Top Post Ad

हुकुमशाहीचा वार आणि लोकशाहीवर बलात्कार


 मागील महिन्यात महाराष्ट्रात पेटलेल्या सत्तानाट्यास एकनाथ शिंदेच्या शपथविधीने तात्पुरता विराम जरी मिळाला असला तरी या सबंध राजकीय घडामोडीचे  देशाच्या राजकारणावर दुरगामी परिणाम होणार आहेत याकडे दुर्लक्ष होवू नये. अख्खी हयात शिवसेनेत घालविणारे एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या अर्ध्याअधिक आमदारांना हाताशी घेऊन स्वपक्षाशी बंड पुकारून सुरतला रवाना होतात व पुढील दहा दिवसाच्या नाटयमय घडामोडीने देशाचे राजकारण ढवळून निघते!! समजा भारतीय जनता पक्षाने त्यांना टाळी दिली नसती तर शिंदे गटाचे भविष्य काय होते? अर्थातच स्वपक्षाशी तडजोड किंवा वेगळा गट स्थापन करुन नवीन राजकीय सुरुवात किंवा आमदारकीचा राजीनामा.  खरेतर भारतीय जनता पक्षाचे खंबीर पाठबळ असल्याशिवाय शिंदेनी हे पाऊल उचललेले नाही हे कुणीही मान्य करील. २०१४ नंतर देशाच्या राजकारणात मोदी आणि शहा या मित्रजोडीचा उदय झाला आणि हळूहळू लोकशाहीच्या परंपरा बदलायला सुरुवात झाली. भाजपाची मातृसंघटना असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पुढील शंभर वर्षाचा अजेंडा तयार आहे व त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी लोकशाहीच्या -हासावरही ते आनंदोत्सव साजरा करतील हे चिरकाळ सत्य!!! जनसंघापासून सुरू झालेली राजकीय वाटचाल ही एंशी,  नव्वदच्या दशकात भाजपात रूपांतरीत होते. ज्या भाजपाने महाराष्ट्रात शिवसेनेचे बोट धरून स्वतःचे पाय रोवले. आज त्याच भाजपाकडून शिवसेना संपवण्याचा घाट घातला जातोय. खरंतर वाजपेयी, आडवानी, महाजनाची भाजपा आता कुठेच दिसत नाही. आजची भाजपा हि व्यक्तीकेंद्रीत झाली आहे.

भाजपा हि कितीही मोदी आणि शहांच्या भोवती फिरत असली तरी हि जोडी निर्विवादपणे आरएसएसचाच अजेंडा राबवतेय हे तेवढेच सत्य. राजकीय चाणक्य म्हणविणाऱ्या अमित शहांना २०१९ मध्ये जबरदस्त मात दिली ती शरद पवार या मराठी माणसाने!! मुख्यमंत्री पदाच्या वादात भाजपा-शिवसेना युती तुटली आणि त्याच क्षणी ५० वर्षाचा राजकीय अनुभव पणाला लावून शरद पवारांनी महाराष्ट्र विकास आघाडीचा यशश्वी प्रयोग करुन मोदी शहांचा विजयरथ रोखला.  खरंतर शरद पवार हे देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव व चाणाक्ष नेता..! १९७८ ला रातोरात वसंतदादा पाटलांचे सरकार पाडून वयाच्या आवघ्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री झालेले शरद पवार आजही देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असतात. पुरोगामी लोकशाही दलाची चुल मांडून पवार जेव्हा १९७८ ला मुख्यमंत्री झाले तेंव्हा बहुदा मोदी-शहांना राजकारणाची बाराखडीही येत नसावी. काही केल्याने पवार जाळ्यात फसत नाहीत हे लक्षात येताच अडीच वर्षाच्या असफल प्रयत्नानंतर मोदी शहानी, देवेंद्रपंताच्या माध्यमातून आपला मोर्चा शिवसेनेकडे वळविला व शिंदेसारखा देवमासा गळाला लागला. भाजपाच्या 'जाळ्यात आडकणारे शिंदे' हे काही पहिलेच नाहीत यापूर्वी मध्यप्रदेशातील एका शिंदेच्या प्रेमामुळेच आज मध्यप्रदेशात भाजपा सत्तेत आहे.  त्यापूर्वी कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) व कांग्रेस युतीचे सरकार पाडून २३ जुलै २०१९ ला कुमारस्वामीचे सरकार उध्वस्थ करण्याच्या घटनेची लवकरच दुसरी वर्षपूर्ती जवळ येतेय.  या मोहीमेचे सेनापती असणाऱ्या येद्दियुरप्पाना काही काळ मुख्यमंत्री पदाचे बक्षीस देऊन व हि मोहीम फत्ते करणाऱ्या १४ बंडखोर आमदारांचे राजकीय पुनर्वसन करुन कर्नाटक काबीज करण्यात मोदी - शब्दांची जोडी यशस्वी ठरली.

काही काळ येद्दियुरप्पांचा लाड करून भाजपाने त्यांना दूर सारून बश्वराज बोम्मई यांना गादीवर बसवून स्वतंत्र महत्वकांक्षा ठेवणाऱ्या येद्दियुरप्पांचे महत्व कमी केले. मध्यप्रदेशात जोतीरादीत्य सिंधीयाना गळाला लावून कांग्रेस फोडण्यात  मोदी-शहांची जोडी यशस्वी झाली. सिंधीयाना केंद्रात कैबिनेट मंत्रीपद देऊन बोळवण करण्यात आली. बिहारमध्ये सर्वाधिक आमदार असणाऱ्या राष्ट्रीय जनता दलापासून नितीश कुमारांना फारकत घेण्यास भाग पाडून लालु पुत्रास सत्तेपासून दूर करुन संख्याबळ नसतानाही भाजपाने जनता दलाशी सत्तेचा संसार थाटला. आता प्रश्न आहे की एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्रीपद किती दिवसाचे व त्यांना गादीवर बसवण्यामागे मोदी-शहांची राजकीय खेळी काय..?

एकनाथ शिंदेना प्रेमात पाडण्यात व २०१९ झालेल्या ब्रेकअपचे पॅचअप करण्यात फडणवीसांचा सिंहाचा वाटा कुणीही मान्य करील. देवेंद्रपंत मुरब्बी राजकारणी व अभ्यासू नेते आहेत. २०१४ ते २०१९ अनेक आव्हानांना पार करीत त्यांनी सत्तेचा कार्यकाळ पूर्ण केलेला! पंताना महाराष्ट्राचा कारभारी करतानासुद्धा मोदी-शहानी एकनाथ खडसेसारख्या दिग्गजास डावलले. मागील काही वर्षांत फडणवीसाची वाढलेली राजकीय महत्वकांक्षा व  मूळचे नागपूरकर असल्याने संघाशी असणारी जवळीक बहुदा मोदी-शहांना भविष्यातील धोक्याची घंटा वाटत असावी. किंबहुना संयुक्त महाराष्ट्राच्या लढयापासून व मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यापासून गुजराती नेते हे मराठी नेत्यांना पाण्यात पाहतात. मुंबई तुमची तर भांडे घासा आमची म्हणणाऱ्या मोरारजी देसाई पासून सुरु झालेला हा मराठीद्वेष पंतानी समजून घेतला असता तर बरे झाले असते. पंत उपमुख्यमंत्री होण्यास तयार नसताना सुद्धा भाजपाध्यक्ष जे. पी.नड्डानी त्यांना शपथ घेण्यास बाध्य केले.   खरंतर अशी गुगली टाकल्याइतके स्वातंत्र्य भाजपात नड्डांना नक्कीच नाही. शिंदे -  फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे मोदी व शहांचे आभार मानताना पंतानी नाकावर हात ठेऊन दबक्या आवाजात शिंदेना नड्डांच्या आभाराचे स्मरण करुन दिल्याचे आपण सर्वांनी  दूरदर्शनवर पाहिले.

यावरून भाजपा किती व्यक्तीकेंद्रीत झाली आहे हे स्पष्ट होते.  शिंदेंना मुख्यमंत्री पदाचे बळ देऊन मोदी-शहांचे पुढील ऑपरेशन लोटस हे पश्चिम बंगाल व राजस्थान असल्याचे स्पष्ट जाणवते.   शिदेच्या फितुरीने राजकीय वातावरण तापले असतानाच आदिवाशी समाजाच्या द्रौपदी मुर्मूंना एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार घोषित करून मोदी शहांनी ममता दिदींच्या राष्ट्रीय राजकारणातील महत्वकांक्षेला शह दिला. राष्ट्रपती पदासाठी विरोधकाकडून तगडा उमेदवार देऊ पाहणाऱ्या दिदींना हा मोठा धक्का होता. द्रौपदी मुर्मुंना राष्ट्रपती पदाची उमेदवारी देऊन भाजपाने अनेक फासे टाकलेत. बंगाल शेजारील उडीसा राज्यातील सत्ताधारी बिजु जनता दलाचे प्रमुख नवीन पटनाईक गृहराज्यातील द्रौपदी मुर्मूंना नकार देऊ शकणार नाहीत व ते त्यांना राजकीयदृष्ट्या सोईचे ठरणारे नाही. झारखंड मध्ये काँग्रेसच्या १६ आमदाराच्या पाठिंब्यावर सत्ता भोगत असलेले झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेनही आपल्या राज्यातील आदिवाशी मतदारांची मर्जी राखण्यासाठी द्रौपदी मुर्मुना पाठींबा देऊ शकतात. किंबहुना त्यांच्या या निर्णयाने काँग्रेससोबतचे त्यांचे संबंध बिघडून कॉग्रेस व झारखंड मुक्ती मोर्चाचा काडीमोड होऊन, झारखंडमध्ये भाजपाला हेमंत सोरेनची नवरी होण्याच्या शक्यता दिसत असाव्यात. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करुन भाजपाने बंगालमधील ममता दिदीचे पुतणे अभिषेक बॅनर्जीना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहण्याच भाग पाडले. बंगाल विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजपाने सुवेंदु अधिकारीच्या रूपाने तृणमूल कांग्रेसच्या बड्या नेत्यास फोडून बंगालच्या सत्ताचिखलात कमळ फुलविण्याचा प्रयत्न केला होता परंतु सुवेंदु अधिकारी यांनी नंदीग्राम मतदारसंघात दीदीच्या विरोधात दंड थोपटुन विजय तर मिळविला पण भाजपाला सत्तेची बंगाली मिठाई ते चारु शकले नाहीत. अभिषेक बॅनर्जी पश्चीम बंगालच्या चोवीस परगाना जिल्ह्यातील डायमंड हार्बर लोकसभा क्षेत्राचे २०१४ पासून संसदेत नेतृत्व करतात. सध्या दीदी आणि अभिषेक बैनर्जीमध्ये राजकीय धुसफुस सुरू असल्याचे वाचनात आहे. अभिषेक बॅनर्जी हे तृणमूल कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय महासचिवही आहेत.

२९२ सदस्यांच्या बंगाल विधानसभेत २१४ आमदारासह भक्कम मजबूत असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोदी शहांच्या खेळीने अभिषेक बॅनर्जीच्या रूपाने फुट पडली तर नवल वाटण्यासारखे काहीच नाही.  परंतु ममता दीदी या उद्धव ठाकरेसारख्या संयमी व भावनिक नाहीत. त्यामुळे मोदी-शहांना बंगालच्या सत्तेचा रसगुल्ला सध्या तरी कठीणच आहे.

परंतु' साम, दाम, दंड भेद, ईडी, सिबीआयच्या धाकाने उदया बंगालमध्ये  ७६ पाकळ्याचे कमळ फुलल्यास नवल ते कसले. राजस्थानात सचिन पायलट यांनाही गुवाहाटीच्या पिकनिकचा मोह झाल्यास व आपणही एकनाथ शिंदे होऊ शकतो हि आशा बळावल्यास १०८ आमदारासह स्पष्ट बहुमताने सत्तेत असलेल्या अशोक गहलोतांचा पंजा केव्हाही छाटला जाऊ शकतो. महाराष्ट्रात ५० आमदारांना इडीच्या छडीची काडी दाखवून ठाकरेंच्या सत्तेचे नखरे बंद करणारी भाजपा राजस्थानात बहुमतासाठी कमी पडत असलेले ३१ आमदार फोडू शकणार नाही हे कशावरून. तुर्तास एकनाथ शिंदेचा काटेरी मुकुट व मुख्यमंत्रीपदाचे मृगजळ पुढील अडीच वर्षे टिकावे व धर्मवीरांचे चेले कर्मवीर व्हावे या सदिच्छा त्यांना देण्याखेरीज व देशावर होणारा हुकुमशाहीचा वार आणि लोकशाहीवर होणारा बलात्कार पाहण्याखेरीज भाबड्या जनतेकडे आहे तरी काय...?


अ‍ॅड.सचिन मेकाले
  मो.९७६७६५९५५१
Email. sachinmekale11@gmail.com


          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com