प्राचीन माणसाला, तत्कालीन विचारवंतांना, प्रेषितांना, ऋषिमुनींना व नंतरच्या काळातील संतश्रेष्ठांनासुद्धा विसाव्या शतकांतील ज्ञान उपलब्ध नव्हते. म्हणून त्यांनी ईश्वर कल्पिला व मानला असावा. चार्वाकांनी मात्र ईश्वर स्पष्टपणे नाकारला. मग आज आपल्याला सहजपणे उपलब्ध असलेल्या या ज्ञानाच्या आधारावर पुन्हा ईश्वरचिकित्सा करून त्याला नाकारणे, आपल्याला नक्कीच शक्य असले पाहिजे.
जगात बहुधा सर्वत्र प्राचीन माणसांनी व प्राचीन मानव समूहांनी ‘ईश्वर आहे’ असे मानलेले आहे. मात्र फक्त भारतातच ‘ईश्वर नाही’ असे सांगणाऱ्या विचारधारा फार प्राचीन म्हणजे अगदी ऋग्वेदरचना काळापासून लोकायत, लोकायतिक, बार्हस्पत्य अशा नावांनी प्रचलित होत्या हे आपण या लेखमालेत आधींच्या काही लेखांमध्ये पाहिले आहे. वेदकाळानंतरच्या षड्दर्शन रचना काळात ‘सृष्टीत सर्वत्र अणू भरलेले आहेत व अणूंखेरीज सृष्टीत दुसरे काहीच नाही’ असे ठासून सांगणारे ‘वैशेषिक दर्शन’ हे प्रसिद्ध तत्त्वज्ञान कणाद मुनीने मांडले होते. त्याच अडीच हजार वर्षांपूर्वीच्या काळात पकुध कात्यायनानेसुद्धा एक प्रकारचा पद्धतशीर ‘अणुवाद’ मांडला होता. या दोन्ही शास्त्रज्ञ ऋषींनीसुद्धा ईश्वराचे अस्तित्व मानलेले नाही. त्याच सुमारास भारतात निर्माण झालेले बौद्ध व जैन हे धर्मसुद्धा मूलत: ईश्वराचे अस्तित्व न मानणारे धर्म आहेत व असे धर्म जगात इतरत्र कुठे निर्माण झाले होते असे दिसत नाही. जगाच्या काही भागांत १९ व्या शतकात ईश्वराचे अस्तित्व न मानणारा मार्क्सवाद स्वीकारला गेला हे जरी खरे आहे तरी आजच्या जगाचा ढोबळ आढावा म्हणून बोलायचे तर ‘हे जग ईश्वराचे अस्तित्व मानते’ असेच म्हणावे लागेल. म्हणजे आजपर्यंतच्या हजारो पिढय़ांनी ईश्वर कल्पना मनात प्रेमाने बाळगलेली आहे हे खरेच.
आतापर्यंतच्या बहुसंख्य विचारवंतांना ‘जगाच्या मुळाशी कुणी तरी ईश्वर आहे’ असे मानावे लागले. कारण त्यांचे भौतिक जगाविषयीचे विश्वाविषयीचे ज्ञान अगदीच तुटपुंजे किंवा अगदी चुकीचेसुद्धा होते; परंतु पाचेक शतकांपूर्वी माणसानेच शोधलेल्या ‘विज्ञान’ या साधनाने त्याने भौतिक विश्वविषयक अधिकाधिक ज्ञान मिळवायला सुरुवात केल्यावर इ. स.च्या विसाव्या शतकातील वैज्ञानिक शोधांनी असे घडले की, मनुष्य निर्माण झाल्यापासून प्रथमच त्याला भौतिक विश्वाविषयीचे काही भरीव (संपूर्ण नव्हे पण विश्वासार्ह) ज्ञान प्राप्त झाले. या ज्ञानाच्या आधारावर माणसाने आतापर्यंत जोपासलेली ईश्वरकल्पना तपासून पाहण्याची व जरूर तर नाकारण्याची गरज निर्माण झालेली आहे असे मला वाटते. अर्थात ते अत्यंत कठीण आहे हे मान्य आहे.
मुळात फक्त आपल्या पृथ्वीबाबतच माणसाने मिळविलेले ज्ञान, अगदी चार-पाच शतकांपूर्वीपर्यंतसुद्धा फार अपुरे व चुकीचेसुद्धा होते. पृथ्वी गोल व अधांतरी असून, ती स्वत:भोवती व सूर्याभोवती सतत फिरत असून, ती प्रचंड विश्वाचा एक अतिक्षुद्र भाग आहे, अशा मूलभूत गोष्टीसुद्धा माणसाला माहीत नव्हत्या. या पृथ्वीबाहेर एक सूर्य, एक चंद्र व फार मोठे आकाश आहे एवढेच त्याला त्याच्या नैसर्गिक डोळ्यांनी दिसत होते व त्यामुळे त्याला निर्माण करणाऱ्या व जगण्यासाठी हवा-पाणी व अन्न यांची सोय करून ठेवणाऱ्या त्या ईश्वराचे वसतिस्थान आकाशात असावे व तिथेच कुठे तरी त्याने माणसाच्या न्यायनिवाडय़ासाठी व मृत्यूनंतरच्या जीवनसातत्यासाठी स्वर्ग व नरक बांधून ठेवले असावेत, अशा कल्पना माणसाने रचल्या.
आपल्या डोक्यावरच्या आकाशात अनेक तारकापुंजयुक्त अशी जी एक आकाशगंगा आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसू शकते, तिच्यासारख्या पण वेगवेगळ्या आकाराच्या सहस्रकोटी आकाशगंगा या विश्वात अस्तित्वात आहेत. एकेका आकाशगंगेत सुमारे दशसहस्र कोटी तारे (म्हणजे सूर्य) आहेत. आपला सूर्य हा आपल्या आकाशगंगेतला असाच एक साधासा सूर्य असून, आज सात अब्ज लोकसंख्या असलेली आपली पृथ्वी ही त्याच सूर्याचा एक सामान्य ग्रह आहे. आकाशगंगेत आकाराने नगण्य असलेला तो सूर्यसुद्धा, मानवाचे जग असलेल्या पृथ्वीच्या लाखोपट मोठा आहे. अशा अब्जावधी ताऱ्यांचे- आकाशगंगांचे तसलेच प्रचंड वेग आणि त्यांच्यामधली त्याहून प्रचंड अंतरे जी शेकडो प्रकाशवर्षांमध्ये मोजावी लागतात ती लक्षात घेतल्यावर, ‘विश्व’ या अस्तित्वाचा काहीसा अंदाज आपल्यासारख्या सामान्य माणसालासुद्धा येऊ शकेल. या एवढय़ा अवाढव्य विश्वाच्या निर्मितीमागे, त्याच्या निर्मात्या ईश्वराचे काही ‘मानवकेंद्रित प्रयोजन’ आहे, हा आपला केवळ कल्पनाविलास आहे, आणि अशा त्या ईश्वरीशक्तीचे माणसाबरोबर देण्याघेण्याचे काही व्यवहार शक्य आहेत, ही तर आपली अगदीच वेडी आशा आहे.
आपल्या विश्वाची ही रचना केवळ अतिप्रचंड आहे एवढेच नसून ती अतिसूक्ष्मही आहे, हे माणसाला साधारण, इ. स.च्या विसाव्या शतकापूर्वी क्वचितच माहीत होते. आज आपले शाळा-कॉलेजांतील विज्ञान आपल्याला सांगते की, प्रत्येक वस्तूचे सूक्ष्मातिसूक्ष्म कण म्हणजे ‘अणू’ हे त्याहून अतिसूक्ष्म मूलकणांचे बनलेले असतात. हे मूलकण ज्यांचा शोध अजूनही चालू आहे ती अमूर्त व निराकार अस्तित्वे आहेत. ही अस्तित्वे निर्जीव आणि ‘कण व लहरी’ अशा द्विगुणी प्रकृतीची व सातत्याने (आपणहून) अत्यंत गतिमान आहेत. अणू घन नसून, पोकळ आहेत, ते आपल्याला दिसू शकत नाहीत इतके सूक्ष्म आहेत व त्यातील मूलकण इतके अतिसूक्ष्म आहेत की, त्या मानाने सूक्ष्म कणाएवढा अणूही अतिप्रचंड आहे. आता असे पाहा की, अब्जावधी सूर्याच्या अतिप्रचंडतेपासून मूलकणांच्या अतिसूक्ष्मतेपर्यंतची ही विश्वव्यापी रचना, माणसाची मती गुंग होईल, अशा या रचनेचा विश्वासार्ह शोध (म्हणजे त्याच्या नियमांचा शोध) विसाव्या शतकातील माणूस, विज्ञान या त्याच्या साधनाच्या आधारे घेऊ शकतो व तो शोध घेताना त्याला कुणा गूढ ईश्वराचे अस्तित्व किंवा हस्तक्षेप मानावा लागत नाही ही वस्तुस्थिती अतिशय महत्त्वाची नाही का?
प्रचंड विश्वच नव्हे तर अणूंचे सूक्ष्म कणसुद्धा प्रचंड शक्तिधारी आहेत; अणूंच्या विभाजनातून आणि अणूंच्या एकत्रीकरणातूनसुद्धा माणसाच्या तुलनेने प्रचंड अशा शक्तीची निर्मिती होते, वस्तूंचे अणू जरी जड पदार्थ वाटत असले तरी ते तसे नसून मुळात जड पदार्थ हेच शक्तीचे एक रूप आहेत; वस्तू आणि शक्ती यांचे समीकरण निश्चित करता येते, इत्यादी वैश्विक सत्ये, विसाव्या शतकापूर्वी माणसाला पूर्णत: अज्ञातच होती. रुदरफोर्डने आणि नील्स बोरने पटवून देईपर्यंत, अणूला एक केंद्र असते हे तरी माणसाला कुठे माहीत होते? आइनस्टाइनने सिद्ध करीपर्यंत, विश्वाची ‘सापेक्षता’ हे भौतिक शास्त्रातील महत्त्वाचे सत्य, आणि मॅक्स प्लँकने पटवून देईपर्यंत पुंज सिद्धान्ताचे (क्वांटम विज्ञानाचे) नियम माणसाला माहीत नव्हतेच. तसेच हायझेनबर्गने सिद्ध केलेले ‘अनिश्चिततेचे तत्त्व’ यासारख्या विज्ञानांतील क्रांतिकारक सत्यांची माणसाला विसाव्या शतकापूर्वी काहीच माहिती नव्हती. म्हणून असे म्हणता येते की, ‘भौतिक विश्व व त्याचे भौतिक नियम ह्य़ांचे विश्वासार्ह ज्ञान (जे माणसाला अजून फक्त काही अंशी प्राप्त झालेले आहे ते) माणूस निर्माण झाल्यापासून प्रथमच त्याला, फक्त विसाव्या शतकात प्राप्त झालेले आहे व त्यापूर्वीच्या माणसाला हे काहीच माहीत नव्हते.’
तसेच माणूस हा निसर्गातील इतर प्राण्यांसारखा एक प्राणीच असून, तो ईश्वराच्या जादूने नव्हे, तर कोटय़वधी वर्षांच्या भौतिक उत्क्रांतीने निर्माण झालेला आहे हेही माणसाला इ.स.च्या २०व्या शतकापूर्वी कळलेले, पटलेले नव्हते. त्याचप्रमाणे आणखी एक अत्यंत महत्त्वाचे सत्य हे की माणसाचे शरीर व त्याचा मेंदू हे सूक्ष्म पण जिवंत पेशींनी बनलेले आहेत हे आणि त्यांतील रसायने, डी.एन.ए. व त्यांची कार्ये कशी चालतात व चालू राहतात हे सर्व, जेनेटिक्स व आधुनिक मेंदू विज्ञानांतील संशोधनाअभावी, २०व्या शतकापूर्वीच्या मानवाला माहीत नव्हते.
‘वस्तूंच्या अणूंमधील शक्ती’ हे चैतन्य सत्य व सर्वव्यापी असल्यामुळे, काही लोकांना तो ‘सर्वव्यापी ईश्वरी चैतन्याचा पुरावा’ आहे असे वाटते. परंतु तसे म्हणता येत नाही याची ही कारणे बघा. (१) ईश्वराला मनभावना, बुद्धी व इच्छा असतात असे साधारणपणे मानले जाते. याउलट अणुशक्तीला हे गुण नाहीत. (२) ईश्वराला न्याय, नीती व तारतम्य असते असे मानतात. अणुशक्तीला हे गुणही नाहीत. (३) अणूंतील शक्ती हा अणूचा स्वभाव (म्हणजे मूल गुण) आहे. पण तो स्वभाव ‘ईश्वरीय’ कशावरून? विश्वरचनेच्या मुळाशी चैतन्य आहे हे मान्य. पण ती चेतना ‘चिद्स्वरूप’ कशावरून? सारांश, विश्व हे सर्वव्यापी चैतन्याने भरलेले असले तरी त्याला मन, बुद्धी, इच्छा व भावना नसल्यामुळे, ते, जग मानते तसला ईश्वर असू शकत नाही. शिवाय हे अस्तित्व स्पष्ट अशा भौतिक नियमांनी बांधलेले म्हणजे ‘परतंत्र’ आहे, ते ‘स्वतंत्र’ ईश्वर कसे असू शकते?
प्राचीन माणसाला, तत्कालीन विचारवंतांना, प्रेषितांना, ऋषिमुनींना व नंतरच्या काळातील संतश्रेष्ठांनासुद्धा हे विसाव्या शतकांतील ज्ञान उपलब्ध नव्हते. म्हणून त्यांनी ईश्वर कल्पिला व मानला असावा. चार्वाकांनी मात्र त्यांनाही हे ज्ञान उपलब्ध नसून, ईश्वर स्पष्टपणे नाकारला. मग आज आपल्याला सहजपणे उपलब्ध असलेल्या या ज्ञानाच्या आधारावर पुन्हा ईश्वरचिकित्सा करून त्याला मनोमन व खात्रीपूर्वक नाकारणे, आपल्याला नक्कीच शक्य असले पाहिजे. आपण आज विचारू शकतो, कुठे आहे तो ईश्वर?
0 टिप्पण्या