दोन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या झालेल्या नाहीत, त्यामुळे या निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल न करता उर्वरित निवडणुकांचा कार्यक्रमही लवकरात लवकर जाहीर करण्यात यावा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. न्यायमूर्ती खानविलकर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यामध्ये वॉर्ड पुनररचनेचा मुद्दा निवडणूक आयोगाने पाहावा, असे कोर्टाने स्पष्ट निर्दे दिले आहेत. तसेच दोन आठवड्यात उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.
आमची पूर्ण तयारी झाली असून फक्त निवडणूक घेणे बाकी आहे. येत्या दोन आठवड्यात आम्ही निवडणुका घेऊ शकतो, असे निवडणूक आयोगाने न्यायालयात मत नोंदवले. तसेच काही नगरपालिकांमध्ये शून्य टक्के आरक्षण असल्याचे माहिती आयोगाने दिली. वॉर्ड पुनर्रचनेबाबत ही आयोगाने प्रश्न उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती खानविलकर यांनी फक्त ओबीसी आरक्षणावरती सुनावणी असल्याचे सांगत वॉर्ड पुनर्रचनेचा मुद्दा फेटाळून लावला.
सर्वोच्य न्यायालयाच्या निकालानंतर छगन भुजबळ म्हणाले की, राज्यातील ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले आहे यांचा आनंद आहे. आता काही ठिकाणी 27 टक्क्यांच्या पुढे आरक्षण जाऊ शकतं. ओबीसी समाजाच्या लोकसंख्येवर तिथला आरक्षणाचा टक्का अवलंबून असेल. फडणवीस यांनी तुषार मेहता यांची नेमणूक केल्याबद्दल त्यांचे आभार. बाकी त्यांना सरकार स्थापना, मंत्रिमंडळ यापलिकडे वेळ तरी कुठे होता, असा टोला भुजबळांनी लगावला.
आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसी समाजाला न्याय मिळाला याचे समाधान आहे. ही श्रेय घेण्याची लढाई अजिबात नाही, कारण सर्वसामान्य जनतेच्या, विशेषत: दुर्बल समाजाच्या भल्यासाठी काम करणं हे कुठल्याही सरकारचे कर्तव्यच असतं आणि म्हणूनच ओबीसी आरक्षणासाठी अगदी पहिल्यापासून महाविकास आघडीतले आम्ही सर्व पक्ष मनापासून प्रयत्न करीत होतो.हा तिढा अवघड होता पण तो सोडविण्यासाठी आम्ही त्यावेळेस विरोधी पक्ष, संघटना या सर्वांशी वारंवार चर्चा करून त्यांनाही विश्वासात घेतले होते. जयंत बांठीया यांच्यासारखा अनुभवी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांची टीम यांनी हे शिवधनुष्य पेलले त्याबद्द्ल त्यांनाही जितके धन्यवाद द्यावे तितके कमीच आहेत. यामध्ये आयोगाचे सर्व सदस्य तर अतिशय मेहनतीने काम करीत होतेच शिवाय राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील सर्व घटकांनी देखील सर्वतोपरी प्रयत्न केले. खरं तर सगळ्यांनीच ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे यावर लक्ष्य केंद्रीत करून एक चांगला लढा दिला. त्यामुळे महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांना यश आले. मी आज मुख्यमंत्री नसलो तरी आमच्या काळात यावर सर्वानुमते जी पाऊले उचलण्यात आली होती तिला यश मिळालं यासारखे समाधान नाही.- उद्धव बाळासाहेब ठाकरे - शिवसेना पक्षप्रमुख !!
0 टिप्पण्या