भारतात दोन विचारधारा क्रांती व प्रतिक्रांतीच्या पथदर्शक आहेत. आंबेडकरी चळवळ क्रांतीच्या मार्गावर चालणारी तर आरएसएस प्रतिक्रांतीच्या दिशेने सातत्यपूर्ण मार्गक्रमण करणारी आरएसएसला इथली संविधानिक लोकशाहीची, स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्यायाची व्यवस्था उध्वस्त करायची आहे व त्या दिशेने ते पाऊले टाकत आहेत. तर दुसरीकडे... आंबेडकरी चळवळीला स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्यायाचे संवर्धन, पालनपोषण व संरक्षण करणारी संविधानिक लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवायची आहे. असे असतांनाही ही चळवळ गर्तेत अडकली आहे. एकीकडे ... आरएसएसच्या शाखा वाढत आहेत. वाढणाऱ्या शाखांमध्ये तरूणाईचा भरणा होत आहे. तरूणांना आकर्षित करून आरएसएस पुढच्या प्रतिक्रांतीच्या ५०-६० वर्षाची तजविज आजच करून ठेवीत आहे.
तर दुसरीकडे ... आंबेडकरी चळवळ काही मोजक्या वय संपत चाललेल्या लोकांपर्यंत मर्यादीत होत चालली आहे. तरूणाईला आकर्षित करणारा कृतिकार्यक्रम आंबेडकरी चळवळीच्या म्होरक्यांकडे दिसून येत नाही. कुठल्याही संघटनेचे वय वाढत असतांनाच तरूणाईच्या बळावर त्या संघटनेचे आयुष्य दुप्पटीने वाढत जात असते. पण तरूणाईपासून दूर जाणारे संघटन प्रौढावस्थेत म्हातारे होत जाते. क्रांतीला प्रतिक्रांतीसोबतचे शितयुद्ध जिंकायचे आहे. त्यासाठी क्रांतीच्या नायक शिलेदारांची ही जबाबदारी आहे की आंबेडकरी चळवळीत उपकार म्हणून कार्य करण्यापेक्षा जबाबदारी म्हणून कार्याला लागा.
प्रतिक्रांतीवर मात करायची असेल तर शिस्त व संयम पाळायला शिका. एखादी कृती करून समाजमन जिंकले की लगेच नायक होण्याची महत्वाकांक्षा बाळगू नका. व लगेच आंबेडकरी चळवळीचे स्वाभिमानी नेतृत्व करणाऱ्यांवर प्रश्नांकित वयल निर्माण करू नका. तुम्ही एका जबाबदारीचे निर्वहन करून चळवळीत आपले योगदान दिले. असेच प्रत्येकाने आपआपली जबाबदारी म्हणून आंबेडकरी चळवळीत योगदान दिले तरच ही चळवळीचे आयुष्य चिरकाळ टिकेल. मोर्चे काढली, चार माणंस जमवली म्हणजे चळवळ चालत नसते. तत्कालीन मुद्यांवर लढणे म्हणजेच चळवळ नव्हे. तर तत्कालीन मुद्यांवरील लढ्याचा भविष्यावर दूरगामी परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन संयमी लढ्याची आखणी करणे चळवळीच्या शिलेदारांचे काम आहे.आंबेडकरी चळवळीतल्या व परिवर्तनवादी आंदोलनातल्या माझ्या तरूण मित्रांनो ...
शत्रु जेव्हा स्वतःचे शक्तीप्रदर्शन करीत असतो तेव्हा त्याच्या शक्तीप्रदर्शनाची चिकीत्सा करून तो वेळ चिंतनात घालवायचा असतो. हे युद्धनितीचे साधे व सोपे नियम आहे.शत्रुंचे शक्तीप्रदर्शन व तुमचेही शक्तीप्रदर्शन दोन्ही एकसाथ, एकाचवेळी सुरू असेल तर त्याला युद्ध असेच म्हणतात. शक्तीप्रदर्शनाची कीतीही नावे बदलली तरीही .... ज्या गोष्टींच्या संरक्षणासाठी तुम्ही तुमचे शक्तीप्रदर्शन कराल त्याच गोष्टीच्या विरोधात शत्रु जनमत तयार करीत असतो हे लक्षात घ्या. आज ज्याच्या सन्मानार्थ तुम्ही शक्तीप्रदर्शनाला तयार आहात तेच उद्धस्त करण्यासाठी उद्याचे मोर्चे निघाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.शत्रु तरूण होत आहे. तुम्हीही नवी उमेद जागवा. शस्त्राने नव्हे अस्त्राने सज्ज व्हा. शक्तीप्रदर्शनासाठी नाही तर नितीने सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी ... मित्रांनो, निती ओळखा, कृती ओळखा, चाल ओळखा, चिंतन करा, जबाबदारी घ्या. तुम्ही नेहमीच शक्तीप्रदर्शन करीत आला आहात. हा काळ चिंतनाचा आहे, तो चिंतनात घालवा. व नव्या दमाने, नव्या उमेदीने, नव्या नितीने सज्ज व्हा !
0 टिप्पण्या