शिवसेना पक्षाचं बारसं करणारे प्रबोधनकार ठाकरे


  भट भिक्षुकशाहीला पूर्णपणे नाकारणारे प्रबोधनकार ठाकरे हिंदू धर्मात सांगितलेल्या बुरसटलेल्या रुढींच्या  विरोधात होते. पुरोगामी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इतिहासात प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव अग्रणी आहे. केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना वाचन आणि शिक्षणाची विलक्षण ओढ होती. `वाचाल तर वाचाल' हे त्यांनी युवा पिढीला सांगितलं.  प्रबोधनकारांवर त्यांच्या आई आणि आजीचा खूप प्रभाव होता. आभाळाएवढ्या मायेसोबत आई-आजीच्या शिस्त आणि संस्कारांमुळे लहान वयातच ते घडत गेले.  कट्टर सुधारणावादी, बहुजनांचे कैवारी, अस्सल सत्यशोधक, सामाजिक न्यायासाठी लढणारे निर्भीड नेते, प्रखर वत्ते, पत्रकार, नाटककार, इतिहासकार, संगीतकार, नट अशी त्यांची बहुविध रुपं होती. देव -वेद यांचं प्रामाण्य झिडकारणारे ते होते. बाबा आढाव यांनी सांगितल्याप्रमाणे भट-भिक्षुकशाहीला पूर्णपणे नाकारणारे अशी त्यांची ओळख होती. धर्मात सांगितलेल्या, बुरसटलेल्या रुढींच्या ते विरोधात होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते अग्रणी सेनानी होते. तुरुंगवास सोसूनही मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी ते लढत राहिले. उठ मराठ्या उठ म्हणत शिवसेना पक्षाचं बारसं त्यांनी केलं.   

`प्रबोधन' हे त्यांनी काढलेलं पहिलं नियतकालिक नाही. तर ते इयत्ता तिसरी-चौथीत असताना `विद्यार्थी' या नावाचं नियतकालिक स्वतच्या हातांनी लिहित आणि लोकांना वाटत असतं. आर्थिक चणचण, वेळोवेळी होणारी स्थलांतरं, आजारपण, सनातनींनी केलेली कठोर अवहेलना, तत्त्वांसाठी कटू झालेले स्नेहसंबंध अशा अनेक अडचणींसमोर प्रबोधनकार कधी झुकले नाहीत, त्यांचा प्रवास कधी थांबला नाही. आयुष्य कधी तुम्हाला निराशेच्या गर्तेत ढकलून देतं, त्यातून बाहेर येण्यासाठी `माझी जीवनगाथा' हे प्रबोधनकारांचं आत्मचरित्र वाचावं लागेल. संघर्ष, सत्याबद्दलची शिकवणूक त्यामधून मिळते.   

ब्राह्मणेत्तर चळवळीच्या वतीने निवडणुकीला उभे असलेल्या जाधवरावांनी मराठयांची मते मराठयालाच मिळाली पाहिजेत, असा जातीय प्रचार सुरू केला. लगेच प्रबोधनकारांनी 16-12-1923 च्या प्रबोधनात जाधवरावांवर टीकेचा प्रहार केला. ''मेहरबान, ही वारंवार पगडया फिरविण्याची सवय सोडून द्या. असले पगडी पटाईत पठ्ठे पुढारीच ब्राह्मणेत्तर संघाच्या नशिबाला लागल्यामुळे त्या संघटनेचा बोजवारा उडाला आहे. गरीब बिचारी भोळी जनता तोंडघशी पडली आहे.'' सत्यशोधक चळवळीत शेवटपर्यंत सत्याची संपूर्ण ब्राह्मणेत्तर बहुजन समाजाच्या उध्दाराची बाजू घेऊन असल्यावर ढोंगीपणावर आसूड ओढणारे हे एकमेव प्रबोधनकारच.   

जातीय प्रवृत्तीवर कोरडे ओढताना प्रबोधनकार म्हणतात, या (जाधव) कंपूने ब्राह्मणेत्तर नावाखाली जो चित्पावनी जातिभेद माजविला आहे, त्यामुळे मराठेत्तर अनेक ब्राह्मणेत्तर जातीची आज शुध्द फसवणूक झालेली आहे. ब्राह्मणेत्तर चळवळीमुळे आपला झाला तर काही आत्मोध्दारच होईल, असे जे या जातींना वाटत होते, तो आता भ्रम ठरू पाहत आहे... या लोकहितवादात स्वजातिवर्चस्वाचा गुप्त सुरूंग उडविण्याची कोणी कारवाई करील तर त्याची प्रबोधन मुळीच पत्राजा राखणार नाही. ना. जाधव प्रभूतींच्या आत्मस्तोमी सर्व खटपटी आम्हाला पूर्ण माहीत आहे. त्यांच्या नामदारीला प्रबोधन केव्हाच वचकणारा नव्हे. हा कंपू ब्राह्मणेत्तर नावाखाली केवळ मराठा जातीचे वर्चस्व मराठेत्तर, ब्राह्मणेत्तर समाजावर लादण्याच्या प्रयत्नात गढलेला असतो, असा आमचा उघडउघड आरोप आहे. छाती असेल तर पुढे या, मुद्या पुराव्यानिशी पापाचे माप भरपूर मोजून पदरात घालायला प्रबोधन तयार आहे.  

ब्राह्मणेत्तर चळवळीत मराठयांनी जो जातीयवाद बोकाळविला तो ब्राह्मणातील चित्पावनी वळणाचा होता. मराठयांना आपल्या जातीचा आत्मोध्दार करावयाचा असेल तर जातीच्या नावावर चळवळी करून तो अवश्य करावा; परंतु ब्राह्मणांप्रमाणे आपल्याला हव्या त्या जातीय, गटातटाचा चळवळीला सार्वजनिकपणाचा मुलामा चढवून इतरांची फसवणूक करू नये. प्रबोधनकार म्हणतात, जातिभेदाच्या व आत्मस्तोमाच्या दृष्टीनेच चळवळी करावयाच्या तर त्यासाठी 'ब्राह्मणेत्तर' नाव कशाला? ती नाटकी पार्टी कशाला? ती अप्रातिनिधिक डेप्युटेशने कशाला? आणि महात्मा फुले यांचे नाव बढ्ढु (बदनाम) करणारी ती सत्यसमाजाची ओढणी कशाला?   

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी संपूर्ण आयुष्यभर आपला सत्यशोधकी बाणा अभेद्य ठेवून फुले यांच्यानंतर सत्यशोधक चळवळीचा प्राण कायम ठेवण्यासाठी या चळवळीच्या ध्येय-धोरणांचा प्रचार व प्रसार हेच आपल्या आयुष्याचे ध्येय ठरविले. .'  

गोविंद गोपाळराव टिपणीस हे प्रबोधनकारांच्या 'भिक्षुकशाहीचे बंड' या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत म्हणतात, ''रा. ठाकरे कोणत्याही पक्षाचे नाहीत. ब्राह्मणांच्या पक्षाचे नाहीत की ब्राह्मणेत्तरांच्या पक्षाचे नाहीत. ते सत्यशोधक आहेत. पण सत्यशोधक समाजाचे सभासद नाहीत किंवा त्या समाजाविरुध्द दौरा काढणारेही नाहीत... सामाजिक आणि धार्मिक सुधारणेच्या बाबतीत ते जहालातले जहाल असल्यामुळे राजकीय बाबतीतदेखील फारसे मवाळ असतील असे वाटत नाही.''  

प्रबोधनकारांच्या पाच नाटके या समग्र वाङ्मयातील तिस्रया खंडाच्या प्रस्तावनेत नाटककार प्रभाकर पणशीकर म्हणतात, ''लोकहितवादी आणि आगरकरांच्या सामाजिक सुधारणांचा त्यांनी पाठपुरावा केला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समतावादी आणि आक्रमक विचारांचा यथाशक्ती प्रचार केला. महर्षी शाहू महाराजांच्या बहुजन समाजाच्या क्रांतीत सहभागी झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्पृश्योध्दाराच्या उठावात सक्रीय सहभाग घेतला. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेच्या बीजरूपी कल्पनेला आपुलकीने खतपाणी घातले. आपल्या माफक उत्पन्नात कुटुंबाच्या किमान गरजा भागवायला न विसरता प्रबोधनकार आपल्या लेखणीच्या आणि वाणीच्या साहाय्यानं वेगवेगळया सामाजिक आघाडयांवर कायम धडधडत राहिले.   

सुप्रसिध्द कवी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) प्रबोधनकारांच्या समग्र वाङ्मयाच्या पहिल्या खंडात म्हणतात, 'प्रबोधनकार ठाकरे हे सत्यशोधक चळवळीतले एक प्रमुख व प्रखर प्रवत्ते होते'  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1