केवळ लोखंडी बीमवर उभे असलेल्या गुप्ताच्या बांधकामावर कारवाई कधी
मागील दोन आठवड्यापासून ठाणे शहरात मुसळधार पावसामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाजारपेठेत पाणी साचले आहे. मात्र नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील जवाहर बाग लगत असलेल्या बाजारपेठेत होत असलेल्या गुप्ताचे बांधकाम मात्र जोरात सुरू होते. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर ठाण्यातील अनेक बांधकामांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे.अनेक प्रभाग समित्यामधून अनधिकृत बांधकामांवर ठाणे महापालिका धडक कारवाई करीत आहे. मात्र नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील जवाहर बाग लगत असलेल्या बाजारपेठेत सुरु असलेल्या बांधकामांवर अद्यापही कोणती कारवाई का होत नाही असा सवाल येथील बाजारपेठेमधील व्यापारी करत आहेत.
ठाणे जवाहरबाग जवळील मच्छीमार्केटच्या बाजुला भोईर देशी बारच्या लगत लोखंडी (आय बिंम)च्या सहाय्याने तळ मजला अधिक एक मजल्याचे बांधकाम. खाली व्यावसायिक गाळे आणि वरती रहाण्यासाठी करण्यात आले. हे संपूर्ण बांधकाम केवळ लोडबेअरींगवर करण्यात आले आहे. त्यातच मागील काही दिवसात याच बांधकामावर पुन्हा लोड बेअरिंगच्या सहाय्याने आणखी एक माळा वाढवण्याचे काम सुरु झाले. हे बांधकाम धोकादायक असून ते कधीही कोसळू शकते. त्यामुळे भविष्यात जिवीत हानी आणि वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा परिसर बाजारपेठेचा असल्याने तो नेहमीच गजबजलेला असतो तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने हे बांधकाम कोसळल्यास याला जबाबदार कोण? असा सवालही आता करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या