आजही या लोकांपैकी एकानेही सांगितले की, उद्धवजी आम्हाला तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नको आहात, तर मी आजच वर्षा सोडून मातोश्रीवर जायला तयार आहे. त्यांनी हे समोर येऊन बोलावे, उगाचं शिवसेनेला आम्ही सोडणार नाही, हिंदुत्वाचा मुद्दा असे याच्या-त्याच्या पाशी सांगू नये. मी सत्तेला चिकटून बसणारा माणूस नाही. मी शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे. मला सत्तेचा मोह नाही. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी एक म्हण आहे, तशीच परिस्थिती आता आली आहे. मी मुख्यमंत्रीपदाच्या लायक नसल्याचे समोर येऊन सांगा. राजीनामा तयार आहे, असे म्हणत बुधवारी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरें यांनी सोशल माध्यमाद्वारे बंडखोरांना साद घातली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांनी आपली भूमिका फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून विशद केली. शिवसेना हिंदुत्वापासून आणि हिंदुंत्व शिवसेनेपासून दूर होऊ शकत नाही. विधान भवनात हिंदुत्वाबाबत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री आहे. ही शिवसेना बाळासाहेबांची नाही असे भासवण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. बाळासाहेबांच्या नंतरच्या शिवसेनेनी तुम्हाला खूप काही दिले हे लक्षात ठेवा. शिवसेना आणि हिंदुत्व एकमेकांशी जोडलेले शब्द. हो दोन्ही शब्द कदापिही एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत.
आमदार एकनाथ शिंदे यांनी 34 आमदारांच्या सहीचे समर्थनाचे पत्र जारी केले आहे. त्याचबरोबर आणखी तीन शिवसेना आमदार गुवाहाटीला पोहोचत आहेत. त्यामुळे शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांची मॅजिक फिगर 37 गाठली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्यातून त्यांची सहीसलामत सुटका होणार हे निश्चित झाले आहे. मात्र हे तीन आमदार कोण ते अजूनही स्पष्ट झाले नाही. मात्र रात्रीपर्यंत ही नावेही बाहेर येतील. यावरून एकनाथ शिंदे भाजपसोबत जाऊन राज्याची सुत्रे हाती घेतील असे मत आता राजकीय तज्ञ व्यक्त करीत आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा व्हीप बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी सुनील प्रभू यांच्या जागी भरत गोगावले यांची मुख्य व्हीप म्हणून नियुक्ती केली आहे. म्हणजेच खुद्द शिंदे आता शिवसेनेवरच दावा ठोकत आहेत. यासोबतच त्यांनी 34 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपाल आणि उपसभापतींना दिले आहे. शिंदे 46 आमदार असल्याचा दावा करत आहेत. गुवाहाटीत सध्या शिवसेनेचे 34 आमदार असून २ अपक्ष आहेत. सध्या शिवसेनेचे दोन आमदार संजय राठोड आणि योगेश कदम सूरतला आले आहेत. त्यांच्याशिवाय आणखी दोन आमदार मंजुळा गावित आणि गोपाळ दळवी सुरत विमानतळावरून गुवाहाटीला रवाना झाले. त्यांच्यासोबत महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही आहेत.
एकनाथ शिंदे यांच्याकडील शिवसेना आमदारांचे संख्याबळ पाहता ते 34 असल्याचे या फोटोवरुन दिसते. पक्षांतर कायद्यानुसार शिंदे यांना 37 त्यांच्याबरोबर किमान 37 आमदारांची गरज आहे. शिवसेनेचे 37 आमदार जर फुटले तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही. तरच त्यांचे बंड खऱ्या अर्थाने यशस्वी झाले असे म्हणता येईल. कारण सध्या शिवसेनेकडे 55 आमदार आहेत. त्यामुळे त्यातील 2/3 आमदारांची संख्या 37 होते. शिवसेनेतून किमान 37 आमदार बाहेर पडले तर त्याना पक्षांतर बंदी कायद्याचा फटका बसणार नाही. मात्र त्याहून एक जरी आमदार कमी पडला तर त्यांना पक्षांतर बंदी कायद्याच फटका बसू शकतो. तसेच त्यांचे विधानसभा सदस्यत्व जाऊ शकते. त्यामुळे शिंदे यांना अजून किमान 5 आमदारांची गरज आहे. शिंदे सांगत आहेत की त्यांच्याबरोबर 40 आमदार आहेत. आता त्यांच्याकडे 32 आमदार असल्याचे फोटोवरुन दिसते. त्यामुळे त्यांचे आणखी 5 समर्थक आमदार कोण हा प्रश्न अजूनही कायम आहे.
भविष्यात हे प्रकरण काय वळण घेण्यात येईल याबद्दल काही, महाविकास आघाडीचे सगळे आमदार हे एकसंथ आहेत. भाजपाच्या मदती शिवाय आणि पाठिंब्याशिवाय आमदारांचे अपहरण शक्य नाही. सितेला एकच अग्निपरीक्षा द्यावी लागली, शिवसेनेला अश्या अनेक अग्निपरिक्षा द्याव्या लागत आहेत. अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. काझीरंगा हे एक उत्तम ठिकाण आहे. परिसरातही चांगला पाऊस होत आहे. ज्यांना निसर्ग पहायचा आहे ते तिथे जाऊ शकतात असेही संजय राऊत म्हणाले.
राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असताना नेमकं राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे प्रभारी राज्यपाल नवीन मुख्यमंत्र्यांना पाचारण करतील. बहुमत सिद्ध करायला सांगितलं जाऊ शकतं. प्रभारी राज्यपालांच्या देखरेखेखाली या प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सभागृहाचे विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते. विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्यासंबधी अनेक घडामोडी होऊ शकतात. अधिवेशनात सरकार बनवण्याच्या तांत्रिक घडामोडी तपासून पाहिल्या जातील, बहुमत सिद्ध होत असेल तर महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागेल. बहुमत गेल्याने साहजिकच कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो. महत्त्वाचे म्हणजे आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर त्यांच्या नावासमोरून मंत्रिपदाचा उल्लेख काढून टाकला आहे. आदित्य ठाकरेंचा कृती सूचक आहे. यावरून ठाकरे सरकार राजीनामा देण्याच्या तयारी करीत असल्याचे चित्र वृत्त प्रकाशित होईपर्यंत होते.
आता प्रश्न आहे राज्यपालांच्या कोरोना चाचणीच्या "टायमिंग"चा. त्यांनी स्वतःहून ही चाचणी करून घेतलीय. याशिवाय, मुंबईतील तमाम नामांकित, नेहमीची हॉस्पिटल्स सोडून ते रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. तिथे रणनिती आखणे, वरिष्ठांशी संपर्क-समन्वय सोपा जाणार आहे, त्यात गोपनीयता राखता येणार आहे. एकूणच बीटवीन दी लाईन्स - अजून फुटीर गटाकडे आवश्यक असलेले 2/3 आमदार जमलेले नाहीहेत. जोवर हे संख्याबळ गाठले जात नाही तोवर फुटिरांना मुंबईत आणून त्यांची ओळख परेड करवून घेतली जाऊ शकत नाही. मॅजिक फिगर हाती नसल्यामुळेच फुटीरांना सुरतेहून रातोरात, तडकाफडकी गुवाहाटीला पळवण्यात आले. जोवर 2/3 फुटीर सोबत असल्याची खात्री होत नाही, तोवर भाजप काहीही हालचाल करणार नाही. "वेट अँड वॉच" हेच भाजपचे धोरण तूर्तास आहे. राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्याने फुटीर आमदारांना 2-3 दिवस हाताळणे, थोपवून धरणे शक्य आहे. त्यांच्यात त्यामुळे अस्वस्थता पसरणार नाही. सुरतमध्ये अळीमिळी गुपचिळी असलेले फुटीर आमदार आज आसामात पोहोचून अचानक वाहिन्यांशी बोलायला लागले आहेत. त्यांचे जप्त केलेले मोबाईल बहुधा परत देण्यात आले असावेत. अर्थात मोजकेच आमदार, नेमकेच आणि स्क्रिप्टेड कोटस देत आहेत. यातील बहुतांश स्वतः वाहिन्यांशी संपर्क साधत आहेत.
0 टिप्पण्या