Top Post Ad

कोट्यावधी संपत्तीचे मालक महाराष्ट्राचे मंत्री ...


महाराष्ट्र राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्याच्या 39 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. ज्यामध्ये एकूण 18 जणांना कॅबिनेटमध्ये संधी मिळाली. यात भाजपच्या 9 आणि शिंदे गटातील 9 जणांचा समावेश आहे.  एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सुरेश खाडे हे सर्वाधिक उच्च शिक्षित असून त्यांनी कोलंबो विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी घेतली आहे. तर, एक मंत्री केवळ दहावी पास आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे.  सुधीर मुनगंटीवार यांचे शिक्षण पदव्युत्तरपर्यंत झाले आहे. उदय सामंत यांनी ऑटोमोबाइल क्षेत्रातील डिप्लोमा केला आहे. दीपक केसरकर यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले आहे. संजय राठोड यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मंगल प्रभात लोधा यांनी एल.एल.बी ची पदवी घेतली. संदीपान भुमरे यांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतले. तानाजी सावंत यांचे पदव्युत्तरपर्यंत शिक्षण झाले आहे. सुरेश खाडे हे नव्या मंत्रिमंडळात सर्वाधिक उच्च शिक्षित असून त्यांनी कोलंबो विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी घेतली आहे. 

या नव्या मंत्रिमंडळातील प्रत्येक जण कोट्यधीश आहे. त्यापैकी सर्वात श्रीमंत भाजपचे मलबार हिल्स मतदारसंघाचे आमदार मंगल प्रभात लोढा आहेत. त्याचबरोबर सर्वात कमी म्हणजे 2 कोटींची मालमत्ता पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांच्याकडे आहे. तर मंत्रिमंडळातील 70 टक्के मंत्र्यांविरुद्ध केसेस दाखल आङेत. या नव्या मंत्रिमंडळात 12 मंत्री असे आहेत, ज्यांच्यावर विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. यातील काही जणांवर गंभीर कलमेही लावण्यात आली आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 18, तर उपमुख्यमंत्र्यांवर 4 गुन्हे दाखल आहेत.  मंत्रिमंडळातील भाजपचे नंदुरबार पूर्वचे आमदार विजयकुमार गावित यांच्याविरुद्ध सर्वाधिक 9 गुन्हे दाखल आहेत, तर त्याखालोखाल औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांच्याविरुद्ध 6, मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांच्याविरुद्ध 5 गुन्हे दाखल आहेत. तर रवींद्र चव्हाण आणि सुरेश खाडे यांच्याविरुद्ध प्रत्येकी 3 गुन्ह्यांची नोंद आहे. यानंतर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध प्रत्येकी 2 गुन्ह्यांची नोंद असल्याचे समोर आले आहे. शिंदे गटातील मंत्र्यांपैकी सर्वाधिक 9 गुन्ह्यांची नोंद पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्याविरुद्ध आहे. त्याखालोखाल 8 गुन्ह्यांसह अब्दुल सत्तार यांचा क्रमांक लागतो. तर संजय राठोड यांच्याविरुद्ध 4 गुन्ह्यांची नोंद आहे. याशिवाय दादा भुसे आणि गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद आहे. 

शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या 18 मंत्र्यांमध्ये भाजपचे 9 मंत्री आहेत. यातील भाजपच्याच मंत्र्यांबद्दल बोलायचे झाल्यास मंगलप्रभात लोढा हे सर्वाधिक 441 कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक आहेत. पेशाने बांधकाम व्यावसायिक असलेले मंगल प्रभात लोढा हे भारतीय जनता पक्षाचे सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. 

2011च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे 441 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. 6 वेळा आमदार राहिलेल्या लोढा यांच्याकडे 252 कोटी रुपयांची जंगम आणि 189 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे 14 लाख रुपयांची जग्वार कार असून इतर बाँड आणि शेअर्समध्ये गुंतवणूक आहे. दक्षिण मुंबईतही त्यांचे पाच फ्लॅट आहेत. त्यांचा राजस्थानमध्ये प्लॉट असून त्यांच्या पत्नीचे मलबार हिल परिसरात घर आहे. त्या खालोखाल विजयकुमार गावित 27 कोटी संपत्तीसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यानंतर गिरीश महाजन 25 कोटी, राधाकृष्ण विखे 24 कोटी, अतुल सावे 22 कोटी यांचा क्रमांक लागतो. यानंतर 11.4 कोटींसह सुधीर मुनगंटीवार असून, त्याखालोखाल 9 कोटींसह रवींद्र चव्हाण आहेत. तर सुरेश खाडे हे 4 कोटी संपत्तीसह सर्वात कमी श्रीमंत आहेत.

शिंदे गटाच्या 9 मंत्र्यांपैकी तानाजी सावंत हे 115 कोटींसह सर्वाधिक श्रीमंत असून त्याखालोखाल 82 कोटी संपत्तीसह दीपक केसरकर आहेत. 20 कोटी संपत्तीसह अब्दुल सत्तार यांचा तिसरा क्रमांक लागतो. यानंतर शंभुराज देसाई 14 कोटी, दादा भुसे 10 कोटी, संजय राठोड 8 कोटी, गुलाबराव पाटील 5 कोटी, उदय सामंत 4 कोटी संपत्तीचे मालक आहेत. तर संदीपान भुमरे हे 2 कोटी संपत्तीसह मंत्र्यांपैकी सर्वात कमी श्रीमंत आहेत. निवडणुक प्रतिज्ञापत्रामधून सदर माहिती मिळाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com