हिंदी चित्रपटसृष्टीला सध्या ‘बॉयकॉट बॉलिवूड’चे ग्रहण लागले आहे. ‘बॉयकॉट द खान’ हा ट्रेंड अयशस्वी झाल्यामुळेच आता त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा नवा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. हिंदू धर्म-समाजावर टीकाटिप्पणी, अभिनेता-दिग्दर्शकांची वैयक्तिक मतं आणि सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरण यासारख्या विविध कारणांचा शस्त्र म्हणून वापर करीत हा ट्रेंड सध्या सुरू करण्यात आला आहे. त्याचा मोठा फटका अमिर खानला बसला आहे. अभिनेता आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’द्वारे तब्बल चार वर्षांनी पडद्यावर परतला. 2018 मध्ये आलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटानंतर तब्बल चार वर्षे या चित्रपटाच्या निर्मितीवर काम सुरु होते. तंत्रज्ञानाचं प्रचंड मोठ्ठ जग उपलब्ध असतानाही या चित्रपट निर्मितीला चार वर्षाचा कालावधी लागला त्यात दोन वर्षे कोरोना महामारीचीच होती. एकामागून एक अनेक मास्टर हिट चित्रपट देणाऱ्या मिस्टर परफेक्शनिस्टला कदाचित आपल्या चित्रपटाला बहिष्काराला सामोरे जावे लागेल याची कल्पनाही नसेल.
बहिष्कारामुळे भारतीय बॉक्स ऑफिसवर त्याला चालू दिल्या गेले नसले तरी जागतिक स्तरावर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ 11 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. एकूणच, 9 दिवसांत भारतीय बॉक्सवर केवळ 60.69 कोटींचा गल्ला जमवला, तर दुसरीकडे बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, तो परदेशात चांगली कामगिरी करत आहे आणि त्याने आतापर्यंत 47.78 कोटींचे कलेक्शन केले आहे. याच कारणामुळे चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन चांगले झाले असून आमिर खानचा चित्रपट 100 कोटींचा आकडा पार करण्यात यशस्वी ठरला आहे. ‘लाल सिंह चड्ढा’चे देशी-विदेशी कमाईसह जगभरातील बॉक्स ऑफिस कलेक्शन 108.47 कोटी झाले आहे.
बायकॉटचा ट्रेंड एवढा आक्रमक करण्यात आला आहे की, त्या विरोधात बोलणे किंवा त्या चित्रपटांचे कौतूक करणे दोघांनाही टिकेचे लक्ष्य केल्या जात आहे. याचा प्रत्यय अर्जुन कपूर या अभिनेत्यालाच नाही तर अशा टिकेतून करीना कपूर, तापसी पन्नू या अभिनेत्रीही सुटलेल्या नाहीत. इतकेच नव्हे तर हृतिक रोशनने ‘लाल सिंग चढ्ढा’चं कौतुक केलं म्हणून त्याच्या आगामी ‘विक्रम वेधा’ सिनेमावर बहिष्कार टाकण्याची तयारी सुरु झाली आहे. तर दाक्षिणात्य सिनेमांचा रिमेक आहे म्हणूनही अनेक सिनेमांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड चालवला गेला. त्यात ‘जर्सी’सारख्या चित्रपटाकडे लोकांनी पाठ फिरवली. अमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ नंतर आता ‘ब्रह्मास्त्र’ वर नेटकऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. अनुराग कश्यपच्या ‘दोबारा’लाही बहिष्काराचा सामना करावा लागलाय.
‘रक्षाबंधन’मधील अभिनेत्री आप या राजकीय पक्षाला पाठींबा देते आणि आपली मतं समाजमाध्यमांवर मांडते, म्हणून बहिष्कार घालण्याचा ट्रेंड समाजमाध्यमांवर चालवण्यात आला. त्यावेळी अक्षयकुमारनं, ‘सिनेमाचं यश देशाच्या अर्थव्यवस्थेला बळ देतं’, असं सांगत सिनेमावर बहिष्कार टाकू नका, असं म्हटलं होतं. आमीर खानचंही म्हणणं तेच होतं. याआधीही हा प्रकार अनेकदा हिंदी चित्रपटांबाबत झाला आहे. ‘माय नेम इज खान’ आणि ‘पद्मावत’ या सिनेमांना थेट बॉयकॉट केलं गेलं नाही, पण त्यावेळी ते चित्रपटच प्रदर्शित होऊ नये अशी परिस्थिती निर्माण केली गेली. याशिवाय ‘उडता पंजाब’, ‘गोलियों की रासलीला राम-लीला’, ‘लिप्स्टिक अंडर माय बुरखा’ या सिनेमांना समाजातील विशिष्ट वर्गांकडून विरोध झाला होता. दीपिकाच्या ‘गहराईयां’, ‘छपाक’ या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड चालवला गेला. आलियाच्या ‘डार्लिंग्स’ या ओटीटीवर प्रदर्शित सिनेमावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन समाजमाध्यमांवर केलं गेलं. इतकच नाही तर सनी देओलचा वाराणसी प्रदर्शितच होऊ दिला गेला नाही. त्याआधी अजून काही वर्षे मागे गेलो तर सलिम लंगडे पे मत रो यावर देखील बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यावेळेस असं सोशल माध्यमाचं पेव नसल्याने त्याचा तितकासा प्रभाव पडला नाही.
आता मात्र त्याही पूढे जाऊन प्रदर्शनापूर्वीच बहिष्काराचं शस्त्र उगारलं जात आहे. शाहरूख खानचा ‘पठाण’, विजय देवेरकोंडाचा ‘लायगर’ अद्याप प्रदर्शित व्हायचे आहेत. मात्र आधीच त्यांना बायकॉटचा ट्रेंड सुरु करण्यात आला आहे. त्यातच आमिताभ बच्चन यांचा ब्रह्मास्त्रबाबतही हे धोरण जाहीर होत आहे. कारण अमिताभ बच्चन यांनी कुछ बातें करने का मन करता है ; पर करें तो कैसे करें ; हर बात की तो आजकल बात बन जाती है ! असं ट्वीट केल्याने नेटकऱ्यांनी त्यांना उलट सूलट उत्तरं दिली आहेत. इतकेच नव्हे तर ब्रह्मास्त्र आने का इंतजार करो असंही म्हटलं आहे. तर एकाने ऐसा रिस्क मत लो नही तो प्रतिक्षा के बाहर इडीवाले नजर आयेंगे असही म्हटलं आहे. यावरून हा बायकॉट ट्रेंड कोणत्या थरापर्यंत गेलाय हे कळतं.
बॉयकॉट बॉलिवूड” ट्रेंड यशस्वी झाल्यानंतर स्वरा भास्कर म्हणाली, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडला “व्हिलन” स्वरूपात रंगवले गेले. बॉलिवूड जणू ड्रग्स पार्ट्यांमध्ये रमले आहे, त्यात फक्त अंडरवर्ल्ड मधले गुन्हेगार पैसा खेळवतात असे चित्र रंगवले गेले आणि त्याचा परिणाम म्हणून बॉलिवूडवर बहिष्कार अर्थात “बॉयकॉट बॉलिवूड” ट्रेंड सुरू झाला. आता त्याचा फटका सगळ्या सिनेमांना बसत असल्याची खंत स्वरा भास्करने व्यक्त केली. अर्थात दिवसेंदिवस हे बहिष्कारअस्त्र चित्रपटसृष्टीचं अधिक नुकसान करणारं ठरेल, हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.
बॉलीवूड ही एक इंडस्ट्री आहे, चित्रपट निर्मितीचा कारखाना आहे. ज्यामध्ये कित्येक कोटीची उलाढाल दिवसागणीक होत असते. एका चित्रपटामागे किमान हजारो लोकांना रोजगार मिळत आहे. एक चित्रपट म्हणजे तो नायक किंवा त्यातील एखादा कलाकाराचा चित्रपट असं कसं काय होऊ शकतं. प्रत्येक चित्रपट बनण्याकरिता हजारो हातांचे सहकार्य असते. जितके पडद्यावर तितकेच पडद्याच्या मागे देखील. अशा परिस्थितीत “बॉयकॉट बॉलिवूड” ट्रेंडमुळे किती लोकांचा रोजगार आपण बायकॉट करीत आहोत याचाही विचार व्हायला पाहिजे.
आधीच कोरोना महामारीमुळे प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. कित्येक सह.कलाकार आणि पडद्यामागे काम करणारे कामगार, तंत्रज्ञ यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यानंतर आता कुठे आर्थिक व्यवस्था सुरळीत होत असतानाच या ट्रेंडमुळे पुन्हा होत्याचे नव्हते होईल काय ही चिंता आता या लोकांना सतावते आहे. नेटवर एक शब्द येतो बायकॉट परंतु या बायकॉटने किती जणांचे भवितव्य अंधारात जाणार आहे याबाबत मात्र सर्वच अनभिज्ञ. आधीच रोजगाराची वाणवा असताना त्यात अधिक बेरोजगारांची भर पडू नये. अन्यथा बायकॉट बेरोजगार म्हणण्याचीही वेळ आल्याशिवाय राहणार नाही. त्यापेक्षा बायकॉट बेरोजगारी... महागाई... भ्रष्टाचार... याकरिता ट्रेंड चालवला तर या देशातील तरुणांचे आणि एकूणच देशवासीयांचे भले झाल्याशिवाय राहणार नाही.
0 टिप्पण्या