Top Post Ad

बुद्धकालीन पर्यटन स्थळे

महापरिनिर्वाण सुत्रामध्ये तथागत बुद्ध आनंदास म्हणतात की, आनंद श्रद्धाळू , शिलसंपन्न पुरुष  व महिलांसाठी चार स्थाने दर्शनीय व वैराग्यपद आहे.

  • 1)जेथे बोधिसत्व जन्माला आले.
  • 2)जेथे तथागताने सम्यक संबोधिस प्राप्त केले. 
  • 3)जेथे तथागताने धम्मचक्र प्रवर्तन केले.
  • 4)जेथे तथागताचे महापरिनिर्वाण झाले.

कपीलवस्तु

कपीलवस्तु ही प्राचीन शाक्यवंशाची राजधानी होती. सिद्धार्थ गौतम बुद्धांचे वडील शृद्धोधन शाक्य येथील राजे होते. सिद्धार्थ गौतम यांच्या बालपणीच्या आठवणीचे स्थान कपीलवस्तु आहे. हे स्थान भारत नेपाळ सीमेवर लुंबीनी पासुन 24 किलोमीटर दूर दक्षिण- पश्चिमेस आहे. येथे आपणास बुद्धकालीन ऐतिहासिक वास्तूंचे भग्न अवशेष पाहायला मिळतात. या भग्न अवशेषांमुळे आपल्याला सिद्धार्थ गौतमाच्या प्राथमिक बाल जीवनाची माहिती मिळते.


लुंबीनी

राणी महामाया गर्भवती असताना पालखीमधे बसुन देवदह जाण्यासाठी निघाली होती तेव्हा देवदह जाण्यासाठी लुंबीनी वनातुन जावे लागत होते. त्यावेळी लुंबीनी वनामधे शाल वृक्षाचे उद्यानवन होते. माता महामायेचे शालवृक्षाच्या उद्यानवनामधे आगमन झाले तेव्हा फळं आणि फुलांनी बहरलेल्या वृक्षांना पाहुन राणी महामाया प्रसन्न झाली, त्या मनमोहक वातावरणाने राणी महामाया अत्यंत प्रभावित झाली. पालखीतुन उतरुन राणी महामाया एका शाल

वृक्षाजवळ गेली व एका फांदीला पकडले, तेव्हा अचानक राणी महामायेस प्रसव वेदना व्हायला सुरुवात झाली, व 563 इ. पुर्व वैशाखी पोर्णीमेला अतिशय प्रसन्न व निसर्गरम्य वातावरणात सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला. लुंबीनी हे भगवान बुद्धाचे जन्मस्थळ भारत नेपाल सीमेपासुन जवळ जवळ 10 किलोमीटर भैरावास जिल्ह्यामध्ये आहे. याचे वर्तमान नाव 'रुम्मीनदेई' आहे. याठिकाणी तथागत बुद्धांच्या स्मरणार्थ सम्राट अशोक यांनी 'अशोक स्तंभ' निर्माण केला आहे, याची उंची 24 फुट 3 इंच आहे. यावर सम्राट अशोकाचा अभिलेख लिहलेला आहे. याठिकाणी उत्खननात सापडलेल्या विटांचे प्राचीन स्तुप असुन बाजुला आधुनिक 'रुम्मीनदेई विहार' आहे. याच ठिकाणी विहाराच्या दक्षिणेस प्राचीन तलाव आहे जेथे एके काळी बोधिसत्वाच्या जन्म झाल्यावर माता महामायाने स्नान केले होते. 


बुद्धगया

बुद्धगया हे बिहार ची राजधानी पटनाच्या दक्षिण- पुर्वेस 101 किमी. अंतरावर स्थित आहे. बोधगया जिल्ह्यातील छोटे शहर आहे. बुद्धागया जवळील फाल्गु नदीच्या सहाय्यक उपनदीस निरंजना नदी म्हणतात. याच नदीच्या काठावर भगवान बुद्धानी कठोर तप केले होते. या नदीचा उगम हजारीबाग जिल्ह्यात सिमेरीया जवळ आहे. प्राचीन भारतातील मुलनिवासी नागवंशिय लोक या नदीकाठी वसलेले होते. याच नदीकाठी सुजाताने बोधिसत्वाला पिण्यासाठी वाटीभर दुध व खीर दीली होती. या ठिकाणी एके काळी सुजाता स्तुप होता. येथे उत्खननात काही अवशेष मिळाले आहेत त्यावर देवपालराजस्स सुजातागृह असा लेख आहे, याचाच अर्थ सुजाताच्या स्मरणार्थ बनविलेला स्तुप हा राजा देवपाल यांच्या शासन काळातील असावा. सुजाता कुटी पासुन काही अंतरावर नदी किनारी छोटा बुद्ध विहार आहे या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाने वाटी नदीमध्ये प्रवाहित करून भावी बुद्धत्वाची परीक्षा घेतली होती.

उरूवेला येथुन निरंजना नदीच्या काठावर आल्यावर सिद्धार्थ गौतम पिंपळाच्या झाडाखाली पद्मासन लाऊन बसले.  याच दरम्यान शरीर व चित्ताच्या ध्यानाची भावना केल्याने सिद्धार्थ  गौतमास जन्म व मृत्यूच्या पलीकडील सत्याचा साक्षात्कार झाला. सिद्धार्थ गौतमाने जाणुन घेतले की समस्त संसार दुःखी का आहे. आज्ञानाचे कारण काय आहे. लोभ, तृष्णा व अंहकारामुळे काय नुकसान होत आहे. दुःखाच निवारण कसं करायचं. या सर्वांना तथागताने चार आर्यसत्य' असे नाव दिले. सम्यक संबोधि प्राप्त केल्यानंतर भगवान बुद्धांनी संपुर्ण पहिला आठवडा बोधिवृक्षाखाली समाधी अवस्थेत व्यतीत केला. हा बोधिवृक्ष बोधगया महाविहाराच्या पश्चिमेस आहे. या बोधिवृक्षाची एक शाखा श्रीलंकेच्या अनुराधापुर' मधे आहे. बोधिवृक्ष व महाविहार यांच्या मधे भगवान बुद्धाचे साधना स्थळ वज्रासन आहे. चीनी बौद्ध यात्री 'युवान शुवांग' म्हणतात की भगवान बुद्धाचे साधना स्थळ 'वज्रासन' समस्त विश्वाच्या मध्यम भागात स्थित आहे. दुसरा आठवडा भगवान बुद्धांनी समाधी अवस्थेत व्यतीत केला. याच ठिकाणी 'अनिमेषलोचनस्तुप' बनवला गेला आहे. कारण याच आठवड्यात भगवान बुद्ध बोधिवृक्षा विषयी परोपकारी भावना व्यक्त करत बोधिवृक्षाला एकटक बघत राहिले होते. तथागताने तिसरा आठवडा चंक्रमण करत व्यतीत केला. महाविहाराजवळ या घटनेच्या स्मरणार्थ 'चंक्रमण स्थळाचा चबुतरा' बनवण्यात आला आहे. हा चंक्रमण चबुतरा 53 फुट लांब, 3 फुट 6 इंच रूंद व 3 फुट उंच आहे. भगवान बुद्धाच्या पाऊलांचे ठसे प्रदर्शित करण्यासाठी त्यावर कमळाचे फुल बनवले गेले आहेत. चौथा आठवडा भगवान बुद्धांनी रतनगृह येथे ध्यानमग्न अवस्थेत व्यतीत केला. पाचवा आठवडा भगवान बुद्धांनी 'आजपाल निग्रोध' झाडाखाली समाधी अवस्थेत व्यतीत केला. सहावा आठवडा भगवान बुद्धांनी 'मुचिलींद' तळ्याजवळ मुचिलींद वृक्षाच्या सावलीत व्यतीत केला. सातवा व अंतिम आठवडा भगवान बुद्धांनी 'राजायतन' वृक्षाखाली समाधीस्त अवस्थेत व्यतीत केला. आज आपण जो वृक्ष बघतो, तो 60 वर्षापुर्वी 'बरमा' येथुन आणलेला वृक्ष आहे. याच ठिकाणी उत्कल म्हणजेच उडीसा येथील व्यापारी बंधू तपस्सु व भल्लीक यांना भगवान बुद्धानी बुद्ध व धम्माची शरण दिली होती. तपस्सु व भल्लीक दोघेही व्यापारी बंधू तथागताचे पहिले उपासक शिष्य बनले होते.

सारनाथ

वाराणसीच्या पुर्व-उत्तरेस 10 किमी. दुरवर सारनाथ स्थान स्थित आहे. 

बुद्धत्व प्राप्तीनंतर भगवान बुद्धानी प्रथम उपदेश सारनाथ येथील मृगदाय वनामधे पंचवर्गीय भिक्षुंना दिला. यामध्ये चार आर्य सत्य, मध्यम मार्ग व जीवनातील कोणत्याही अतीरेकापासुन दुर राहणे व दुःखाला जाणून घेण्याचा उपदेश दिला. या प्रथम उपदेशास धम्मचक्र प्रवर्तन' असे म्हणतात. यानंतर तथागत बुद्धानी मृगदाय वनामधील मुलगंध कुटीमधे निवास केला. मुलगंध कुटीच्या पश्चिमेस सम्राट अशोक कालीन अशोक स्तंभ आहे, यावर तीन अभिलेख कोरलेले आहेत. सारनाथ मधे धम्म चक्र प्रवर्तन केल्यानंतर वाराणसी मधील अनेक लोक संघामधे दिक्षीत झाले. वाराणसी मधील काश्यप बंधुनी बुद्ध धम्माचा पुष्कळ प्रचार आणि प्रसार केला. वाराणसी मधे ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी उपदेश दिले त्या सर्व ठिकाणी बौद्ध स्मारक बनविले गेले होते. 


राजगीर

पटनापासुन जवळ जवळ 100 किलोमीटर दूर असलेल्या बौद्ध तीर्थक्षेत्रास राजगीर म्हणतात. प्राचीन काळातील 16 भारतीय जनपदापैकी राजगीर एक होते, त्यास त्यावेळी 'राजगृह' म्हटले जायचे. या ठिकाणी मगध वंशाचे शक्तिशाली राजे बिंबीसार यांचे शासन होते. राजा बिंबीसार यांनी आपले आवडते उद्यान  वेळुवन विहार भगवान बुद्धास दान दिले होते.  याचठिकाणी राजवैद्य जीवक यांनी आपले आम्रवन तथागत बुद्ध व भिक्षुसंघासाठी दान दिले होते. भगवान बुद्धाचा चुलत भाऊ देवदत्त याने भगवान बुद्धावर केलेल्या प्राणघातक हल्ल्याचे स्थान देखील राजगीर  हेच आहे.

ग्रुध्दकुट पर्वतावरुन मोठा दगड देवदत्ताने भगवान बुद्धांच्या अंगावर ढकलून दिला होता पण तो दगड  तथागताच्या पायाच्या बोटाला किरकोळ नुकसान करुन दुर जाउन पडला होता.

देवदत्ताने चुगली करून आजातशत्रुच्या मनात भगवान बुद्ध व वडील बिंबीसार यांविषयी द्वेष निर्माण केला.

राजा बिंबीसार यांचा मुलगा आजातशत्रु यांने पीता बिंबीसार यांची हत्या केली. त्यानंतर आजातशत्रुचा मुलगा उदयने आजातशत्रुची हत्या केली, यानंतर उदयचा मुलगा महामुंडने उदयची हत्या केली. पितृहत्येचे पापं याच जन्मात सर्वांना भोगले. लिच्छवींनी जेव्हा दुष्काळ निवारणासाठी तथागतास वैशाली मधे बोलवले तेव्हा भगवान बुद्धांना त्रास होऊ नये म्हणून राजगृह ते गंगातट पर्यंत रस्ता राजा बिंबीसार यांनी बनवला यास 'राजा बिंबीसार मार्ग' म्हणतात. भगवान बुद्धाचे चुलत भाऊ देवदत्त यांस भिक्षु बनताना बुद्धासारखी प्रतिष्ठा मिळवण्याची खुप लालसा होती. आपल्या महत्वाकांक्षामधे असफल झाल्यावर त्याच्या मनामध्ये घृणा व तिरस्काराने जन्म घेतला. त्यामुळे देवदत्त भगवान बुद्धाच्या विरोधात क्रूर कारवाया करत राहिला.

राजगीर मधील नवीन स्थानास 'नवीन राजगीर' म्हणतात. चीनी बौद्ध यात्री 'फा हियान' यांच्या नुसार नवीन राजगीरची निर्मिती राजा आजातशत्रु यांनी केली होती. वर्तमान काळात याचे भग्न अवशेष पाहावयास मिळतात. सरस्वती नदीच्या पलीकडे सम्राट अशोक यांनी पश्चिमेस स्तुप बनविला होता. पश्चिमेस 3 मीटर खोदकाम केल्यानंतर येथे मौर्य शैलीच्या वीटा व लघुस्तुप सापडले आहेत. वैभार पहाडीच्या पुर्वेस उतारावर जी गुहा आहे त्यास 'पिपलगुहा' म्हणतात. भगवान बुद्धाचे प्रमुख शिष्य महाकाश्यप येथे निवास करत होते, जे प्रथम बौद्ध संगितीचे अध्यक्ष होते. या ठिकाणी 'सप्तकर्णी' गुहेमधे प्रथम धम्म संगिती झाली होती. ग्रुध्दकुट पर्वताजवळील छटागीरी पर्वतासमीप जीवक आम्रवन विहार आहे. हे आम्रवन राजवैद्य जीवक यांनी तथागत व भिक्षुसंघास दान दिले होते. भगवान बुद्ध यांच्या प्रती आपली असीम श्रद्धा व्यक्त करण्यासाठी राजगीरच्या पहाडीवर जपानद्वारा निर्मित भव्य 'शांती स्तुप' आहे. वैभार पर्वताच्या दक्षिणेतील गुहांना 'सोनभंडार गुहा' म्हणतात, या ठिकाणी मगध राज्याचा स्वर्ण व राजकोश सुरक्षित ठेवला जात होता. मुख्य मार्गांपासून दक्षिणेस 1 किमी दुर विटांचे प्राचीन भवन आहे यास 'मणीहार मठ' असे म्हणतात. मणीहार मठ हे बुद्ध कालीन भिक्षु निवास स्थान होते. ही जागा नागवंशिय लोकांसाठी पूजनीय होती. या ठिकाणी उत्खनन होऊन अनेक प्रतिमा मिळाल्या आहेत.


श्रावस्ती

प्राचीन भारतातील श्रावस्ती नगरास आज 'सहेत महेत' म्हटले जाते.  हे उत्तर परदेशातील गुडा व बेहराईक या जिल्ह्यांच्या मध्यभागी स्थित आहे. सहेत मधे प्रसिद्ध प्राचीन जेतवन बौद्ध विहार' आहे. जेतवन विहार अनाथपिंडक श्रेष्ठी यांनी  भगवान बुद्धास भेट दिली होती. जेतवन विहाराची जागा अनाथपिंडक श्रेष्ठी यांनी राजकुमार जेत यांचे कडुन असंख्य स्वर्ण मुद्रा देऊन विकत घेतली होती. जेतवन विहाराच्या आंगणात एक स्तुप व विहीर आहे. भिक्षुसंघासाठी 21 कक्ष आहेत. या ठिकाणी भगवान बुद्ध व भावी बुद्ध मैत्रेय यांची प्रतीमा आहे. जेतवन विहाराच्या उत्तरेस प्राचीन काळात निर्मित 8 स्तुपांचे अवशेष पहावयास मिळतात.


संकिस्सा

उत्तर परदेशातील फरुखाबाद जिल्ह्यातील छोटेसे गाव हे 'संकिस्सा' नावाने ओळखले जाते.  बुद्ध काळात या गावास 'सांकस्य' म्हणत असत. सम्राट अशोक यानी भगवान बुद्धाच्या स्मरणार्थ या ठिकाणी स्मारक बनविले होते. याच ठिकाणी चीनी बौद्ध यात्री 'फा-हियान' यांनी अनेक बौद्ध स्तुप व विहार पाहिले होते. संकिस्सा  येथे उत्खननात सापडलेल्या वस्तू लखनऊ व कोलकत्ता येथील राज्य संग्रहात सुरक्षित ठेवल्या गेल्या आहे.


कौशांबी 

भगवान बुद्धाच्या जीवन काळात महत्वपूर्ण नगरांपैकी कौशांबी एक नगरी होती. कौशांबी वत्स राज्याची राजधानी सुद्धा होती. कौशांबी मधे भगवान बुद्धाचे अनेक वेळा आगमन झाले. याठिकाणी कुकुटाराम व पावारीकाराम आदी प्रसिद्ध विहार होते. सम्राट अशोक यांनी कौशांबी या ठिकाणी शिलालेख व अभिलेख कोरलेले आहेत. 


वैशाली 

वैशाली या नगरीत बुद्ध धम्माशी संबंधित अनेक ऐतिहासिक स्तुपांचे भग्न अवशेष वर्तमान बसाढ नामक ठिकाणाजवळ अस्तित्वात आहे, जे स्थान मुजफ्फरपुर पासुन 20 मधील दुर दक्षिण-पश्चिमेस आहे. वैशाली सिद्धार्थ गौतम बुद्ध कालीन लिच्छवी गणराज्याची राजधानी होती. वैशाली आठ जनपदांचे अर्थात अट्ठकुल चे संयुक्त वज्जीगण संघाची राजधानी होती. वैशाली नगरीस जगातील प्रथम लोकशाही  

असलेली राजधानी असल्याचा सन्मान व गौरव मिळाला आहे. वैशालीच्या कुटागार शाळेत भगवान बुद्धांनी अनेक महत्त्वाचे उपदेश दिले आहेत. भगवान बुद्ध वैशाली मधील बहुपुत्रचैत्य, चापालचैत्य व महावन कुटागार शाळेत नेहमी राहत असतं. वैशाली मधे दुष्काळ पडला असताना भगवान गौतम बुद्धांनी रतन सुत्राचे पठन करून भिषन परिस्थिती मधे सुधारणा घडवून आणली होती. वैशाली मधेच बौद्ध भिक्षुनी संघाची स्थापना झाली होती. वैशाली मधे 8 फुट उंच व जवळ जवळ दीड किलोमीटर क्षेत्रातील परिसरामधील टेकडीस राजा विशाल गढ यांची टेकडी म्हणतात. याच ठिकाणी वज्जीगण राज्य संघाचे सभागृह होते. याठिकाणी 770 सभासद एकत्र येऊन राज्य प्रशासन संदर्भात चर्चा करत असत. टेकडीपासुन जवळजवळ  3.5, किमी दुरवर उत्तर-पश्चिमेस देवांना प्रिय असलेला प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांनी बनविलेला अशोक स्तंभ आहे. या स्तंभावर एकमुखी सिंहाची प्रतिमा विराजमान आहे. अशोक स्तंभाच्या दक्षिणेस प्राचीन तलाव आहे, जो आजकाल रामकुंड नावाने प्रसिद्ध आहे. या तलावाच्या काठी प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांनी बुद्धधम्मावर प्रभावित होऊन बौद्ध स्तुप व स्तंभ बनविला आहे. राजा विशाल गढ या टेकडी पासुन हा स्तुप 2.5 किमी च्या अंतरावर आहे. या स्तुपांचा व्यास त्यावेळी 25 फुट होता, या स्तुपास प्राचीन काळी  लिच्छवी स्तुप असे म्हटले जात होते. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या 100 वर्षानंतर भदंत सब्बकामी यांच्या अध्यक्षतेखाली वैशाली मधेच  इसवी सन पुर्व 383 मधे द्वितीय धम्म संगिती झाली होती. वैशाली मधील प्रसिद्ध गणनाईका आम्रपालीचे निवासस्थान देखील वैशाली नगरी आहे. आम्रपालीने तथागतास व भिक्षुसंघास 35 व्या वर्षावासा दरम्यान भोजन दानासाठी आमंत्रित केले होते. वैशालीमधील अरहंत थेरी विमला ही दुषित जीवनाचा त्याग करून बुद्ध धम्म व संघास शरण आली होती. वैशाली मधील महावन कुटागार शाळेत भगवान बुद्धांनी घोषणा केली होती की आजपासून ठीक तीन महिन्यांनी बुद्ध महापरिनिर्वाणास प्राप्त होतील.


कुशीनगर 

उत्तर प्रदेश मधील देवरीया जिल्ह्यातील कसीया नामक छोट्या गावापासून जवळपास 3× 5.2 ,किमी दुरवर कुशीनगर आहे. याच ठिकाणी भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले. भगवान बुद्ध हिरण्यवती नदीच्या पलीकडील तीरावर कुशीनाराच्या मल्लांच्या शालवनात यमक शाल वृक्षांच्या मधे ठेवलेल्या मंचकावर उत्तरेकडे डोके ठेवून, उजव्या कुशीवर पायावर पाय ठेवून, स्मृती संप्रजन्य राहुन, सिंहशय्या करुन झोपले.

यानंतर भगवान बुद्धानी प्रथम ते चतुर्थ ध्यानाला प्राप्त करून आकाशन्यायतन, विज्ञानन्यायतन, अकिंचन्यायतन, व नैवसंज्ञायतन निरोध समाधीस प्राप्त करून तथागत बुद्ध महापरिनिर्वाणास प्राप्त झाले. भगवान बुद्धाच्या अस्तीधातु व भस्म यांना 8 हिस्स्यांमधे विभाजित करण्यात आले. मगधचा राजा आजातशत्रु, अल्लकप्पाचे वज्जी, राजगृह राज्याचे शाक्य, वैशाली राज्याचे लिच्छवी,  कपीलवस्तु येथील शाक्य, रामग्रामचे कोलीय, वेठ- द्वीपचे ब्राह्मण, पावानगरीचे व कुशीनाराचे मल्ल यांनी भगवान बुद्धाच्या अस्तीं व भस्म यांवर स्तुप व विहार बांधले. कुशीनगर मधे महापरिनिर्वाण स्मारक स्तुप बनविला गेला आहे. यामध्ये भगवान बुद्धाची महापरिनिर्वाण अवस्थेत सिंहशय्या करुन झोपलेली 6 × 1 मीटरची मुर्ती आहे. दक्षिणेस सातव्या शतकात निर्मित छोटे छोटे स्तुप आहेत. महापरिनिर्वाण स्तुप पासुन दक्षिणेस थोड्या अंतरावर भगवान बुद्धाची विशाल मुर्ती असलेले माथाकुवर स्मारक आहे. माथाकुवर स्मारकापासुन 1.5 किमी. अंतरावर टेकडीप्रमाणे प्राचीन स्तुप आहे. या स्तुपाचा व्यास 37 मीटर आहे. याच ठिकाणी भगवान बुद्धाचा चंदनाच्या चितेवर अंत्यविधी करण्यात आला होता, या स्तुपास रामाभार स्तुप (मुकुट बंधनस्तुप) असे म्हणतात. 

 

नागपूर 

भगवान बुद्ध व त्यांचे शिष्य यांच्या शाररीक, उद्देशिक व पारिभोगिक धातुंवर अनेक स्तुप व विहार बनविण्यात आले. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांमुळे बुद्ध धम्माचा प्रकाश संपुर्ण आशिया खंडात पसरला. भगवान बुद्धाचा धम्म आचरणात आणल्याने अनेकांची प्रगती झाली. सम्राट अशोक यांच्या परिनिर्वाणानंतर बुद्ध धम्मास राजाश्रय मिळाला नाही. यानंतर देशात स्पृश्य-अस्पृश, उच-नीचतेचे वारे वाहू लागले. माणूस माणसापासुन जातीयवादामुळे दुर होत गेला. यावेळी भारत देशात बुद्ध धम्माच्या पुनरागमनाची गरज होती. हे महान कार्य केले बोधिसत्व भीमराव रामजी आंबेडकर यांनी.

19 शतकातील प्रज्ञापुरुष युगंधर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायां सोबत दिक्षाभुमी नागपूर येथे बुद्ध धम्माची दिक्षा घेतली. नागपूर नागवंशिय  लोकांचे निवास स्थान असुन भारताचे मध्यवर्ती केंद्र होते. दिक्षाभुमी नागपूर येथे लाखो उपासक व उपासिका येतात, प्रेरणा प्राप्त करतात व संकल्प करतात की, 'मी एक दिवस भारताला बुद्धमय करीन.

You are in Dhamma 

           ✍️

राहुल खरे नाशिक 

9960999363

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com