Top Post Ad

हेच का ते भीमसैनिक





 डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमसैनिकांचे प्रेरणास्थान, बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली तर हाच भीमसैनिक आक्रमक होऊन आपले रक्त ही सांडतो. प्रसंगी प्राणाचीही बाजी लावतो. जयभीम के नाम पे खून बहा तो बहने दो, अशी क्रांतीकारी ललकारी देत शत्रुवर तुटून पडतो. पँथरच्या काळात तर याच भीमसैनिकांचा मोठा वचक होता. गावखेड्यात राहणाऱया दीन-दुबळ्या गोरगरीब लोकांना नाहक त्रास देण्याची कोणाची हिम्मत होत नव्हती. आणि त्यातूनही कोणी हिम्मत केलीच तर त्याला अशी अद्दल घडवली जायची की तो पुन्हा स्वप्नातही कोणाला त्रास देण्याची हिंमत करीत नसे. 

बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी डोक्याला कफन बांधून चालणारा हा भीमसैनिक बाबासाहेबांच्या क्रांतीकारी विचारांशी द्रोह करून जेव्हा श्रीकृष्ण जन्मोत्सव व गणपती उत्सव आपल्या घरात व वस्तीत साजरा करू लागतो तेव्हा त्याच्याकडे पाहील्यावर किव करावीशी वाटते आणि मनात प्रश्न पडतो की, हेच का ते भीमसैनिक, जे बाबासाहेबांच्या मानवतावादी क्रांतीकारी चळवळीचा रथ पुढे नेणार आहेत? हेच का ते भीमसैनिक, जे ब्राम्हणवादी समाज व्यवस्थेने पिडला-नाडला लाचार व गुलाम केलेल्या बहुजन समाजाला (एस.सी., एस,टी., एन.टी., ओबीसी) शासनकर्ती जमात बनविणार आहेत? हेच का ते भीमसैनिक जे बाबासाहेबांचे ``सारा भारत बौद्धमय“ करण्याचे स्वप्न साकार करणार आहेत? पंरतु दहीहंडीच्या खाली अर्ध्या चड्डीमध्ये असणाऱया व फिल्मी गाण्यांच्या तालावर दारूच्या नशेत ढुंगण हलवत बेधुंद नाचणाऱया तसेच गणपतीच्या समोर जयदेव जयदेव जय मंगल मुर्ती असे म्हणत, ताल धरत टाळ्या पिटणाऱया भीमसैनिकांना पाहिल्यावर यांच्याकडून काय अपेक्षा ठेवाव्यात? ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान निर्माण करून, ब्राह्मणी समाज व्यवस्थेत ज्यांना कवडीची किंमत नव्हती त्यांना सर्व प्रकारची स्वातंत्र्ये बहाल केली. व मानासन्मानाचे जीवन दिले. तेच लोक जेव्हा, ज्यांनी त्यांना लाचार व गुलाम बनविले त्यांच्याच अमानुष संस्कृतीला डोक्यावर घेऊन दारूच्या नशेत बाबासाहेबांचा क्रांतीकारी विचार पायदळी तुडवितात. तेव्हा यांना जराही लाज वाटत नाही. हे यांचे अज्ञान म्हणावे की ढोंग? 

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यामुळेच आज आंबेडकरवादी, दिक्षा न घेताही स्वतला बौद्ध समजतात. पंरतु त्यांच्याकडे पाहीले असता वाटत नाही की हे लोक बौद्ध आहेत  काल पर्यंत धर्माने हिंदू व जातीने महार असणारे आज धर्माने बदललेत पण जातीने अजूनही बदलले नाहीत. अजुनही महारच राहिले आहेत. कारण जातीने महार असताना तो ज्या संस्कृतीचा पुजक होता  तो बौद्ध झाल्यानंतरही त्याच संस्कृतीचे पुजन करीत आहे. त्यामुळे काल जो हिन्दु महार होता आज तो बौद्ध महार झाला आहे, असे खेदाने म्हणावे लागत आहे. (जे असे नसतील त्यांना वंदन) अशा आंबेडकरवाद्यांनी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला काय किंवा गौरी गणपती बसवले काय, यात नवल काय? पण मग अशा आंबेडकरवाद्यांनी स्वतला बाबासाहेबांचे वारसदार म्हणून फुशारकी का मारावी? बाबासाहेबांचा वारसदार तोच होऊ शकतो जो स्वत बाबासाहेबांचा विचार स्विकारतो व जसाच्या तसा येणाऱया पिढीत रुजवण्याचा प्रयत्न करतो. जो बाबासाहेबांच्या विचारांशी द्रोह करून बाबासाहेबांना सलाम करतो तो त्यांचा वारसदार कसा होऊ शकतो? 

बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञांमध्ये पहिल्याच प्रतिज्ञेत सांगितले की ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानू नका, त्यांची पूजाअर्चा करू नका. परंतु त्यांचे अनुयायी, याच देवी-देवतांच्या पुजा अर्चा करीत आठराविश्व दारिद्र्यात आजही लोळण्यात धन्यता मानताना दिसत आहे. बाबासाहेबांनी सांगितले गौरी गणपती यांना देव मानू नका त्यांची पुजा अर्चा करू नका  परंतु त्यांचा अनुयायी घराघरात गौरी-गणपती बसवून त्यांची मनोभावे पुजा करतो आहे. एवढेच नव्हे तर आज भीमसैनिक आपल्या वस्तीतही सार्वजनिक गणपती बसवून बाबासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊ लागला आहे. 

बाबासाहेबांनी  सांगितले  की राम कृष्ण यांना देव मानू नका, त्याची पुजा अर्चा करू नका. परंतु  त्यांच्या अनुयायांनी मात्र डोक्याला भगव्या पट्ट्या बांधून गोविंदा आला रे आला म्हणत श्रीकृष्म जन्मोत्सव साजरा करावा आणि त्यांना  आंबेडकरी चळवळीतील नेत्यानी प्रोत्साहन  द्यावे. याला काय म्हणावे?  बाबासाहेबांनी सांगावे दारू पिऊ नका त्यांच्या अनुयायांना मात्र कोणताही कार्यक्रम दारूच्या पार्टीशिवाय संपन्न होत नाही. एवढेच नव्हे तर बाबासाहेबांच्या जयंती दिनी त्यांची मिरवणूकही दारू ढोसल्याशिवाय काढीत नाहीत (जे अनुयायी वरीलप्रमाणे नसतील त्यांना वंदन)  असे असेल तर असले अनुयायी बाबासाहेबांचा वैचारिक वारसा केव्हा जपणार? यांच्या अशा विचित्र वागण्यामुळे नगराचे नाव सिद्धार्थ नगर किंवा भीमनगर असले तरी आज ते गणेशनगर व श्रीकृष्णनगर वाटू लागले आहे. हे सर्व पाहिल्यावर माझे मन पेटून उठते तुमचे मन केव्हा पेटून उठणार? 

भीमसैनिकांनो! बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मातील देव देव्हारे व सण संस्कृती यांचे उच्चाटन करण्याचे आवाहन नायगावच्या महार परिषदेत केले होते. याचा तुम्हाला विसर पडला आहे काय? देव देवता व सण संस्कृतीची उपासना व जोपासना करताना बाबासाहेबांच्या विचारांशी आपण द्रोह करीत आहोत याची तुम्हाला जराही लाज वाटत नाही काय? अरे जगाने बाबासाहेबांच्या विध्वत्तेला मानसन्मान देऊन सलाम केला. भारत सरकारनेही त्यांना भारतरत्न देऊन मरणोत्तर त्यांचा गौरव केला. देशाने आणि जगानेही बाबासाहेबांना स्विकारले 

परंतु तुम्ही अजूनही खऱया अर्थाने विचाराने बाबासाहेबांना स्विकारू शकत नाहीत. अरे काय मजबुरी आहे तुमची? तुमच्या अशा वागण्यामुळे मनुवादी व्यवस्थेचा समर्थक असणारा तुमचा शत्रू प्रबळ होत चालला आहे. ज्या संविधानाने बहुजन समाजाला सर्व प्रकारची स्वातंत्र्ये बहाल केली. त्या संविधानाला उखडून टाकण्याचे स्वप्न तो पाहू लागला आहे. वेळीच सावध व्हा अन्यथा उद्याची पिढी तुम्हाला नालायक ठरविल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरात, वस्तीत व प्रत्येकाच्या मनात व रोमारोमात बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या क्रांतीकारी विचारांची पेरणी करा. परंतु त्यासाठी अगोदर मनुवाद्यांच्या आंधळ्या संस्कृतीचे प्रतिक असणारे देव देव्हारे व सण संस्कृती यांचे उच्चाटन तुम्हाला तुमच्या मनातून, घरातून, व वस्तीतून करावे लागेल. तरच तुम्ही खऱया अर्थाने आंबेडकरवादी ठराल अन्यथा बाबासाहेबांच्या विचारांशी  द्रोह करणारे तुम्ही गद्दार ठराल. 

तुमच्या अशा गद्दारीमुळे इतर लोक भीमानुयायांना पाहिल्यावर उपहासाने बोलतात, जय भीम बोलो किधर भी चलो हे ऐकल्यावर सच्चा अनुयायांना शरमेने मान खाली घालावी लागते. जसे बाबासाहेबांनी आपले आयुष्य चंदनाप्रमाणे झिजवून माणसाला माणुसपण मिळवून दिले. तसा एकाही देवाने कधी प्रयत्न केला  आहे काय? पण तुम्ही मात्र बाबासाहेबांच्या फोटो शेजारी देवांचे फोटो ठेवून त्यांची विटंबना करता. श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करून दहीह्डींही फोडता. गौरी-गणपती घरात व वस्तीत बसवून बाबासाहेबांचा विचार पायदळी तुडवता. अरे कुत्र्याला जीव लावला तर ते मालकाशी इमानी राहते. पण तुम्ही....(जे तसे नसतील त्यांना वंदन) अरे इतकेही षंड बनू नका आपली अस्मीता जागृत ठेवा. आपला स्वाभिमान विकू देऊ नका, नाहीतर पुन्हा पेशवाई येईल आणि मग फिरा गळ्यात गाडगे व कमरेला झाडू बांधून.  

अरे ब्राम्हण्यवाद्यांनी बौद्धेत्तर समाजाला हिंदु धर्माच्या गोंडस नावाखाली आपल्या हातातील कठपुतली बनवून ठेवले आहे. जे बहुनज बांधव ब्राम्हणवाद्यांचे गुलाम झाले आहेत त्यांना त्यातून सोडवण्याचे महान क्रांतीकारी कार्य तुम्हाला करायचे आहे. पंरतु तुम्हीच जर ब्राम्हणवाद्यांची अमानुष संस्कृती जोपासुन तीचे मानसिक गुलाम होत असाल तर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून केलेली क्रांती टिकणार कशी?हे वेळीच थांबवा आणि आपल्या महापुरुषांना अभिप्रेत असणारी मानवतावादी संस्कृती निर्माण करण्यासाठी प्राणपणाने झटा! 


  • मा.राजू कदम ः चेंबूर, मुंबई 
  • दुरध्वनी - 9224351635 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com