मानव धर्माचा साज : सत्यशोधक समाज!


 शिक्षणसम्राट महात्मा जोतिरावजी फुलेंनी दि.२४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. वर्षातून कार्यकारिणीच्या सर्वसाधारण चार सभा, लोकशाही पद्धतीने कार्यकारी मंडळाची निवड व बहुमताने निर्णय, अशी सर्वसाधारण सूत्रे होती. सुरूवातीस दर रविवारी डॉ.गावडे यांच्याकडे अनौपचारिकरीत्या मंडळी जमत. समाजापुढील प्रश्न, सोडवणुकीचे उपाय व सद्य:स्थिती यांविषयी चर्चा होत आणि दर पंधरा दिवसांतून एक व्याख्यान असा उपक्रम असे. सत्यशोधक समाजातील व्यक्तींनी काही सूत्रे काटेकोरपणे पाळावीत, अशी भूमिका ठरली. त्या प्रतिज्ञा- १) ईश्वर- निर्मिक एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार व सत्यरूप आहे आणि सर्व माणसे त्याची लेकरे आहेत. या निर्मिकाशिवाय मी इतर कशाचीही पूजा करणार नाही. २) निर्मिकाची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही. ३) माणूस जातीने श्रेष्ठ ठरत नसून कर्मगुणांनी श्रेष्ठ ठरतो. ४) निर्मिक सावयव रूपाने अवतरत नाही. ५) पुनर्जन्म, परलोक, मोक्ष, कर्मकांड, जपतप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत. त्यांचा अवलंब माझ्याकडून होणार नाही. ६) जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही. ७) दारूच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचे मी प्रयत्न करीन आणि ८) समाजाचा खर्च चालावा म्हणून मी माझ्या उत्पन्नातून काही वर्गणी देईन.

"भटीण शुद्रांची करीना मजुरी।। काढणी न करी।। शेतामध्ये।।१।।
शुद्रांचीया खळीं मजुरी करीना।। नखरा सोडीना।। जोती म्हणे।।४।।" 
(पवित्र अखंडादी काव्यरचना: विभाग-६ - कुळंबीण: अखंड क्र.१२).
        जमीनदार, शेटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून, गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. "निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक! भांडणे अनेक कशासाठी?" हा विचार म.फुले यांनी मांडला. देवाविषयी किंवा निसर्गाविषयी निर्मिक हा शब्द वापरला, त्यावरुन सत्यशोधक समाज अर्थातच म.जोतिबा फुले आस्तिक होते, हे स्पष्ट होते. त्यांनी कनिष्ठ वर्गातील लोकांसाठी गुलामगिरी हा उपदेशपर ग्रंथ लिहिला. त्यानंतर महाराष्ट्रात पंतोजी व शेटजींच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी चळवळ सुरू करण्याचा निर्धार केला. महात्मा जोतिबा फुले हे क्रांतिकारी नेते असल्याने त्यांच्या वृत्तीशी सुसंगत व धोरणाला पोषक असे तत्त्वज्ञान तथा विचारमंच निर्माण करणे, त्यांना अत्यंत गरजेचे वाटले. यातूनच सत्यशोधक समाजाची निर्मिती झाली. सत्यशोधक समाजाचे तत्त्वज्ञान मानताना एकेश्वरवाद, ईश्वरभक्ती, व्यक्तीचे श्रेष्ठत्व त्याचप्रमाणे ग्रंथप्रामाण्याला विरोध असावा. सत्य हेच परम लक्ष्य व मानवी सद्गुणांची जोपासना करणे, अशाप्रकारे वैचारिक आणि प्राथमिक भूमिका घेऊन सत्यशोधक समाजाने आपले तत्वज्ञान मांडले.

 ईश्वराची भक्ती ही निरपेक्ष भावनेने असावी. त्यामध्ये मध्यस्थाची अथवा बट भिक्षूची आवश्यकता नाही, याचे प्रतिपादन सत्यशोधक समाजाने केले. त्याचप्रमाणे व्यक्ती ही जन्माने श्रेष्ठ नसून ती गुणकर्माने श्रेष्ठ ठरते. याचे स्पष्टीकरणही सत्यशोधक समाजाने दिले. पाप-पुण्य, स्वर्ग-नरक व पुनर्जन्म या गोष्टीला त्यांनी थारा दिला नाही. तर सत्य हेच परब्रह्म आहे, अशा प्रकारचा विचार सत्यशोधक समाजाने मांडला. मानवाच्या अंगी असलेल्या सद्गुणांची जोपासना व्हावी, हा विचार दृढ करण्याचा प्रयत्न सत्यशोधक समाजाने केला.
 "काया पुरती लंगोटी। फिरती नांगराचे पाठी।।१।।
एका घोंगड्यावांचूनी। स्त्रियां नसे दुजे शयनी।।२।। 
ढोरांमागे सर्वकाळ। पोरें फिरती रानोमाळ।।३।। 
ताक कण्या पोटभरी। धन्य म्हणे तो संसारी।।४।।" 
(पवित्र म.फुले समग्र वाङ्मय: गुलामगिरी: अभंग १ला). 

      सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो तो हा- सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथामध्ये म.फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या विचारांना प्रस्तूत केले आहे. मानवता धर्माची शिकवण सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला गेला. सामाजिक परिवर्तनाची दिशा ठरवताना सत्यशोधक समाजाने समाजातील दीनदलित उपेक्षीत समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. सत्यशोधक समाजातर्फे 'दीनबंधू' नावाचे एक साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालविले जात असे. या वृत्तपत्राचे संपादक कृष्णराव भालेराव हे होते. त्यांनी दि.१ जानेवारी १८७७मध्ये पुणे येथे स्थापन केले होते. हे वृत्तपत्र मराठी भाषेत होते. लोकशिक्षण व लोकजागृती प्रभावी माध्यम म्हणून दिनबंधुचा उल्लेख करावा लागतो. 

"सर्वसाक्षी जगत्पती। त्याला नकोच मध्यस्ती॥" हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे आवश्यक सुधारणा अशी करण्यात आली- पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. त्यासाठी मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाजाचे मुंबई शाखेचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे हे होते. इ.स १८९०मध्ये यांनी दिनबंधु या वृत्तपत्राचे संपादन आणि मुद्रण मुंबई येथून केले.
पोटीं बाळगून जन्म त्यास दिला।। पाजीला पोशीला।। माऊलीनें।।१।। 
आर्यपाखंडानें माते कष्ट देती।। अधोगती जाती।। जोती म्हणे।।४।।" 
(पवित्र अखंडादी काव्यरचना: विभाग-१ - मानवी स्त्रीपुरुष: काव्य क्र.१६)

      कमीअधिक प्रमाणात सत्यशोधक चळवळ झपाट्याने, काही वेळा मंदपणे फोफावत असली, तरी सत्यशोधक समाजाच्या वतीने तिच्या ध्येय-उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीच चळवळीचे हे महायान सुरू होते. लोकजागरण, लोकप्रबोधन, लोकसंघटन आणि नव समाजनिर्मिती या सत्यशोधक समाजाच्या ध्येयसिद्धीसाठी हा सारा खटाटोप व उभा प्रयास होता. सन १८७३मध्ये सत्यशोधक समाजाची म.फुले यांनी स्थापना केली, मात्र समाज अधिवेशनांची सुरूवात सन १९११पासून झाली. तर सन २००७पर्यंत सत्यशोधक समाजाची एकूण ३५ अधिवेशने संपन्न झाली. पहिले अधिवेशन १७ एप्रिल १९११रोजी पुणे येथे स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू यांच्या अध्यक्षतेने पार पडले. त्याच्या स्वागताध्यक्ष पदी गणपतराव बिरमल होते. पस्तीसावे अधिवेशन २२ डिसेंबर २००७ रोजी गेवराई जिल्हा बीड, मराठवाडा येथे डॉ.आ.ह.साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. मराठवाडा सार्वजनिक सभेचे अध्यक्ष पद्माकरराव मुळे यांनी स्वागताध्यक्ष पद भूषविले होते. 
 !! समस्त बहुजन वर्गातील बंधुभगिनींना सत्यशोधक समाज स्थापना दिनाच्या सप्ताहभर हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!  

                         
 कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी- सत्यशोधक.   ९४२३७१४८८३
 मु. एकता चौक- रामनगर, गडचिरोली. ता. जि. गडचिरोली,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1