अग्निपथ योजनेवरून देशभरात अनेक ठिकाणी निदर्शने सुरू आहेत. या भाजपचे नेते सातत्याने अग्निपथ योजनेचे फायदे तरूणांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान इंदौरमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी भाजप कार्यालयात सुरक्षा रक्षक ठेवताना अग्निवीरांना प्राधान्य देईल, असे जाहीर केले आहे. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी कैलाश विजयवर्गीय मीडियाशी संवाद साधण्यासाठी इंदौरमधील भाजप कार्यालयात पोहोचले. याबाबत कैलाश विजयवर्गीय यांना विचारले असता त्यांनी सर्वप्रथम अग्निपथ योजनेचे फायदे सांगितले. त्यानंतर अग्निवीर म्हणून काम केल्यानंतर बाहेर पडल्यावर १३ लाख रुपये मिळतील, असे त्यांनी सांगितले. तसेच त्याच्यावर अग्निवीरचा शिक्काही लागलेला असेल. भाजप कार्यालयात सुरक्षा गार्डची नेमणूक करण्यासाठी देखील अग्निवीरांना प्राधान्य देऊ, असे कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले.काँग्रेससह देशातील अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून देशातील तरुण आणि लष्कराच्या जवानांचा एवढा अनादर करू नका, असे म्हटले आहे. आपल्या देशातील तरुण रात्रंदिवस परिश्रम करून शारीरिक परीक्षा उत्तीर्ण होतात कारण त्यांना सैन्यात भरती होऊन आयुष्यभर देशसेवा करायची आहे, भाजप कार्यालयाबाहेर गार्ड व्हायचे आहे म्हणून नाही, असे ते म्हणाले आहेत.
त्यांना नाझीसारखी सेना निर्माण करायची आहे - प्रकाश आंबेडकर
मुंबई : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अग्निपथ योजनेविरोधात देशातील अनेक राज्यातून प्रचंड विरोधात आंदोलने सुरू आहेत. देशभरातून या योजनेला विरोध होत असताना प्रकाश आंबेडकर यांनी देखील भाजप आणि आरएसएसवर गंभीर आरोप केला. अग्निपथ या योजनेमागे भाजप आणि आरएसएसचा गुप्त अजेंडा आहे. त्यांना नाझीसारखी सेना निर्माण करायची आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.
‘अग्नीवीर या योजनेमागे भाजपा आणि आरएसएसचा गुप्त अजेंडा आहे.सरकारी तिजोरीवर पडणारा ताण कमी करणे, बेरोजगार तरुण सैनिक निर्माण करणे, जेणेकरून त्याचा फायदा हा नाझीसारख्या सेना निर्माण करण्यास मदत होईल व वैदिक हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी या नाझी सेनेचा उपयोग करता येईल’, असं ट्वीट करत प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि आरएसएसवर टीका केली आहे.
मुंबई : "भाडोत्री सैन्य हा काय प्रकार? असंच जर असेल तर भाडोत्री राज्यकर्ते आणू, टेंडर काढा. नाहीतरी राजकर्ते ५ वर्षांसाठी भाडोत्रीच असतात. एक्स्टेंशनसाठी पुन्हा जनतेत जाऊन मतं मागावीच लागतात. पण भाडोत्री सैन्य आणू पाहणाऱ्या सरकारला माझा सवाल आहे, की पोरांची उमेदीची वर्षे हातातून गेल्यानंतर त्यांनी पुढे काय करायचं? त्यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहात?", अशा शब्दात अग्निपथ योजनेवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिक, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना संबोधित केलं.
"अग्निपथमुळे तरुण रस्त्यावर आलेत. या तरुणांची माथी कुणी भडकवली, हृदयात राम आणि हाताला काम हे आपलं हिंदुत्व आहे. तेच चित्र आज देशात आहे. काम नसेल तर काहीही उपयोग नाही. ऐन उमेदीच्या वयात पोरांना मृगजळ दाखवणार, त्यानंतर पोरांच्या हाताला काय लागणार? तरुणांवर ही वेळ का आणि कुणामुळे आली? अचानक योजना आणायची, अग्नीवीर नाव द्यायचं पण शिकवणार काय? चार वर्षाने यांच्या नोकरीचा पत्ता नाही. शिवाजीराव देशमुखांच्या भाषणात ते म्हणायचे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ १६ व्या वर्षी घेतली. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी १६ व्या वर्षी लिहिली. पण आता उमेदीच्या वयात पोरांना काहीतरी मृगजळ दाखवणार नंतर फक्त १०% लोकांना घेणार. भाडोत्री सैन्य आणायची कल्पना करताय तर मग काढा टेंडर. भाडोत्री राज्यकर्तेही आणू", अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
त्या कंत्राटी कामगारांचा कंत्राटदार कोण - जीतेंद्र आव्हाड
सैन्य दलात अग्नीवीर या नावाखाली सैनिकांची भरती केली जाणार आहे. पण, त्यांना सैनिक म्हणू शकत नाही. आपण त्यांना कंत्राटी कामगार असेच म्हणू, त्या कंत्राटी कामगारांचा कंत्राटदार कोण असेल? असा सवाल गृहनिर्माण व अल्पसंख्यांक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला विचारला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री आव्हाड म्हणाले की, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी भाजपची मानसिकता बोलून दाखविली. ते म्हणाले,”जर मला भाजपने सर्व कार्यालयांचा सिक्युरिटी इंचार्ज केला. तर चार वर्षांनंतर जे अग्नीवीर बाहेर पडतील. त्यांना भाजपाच्या कार्यालयावर सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी देऊ शकेन. ” म्हणजे काय तर वॉचमन! या तरुणांचे नेमके काय करायचे ठरवलेय, असा सवालही आव्हाड यांनी विचारला आहे.
पंतप्रधान मोदी हे गोंधळलेले पंतप्रधान आहेत अशी जनतेची धारणा होऊ लागली आहे. अनेक मोठ्या योजना आणि धोरणे आणण्याचा उत्साह केंद्र सरकार दाखवत असले तरी प्रत्यक्षात ठोस कृतिशील आखणी नसल्याने अनेकदा या योजनांमध्ये बदल करावे लागले तर अनेक योजना सपशेल अपयशी ठरल्या आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलीय.
0 टिप्पण्या