महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शुक्रवारी 29 जुलै रोजी संध्याकाळी एका कार्यक्रमात सांगितले की, जर मुंबईतून गुजराती आणि राजस्थानींना हटवले तर शहराकडे ना पैसा असेल ना आर्थिक राजधानीचे पद. कोश्यारी यांच्या विधानानंतर अनेक राजकीय पक्षांनी त्यावर आक्षेप घेतला आणि वाद निर्माण झाला. त्यांच्या विधानावरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्षात बसलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांना घेरले असून आता माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास सांगितले. त्यांना घरी पाठवायचे की तुरुंगात पाठवायचे हे ठरवण्याची वेळ आता आली आहे, असे ते म्हणाले. मुंबई आणि ठाण्यात शांततेत राहणाऱ्या हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही ठाकरे यांनी केला.
ज्या राज्यात राज्यपाल आहोत, त्याच राज्याविषयी मनात कमालीचा आकस- द्वेष बाळगणारे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्रातून त्वरित हटवण्यात यावे, अशी मागणी ‘आंबेडकरी संग्राम’ चे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ प्रा डॉ जी के डोंगरगावकर आणि सरचिटणीस ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ यांनी पत्रकाद्वारे केली आहे. कोश्यारी यांना हटवण्याच्या मागणीसाठी राज्यातील सर्वंपक्षीय मराठी खासदारांनी एकजुटीने दिल्लीत नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. राज्यपाल हे केंद्र सरकारचे प्रतिनिधी असतात. त्या घटनात्मक पदावरील व्यक्तीचे वक्तव्य हे केंद्र सरकारच्या मनातले बोल मानले जातील, असे आंबेडकरी संग्रामने म्हटले आहे.
केंद्र सरकार हे राज्यपालांच्या वक्तव्याशी सहमत नसेल तर ते कृतीतून दाखवून देण्यासाठी भगतसिंग कोश्यारी यांना त्वरित महाराष्ट्रातून हटवण्यात यावे, असे डॉ डोंगरगावकर आणि शेजवळ यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे. राज्यपालांच्या त्या वक्तव्यानंतर त्यांना चारही बाजूंनी घेराव घालण्यास सुरुवात झाली आहे. अनेक नेत्यांनी ट्विट करीत याचा निषेध केला आहे तर प्रसारमाध्यमांमध्येही आपले मत व्यक्त केले आहे. आता युवा सेनेतर्फे याप्रकरणी संपूर्ण राज्यात स्वाक्षरी मोहीम राबवून विधानसभा मतदारसंघात याला विरोध करण्यात येणार आहे. शिवसेनेचे नेते राज्यपालांचे वक्तव्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असून, हे विधान महाराष्ट्रविरोधी असल्याचे त्यांना सांगण्यात येणार आहे.
शिवसेना नेत्या आणि प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी भाजपवर निशाणा साधत ट्वीट केले कि, सगळा पैसा जर गुजराती आणि मारवाडी लोकांकडे आहे तर ED च्या कारवाया मराठी माणसावर का ? असा सवाल त्यांनी गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
राज्यपालांच्या विधानावर भाजपच्या काही नेत्यांनीही नाराजी व्यक्त केली. या विधानावर झालेल्या गदारोळानंतर राज्यपालांनी आपले स्पष्टीकरण देताना आपले विधान वळणदार पद्धतीने मांडल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि प्रगतीत कष्टकरी मराठी भाषिक समाजाच्या योगदानाचा अपमान करण्याचा आपला हेतू नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र यासाठी राज्यपालांनी माफी मागावी, अशी भूमिका सर्वत्र व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटविण्याची आणि याठिकाणी महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो, अथवा मुंबई बद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत, राष्ट्रपती द्रौपती मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा, - असे संभाजीराजे भोसले यांनी ट्वीटद्वारे आवाहन केले आहे.
मुंबईतील मील्स या राजस्थानी लोकांकडे होत्या. संपानंतर राजस्थानी लोक निघून गेले पण मुंबईवर परिणाम झाला नाही. मुंबईतील गुजराती समाज हा दाणाबाजार आणि दलालीमधे आहे. हा समाज गेल्यावरही मुंबईवर परिणाम होणार नाही. कारण आज मुंबई मॅन्युफॅक्चरिंग हब नाही तर ट्रेडिंग हब आहे. हे ट्रेडिंग हब कुठला एक समाज चालवत नाही तर एम बी ए केलेला तरुण चालवतो. हा गुजराती समाज गेल्याने महाराष्ट्राला फरक पडणार नाही, - वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर
0 टिप्पण्या