Top Post Ad

' करो या मरो '... 'भारत छोडो'... ऑगस्ट क्रांती दिन


 आपण भारताला स्वातंत्र्य तरी करुयात किंवा या प्रयत्नामध्ये आपले बलिदान देऊया. ' करो या मरो '.  हा मंत्र महात्मा गांधीनी देशवासियांना दिला आणि प्रत्येक भारतीयामध्ये चेतना संचारली, ब्रिटिश सत्तेवर शेवटचा आघात सुरु झाला. युसूफ मेहर अली यांनी सर्वप्रथम भारत छोडो हा नारा दिला. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर 'भारत छोडो' आंदोलनाची घोषणा करण्यात आली आणि 9 ऑगस्टला 'क्रांती दिन' पाळायचं ठरलं. आणि हाच दिवस भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील 'ऑगस्ट क्रांती दिवस' म्हणून ओळखला जातो. आजपासून 80 वर्षापूर्वी झालेल्या 'ऑगस्ट क्रांती दिना'ने भारतातील ब्रिटिशांच्या सत्तेला सुरुंग लावला. 'चले जाव' चळवळ म्हणजे परकीयांचे झू-जुगारून टाकण्यासाठी भारतीयांनी स्वातंत्र्य मिळविण्याच्या रोखाने उचललेले एक भरभक्कम पाऊल होते. देशासाठी स्वप्राणाची बाजी लावण्याची लोकांच्या मनाची तयारी झाली होती. भारतीय जनता आपल्या विरोधात गेली असून आता आपण भारत देशावर फार काळ राज्य करू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना झाली.  क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो. 

7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टैंक मैदानावर (क्रांती मैदान) राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 ऑगस्ट रोजी पंडित नेहरूंनी मांडलेला 'छोडो भारत' ठराव प्रचंड, बहुमताने मंजूर झाला. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.  देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरूवात झाली. ब्रिटिश सत्ता हादरून गेली होती. आंदोलन देशभर पसरणार म्हणून 9 ऑगस्टच्या पहाटेच महात्मा गांधी, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद यांच्यासह अनेक नेत्यांना पकडून ब्रिटिशांनी तुरुंगात टाकले. पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ले आणि गोळीबार केला तरी लोक घाबरले नाहीत.    'चले जाव' चळवळीला सर्व थरातून पाठिंबा मिळाला.  ज्यावेळी 'चले जाव' चळवळीचा जोर कमी होत आहे असे ब्रिटिश सरकारला वाटू लागले होते त्याचवेळी भूमिगत चळवळ आकारास घेऊ लागली होती. बॉम्ब बनविणे, शस्त्रास्त्र चालविण्याचे शिक्षण घेणे, गुप्त रेडिओ केंद्रे चालविणे इत्यादी कामे भूमिगत चळवळीतील नेत्यांनी केली. या चळवळीतील प्रमुख भूमिगत नेते म्हणून जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफअली, गुसूफ मेहेरअली, सुचेता कृपलानी, एस.एम.जोशी, उषा मेहता इत्यादी नेत्यांचा उल्लेख करता येईल. सरकारी यंत्रणेला नुकसान पोहचविणे हे या चळवळीचे मुख्य शुभ होते.  

देशाच्या काही भागांत ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन झाली. यालाच प्रतिसरकार असे म्हणतात. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिह्यांत प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात सातारा जिह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले प्रतिसरकार विशेष गाजले. कारण दीर्घकाळ अस्तित्वात राहिलेले आणि इंग्रजी सत्तेला शेवटपर्यंत दाद न दिलेले असे हे एकमेव प्रतिसरकार होते. ब्रिटिशांचे नीतीधैर्य खच्ची करण्यात प्रतिसरकारने महत्त्वाचा वाटा उचलला होता.

भारत छोडो आंदोलनाची पार्श्वभूमी ही 1942 च्या आधीच्या स्वातंत्र्य लढ्याशी जोडली गेली आहे. पण दुस्रया महायुद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या लढ्याला मोठं बळ मिळालं. 1939 साली दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली आणि जग दोन गटात विभागलं गेलं. अमेरिका, ब्रिटनच्या नेतृत्वाखालील दोस्त राष्ट्र आणि जर्मनी, जपानच्या नेतृत्वाखालील अक्ष राष्ट्र. आग्नेय आशियात ब्रिटिशांचा जपानच्या सैन्याने पराभव केला आणि सिंगापूर, मलाया आणि बर्मा म्हणजे आजचे म्यानमार जिंकून भारताच्या सीमेपर्यंत मुसंडी मारली. आता जपान कधीही भारतावर हल्ला करणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती.  भारतातही ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्याची लढाई सुरु होती. अशा परिस्थितीत दोस्त राष्ट्रांसाठी भारताचा पाठिंबा हा अत्यंत महत्वाचा होता. त्यामुळे अमेरिका आणि फ्रान्सने ब्रिटनवर दबाव टाकायला सुरुवात केली. भारतीय गव्हर्नर जनरल लॉर्ड लिनलिथगो यांनी भारतीय नेत्यांना न विचारता 3 सप्टेंबर 1939 साली भारत जर्मनीविरोधात या युद्धात सामिल होत असल्याची घोषणा केली. काँग्रेसमध्ये या युद्धात ब्रिटिशांना पाठिंबा देण्यावरुन मतभेद होते. ब्रिटनला कोणत्याही परिस्थितीत भारताची साथ आवश्यक होती. पण या युद्धानंतर भारताला काय मिळणार यावर ब्रिटिशांनी चर्चा करावी अशी भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली होती.   

ब्रिटिशांनी सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली मार्च 1942 साली 'क्रिप्स मिशन' भारतात पाठवलं. क्रिप्स मिशनने भारताला पूर्ण स्वराज्य नाकारुन डॉमिनियन स्टेटस देण्याचा प्रस्ताव मांडला. पण भारतीयांनी हा प्रस्ताव नाकारला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ब्रिटिशांकडून भारतीय स्वातंत्र्याचं शोषण करण्यात आलं, युद्धाच्या खर्चासाठी बंगाल प्रांतातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्यात आल्या होत्या, भारतीयांचे शोषण सुरु होतं. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष उफाळून आला होता, साम्राज्यवादावर आता अंतिम प्रहार करण्याची वेळ आली होती.  सुरुवातीला 'भारत छोडो' आंदोलन सुरु करायचे का नाही यावर अनेक वाद झाले. महात्मा गांधी या आंदोलनाच्या समर्थनार्थ होते तर जवाहरलाल नेहरू, राजगोपालाचारी, मौलाना आझाद आणि इतर डाव्या विचारांच्या नेत्यांना अशा परिस्थितीत आंदोलन करणं महत्वाचं वाटत नव्हतं. पण गांधींजींनी हे आंदोलन सुरु करायचंच असा निर्धार केला होता. स्वातंत्र्यप्राप्तीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. अनेकांनी स्व-बलिदान केले. आंदोलकांची संख्याच इतकी प्रचंड होती की, त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंगही अपुरे पडले. साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला. या राष्ट्रव्यापी आंदोलनाला 'ऑगस्ट क्रांती' असेही म्हटले जाते..   

भारत छोडो आंदोलनाचा इतिहास अज्ञात योध्यांच्या बलिदानाने भरुन गेला आहे. त्या काळातील कामगार, शेतकरी, विद्यार्थी, पत्रकार, कलाकार यांच्या अनेक साहसी गोष्टी आहेत. भारत छोडो हे केवळ ब्रिटिशांविरोधात आंदोलन नव्हतं तर ते भारतीय लोकांमध्ये एक नवीन चेतनेचा संचार होता. त्यामुळे ब्रिटिशांना भारत सोडावा लागला. भारत छोडो आंदोलन अशा वेळी सुरु करण्यात आलं होतं ज्यावेळी जग एका जबरदस्त बदलातून जात होतं. जग दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं गेलं होतं तर अनेक देशांमध्ये साम्राज्यवादाविरोधात शेवटची लढाई सुरु होती. भारतामध्ये एका बाजूला भारत छोडो आंदोलन सुरु होतं तर दुसऱ्या बाजूला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेनं ब्रिटिशाविरोधात लढा पुकारला होता.  भारत छोडो आंदोलनामुळे ब्रिटिशांच्या सत्तेला शेवटचे हादरे बसायला सुरुवात झाले. ही लढाई अंतिम असेल आणि यानंतर केवळ स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यच मिळेल असा आत्मविश्वास प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण झाला. तसेच ब्रिटिशांनाही आता आपली सत्ता सोडावी लागणार याची खात्री झाली. भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी आणि अज्ञात वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारताच्या भावी पिढ्यांनी स्वातंत्र्याचा श्वास घ्यावा यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com