ठाणे - फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महापालिकेची वरवरची धडपड असून, फेरीवाला धोरणाबाबत ठाणे महानगर पालिका उदासिन असल्याचा आरोप अनेक फेरिवाल्यांनी केला आहे. पालिकेला आजही शहरात फेरीवाले नेमके किती याचा अंदाज बांधता आलेला नाही. ठाणे महापालिकेच्या हद्दीत जागा मिळेल तिथे फेरीवाले बसत असून गर्दीच्या ठिकाणी स्टेशन, हॉस्पिटल किंवा शाळा अशा अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे आपले बस्तान मांडले आहे. हे फेरीवाले केवळ ठाणे शहरातीलच नव्हे तर ठाण्याच्या बाहेरील असल्याची बाबही अनेक वेळा उघड झाली आहे.
महापालिकेने केलेल्या २०१९ सर्वेक्षणात शहरात केवळ सहा हजार फेरीवाले असल्याचा दावा केला त्यापैकी केवळ दोन हजार फेरीवाल्यांनी पुरावे पालिकेकडे जमा केले आहेत. मात्र आता शहरात फेरीवाल्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. सुमारे २५ हजारहून अधिक फेरीवाले असल्याचे पालिका सांगत असली तरी याबाबत पालिकेकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. २०१६ आणि २०१९ च्या सर्वेक्षणाचा आधार घेऊन नुकतीच महापालिकेने फेरीवाला यादी जाहीर केली आहे. यामध्ये काही दुरुस्ती असल्यास त्या करणार असल्याने आणखी फेरीवाल्याना कागदपत्रे सादर करण्यास वेळ मिळणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाणे महापालिका उपायुक्त - अतिक्रमण नियंत्रण विभाग यांनी ठाणे महापालिका क्षेत्रातील पात्र फेरीवाल्यांची यादी प्रसिद्ध केली आहे त्यामध्ये स्वत:ला ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणवून घेणाऱ्या संजय चंद्रकांत पितळे याचे नाव अ.क्र. 135 व अर्ज क्र.2892 वर आहे. अशा बोगस फेरिवाल्यांमुळे गरीब आणि ज्यांचे कुटुंब यावर अवलंबून आहे त्यांच्या उपजिविकेचे साधन हिरावले जात आहे. अशा बोगस फेरिवाल्यांची नावे भविष्यात अधिकाधिक समाविष्ट करण्यासाठीच महापालिकेचे अधिकारी फेरिवाल्यांचा आकडा २५ हजाराहून असल्याची बतावणी करत असल्याचा आऱोप ठाण्यातील प्रसिद्ध समाजसेवक सुभाष ठोंबरे यांनी केला आहे. ज्यांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे त्यां सर्व फेरीवाल्यांनी मोठ्या संख्येने अशा बोगस फेरिवाल्यांविरोधात हरकती/सुचना 12 ऑगस्टपर्यंत पालिकेत दाखल कराव्यात असे आवाहनही ठोंबरे यांनी केले आहे.
ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या फेरीवाल्यांच्या यादीमध्ये ठाण्यातील पत्रकाराच्या नावाचा समावेश असल्याने याबाबत पालिकेने खुलासा करावा अशी मागणी राज्यव्यापी वृत्तपत्र व वृत्तवाहिनी पत्रकार महासंघाचे सेक्रेटरी विलास शंभरकर यांनी केली आहे. मागील अनेक वर्षापासून सदर पत्रकार हा ठाण्यातील मोठा पत्रकार म्हणून मिरवत असून हा महानगर पालिकेत पत्रकारांना देण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा लाभार्थी असल्याचेही निदर्शनास येत आहे. पत्रकार म्हणून महापालिकेचा लाभार्थी असताना पुन्हा फेरीवाला म्हणून ठाणे महानगर पालिकेच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी फेरीवाल्याच्या यादीत आपले नाव समाविष्ट करणाऱ्या या पत्रकाराची चौकशी झालीच पाहिजे असे शंभरकर यांनी म्हटले आहे.
0 टिप्पण्या