Top Post Ad

अरे संसार संसार.....अजरामर कवियत्री बहिणाबाई चौधरी


  मराठी साहित्यातील अजरामर कवियत्री बहिणाबाई चौधरी यांची आज जयंती. बहिणाबाई चौधरी यांचा जन्म २४ ऑगस्ट १८८० रोजी जळगाव जवळील असोदे या गावी झाला. त्यावेळेच्या परंपरेनुसार वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह झाला. दुर्दैवाने तरुणपणीच  त्यांना वैधव्य आले. सुरवातीचे एकत्र कुटुंब विभक्त झाल्यावर आणि नवऱ्याच्या निधनानंतर त्यांचे जीवन हलाखीत गेले. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आपली कन्या काशी आणि पुत्र सोपानदेव व ओंकार यांच्यावर चांगले संस्कार केले. बहिणाबाई या कधीही शाळेत गेल्या नाही.  त्यांना लिहिता वाचता येत नव्हत्या त्यामुळे  त्यांनी केलेल्या अनेक कविता काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्या निरीक्षर होत्या मात्र त्यांना कवितेची निसर्गदत्त देणगी लाभली होती.  

घरातील आणि शेतातील कामे करता करता त्यांना काव्य सुचले आणि ते काव्य मराठी साहित्य विश्वात अजरामर ठरले.  बहिणाबाई शेतात गेल्या की शेतीवर उत्स्फूर्त कविता म्हणत. घरकाम  करतानाही त्यांना कविता सुचत.  घरकाम करता करता त्या कविता गुणगुणत तसेच जात्यावर दळताना विविध प्रकारच्या ओव्या म्हणत. त्यांनी अशा हजारो कविता केल्या आहेत. मात्र आज त्या सर्व कविता उपलब्ध नाहीत. बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव शाळेत जाऊ लागल्यावर ते बहिणाबाईंच्या कविता आपल्या वहीत लिहून घेऊ लागले.  याकामी त्यांना त्यांचे मावसभाऊ पितांबर चौधरी हे मदत करत. बहिणाबाई  काम करताना जेंव्हा कविता म्हणत तेंव्हा सोपानदेव त्या कविता आपल्या वहीत लिहून घेत असत. त्यांचे चिरंजीव सोपानदेव चौधरी हे  ही पुढे महाराष्ट्रातील नामवंत कवी म्हणून नावारूपास आले. 

बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव व मावसभाऊ पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली कविता, गाणी हस्तलिखित स्वरूपात होती.  बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर सोपानदेव यांनी हे हस्तलिखित आचार्य अत्रे यांना दाखवले. आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या त्या सर्व कविता वाचल्या आणि उदगारले अहो हे तर बावनकशी सोने आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणे गुन्हा आहे! आचार्य अत्रेंने त्या सर्व कविता आपल्याकडे घेतले आणि ते प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. १९५२ साली आचार्य अत्र्यांनी स्वतः लिहिलेल्या प्रस्तावनेसह बहिणाबाईंच्या ३५ कविता असलेला काव्य संग्रह प्रसिद्ध केला. आचार्य अत्र्यांमुळेच या महान कवीयत्रीचा महाराष्ट्राला परिचय झाला. 

पुढे बहिणाबाईंच्या अनेक कविता प्रसिद्ध झाल्या. लोकप्रिय झाल्या. संपूर्ण महाराष्ट्राला बहिणाबाईंच्या काव्य प्रतिभेने भुरळ घातली. प्रत्येकाला ती आपली कविता वाटली. बहिणाबाईंच्या सर्व कविता त्यांच्या मातृभाषेत म्हणजे वऱ्हाडी - अहिराणी  - खानदेशी भाषेत आहेत. त्यांच्या कवितेचा विषय सासर - माहेर,  संसार, शेतीची कामे, निसर्ग, पशुपक्षी, मराठी सण - उत्सव, भाऊ,  बहीण, आई, वडील असे होते. या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती. हीच आत्मीयता कवितेतून झळकत होती. तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुख दुःखाकडे समभावाने पाहू शकणारे  शहाणपण आणि जगण्यातून कळलेले   तत्वज्ञान ही त्यांच्या काव्य प्रतिभेची वैशिष्ट्ये होती. शालेय अभ्यासक्रमात त्यांच्या अनेक कविता समाविष्ट करण्यात आल्या आहेत. 

अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तेंव्हा ( मियते ) मिळते भाकर......, 
खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिने जीव झाडाले टांगला......, 
मन वढाय वढाय उभ्या पिकांतलं ढोर किती हाकला हाकला तरी येतं पिकांवर...... 
धरित्रीले दंडवत..... यासारख्या  त्यांच्या कितीतरी कविता शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. या कविता न अभ्यासलेला एकही व्यक्ती महाराष्ट्रात सापडणार नाही. शाळेत जाणाऱ्या सर्व मुलांच्या या कविता तोंडपाठ आहेत. महाविद्यालयातही त्यांच्या अनेक कविता अभ्यासण्यासाठी आहेत.  

महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांनी या कवितांचे पारायण केले आहेत. बहिणाबाईंच्या कवितांनी महाराष्ट्राच्या अनेक पिढ्यांना भुरळ घातली आहेत.  महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात  बहिणाबाई चौधरी व त्यांच्या कविता अजरामर आहेत. मराठी साहित्य विश्वातील  त्यांचे स्थान  ध्रुव तात्यासारखे अढळ आहे म्हणूनच महाराष्ट्र शासनाने जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे  नाव कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे ठेवले आहे. जी व्यक्ती कधीही शाळेत गेली नाही त्या व्यक्तीचे नाव विद्यापीठाला दिले जाते यातूनच बहिणाबाईंचे श्रेष्ठत्व  सिद्ध होते. आपल्या काव्य प्रतिभिने मराठी साहित्याला वेगळ्या उंचीवर  नेणाऱ्या या महान कवीयत्रीचे ३ डिसेंबर  १९५१ रोजी निधन झाले. आज त्यांची  १४२ वि जयंती आहे.  जयंतीदिनी बहिणाबाई चौधरी यांना विनम्र अभिवादन! 

श्याम ठाणेदार ..........९९२२५४६२९५
दौंड जिल्हा पुणे 


बहिणाबाईंचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा ) ह्या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी जन्म : २४ ऑगस्ट इ.स. १८८० रोजी महाजनांच्या घरी झालात्यांच्या आईचे नाव भिमाई तीन भाऊ- घमा,गना आणि घना तीन बहिणी- अहिल्या,सीता आणि तुळसा
(इ.स.१८९३?) मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाल नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान आणि काशी झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी (इ.स.१९१० ?) बहिणाबाईंना वैधव्य आले. बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना सोपानदेव चौधरी यांनी व काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. बहिणाबाईंचा वयाच्या बहात्तराव्या वर्षी जळगावात ३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला.

त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. लिहिता न येणार्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com