एका युवतीला डांबून ठेवल्याचा आरोप करत खासदार नवनीत राणा यांनी अमरावती पोलिसांशी हुज्जत घातली होती, सदर युवतीला ताबडतोब हजर करा म्हणून त्यांनी पोलिसांना वेठीस धरले. लव्ह जिहादचा प्रकार असल्याचे ठासून सांगत त्यांनी पोलिस यंत्रणेवर ताशेरे ओढले. पोलिसांनी देखील वेळीच चक्र फिरवली आणि सदर युवतीला सादर केले. मात्र त्या युवतीने स्वतःहून रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट झाले. त्यामुळे अशा प्रकरणात कुणाला रस होता हे समोर आले असून या प्रकरणी जातीय तेढ निर्माण करणार्या नवनीत राणांसारख्या नेत्यांवर कारवाई करण्याची भूमिका विद्यमान गृहमंत्री घेणार का? असा रोखठोक सवाल सर्वच थरातून विचारला जात आहे.
नवनीत राणा यांनी अमरावती शहरातील राजपेठ पोलीस ठाण्यात पोलिसांसोबत हुज्जत घालून राडा केला. पोलिसांना अपमानास्पद वागणूक खासदार नवनीत राणा यांनी दिली. तसेच त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्या वतीने नवनीत राणा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी नवनीत राणा यांचा निषेध करण्यासाठी पोलीस कुटुंबीय मोठ्या प्रमाणावर रस्तावर उतरले होते. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. तात्काळ पोलिसांची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी लव जिहाद चा मुद्दा बनवून जिल्ह्यातील सामाजिक वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला आणि खोटे आरोप करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तसेच पोलीस प्रशासनावर दबाव टाकून त्यांना धमकवण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्व घटनांमुळे खासदार नवनीत राणा यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने निवेदनातर्फे करण्यात आली. चांदुर बाज़ार पोलिस स्टेशन चे प्रभारी ठाणेदार नरेंद्र पेंदोर साहेब यांना निवेदन देऊन ग्रामीण पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ, अचलपुर उपविभागीय पोलिस अधिकारी अतुलकुमार नवगिरे यांना खासदार नवनीत राणा यांच्यावर पोलीस प्रशासन यावर दबाव, धमकावले आणि दोन समुदायात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केल्यावरून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गौरव ओमप्रकाश किटुकले. सागर सिंगाड़े, चेतन वानखडे, राजू भाऊ तंतरपाळे, सागर खापरे लकी तायडे, मयूर हरडे, किरण भाऊ इंगळे, विशाल गजभिये, सौरभ गजभिये, दिनेश घोडेस्वार, विवेक गजभिये, सूरज इंगळे, समीर खान पठान. मिलिंद गजभिये उपस्थित होते.
"बुधवारी याकुब मेमनच्या कबरीचा विषय भाजपा आमदार राम कदम यांनी ट्वीट करत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातही तो जुना फोटो असल्याचे समोर आले. या घटनेमधून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता का? याचाही तपास करण्यात यावा. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त करण्यात आला होता तर दुसरीकडे पालघरमध्ये साधूंच्या हत्येप्रकरणीही पोलिसांकडे बोट दाखवण्यात आले होते. मध्यंतरी हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट राणा दांपत्याने करुन पोलिसांना बघून घेण्याची धमकी दिली होती. त्यातच आता तर खासदार नवनीत राणा यांनी अमरावती पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे नवनीत राणा यांच्यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करण्याचे आदेश देतील का असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे. याकुब मेमन आणि कथित लव्ह जिहादचा विषय आणून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जातीय तेढ निर्माण करणार्या अशा नेत्यांवर कारवाई करण्याची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसदी घेतील का?" मुंबईत याकुब मेमन आणि अमरावतीत कथित लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करून भाजपा नेत्यांकडून महाराष्ट्र पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू होता. तसेच या मुद्द्यांच्या मागून जातीय तेढ वाढवण्याचाही प्रयत्न होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.
0 टिप्पण्या