मुंबई - , हे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र आहे, ऑपरेशन लोटससाठी हा प्रकार यांनी सुरू केला आहे. आमच्या आमदारांचे अपहरण करून गुजरात त्यांना पोलिसांच्या गराडात ठेवण्यात आले आहे. यातून सुटका करून घेणाऱ्या आमदारांवर हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र यातून शिवसेना बाहेर पडेल. असा विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून सरकार पडण्यापर्यंतच्या चर्चा रंगवल्या जात आहेत.
एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून खदखद सुरू होती, असं समोर आलं आहे. मराठा समाजाच्या विषयावरून ही खदखद टोकाला गेली होती. यातून एकनाथ शिंदे यांना बाजूला करून मराठा समाजाची थेट मनं जिंकण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू होता.त्यासाठी विनायक राऊत यांना पुढे करून मराठा समाजाच्या नेत्यांशी बैठका सुरू होत्या. यामुळेच एकनाथ शिंदे प्रचंड नाराज असल्याचे बोलले जात आहे.यावर बोलतांना संजय राऊत म्हणाले, कोणी कितीही म्हटले तरी संघटनेला तडा गेलेला नाही. आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला. एकनाथ शिंदे आमचे सहकारी आहेत गेली अनेक वर्षे आम्ही सोबत काम करतो. त्यांच्या मनात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर होऊ शकतात. त्यामुळे मुंबईला येऊन त्यांनी आमच्या सोबत चर्चा करण्याचा आम्ही आवाहन केले आहे. तिथे जाऊन चर्चा करणे हे शिवसेनेच्या शिस्तीत बसत नाही. आमदारांच्या कुटुंबीयांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.
"एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांच्यासोबत जाऊन उपमुख्यमंत्री पद घेण्यापेक्षा मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो. त्यांनी शिवसेनेत परत येऊन मुख्यमंत्री बनावं, अशी ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली आहे. मी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी ही भूमिका घेतली होती. वर्षा बंगल्यावर आपल्या खाजगी सहकार्यांसोबत केलेल्या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली ही भूमिका बोलून दाखवली आहे.
एकनाथ शिंदे कोणत्याही पक्षासोबत जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जायचं नाही, अशी त्यांची मागणी आहे. त्याचबरोबर शिवसैनिकांवर अन्याय होता कामा नये, तसंच शिवसेना आमदारांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे या मागणीवर ते ठाम आहेत. शिंदे चर्चा करायला तयार आहेत. पण, सर्व आमदारांसोबत चर्चा केली जावी अशी त्यांची मागणी आहे.
आमदार बेपत्ता असल्याची पोलिसात तक्रार
अकोला - शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये गेलेले बाळापूर मतदार संघातील आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने पोलिसांकडे आज तक्रार दाखल केली आहे. सिव्हील लाईन पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीत त्यांनी माझे पती आमदार नितीन देशमुख हे सोमवारपासून बेपत्ता असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. आपल्या पतीचा लवकरात लवकर शोध लावा, असे त्यांनी तक्रारीच्या माध्यमातून पोलिसांकडे साकडे घातले आहे. प्रांजल नितीन देशमुख असे तक्रारकर्त्या पत्नीचे नाव आहे. तक्रारी दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे. नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजल देशमुख यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली सोमवारी संध्याकाळी सहा वाजता पासून माझ्या पतीसोबत माझे शेवटचे बोलणे झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी थोड्याच वेळात मुंबईहून अकोल्याला येण्यासाठी निघेल, असे त्यांनी मला फोनवर सांगितले मात्र सात वाजल्यापासून त्यांचा फोन बंद आहे. त्यांचा पीए आणि सहकारी स्टेशनवर त्यांची वाट बघत होते. मात्र ते विधानभवनातून परत आलेच नाहीत. कालपासून माझा त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाह. त्यामुळे मी अकोला शहर पोलिस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. आता पोलिसांनी त्यांचा तातडीने शोध घ्यावा अशी मागणीही पांजल देशमुख यांनी केली आहे.
विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडीत राजकीय भूकंप होईल याची कोणाला शक्यताही वाटली नव्हती. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना घेऊन बाहेर पडले. तेव्हापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच शिवसेना आणि एकनाथ शिंदेंच्या तीन प्रमुख आमदारांनी मध्यस्थीची भूमिका निभावत वर्षावरील बैठकीत उपस्थित होते. यात चर्चेसाठी शिवसेनेच्यावतीने मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक उपस्थित होते. तर एकनाथ शिंदेच्या वतीने दादा भुसे, संजय राठोड, संतोष बांगर हे आमदार बैठकीला उपस्थित होते.मात्र यामध्ये काय चर्चा झाली याची माहिती मिळू शकली नाही.
त्या आमदारांना शिवसेना स्टाईलने वर्षावर आणले
एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेतील राजकीय वजन आणि आमदारांशी असलेले संबंध पाहतात ते पक्षातील एक मोठा गट फोडू शकतात. एकनाथ शिंदे सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या गटातील शिवसेना आमदार सूरतला जाण्याच्या तयारीत होते. यामध्ये दादा भुसे, संजय राठोड, संतोष बांगर आणि अंबादास दानवे यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. हे सर्वजण सुरतला जाऊन एकनाथ शिंदे यांना भेटणार होते. हे सर्व आमदार सकाळपासून नॉट रिचेबल होते. मात्र, यापैकी काही आमदार मुंबईतील सेंट रेगिस हॉटेलमध्ये मुक्कामाला असल्याची माहिती शिवसेनेला लागली. त्यानंतर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी वेगाने सूत्रे हलवायला सुरुवात केली.
शिंदे यांच्यासोबत जाऊ शकणारे तीन आमदार सेंट रेगिसमध्ये असल्याचे समजताच शिवसैनिक आणि काही आमदार तातडीने याठिकाणी दाखल झाले. त्यानंतर आमदार सुनील शिंदे यांनी या तिन्ही आमदारांना आपल्या गाडीत बसवले. या गाडीच्या अवतीभवती सचिन अहिर आणि सुनील प्रभू यांच्या गाड्या होत्या. अशा कडेकोट बंदोबस्तामध्ये या तिन्ही आमदारांना वर्षा बंगल्यावरील बैठकीसाठी नेण्यात आले. यापूर्वी २०१९च्या सत्तानाट्यावेळीही शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना हुडकून काढण्याची भूमिका चोखपणे पार पडली होती. आतादेखील एकनाथ शिंदे यांच्या गोटात जाऊ शकणाऱ्या आमदारांना रोखण्यासाठी शिवसेनेकडून वेगवान हालचाली सुरु आहेत.
0 टिप्पण्या