शिवाजी पार्क शिवसेनेचेचं
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास हायकोर्टाची परवानगी
मुंबई हायकोर्टाने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसेनेला परवानगी दिली आहे. अर्ज नाकारण्याचा पालिकेचा अधिकार योग्य आहे मात्र, पालिकेचा निर्णय वास्तविकतेला धरुन नसल्याचेही उच्च न्यायालय म्हणाले. तसेच, आमच्या मते पालिकेनं अधिकाराचा गैरवापर केला आहे आहे. अशा शब्दात उच्च न्यायालयाने पालिकेला सुनावले. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अनेक वर्ष सुरु आहे. सरकारकडून शिवाजी पार्कवर ४५ दिवस कार्यक्रमासाठी राखून ठेवलं आहेत. असही हायकोर्टाने आपल्या निकालात नमूद केलं आहे. सदा सरवणकर यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. तर शिवसेनेच्या युक्तिवादाशी न्यायालय सहमत असल्याचे स्पष्ट केले. खरी शिवसेना कोणाची यावर आम्ही भाष्य करत नाही. तो निर्णय अजून प्रलंबित आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणाच हा मुद्दा आजचा नाही. असेही न्यायालयाने निकाल वाचण्यापूर्वी स्पष्ट केले.
तीन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पक्षाला आणि नेतृ्त्वाला दिलासा देणारी बाब घडली आहे. कारण शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा शिवसेनेचा मार्ग खुला झाला असून आता खऱ्या अर्थाने तयारी सुरु झाली आहे. उच्च न्यायालयाने कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही सरकारकडे दिली असली तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे की, दसरा मेळावा ही शिवसेनेची गेल्या 66 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे या तेजस्वी उत्सवाला गालबोट लागू नये. शिवाय विजय सत्याचाच म्हणत आगामी काळातही सर्वकाही सुरळीत होईल असा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी जेवढी सरकारची आहे तेवढीच शिवसैनिकांची आहे. अनेक अडचणींवर मात करुन यंदाचा मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे राज्यभरातून शिवसैनिक हे शिवतीर्थाकडे येतील. त्यामुळे उत्साहाच्या गुलालाची उधळण असू द्या पण त्यामुळे अनुचित प्रकार घडणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे. न्यायदेवताच्या निर्णयामुळे लोकशाहीचा विजय झाला आहे. आजच्या निर्णयामुळे न्यायदेवतेवरील विश्वास सार्थ ठरला आहे. आता सुप्रीम कोर्टाचा निकालही लोकशाहीचे भवितव्य ठरणारा असणार आहे. त्यावर आताच काही सांगता येणार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
शिवसेनेचे पदाधिकारी या नात्यानं अनिल देसाई यांनी पालिकेकडे रितसर परवानगी मागितली होती. मात्र पालिकेनं कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव ती नाकारली. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणं ही शिवसेनेची परंपरा आहे. जर अचानक कुणी दुसरा तिथं त्याच दिवशी मेळावा घेतो म्हणतोय तर सारी प्रक्रिया थांबवणं अयोग्य आहे. गेली अनेक वर्ष पक्ष तिथं कार्यक्रम घेतोय तर तो त्यांचा अधिकारच आहे. कुणी दुसरा राजकीय पक्ष परवानगी मागत आलेला नाही, केवळ स्थानिक आमदार सरवणकर तिथं परवानगी मागत आहेत. त्यानंतर उच्च न्यायालयाने सवाल उपस्थित केला. साल 2016 च्या आदेशांत अन्य कुणी परवानगी मागू नये असं म्हटलंय का?, नाही, तसं काही म्हटलेलं नाही असं युक्तीवाद चिनॉय यांनी न्यायालयात केला.
पहिला अर्ज कोणी केला? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला असता सरवणकर यांनी 30 ऑगस्टला केलाय, तर शिवसेनेनं 22 आणि 26 ऑगस्टला अर्ज केलाय. अनिल देसाईंचे दोन अर्ज पालिकेकडे आलेत. असा युक्तिवाद चिनॉय यांनी केला असता. पण फर्स्ट कम फर्स्ट हा नियम इथं लागू होत नसल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे. जर पोलीस एका आमदाराला आवरू शकत नाहीत तर मग काय उपयोग? असा युक्तिवाद सेनेने केला. यापूर्वी शिवाजी पार्कवर ध्वनी प्रदुषणाचा मुद्दा असायचा. पण साल 2016 नंतर ते मुद्दे उरले नाहीत. 2016 चा आदेशच परवानगी देण्याकरता पुरेसा असल्याचा युक्तिवाद शिवसेनेने केला.
दसऱ्याच्या दिवशी होणारा मेळावा हा शिवसैनिकांचा आहे. ज्या ठिकाणी शिवसैनिक जमणार ते शिवतीर्थ आहे. मेळाव्याला चांगल्या विचाराची बाळासाहेबांच्या विचारांची गरज आहे. त्यामुळे हा मेळावा जल्लोष होणार असल्याची माहिती किरण पावसकर यांनी दिली आहे.
उच्च न्यायालयाने शिवसेनेला परवानगी दिल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी जल्लोष केला. काही ठिकाणी पेढे वाटले. तर काही ठिकाणी गुलालाची उधळण करत शिवसैनिकांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात देखील शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला. मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात ठाकरे गटातील शिवसैनिकांनी आतिषबाजी केली. जळगावत पेढे वाटप करत फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला. तळकोकणातील शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांच्या होम ग्राउंडवर सावंतवाडीत शिवसैनिकांनी जल्लोष करत फटाक्यांची आतोषबाजी केली. पुण्यात शिवसैनिकांनी फटाके फोडत जल्लोष केलाय. मुंबईत मातोश्रीवर देखील जल्लोष साजरा करण्यात आला. मातोश्रीवर मोठ्या प्रमाणावर महिला शिवसैनिक उपस्थित होत्या. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी महिला कार्यकर्त्यांसोबत सेलिब्रेशन केलं. आज रश्मी ठाकरे यांचा वाढदिवस असल्यानं त्यांना महिला शिवसैनिकांनी शुभेच्छा दिल्या. शिवाय जोरदार घोषणाबाजीही केली.
* दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणं ही शिवसेनेची परंपरा
* 2016 चा आदेशच आम्हाला परवानगी देण्याकरता पुरेसा असल्याचा शिवसेनेचा युक्तीवाद.
* पालिकेचा निर्णय वास्तविकतेला धरुन नसल्याचे उच्च न्यायालय मत
0 टिप्पण्या