदी ठिकाणी विकी गोस्वामीवर ड्रग स्मगलिंगचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ठाणे पोलिसांनी पकडलेला 2 हजार कोटीचे एफेड्रीन प्रकरणाचा गुन्हा सगळ्यात मोठा आहे. या गुन्ह्याची माहिती अमेरिकन एजन्सी एफबीआय कडून घेण्यात आली आहे. 

विकी गोस्वामी नंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार किशोरसिंग राठोड देखील ठाणे पोलिसांच्या ताब्यात आला आहे. तर या प्रकरणातील जय मुखी, मनोज जैन, सुशील अशिकनन असे सर्वच मुख्य आरोपी ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आले आहेत. त्यामुळे एफेड्रीन प्रकरणाच्या तपासाला मोठी गती मिळाली असून पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. या गुन्ह्यात आता मुख्य सूत्रधारांपैकी फक्त ममता कुलकर्णी ही एकमेव मुख्य सूत्रधार अटकेबाहेर असून तिच्या अटकेसाठी भारताकडून प्रयत्न सुरु आहेत. या प्रकरणातील इतर आरोपींचे जबाब आणि ममता कुलकर्णी विरोधातले पुरावे ठाणे पोलीसांनी न्यायालयात सादर केले असून त्या आधारवर न्यायालयाने ममता कुलकर्णीला फरार घोषित केले आहे. तर तिची मालमत्ता जप्तीचे देखील आदेश दिले आहेत. 

त्यानुसार पोलिसांनी ममता कुलकर्णीच्या अंधेरी व वर्सोवा येथील फ्लॅट व बँक खाती सील केली आहेत. काही महिन्यांपूर्वी ममताने आपल्या वकिलामार्फत एक याचिका मुंबई न्यायालयात दाखल केली होती. ज्यात तिने मी आर्थिक अडचणीत असून माझे सील केलेले बँक खाते व मालमत्ता खुली करण्याची मागणी केली होती. या याचिकेत ममताने कुटुंबात ती एकमेव कमावणारी व्यक्ति असून मानसिक आजारी असलेल्या तिच्या बहिणीचा खर्च तिला करावा लागतो, त्यामुळे न्यायालयाने बँक खाती खुली करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र ममता कुलकर्णी आतापर्यंत तपास यंत्रणेसमोर तसेच सुनावणीस प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहिलेली नाही. त्यामुळे तिने बँक खाती खुली करण्यासाठी दिलेली कारणे पुरेशी वाटत नसल्याचे म्हणत तिची याचिका फेटाळली होती. 

सध्या ममता कुलकर्णी केनिया देशात लपून असल्याची चर्चा असून ती आर्थिक अडचणीत असल्याने तिला तिथे फार काळ लपून राहणे शक्य होणार नाही. तसेच गुप्तचर संस्था व तपास यंत्रणांनी ममतावर करडी नजर रोवली आहे. गंभीर गुन्ह्यातील देशाबाहेर फरार झालेल्या आरोपींना परत आणण्यासाठी भारताकडून सध्या जोरदार मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमअंतर्गत ममता कुलकर्णीस देखील भारतात परत आणण्यात येण्याची दाट शक्यता असल्याची माहिती ठाणे पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

          इंटरनॅशनल ड्रग माफिया आणि अभिनेत्री ममता कुलकर्णीचा पती विकी गोस्वामी यास काही वर्षांपूर्वी दुबई येथे अटक झाल्यानंतर त्यास ड्रग तस्करीच्या आरोपाखाली स्थानिक सरकारने 14 वर्षाची शिक्षा सुनावली होती. तेव्हा ममता कुलकर्णीने मुंबईतील काही नामवंत वकिलांसह दुबईत वकिलांची फौज उभी करून त्यास या केस मधून सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केला होता. तेव्हा दुबईतील कायद्यानुसार ममताने विकीसह मुस्लिम धर्म स्वीकारला होता. मुस्लिम धर्म स्वीकारतांना ममताने आपले नाव आयशा हसन असे ठेवले होते. 

दरम्यान मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर देखील ममताने हिंदू धर्माला सोडले नाही. तर तिने भारतातल्या कुंभमेळ्यात आवर्जून हजेरी लावली होती. अहलाबाद येथे पार पडलेल्या कुंभमेळ्यावेळी देखील ममता कुलकर्णी भारतात आली होती व ममताने या कुंभमेळ्यात हिंदू धर्मानुसार पवित्रस्नान केले होते असा जबाब विकी गोस्वामीच्या बहिनेने पोलिसांकडे त्यावेळी दिला होता. तर ममताच्या म्हणण्यानुसार तिने मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर देखील हिंदू धर्माचा तिरस्कार केला नाही. तर तिने पती विकीला सोडवण्यासाठी तब्बल 12 वर्ष तपस्या केली. या 12 वर्षाच्या काळात आपण फक्त चहा आणि शेंगदाणे खाऊन दिवस काढल्याचे ममताने एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. या 12 वर्षाच्या काळात आपण कुठल्याही पुरुषाला स्पर्श केला नाही. तसेच आपल्याला मुंबईत राहून तपस्या करता आली नसती म्हणून मी देशाबाहेर गेली असून मी देशातून पळालेली नाही असा दावा देखील ममताने आपल्या मुलाखतीत केला होता.

         गुजरात मधील माजी आमदाराचा मुलगा किशोरसिंग राठोड, जय मुखी आणि विकी गोस्वामी या भारतातल्या तिघा बड्या ड्रग माफियांनी इंटरनशनल ड्रग मार्केटचे बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आकाशा ब्रदर्स ग्रुप सोबत हातमिळवणी करून आफ्रिकन कंट्रीतल्या टांझानिया या देशात ड्रग उत्पादन करण्यासाठी संपूर्ण फॅक्ट्री उभारण्याचा प्लॅन केला होता. भारतातल्या सोलापूर येथील एव्हान लाईफ सायन्स कंपनीतून दरमहा 100 टन एफेड्रीन हा ड्रग बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल टांझानिया देशात घेऊन जायचा आणि तेथे या मालापासून ड्रग बनवून तो जगभरात तस्करी करून पाठवायचा असा डाव या मंडळींनी ठरवला होता. 

जगभरात ड्रग तस्करी करण्याची जबाबदारी आकाशा ब्रदर्स यांच्यावर होती. तर ड्रग मेकिंग आणि फॅक्टरीची जबाबदारी कुख्यात ड्रग केमिस्ट डॉ. अब्दुला सांभाळणार होता. तर भारतातून कच्चा माल टांझानिया देशात नेण्याची आणि कच्चा माल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विकी गोस्वामी याने आपल्या खांद्यावर घेतली होती. त्यासाठी विकीने कच्चा माल मिळवण्यासाठी सोलापूर येथील एव्हान लाईफ सायन्स या कंपनीची निवड केली होती. ड्रग माफियांचा हा सारा प्लॅन प्रत्येक्षात येण्यासाठी 4 जानेवारी 2016 रोजी केनियात एक अत्यंत महत्वाची मिटिंग पार पडली होती. त्यात आकाशा ब्रदर्स, डॉक्टर अब्दुला, विकी गोस्वामी, किशोरसिंग राठोड, जय मुखी आणि ममता कुलकर्णी आदी उपस्थित होते. या मिटिंग मध्ये ममता कुलकर्णीला एव्हान लाईफ सायन्स कंपनीचे संचालक बनवायचे असा ठरवा पास झाला. त्यानंतर ममताला संचालक पदावर बसवण्याची संपूर्ण जबाबदारी किशोरसिंग राठोड आणि जय मुखीवर देण्यात आली आणि येथूनच ममताच्या साऱ्या मिटिंग किशोरसिंग फिक्स करू लागला होता. दुबईतल्या सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफा या इमारतीच्या 26 व्या माळ्यावर ममता कुलकर्णीच्या उपस्थित पार पडलेली मिटिंग देखील किशोरसिंग राठोड यानेच फिक्स केली होती. 

उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची मुलगी ते ड्रग्ज माफिया व्हाया बॉलिवूड
      90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या ममता कुलकर्णीचे बालपण मराठी पोलीस अधिकाऱ्याच्या घरात पार पडले. तिचे वडील मुंबईत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती ममताची बहीण मोलीना हिच्या नावावर करण्यात आली होती. ममताशी माझा आता पर्यंत कुठलाही आर्थिक व्यवहार झालेला नसून माझे वडील मुंबईत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती माझ्या नावावर झाली होती. त्यातूनच माझा उदरनिर्वाह चालतो. तसेच ममताच्या मुंबईतील कुठल्याही संपत्तीशी माझा संबंध नसून मी मीरा रोड येथे स्वतंत्रपणे राहत असल्याचे ममताची बहीण मोलीना हिने ठाणे पोलिसांसमोर सांगितले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com