धर्मप्रामाण्य, व धर्मांधतेचा धुडगूस... बहुजनवादी विचारवंत आहेत कोठे?


फुले-शाहु-आंबेडकर या परिवर्तनवादी विचारांच्या पागोळ्याखाली सचैल स्नान केल्याने ज्यांची पुरोगामी विचारवंत अशी प्रतिमा तयार झाली, त्या बहुजनवादी विचारवंतांच्या भूमिकेची किंवा येते.  मूळात फुले-शाहु-आंबेडकरी हा विचारच बहुजनवादी आहे, जो अभिजनवादाला सर्वथैव पुरून उरला असे म्हटले तर वावगे ठरू नये.  खरेतर बहुजन या शब्दाचे निर्मातेच तथागत गौतम बुद्ध आहेत. २५५४ वर्षांपूर्वी ' बसून हिताय बहुजन सुखाय '  ही घोषणा तथागतांनी केली, ज्याला कारूण्याची झालर आहे.  बहुजन या शब्दाचा अर्थच मुळी जात,धर्म, पंथ, भेद विरहित सामाजिक ऐक्याचे संघटन होय!  

अर्थातच मनुष्यधर्म म्हणजेच निखळ मानवतावाद हे त्याचे प्रारूप म्हटले पाहिजे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही या विचारधारेचा अधिष्ठाने असून,  भारतीय संविधानाने ही अधिष्ठाने तत्वतः स्विकारावी हा केवढा मोठा चमत्कार आहे! संविधान सभेने विविध अंगांनी विचारविनिमय व मंथन केल्यानंतर या अधिष्ठानांच्या समावेशाला परवानगी देऊन शिक्कामोर्तब केले.  सामाजिक व राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी भारतीय स्वातंत्र्याच्या निर्मितीनंतर  सामाजिक वक्तृत्व  सांस्कृतिक एकात्मतेवर भर दिला..याचे कारण संविधानाला अभिप्रेत असलेला विचार, जो राष्ट्रीय भावनेलाक्ष वृद्धिंगत करू शकेल अशी धारणा होती. एकूणच सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित विचारांच्या पायाबांधणीचे निर्मातेच तथागत गौतम बुद्ध असल्याचे भारतीय व पाश्चात्य विचारवंतांनीही मान्य केले आहे.

         बुद्ध विचार परंपरावादी नाही, पण काळानुरूप बदलाची अपरिहार्यता देखील नाकारत नाही.  याचे कारण विज्ञानाशी सुसंगत तत्वज्ञान हा या विचारधारेचा पाया असल्याने, जेथे विज्ञान तेथे अज्ञानाला थारा नाही हे वास्तव अवघ्या जगाने स्वीकारले असल्याने (भारत व काही ना निवडक इस्लामी राष्ट्रे वगळता)  तेथे वैश्विक स्तरावर  शांततावादी भूमिकेचा पुरस्कार केला जातो.

'सब्बे सत्था, सुखी होन्तु ' सर्व प्राणीमात्र सुखी होवोत हा संदेश बुद्धविचार सांगतो!  सुख व समाधान  या क्रिया मनुष्यनिर्मित असल्याने कर्मप्रामाण्याशी जोडण्यात आल्या. ' जैसे कर्म तैसे फळ ' हे बुद्धवचनच  आहे.  परंतु भारतात याउलट चित्र निर्माण करण्याचे अश्लाघ्य  प्रयत्न वारंवार झाले. अश्लाघ्यचा प्रमाण मराठी भाषेत निंदनीय म्हणजेच अप्रशंसनीय असा अर्थ होतो. ही अश्लघ्यता निर्माण होण्यामागे  कर्मप्रामाण्याऐवजी धर्मप्रामाण्याला दिलेले अवास्तव महत्त्व! धर्मप्रामाण्याच्या या अतिरेकाची पाळेमुळे वैदिक धर्मात रूजली हिंदू धर्मात नव्हेत, हे प्राधान्याने समजून घेतले पाहिजे. चार्वाकानंतर संतपरंपरेद्वारे या प्रामाण्यावर काही प्रमाणात हल्ले झाले. या प्रामाण्यानंतर मुघलांच्या भारत प्रवेशाची पडलेली भर, १७ शतकात मादागास्कर मार्गे भारताच्या पूर्व किनार्‍यावर  आलेले पोर्तुगीज, व पुढे व्यापारानिमित्त झालेल्या इंग्रजांचे आगमन या सर्वांनी त्यांच्यासोबत धर्म आणले. येथे स्थिरस्थावर झाल्यावर यथावकाश महंमदी व ख्रिस्ती धर्माची पाळेमुळे रूजत गेली. एकूणच हे तीनही धर्म चमत्कारावर उभे राहिले. देव, प्रेषिताच्या आज्ञेवर श्रद्धायुक विश्वास हा या धर्माचा डोलारा उभा राहिला. प्रारंभी राजा हाच सर्व काही अशी भूमिका असलेल्या धार्मिक विचारांची जागा कालांतराने दैववादाने घेतली ती आजतागायत कायम आहे. आर्य कौटिल्य चाणक्य उर्फ विष्णूगुप्त याचा श्लोक प्रसिद्ध आहे. राजा हाच सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगताना कौटिल्य एके ठिकाणी लिहितो,

धर्ममुलत्वात्कांमच्चफलं, 
यथार्थ सिद्धी सः सर्वार्थ सिद्धी ।।

 या संस्कृत श्लोकाचा शब्दशः अर्थ असा सांगता येईल की,प्रचंड पैसा, (अर्थ) व त्कामच्च म्हणजेच सेक्स-मनसोक्त कामक्रीडा ही सिद्धी राजाला प्राप्त होणे हीच सर्वात मोठी सिद्धी होय! 

या एका श्लोकावर लिहायचे म्हटले तर स्वतंत्र असा प्रदीर्घ लेख तयार होईल. भारतीय समाजरचनेला अभिप्रेत असलेल्या संस्कृतीला भ्रष्ट करण्याचे काम झाले ते ह्या व अशाप्रकारच्या भूमिकांमुळेच. कथाकल्पतरूच्या शाब्दिक वृक्षांची लागवड करुन पुराणे  निर्माण करण्यात आली. यातूनच देवांची निर्मिती झाली. सध्या जिच्याबद्दल राजकीय प्रांगणात वादळी चर्चा सुरू आहे, ती सरस्वती देखील काल्पनिकतेचेच एक अपत्य म्हणता येईल. मानववंश शास्त्र, अद्भुतरम्यवाद ( Romanticism) व गूढवाद (Mysticism) या तत्वज्ञानाच्या शाखांनी देव ही संकल्पना नैसर्गिक बदलामुळे निर्माण झाल्याचे सिद्ध केले.  भय व भीतीपोटी मानवाच्या प्रारंभिक अवस्थेच्या परिणामातून श्रद्धेचा उगम झाला. कारण आशावाद, जगण्याची उमेद, दुर्दम्य इच्छाशक्ती ही सर्व मनुष्याच्या जगण्याची साधने होती! परंतु मनुष्य विकसित होत गेला, तसा त्याने काल्पनिकवादाला म्हणजेच अवास्तवाला घट्ट कवटाळले. देवीदेवतांच्या असोत किंवा प्रेषित असोत, या सगळ्यांचा जनक मनुष्यच राहिला! वैज्ञानिकांनी हे वारंवार जाहीर केल्यानंतरही

यामागील सत्यता पडताळून पाहण्याची तसदी न घेता, धार्मिकतेशी संबंध जोडून, आपण जे काही आहोत, ते फक्त आणि फक्त देवांमुळेच अशा निष्ठा तयार झाल्या. अवतारवादी नावाच्या श्रद्धेने  मनुष्याच्या मनात इतके घट्ट स्थान निर्माण केले की, पुढे याच श्रद्धेला महोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले. या श्रद्धांवर राष्ट्रपिता जोतिबा फुले , अय्यावारू, दक्षिणेत पेरियार रामस्वामी नारकर डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार के.सि. ठाकरे बोले,घुले गद्रे या साऱ्या मंडळींनी कडाडून विरोध केला. त्यांनी देवाचे अस्तित्वच नाकारले. पेरियार स्वामींच्या पुतळ्याखालील पाटीवर असलेले, ' देशावरील विश्वास हेच विषमतेचे कारण होय. " हे वाक्य काढून टाकण्याची मागणी पेरियार विरोधकांनी केली असता,  स्वामींच्या समर्थकांनी प्रकरण कोर्टात नेले. मद्रास न्यायालयात हे प्रकरण खूप गाजले. न्यायमूर्ती एस. मणिकुमार, आणि न्यायमूर्ती  सुब्रह्मण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालात स्पष्ट म्हटले आहे की,

 " देवावर विश्वास हेच समाजातील विषमतेचे कारण हे पेरियार यांचे मत होते. परियार नास्तिक होते, आणि त्याबाबतचे विचार आणि लेखन यात पुरेशी स्पष्टता आहे!"

ह्याच वैचारिक विषमतेने महाराष्ट्रात सध्या डोके वर काढले असून, धर्मप्रामाण्याच्या आडून धर्मांधता धुडगूस घालीत आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी अलीकडेच विणाधारी सरस्वतीविषयी विधान केले,  " शाळेत सरस्वती आणि शारदामातेचचे फोटो हवेत कशाला? ज्यांना तुम्ही पाहिले नाही, ज्यांनी तुम्हाला शिकविले नाही, त्याची पूजा कशाला करायची. शाळेत फोटो लावायचे असतील तर फुले-शाहु-आंबेडकर या महामानवांचे लावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावा. शाळेत सरस्वतीऐवजी सावित्रीमाईंंची पूजा करा!"

भुजबळ यांच्या या वक्तव्यावर भाजपचे आमदार राम कदम यांनी आक्षेप घेतला. सोशल मिडियावर समर्थक-विरोधकांनी शाब्दिक तलवारी म्यानातून बाहेर काढल्या. सर्वात कळस म्हणजे दुसरा दिवस उजाडण्याची वाट न पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, " सरस्वतीची प्रतिमा काढून टाकली जाणार नाही." असे जाहीर करून, एका वाक्यात विषयच संपवून टाकला! श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन शब्दांच्या कैफात समाज सापडला असून, ज्ञान-विज्ञान यात फरक असतो, याचा विचार करण्याची त्याला गरज भासत नाही. ज्ञानाच्या कक्षा त्या,त्या विषयापुरत्या मर्यादित असतात, पण विज्ञान याला अपवाद ठरावे. विज्ञान सत्यतेवर अवलंबून असते, हेच मानायला समाजमन सहजासहजी तयार होत नाही. भूमिका प्रचोदक म्हणजेच पुढे नेणारी असावी. तर्कवादाशी सुसंगत आणि डोळस असायलाच हवी. देवी सरस्वती हे दैवत आहे हे आपण क्षणभर मान्य केले. मनुष्याला आवश्यक ते ज्ञान प्राप्त झाले ते त्याच्या बुद्धीसामर्थ्यावर असे मानववंशशास्त्र सांगते. किंबहुना भूगर्भशास्त्रज्ञांनीही याला वारंवार दुजोरा दिला, पण धर्मप्रामाण्य याला मानत नाही. अंधानुकरण म्हणतात ते हेच! विज्ञान व्यवहारवादी म्हणजे कृतीप्रवण असते.  

' प्रॅक्टिकल ' ला विज्ञान प्राधान्य देते. सावित्रीमाईं फुले ही एक विचारधारा असून, सावित्रीमाईंनी प्रथम  सामाजिक मनाचा अभ्यास केला. विषमतावादी भूमिकेविरोधात बंड पुकारले. त्यातूनच बहुजनांच्या शैक्षणिक प्रक्रियेचा व संधीचा पाया घातला गेला. ज्याची इतिहासाला सुद्धा नोंद घेणे भाग पडले! देवी सरस्वतीबाबत असे काही सांगता येईल का? विणाधारी सरस्वतीने किती शाळा काढल्या?  तिच्या पहिल्या शाळेचे नाव काय? तसेच पहिल्या विद्यार्थीनीचे व  विद्यार्थ्याचे नाव काय होते? कोणत्या वर्षात, कोणत्या गावात, शहरात, नगरात शाळेची स्थापना झाली? असे अनेक प्रश्न  निर्माण झाल्यास त्यांची उत्तरे देता येत नसतील तर मग, त्याबाबत खल कशासाठी? वास्तव स्विकारता येत नसेल किंवा त्याचे स्पष्टीकरण देण्याइतका सबळ पुरावाच उपलब्ध नसल्यास अकारण त्रागा करण्यापेक्षा शांत राहणेच चांगले. जबाबदार म्हणविणारेच जर वस्तुस्थितीकडे पाठ फिरवून दंड थोपटण्याची भाषा करत असतील तर अशा अंधभक्तांचे समर्थक चेकाळणारच की!

    अभिनिवेश आणि अभिव्यक्ती यांची एकाचवेळी गळचेपी

श्रद्धेच्या या अतिरेकाने सामाजिक अभिनिवेश आणि अभिव्यक्ती यांची अत्यंत क्रूरपणे गळचेपी करण्यात आली हे वास्तव आपण स्विकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. आडमुठेपणा असला की,  नवमतवादाचा मुडदा कसा पाडता येईल यात वाकबगार असलेले धर्माचे ठेकेदार हरतऱ्हेचा मार्ग शोधत असतात.  त्यांना आधुनिकता हवी असते, पण भौत्तिकवादाशी  संबंधित अशी व्यवहारवादी तडजोड करणारी भूमिका या अर्थाने! उदा. राहणीमान, फॅशनेबल  कपडे,  परदेशी राष्ट्रांनी तयार केलेली महागडी उपकरणे,  यांत्रिकी वस्तू इत्यादींची सोय वगैरे.... जगण्यासाठी आवश्यक ती साधने म्हणून न पाहता, चंगळवादी भूमिकांचा स्वीकार करण्याकडे असलेला कल असा नवा फंडा, विचार समाजात रूढ बनू पाहतोय! त्याचवेळी प्रचोदकवादी विचारप्रणालीची खांडोळी होत आहे याकडे मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणे अशा दुहेरी मानसिकतेत समाज वावरत आहे. प्रचोदकवादी या शब्दाचा अर्थचमुळी 'अभ्युदय ' असा आहे हे अनेकांना माहितही नसेल! गायत्री मंत्रातील शेवटी शेवटी येणारा प्रचोदयात हा शब्द आठवून पहा म्हणजे माझे म्हणणे लक्षात येईल. 

महामानव विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मंगळवार,दि.२२ एप्रिल १९२७ रोजीच्या, ' बहिष्कृत भारत ' च्या अग्रलेखात स्पष्ट लिहितात,  हिंदू धर्माची दोन अंगे आहेत, १) तत्वज्ञान धर्म आणि २) आचरण धर्म...तत्वज्ञानात समता ठासून भरलेली, पण आचरणात मात्र कमालीची विषमता. नेमके याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. धर्मांधता कळस गाठत असताना, धर्मप्रामाण्यवाद्यांच्या पलायनवादी भूमिकेचा परामर्श  घेताना  पत्रकार  सुबोध शाक्यरत्न यांनी उपमुख्यमंत्री यांच्या  'आम्ही हिंदू असल्याच्या ' विधानावर प्रश्न विचारला आहे. " सारस्वतांच्या सरस्वतीचा आणि हिंदुंचा संबंध काय?  झिजिया कर माफ व्हावा म्हणून मुघलांपुढे नांग्या टाकत, " आम्ही हिंदू नाहीत " म्हणविणारे हिंदू कसे"?

           सामाजिक ' अभिनिवेश ' दुसरे तिसरे काही नसून, १) मनावर होणारा परिणाम, उमटू पाहणारा ठसा, २)  एका विशिष्ट गोष्टींमुळे निर्माण होणारा अहंकार तर प्रकटीकरणाचे दुसरे प्रारूप म्हणजे अभिव्यक्ती (expression) या अर्थाने या दोन्ही शब्दांकडे पाहिले जाते. प्रत्यक्षात वरील दोन्ही शब्दांची प्रामाण्याच्या व  स्वमताचा अतिरेक व अट्टहासामुळे इतकी गळचेपी झाली की,  समन्वयाचे पावलोगणिक मुडदे पडत गेले. हा नियम एका धर्मासाठी नसून सर्व धर्मांच्या अनुयायांना तंतोतंत लागू पडतो. सामाजिक व धार्मिक तणाव निर्माण होण्यास  अशा कितीतरी गोष्टी जबाबदार आहेत.  हे का आणि कशामुळे झाले? यामागे अज्ञानवृत्ती तर आहेच, पण पराकोटीचा द्वेष अहंकारही तितकाच जबाबदार आहे. स्वधर्मश्रेष्ठत्वाचा हा अहंकार इतर धर्म व  समाज घटकांना नेहमीच तुच्छ मानत गेला. या प्रामाण्याच्या अतिरेकावर महामानवांनी कडाडून टीका केली. आयुष्याच्या अंतापर्यंत ते लढत राहिले. परंतु महामानवांच्या विचारप्रणालीचा आदर करणाऱ्यांनी, सुधारकांच्या भूमिकांना पुढे नेण्याची तयारी असणाऱ्यांनी महामानवांना दुय्यम मानले नसले तरी महामानवांना अभिप्रेत असलेला विचार समाजात प्रवसण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना या मंडळींना राबविता आल्या नाहीत. ज्यांनी प्रयत्न केला, त्यांच्या धर्मप्रामाण्यवाद्यांनी टाचा तोडल्या. 

डॉ.नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गीसर, पत्रकार गौरी लंकेश यांच्या नियोजनबद्ध करण्यात आलेल्या हत्या ही  वानगीदाखल उदा.पुरेशी आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट ही की, कालपरवापर्यंत आंबेडकरवाद्यांच्या  विचारपीठावर येऊन धर्मांधतेवर प्रहार करणारे बहुजनवर्गातील विचारवंत, भुजबळांच्या विधानानंतर व्यक्त होतील, ओबीसी प्रवर्गातील एका नेत्याच्या मागे उभे राहतील अशी आम्ही अटकळ बांधली. विशेषतः अमोल मानकरी बोलतील असे गृहीत धरलेले.  परंतु बहुजनवर्गाच्या उंबरठ्याबाहेर कशी चिडीचूप दिसली. दोन दिवस उलटल्यावर तरी  घराचे दरवाजे उघडतील व  बहुजनवादी विचारवंतांना अभिप्रेत असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपी विरोधात कोणी तरी व्यक्त होईल....पण सर्वत्र अंधारच दिसल्याने मंडळी नैराश्याच्या गर्तेत गटांगळ्या खातात की काय असा प्रश्न पडावा! नाहीतरी परिवर्तनवाद्यांनी पेरल्याशिवाय उगवत नाही असे मोठ्या खेदाने म्हणावे लागतेय, त्याला आमचा नाईलाज आहे. परिवर्तनवाद्यांच्या पागोळ्याखाली पवित्र झालेल्या बहुजनवाद्यांनो आतातरी बाहेर या. क्रांतीचे पडघम आपली वाट पाहत आहेत.

------------------------------------------------------

गुणाजी काजिर्डेकर, चेंबूर मुंबई
93236 32320टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA