Top Post Ad

तरुणांनो झाडे लावा व जगवा - ती नंतर तुम्हाला जगवतील

 


           मानवाची संख्या वेगाने वाढत आहे. त्याचप्रमाणात हवा प्रदुषित करण्याचे कार्यही माणुस जोमाने  करत आहे.मात्र त्या प्रमाणात संतुलनासाठी वृक्षांची संख्या वाढवली पाहिजे.पण आजचीस्थिती पहाता याकडे आपले दुर्लक्ष झाल्याचे दिसते.अन्न,वस्त्र ,निवारा या मानवाच्या प्राथमिक गरजा फक्त  वृक्ष आणि वृक्षच भागवू शकतो.या गरजा भागविण्यासाठी मानवास प्रयत्न करावे लागतात.आणखी दोन प्रमुख गरजा म्हणजे हवा आणि पाणी या गोष्टी आपणास विनासायास प्राप्त होतात.यासाठी झिजतात ते फक्त वृक्षच.निसर्गाने दिलेले पाणी हे वैभव पावसाळ्यानंतर आठ महिने आपणास सावकाशीने मिळवून देण्यास वृक्षांचीच मदत होते.शुद्ध हवा म्हणजे त्यातील जो प्राणवायू आहे तो आपणांस वृक्षच देत असतात.आपत किंवा  आपण निर्माण  केलेले अनेक उद्योगधंदे हवेत कर्ष सोडतो.हाच कर्ष ग्रहन करुन वृक्ष त्यापासून अन्न तयार करतात.या प्रक्रियेतून आपणास प्राणवायू  पूरवितात.हवेतील सर्व प्रकारचे प्रदुषण नष्ट करुन पर्यावरण शुद्ध राखण्याचे काम करणारी पृथ्वीपातलीवरील वृक्षसंपदा म्हणजे हवा शुद्ध करणारे नैसर्गिक कारखानेच आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

                आज मानवाची संख्या  झपाट्याने  वाढत आहे.कोकणात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे.इंधनासाठी ,अन्नासाठी,इमारती लाकडांसाठी ,शेती करण्यास जमिनी उपलब्ध करण्यासाठी ,घरे,गुरांचे वाडे,फर्निचर ,कागद निर्मिती इ.साठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चालू आहे.मात्र संभाव्य धोका ओळखून आपण आतापासूनच दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण,सामाजिक वनिकरण,वनमहोत्सव,पर्यावरण दिन,वसुंधरा दिन,वृक्षदिंड्या वगैरे दिवस साजरे करत आहोत.प्रत्येक सुजान नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन निसर्गचक्रास गती देणे आवश्यक आहे.यासाठी आपण आपल्या जिल्हांमध्ये,तालुक्यातील प्रत्येक  गावागावात,वाडीवाडीमध्ये तसेच आपल्या घराच्या परिसरात उपयुक्त ठरणाऱ्या वृक्षांची लागवड करणे काळाची गरज आहे.प्रत्येक नागरिकांनी आपल्या  व आपल्या आवडत्या  व्यक्तीच्या वाढदिवसानिमित तसेच लग्न वाढदिवसानिमित आणि आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित तसेच  आवडत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ  दरवर्षी  फक्त ५  झाडे लावली तर पर्यावरणास सहाय्यकरी ठरणाऱ्या  वृक्षांची वाढ होऊन निसर्ग समतोल  राखण्याचे पुण्य पदरात  पडेल .शिवाय देशकार्यात सहभागी झाल्याचा आनंद मिळेल.

वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करणे आवश्यक आहे.गरज  आहे ती फक्त याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून करण्याची.वृक्षरोपण कार्यक्रमाअंतर्गत 
(१) वड,पिंपळ,औदुंबर हे तीन वृक्ष गावाबाहेरील मोकळ्या जागी लावावे.हे फक्त पावसाळ्यातील पाण्यावर जगतात.जमिनीत भूजल साठविण्यास चांगली मदत करतात.
(२) बेल- गावागावात प्रत्येक घराशेजारी व मंदिराच्या आवारात लावता येतील तितकी ही झाडे लावावीत.हवेतील दुर्गंधी नष्ट करण्याचा गुण या झाडांमध्ये आहे.शिवाय बेलाची छाया शितल व आरोग्यवर्धक आहे.औषधी गुणधर्म असल्याने पोटदुःखी,आंव,अतिसारावर हे झाड उपयुक्त आहे.बेलपानांनी संस्कारीत पाणी प्राशन केल्यास मनावरील ताण कमी होतो.
(३)अडुलसा-आपल्या घराच्या बंगल्याच्या ,वाडीवाडीमध्ये,शेताच्या कुंपनात लावण्यासाठी हे झुडुप फायदेशीर आहे.कारण भटकी गुरे याला तोंड लावत नाहीत.शिवाय याच्या अर्काने डास,चिलट मरतात.पानेही औषधी असून हीच पाने इतर झाडांना चांगले खत देतात.झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविताना पाल्याचा रस,काढा खोकला ,दमा यावर औषधी आहे.विशेषतः खोकल्यातून रक्त पडत असल्यास याचा काढा गुणकारी ठरतो.फुलांच्या चुरणाचे चाटण दिल्यास उंबळ त्वरीत थांबून आराम मिळतो.हे झाड वातावरणातील कृमी-किटक नष्ट करतेच शिवाय शरीरस्वास्थ उत्तम राखते.
(४) पारिजातक-कृष्णवतारात वसुंधरेला स्वर्गाच्या नंदनवनातील देणगी मिळालेला हा दिव्य वृक्ष.हा वृक्ष मानवी आरोग्यास फारच लाभदायक आहे.प्रत्येक घराच्या पुढिल -मागील भागात हा वृक्ष लावला पाहिजे.याच्या सुगंधी फुलांनी घरातील संपूर्ण वातावरण प्रसन्न राहते.या झाडाखाली बसल्यावर मनाची उदासिनता,मरगळ  नाहीशी होते.या झाडाच्या पानांचा काढा ताप कमी करतो.शिवाय फ्लू ,मलेरिया या साथीवर नियंत्रण करतो.
(५) निगुर्डी -उग्र वासाची ही रानटी वनस्पती आहे.कांजण्या,गोवर आदींचे विषाणू नष्ट  करण्यास ही वनस्पती फायदेशीर आहे.वा-याबरोबर या वनस्पतीचा दरवळ दिवसभर हवेत पसरतो.त्यामुळे संपूर्ण वातावरण शुद्ध व प्रसन्न होते.प्रत्येक घराच्या कुंपणात हे झाड लावणे गरजेचे आहे.या झाडाच्या पानांच्या रसाने संस्कारीत केलेले तेल संधीवात,मुक्या माराचे दुखणे ,सुज यावर उपयुक्त आहे.पाय लचकणे,मुरगळणे यावर पाने गरम करुन बांधून किंवा शेक दिल्यामुळे त्वरीत आराम मिळतो.शिवाय पानांचा रस अर्धशिरीची कळ थांबवतो.रस्त्यांच्या दोन्ही बाजूला कुंपणात घट्ट लागवड केल्यास या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पेट्रोल -डिझेलच्या वाहनांनी सोडलेले कार्बन मोनाक्साईडसारखे दुषित वायुप्रदुषण त्वरीत नष्ट करण्याचे कार्य या झाडामुळे होते .
(६) आंबा,फणस ,काजू,साग,चिंच ,जांभूळ,नारळ  इ.वृक्ष आपल्या आवडत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ किंवा  वाढदिवसानिमित लावल्यास त्याचा फायदा आर्थिक  मदत,फळांसाठी व जळाऊ लाकडांसाठी होऊ शकतो.या झाडांचा प्रत्येक  भाग मानवालाच उपयोगी असतो.

असे वृक्षच कोकणातील प्रत्येकाने लावायला हवेत.नव्हे ही काळाची गरजच आहे.म्हणून आम्ही कोकणातील प्रत्येकाला सांगू इच्छितो की,दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन पर्यावरणास साह्यकारी असलेल्या या  योजनेत सहभागी व्हावे. तरुणांनो !आज झाडे लावा,ती जगवा .उद्या हीच झाडे तुम्हाला नक्कीच जगवतील.तुम्ही झाडे लावा तुमच्या कुंटूबाला व मित्रांना व त्यांच्या परिवारालाही झाडे लावायला सांगा नाहीतर  भविष्यकाळात मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारण्यासारखी नाही.



शांताराम गुडेकर 
सदस्य- महाराष्ट्र हरितसेना, वनविभाग- महाराष्ट्र  शासन
विक्रोळी पार्क साईट  मुंबई -४०० ०७९
भ्रमणध्वनी -९८२०७९३७५९

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com