गरज पडली तर राजभवनात घुसू, आता त्यांना पळवून लावू


 महाराष्ट्राचे थोर कवी, दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे म्हणतात, "ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर, कष्टकऱ्यांच्या तळहातावर उभी आहे", यातच मराठी माणसाची ओळख आहे.  मराठी माणसाने जेव्हा मुंबई  हातात  घेतली ; तेव्हा १०५ लोक न घाबरता बंदुकीच्या गोळ्यांना सामोरे गेले होते. मारले  गेले. पण आम्ही मुंबई घेतली. तेव्हा आता आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याना परत बोलवा, असं म्हणणार नाही तर आता त्यांना पळवून लावू, गरज पडली तर राजभवनात घुसू. असा इशारा  माजी मंत्री डाॅ.जितेंद्रआव्हाड यांनी दिला.

कोश्यारी आता सारवासारव करताहेत पण ते त्यांचं दरवेळेसचं नाटक असतं. महात्मा फुलेंबद्दल ते जे काही बोलले ते एवढं घृणास्पद आणि घाणेरडे होतं की मी त्याबद्दल बोलणंच टाळलं. अक्षरशः मला तर माझ्या भाषेतल्या शिव्या घालु वाटताहेत ज्या मी सार्वजनिक रीत्या देऊ शकत नाही. पण इतका नालायक माणूस महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून आहे, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.  जोपर्यंत ते राजकीय बोलत होते, तोपर्यंत मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. कारण आपल्या पदाचा ते वारंवार गैरवापर करत होते, असंवैधानिक वागत होते. पण राजकारणा असा वापर केला जातो, त्याच्यात काही मोठं काही होणार असं नाही. पण आता ते जे काही बोलले आहेत तो मराठी मातीचा, मराठी माणसाचा अपमान त्यांनी केला आहे. 

भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई- ठाण्याबद्दल केलेल्या विधानाचा डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की,  एव्हाना आपण या राज्यपालांबाबत कधी बोलतच नव्हतो, त्यांनी महाराष्ट्राचा बराच वेळा अपमान केला, तरी फार मी काही लक्ष दिलं नाही. कारण मराठी माणसांना ते काय बोलतात त्याविषयी काही वाटत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी महात्मा फुलेंचा अपमान केला मला वाटतं तेव्हाच त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायला हवी होती.  राज्यपालांना नेहमी अहो जाहो म्हंटलं जातं. महामहीम राज्यपाल असं म्हंटलं जातं, पण आता त्यांची तशी लायकी उरलेली नाही. त्याला मराठी माणसांची किंमत समजली नाही. 

ज्या दोन समाजांबद्दल राज्यपाल बोलले त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आणि प्रेम आहे. पण, गुजराती आणि राजस्थानी लोक  त्यांच्या राज्यात मेहनत करून मोठे का नाही झाले, कारण इथल्या कष्टकऱ्यांनी घाम गाळला, त्या घामातनं निर्माण झालेली ही संपत्ती. आज त्यानी या मराठी जनतेचा अपमान केला. ते कोण आहेत, कोणाचे आहेत, कशाचे आहेत काही घेणंदेणं नाही मला. स्पष्ट भुमिका असेल प्रत्येक मराठी माणसाची वाट्टेल ते सहन करू पण मराठी माणसाच्या अस्मितेला हात घातलेला सहन करणार नाही,  

रक्ताचे पाट वाहिलेत ही मुंबई घेताना, तेव्हा त्या मुंबई बद्दल अभिमान आणि ऋणानुबंध जुळलेले आहेत आमचे. १८७३ ला इथे पोर्ट सुरू झालं, १८७५ ला मुंबईत पहिल्यांदा स्टॉक एक्स्चेंज सुरु झालं. हा इतिहास आहे. म्हणजे देशाचं जे निव्वळ व्यावसायिक रुप आहे ते ते मुंबईने दिलंय भारताला. इथले टाटा असो, इथले बिर्ला असो, फिरोदिया असो, बजाज, मित्तल, रहेजा हे का नाही त्यांच्या राज्यात जाऊन मोठे झालेत, आमच्या राज्यात मोठे झाले. कारण हा या मातीचा गुण आहे, ही माती ज्याने डोक्याला लावली, तो कधी मागे बघत नाही, इथे पडलेल्याला उचलण्याची मराठी माणसाला सवय आहे. तीच मराठी माणसाची जगात ओळख आहे. आम्ही कुत्सित आहोत म्हणून ओळखले जात नाहीत, तर हे हृदय प्रसंगी हिमालयापेक्षा विशाल असतं, हिच ओळख सह्याद्रीची आहे. आज तुम्ही या सह्याद्रीचा, मराठी मातीचा अपमान केलाय. त्यामुळेच कोश्यारी यांनी माफी मागितलीच पाहिजे, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले. 

हा फक्त मुंबईचाच अपमान नाही तर मराठी माणसाचा अपमान आहे, ते म्हणताहेत की तुम्ही हे गुजराती, राजस्थान्यांच्या जिवावर मोठे आहात, म्हणजे तुम्ही सगळे आहात ना तुम्ही सगळे आहात. ते गेले तर तुम्हाला पगार मिळणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. आता तुम्ही काय करायचंय ते तुम्ही ठरवा. हा तुमच्या माझ्या अस्मितेचा प्रश्न आहे. शेवटी आपण सगळी मराठी माणसं आहोत हे विसरू नका. या मराठी आईने आपल्याला मोठं केलंय, जिवंत ठेवलंय, या मराठी आईने आपल्याला अनेक वाटा दाखवल्यात आपल्याला, या वाटांचा कोणी मालक नाहीये, आम्ही त्यांना वाट दाखवली, त्याच्या वरून चाललेत म्हणून कदाचित मोठे झाले असतील पण या वाटांचे मालक आम्ही आहोत. आमचा घाम आहे त्या वाटांमध्ये. मुंबईमध्ये गिरण्या होत्या, गिरण्यांमध्ये कोण होतं. २-२ लाख गिरणी कामगार काम करत होते. बजाज पुण्यामध्ये कोणामुळे मोठे झाले, फिरोदिया कोणामुळे मोठे झाले, बिर्ला, टाटा, रहेजा, गोदरेज कोणामुळे मोठे झाले. या मराठी माणसाने रक्ताचं पाणी केलंय, घाम गाळलाय या घामाचा हा अपमान आहे, असेही आव्हाड म्हणाले. 

गुजराती, राजस्थानी लोक महाराष्ट्रातून गेले तर मुंबई देशाची आर्थिक राजधानीही राहणार नाही, या कोश्यारी यांच्या वाक्यावर डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखला देत कोश्यारी यांना चांगलीच चपराक लगावली. डाॅ.जितेंद्र आव्हाड  म्हणाले की,  पैशाचे मराठी माणसाला काय सांगता? नाना शंकरशेठ हा मराठी माणूस इतका गर्भश्रीमंत होता की व्यवसायासाठी ब्रिटीशही त्यांच्याकडून कर्ज घ्यायचे.  ज्यांच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता त्या ब्रिटीशांना कर्ज देणारा माणूस याच मुंबईतील मराठी होता, हे कोश्यारींनी ध्यानात घ्यावे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA