गुलामगीरीच्या व्यवस्थेला छेद देणारी मुक्ततेची नवी पहाट... इथल्या भुमिपुञाचा, कष्टकरी जन समुदायाचा, शोषितांचा, वंचितांचा, शेतकऱ्यांचा, अठरापगड जातसमुहाचा प्रतिनिधी... इथल्या वर्णवर्चस्ववादी धर्मव्यवस्थेची, शोषणवादी समाजव्यवस्थेची शतकानुशतकांची बंधने झुगारून सार्वभौम छञपती झाले तो दिवस... अर्थात ६ जून १६७४... शिवराज्याभिषेक दिन. मागील वर्षापासून हा दिवस " स्वराज्य दिन " म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरव केल्या जात आहे. अर्थात महाराष्ट्रात आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या महाआघाडी सरकारनेच या दिनाला अधिक महत्त्व देत शिवशकाची सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दाखवून दिले. त्यामुळेच गेल्या वर्षापासून या दिवसाला उत्सवाचे स्वरुप आले.
आजवर चैत्रमहिन्यात उभारण्यात येणाऱ्या गुढीच्या मागची खरी कहाणी आता जनसामान्यांना कळली असल्याने या वर्षी (२०२२) मध्ये कोणत्याही यात्रा-जत्रांशिवाय हा दिवस साजरा झाला. त्याला कारण कोणते असेल तर महाराष्ट्रातील बहुजनांना आता इतिहासातील चालूगिरी कळायला लागली आहे. वास्तव इतिहास लपवून खोट्या काल्पनिक कथांच्या आधारे कशी उत्सवांची निर्मिती करण्यात आली आणि ते बहुजनांच्या माथी कसे मारण्यात आले याचे प्रबोधन झाल्यानेच आता बहुजनवर्ग या उत्सवांना तिलांजली देत आहेत. मात्र प्रस्थापित पारंपारिक व्यवस्था सध्या पैशाच्या जोरावर पुन्हा पुन्हा या उत्सवांचे उदात्तिकरण करत आहे. तरीही महाआघाडी सरकारने एक नवीन पायंडा सुरु केला याबद्दल त्यांचे आभारच मानायला हवेत. नाहीतर शिवराज्याभिषेक हा दिवस देखील नेमका कोणता? यावरून प्रस्थापितांनी त्यात घोळ घालून ठेवलाच आहे. त्यासाठी गरज आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ऐतिहासिक सत्य जाणून घेण्याची.
आज प्राथमिक शिक्षणापासून तर उच्च शिक्षणापर्यंत शिवाजी महाराजांचा इतिहास राज्यभिषेकासह शिकवला जातो. परंतु त्यामध्ये राज्याभिषेकाला कोणी व का विरोध केला? त्यांचे पुरोहित्य करण्यासाठी अख्खा महाराष्ट्र सोडून वाराणसीहून गागाभट्टांना का बोलवावे लागले? त्याने पायाच्या अंगठ्यांना महाराजांना तिलक का लावला? हे सर्व करूनही महाराजांनी मग दुसरा राज्याभिषेक का केला? या प्रश्नांची उत्तरे प्रस्थापित इतिहासकारांनी कधी बाहेरच येऊ दिली नाही. सारी व्यवस्था अगदी शैक्षणिक पाठ्यपुस्तकांसह या तथाकथित प्रस्थापितांच्या हातात असल्याने त्यांनी हा इतिहास दाबून ठेवला होता. हे सांगतील तो इतिहास आणि तोच इतिहास पाठ्यपुस्तकातूनही शिकवला जाणार. नव्हे आजही शिकवला जात आहे. त्याबद्दल या व्यवस्थेला जाब विचारण्याचे धाडस कोणी करतांना दिसत नाही. परंतु सत्य हे सत्यच असते. भले ते बाहेर यायला उशीर होत असेल परंतु ते बाहेर आल्याशिवाय रहात नाही. आजही प्रत्येक मंदीराच्या गाभाऱ्यात आणि कळसावरही बुद्धप्रतिमा आहेत हे सत्य बाहेर येतंय आणि या भोंदूबाबांची पळता भूई थोडी झाली आहे. मात्र व्यवस्थेच्या आर्थिक चाव्या त्यांच्या हातात असल्याने त्या जोरावर या वास्तविक गोष्टी ते जनसामान्यांपर्यंत पोहोचू देत नाहीत.
खऱ्या इतिहासाला बगल देत सम्राट पृथ्वीराज सारख्या चित्रपटांची निर्मिती करून खोटा इतिहास सांगण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न होत आहे. सम्राट पृथ्वीराज निर्माण करण्यामागचं एकमेव कारण म्हणजे केवळ सम्राट ही उपाधी. जी केवळ चक्रवर्ती अशोक यांनाच लावली जाते. ती आजवर कोणालाही लावल्या गेलेली नाही. मग चित्रपटाच्या माध्यमातून ती पृथ्वीराजला सम्राट म्हणून सबोधण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. ज्याची खिल्ली सोशल मिडियावरून पुरती उडवल्या जात आहे. शिवरायांच्या इतिहासाबाबत तर आज प्रत्येकाला माहिती आहे. कशा पद्धतीने खरा इतिहास लपवण्याचं कारस्थान आजही सुरु आहे. परंतु शिवाजी महाराजांच्या सच्च्या अनुयायांनी त्यांच्या समकालीन साहित्याच्या मुळाशी जाऊन सत्यशोधनाचं महत्त्वपूर्ण कार्य केलं. ज्यामध्ये जोतिराव फुले अग्रणी होते. म्हणूनच शिवरायांचा वास्तव इतिहास समोर आला. ज्याला गो ब्राह्मण प्रतिपालक केला ते तर कुलवाडी भूषण शिवराय होते हे आता लोकांना कळू लागले आहे. पण आजही अनेकांचा मेंदू या व्यवस्थेकडे गहाण असल्याने त्यांनी थोपवलेले विचार पसरवण्यातच ते धन्यता मानत आहेत. म्हणूनच केवळ रायगड किल्ल्यावर साजरा होणारा हा शिवराज्याभिषेक दिन आता संपूर्ण राज्यभर साजरा होत आहे.
शिवराज्याभिषेक हा महत्वपूर्ण सोहळा आहे. हा सोहळा प्रत्येकाच्या मनामनामध्ये साजरा झाला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनप्रवास अखंड उर्जास्थान आहे. खरे तर शतकोनुशतके पारतंत्र्यात जगणाऱ्यां भारतीयांसाठी खऱ्या अर्थाने हा पहिला स्वातंत्र दिन. या दिवशी शिवरायांनी स्वत:चा शक म्हणजेच शिवशक प्रारंभ करुन राजदंड हाती घेतला. सर्व प्रस्थापित सत्ता पालथ्या करुन स्वराज्याचा सार्वभौम पवित्र सुवर्ण कलश रयतेच्या झोळीमध्ये रिता करुन रयतेची झोळी सुखसमृध्दी, स्वातंत्र्य, समतेने भरली. रयतेचे पालनपोषण करणारे सार्वभौम छत्रपती झाले. त्यामुळे आजही शिवरायांचे स्वराज्य हे भारतीयांच्या मनावर राज्य करते. शिवराज्याभिषेक दिन भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारा अतिशय महत्वाचा दिवस आहे.
हा दिवस विश्वव्यापी होण्यासाठी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी प्रत्येक गडावर, घरावर, चौकात, गावात, शहरात, राज्यात तसेच देशविदेशात उभारणे गरजेचे आहे. तरच इथल्या गुलामांना स्वराज्याची जाणिव होईल आणि धार्मिक गुलामगीरीची बंधने जुगारून पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या सर्वकष लढ्याला सुरुवात होईल. कारण शिवशाहीनंतर हाती सत्ता घेतलेल्यां प्रस्थापित व्यवस्थेने या देशात जातीय गुलामगीरी लादली. ज्यामुळे आज हा देश पुन्हा एकदा अराजकतेच्या उंबरठ्यावर उभा आहे. एकीकडे पराकोटीचा मुस्लिमविरोध दाखवायचा तर दुसरीकडे पुन्हा पुन्हा जातीय विभागणी करायची आणि आपली प्रस्थापित व्यवस्था कायम ठेवण्यासाठीचे कारनामे आजही सुरू आहेत.
0 टिप्पण्या