Top Post Ad

सध्या देशात एवढीच लोकशाही उरली ...


वाझहॅट म्हणतात, एक साधारण चोर आपले पैसे, आपली बॅग, आपले दागिने चोरतो पण एक राजकारणी चोर आपला भविष्य, आपला रोजगार, आपला धंदा, आपले आरोग्य, आपले शिक्षण व आपले अधिकार चोरतो. यामधील महत्वाची गोष्ट म्हणजे साधारण चोर कुणाला लुटायचं हे निवडतो ? पण राजकारणी चोरास, आपण स्वतः हून स्वतःला लुटण्यास निवडून देतो. सध्या देशात एवढीच लोकशाही उरली असून अशा लोकशाहीचा उदोउदो करण्यासाठीच सरकार, राजकारणी व पत्रकार नेटाने काम करतांना आपल्याला दिसत आहेत. पण त्याचवेळी भारतातील पगारदार आपल्या पगाराच्या शेपटीने आपली अब्रू झाकू पाहत आहे. 

मला काय फरक पडतो ? माझं काय नुकसान आहे?, त्याचं तो पाहत बसेल, तो चूप आहे तर मी कशाला बोलू? आपलं घर भलं नी आपण, पगार वाढतोय ना, डीए वाढतोय ना, वेतन आयोग मिळतो ना, घर आहे,गाडी आहे, मुलं चांगली शिकत आहेत आणखी काय पाहिजे, पेन्शन आहे, बोललो तर प्रमोशन होणार नाही, वरचं पद मिळणार नाही, बॅंक बॅलन्स आहे चिंता नाही. चिंता नाही, या शब्दात भिषण भिती दडलेली आहे, वाघ सुध्दा तेव्हा घाबरतो जेव्हा त्याची शावके आवाज देऊनही दडलेल्या जागेतून बाहेर निघत नाही कारण निसर्गाचा नियम त्याला माहित आहे, तो इतरांच्या पिलांना खातो त्यामुळे त्याच्या शावकांना मारणाराही या निसर्गात आहे हे तो जाणतो.

एक दिवस जर कामवाली कामाला आली नाही तर आपण तिला सतरा प्रश्न विचारणार, फुकट काम करतेस का असंही ठणकावणार, तिची ऐपत काढणार पण पावसाळ्यात नालीतील पाणी घरात शिरल्यावर साध्या नगरसेवकाला जाब विचारण्याची हिंमत पगारदारात नसते. कमी शिकलेल्या, बुध्दीहिन, चरीत्रहिन, व्यसनी, राजकारण्यांना पगारदार घाबरतात. हे देशाचं दुर्दैव आहे.

वस्तु व सेवा उत्पादक उद्दोगपती सदैव नफ्यात कसा? पण पिढ्यानपिढ्या शेती करणारा व अन्नधान्य उत्पादित करणारा शेतकरी सदैव तोट्यात कसा? भारतातील विशेष म्हणजे, शेती करणारा तोट्यात आणि शेतीचे सामान विकणारा सदैव फायद्यात असतो. शिक्षण क्षेत्र चालविणारे शैक्षणिक उद्दोगपती सदैव नफ्यात पण शिक्षण घेणारे तरूण सदैव तोट्यात कसे? राजकारणात एकदा निवडून आले की त्यांच्या पिढ्यानपिढ्या सुखात पण मतदान करणारे व बदलाची अपेक्षा करणारे मतदार सदैव दुःखात कसे? राजमुद्रा ‌बदला, शहरांची, रस्त्यांची नावे बदला पण कधी शेतकऱ्यांचा तोटा नफ्यात बदलवून दाखवा म्हणजे सरकारच्या बूडात किती दम आहे ते दिसेल. हे सर्व ठाऊक असतांनाही प्रश्न विचारणार कोण?

कर्ज काढून‌ घेतलेल्या चारचाकी ने सुंदर रस्त्यांवरून फिरताना मजा येते. अमुक अमुक रस्ते मंत्री खूप चांगलं करतोय अशी स्तुती ही येते. त्यांच्या कामाचं कौतुक करणे योग्य पण पेट्रोल भरतांना मनात शिवा येतात त्याचं काय ? चांगले रोड बांधणे, दळणवळणाच्या सोयी निर्माण करण्याचा उद्देश हा वाहतूक खर्च कमी करणे व पर्यायाने वस्तुंच्या किमती कमी करणे हा असतो हे विचारणार कोण? एका बाजूने रोड बांधले, दुसऱ्या बाजुने गरज व आवश्यकता नसतांना इंधनाचे दर वाढवले, तिसऱ्या बाजुने वाहनांच्या किमती खूप वाढवल्या, चौथ्या बाजुने आणखी रस्त्यावर टोल नाके बसवले, तुमच्याच चारचाकीचा रोडटॅक्स खूप वाढवला, वाहनांच्या विम्याचे दर वाढवले व भविष्यात खात्रीने मतदारांना लुटण्यासाठी हे रस्ते खाजगी मालकी कडे हस्तांतरित करणार हे सर्व माहीत असूनही त्या मंत्र्याला प्रश्न विचारणार कोण? आता याच चारचाकीच्या कर्जाचा एक हफ्ता नका भरु तर लगेच बॅंकेचे एजंट तुमच्या दारात उभे होतील पण हजारो करोड कर्ज घेऊन विदेशात पळून गेलेल्या शुरविरांच कर्ज का माफ केले ? असा प्रश्न विचारणार कोण?

तुमच्या नोकऱ्या तुमच्या सेवानिवृत्तीच्या वयापर्यंत राहतील या विश्वासात जगू नका, पेन्शन मिळेल या भ्रामक कल्पनेत राहू नका कारण सरकारने कमाईचे सर्व स्त्रोत विकलेले आहेत आता केवळ कर जमा करणे,कर लादने व वस्तुंच्या किमती जमेल तितक्या वाढवणे एवढंच काम सरकारचं असणार आहे. तुमचा पगार केवळ जमा होणाऱ्या करावर अवलंबून राहणार असून कर वाढेल तरच पगार होईल अशी मानसिकता सरकारची असणार आहे. ज्यात तुमची नरडी सरकार दाबणार आहे. भारतात पगारदार 50 वर्षांचा झाल्यावर तो सक्षम आहे की नाही हे तपासण्यासाठी नियम आहेत पण राजकारणी 80 वर्षांचा होईल त्याचे दात पडतील तरी त्याची सक्षमता तपासण्याचा नियम नाही. राजकारण्यांची मुले राजकारणी बनतात पण पगारदारांची मुले पगारदार का बनत नाही?ही नोकरीची तुमची शेवटची पिढी आहे हे सर्व माहीत असतांनाही प्रश्न विचारणार कोण?

इकडे माणसाचा स्वभाव माणूस मरेपर्यंत बदलत नाही पण राजकारण्यांची विचारधारा मात्र एका झटक्यात बदलते. आज रात्री हे ज्या पक्षात झोपले‌ त्याच पक्षात सकाळी उठतील का? हे खात्रीपूर्वक त्यांना स्वतःलाही सांगता येणार नाही. कालपर्यंत ज्या विचारधारेला व पक्षाला यांनी शिव्या दिल्या अचानक त्या पक्षात प्रवेश करून त्या पक्षाची थोरवी गातांना राजकारणी आपल्याला दिसतील. नैतिकता, नियम, निस्वार्थ सेवा, निष्पादन हे सर्व तुमच्या-आमच्यासाठी आहे. राजकारण्यांना हे लागू होत नाही पण हे सर्व त्यांना विचारणार कोण?

अन्नधान्य व जिवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लावून नुकतीच सरकारने आपली कर्तबगारी सिध्द केलीय. सिलेंडरच्या भावात तर पैज लागली आहे, विम्याच्या हफ्त्यावरही कर आहे, हिरे घेण्यावर कमी कर आहे पण पेन्सिल घेण्यावर जास्त कर आहे, खतांच्या किमती वरच्या बाजुने व शेतमालाच्या किंमती खालच्या बाजुने का येतात, शाळेच्या फी का वाढत आहेत, सरकारी शाळा गायब का होत आहेत, दवाखान्याचे बिल जास्त का येत आहेत, पगारदार एका पगारात किती वेळ कर देत आहे, राजकारण्यांची संपत्ती पाच वर्षांतच १००० पटीने कशी वाढते, राजकारण्यांच्याच घरी आमदार खासदार कसे, आमची मुले लंगलंग(बेरोजगार) का फिरतात, तुमच्याच मुलांचे भविष्य उज्वल का, तू माझा नोकर आहे की मी तुझा, शहरांची नावे बदलून काय फायदा झाला, धर्माचा इतका पुळका का, मंदिर बनलाच पाहिजे हा अट्टाहास का, मी निवडून दिलेली सरकार का येत नाही अचानक आमदार पक्ष का बदलतात, विशिष्ट कपडे घालण्यावर बंधन का, तुम्हालाच पेन्शन का, रूपया का घसरत आहे, देशावरील कर्ज का वाढत आहे, सरकारी संपत्ती का विकत आहात, आमच्या कराच्या पैशाने बांधलेल्या रेल्वे रूळावर खाजगी रेल्वे कशी, तरूणांचा रोजगार कुठं गेला, सर्व पत्रकार सरकारची थोरवी गातांना का दिसतात, तुमची मुले लॅटरल एन्ट्री तून मोठ्या पदावर विराजमान कशी झाली, एकनिष्ठ पणाचे व जबाबदारी चे नियम तुमच्यासाठी का नाहीत, अशा कितीतरी प्रश्नांना विचारणार कोण?

मजुर, शेतकरी प्रश्न विचारणार नाही किंवा व्यवस्थेत बदल घडवून आणणार नाही. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न इतका भिषण आहे की समस्या काय? हे त्यांना कळणारच नाही. त्यांच्यासाठी बदल हा शब्दच महत्त्वाचा नाही. त्यांना असेल त्या परिस्थितीत जगणे व आलेला दिवस ढकलणे एवढंच कळते पण मग सत्तेला प्रश्न विचारणार कोण? विरोधाने व्यवस्था मजबूत होते, समाजात समानता आणण्यासाठी विरोधाशिवाय दुसरा पर्याय नाही पण हा विरोध करणार कोण? विरोधक जवळपास निपचित आहेत. त्यामुळे बेलगाम घोड्यासारखी ही सरकार लोकांवर टाच मारून चाल करत आहे. या घोड्याला लगाम लावणारा एकच वर्ग उरलेला आहे व तो म्हणजे पगारदार. पण सध्या देशातील पगारदार पळपुटा, घाबरट व असंवेदनशील झाला असून मी इतरांपेक्षा बरा आहे व माझ्या घरी आग नाही यामध्येच तो समाधान मानत आहे पण या आगीचे चटके त्याला बसतील. भविष्यात पगार राहीलच हे तो आजही खात्रीने सांगू शकत नाही.

सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात बोलण्याची पगारदारांची हिंमत नसेल तर त्यांनी स्वतः ला कुटूंबभक्त व पगार प्रीय म्हणावे देशभक्त म्हणण्याची गरज नाही. स्वतःला घाबरट म्हणावे, मला देशाची चिंता आहे असा आव आणण्याची गरज नाही, स्वतः ला पळपुटा म्हणावे मी देशासाठी जीव देऊ शकतो असा खोटा आभास निर्माण करण्याची गरज नाही.वरचे सगळे प्रश्न जर महत्वाचे नसतील व पगारदारांना त्यांचा पगारच महत्त्वाचा असेल तर मोठी पद तर सोडा,आज पगारदारांमध्ये हिंमत असेल तर आपल्या मुलांना साधं सरकारी मास्तर (संस्थापकाचे खिसे न भरता) बनवून दाखवावं. त्यांना त्यांची कुवत लवकरच कळेल.  बाबासाहेब म्हणतात, स्वयं घोषित साधू व साध्वींचा राजकारणात प्रवेश म्हणजे "देव" हा एक भ्रम आहे, हे सिद्ध होते. खरा अधिकार संसदेत मिळतो मात्र ज्याप्रमाणे पशू-पक्ष्यांना घाबरविण्यासाठी शेतात पुतळे उभे केले जातात त्याचप्रमाणे मनुष्य जातीला घाबरविण्यासाठी ईश्वराचे पुतळे उभे केले जातात. तथाकथित साधू साध्वी संसदेत प्रवेश करत आहेत आणि शिकलेले व पगारदार लोक मंदिरात प्रवेश करण्यास उतावीळ आहेत. ज्या सहनशक्ती ने मंदिराच्या रांगेत उभे राहता त्याच सहनशक्तीने विरोध करा, सरकारला प्रश्न विचारा यामुळे तुमच्या येणाऱ्या पिढीला विरोध करण्याची गरज भासणार नाही.


प्रा.आकाश
नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालय
ब्रम्हपुरी,महाराष्ट्र
profakash123@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com