Top Post Ad

"Dead Ambedkar is More dangerous than live"


 जमैका या कॅरेबियन देशाने किंगस्टन ह्या त्यांच्या राजधानीतील मुख्य रस्त्याला  DR B R AMBEDKAR AVENUE असे नाव दिले आहे. ह्या मुख्य रस्त्याचे अनावरण भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते जमैका  देशाचे प्रधानमंत्री अँड्र्यू होलनेस उपस्थित झाले. इतकेच नव्हे तर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनसंघर्षावर प्रकाश टाकणाऱ्या आंबेडकर स्मारकाचे सुद्धा उदघाटन करण्यात आले. ह्यावेळी स्थानीय सरकार आणि ग्रामीण विकास मंत्री डेसमंड मैकेंजी व राष्ट्रपति कोविंद यांनी डॉ. आंबेडकर यांच्या अनमोल भीमकार्याचा गौरव केला.  मागील आठवड्यातील ही घटना सांगते की बाबासाहेब या देशाच्या सीमा ओलांडून कधीच विश्वरत्न झालेत. परंतु इथली कुजलेली मानसिकता बाबासाहेबांना अजूनही दलित वस्तीत बंदीस्त करत आहे. 

मात्र बाबासाहेब हा एक विचार आहे. मानवतेच्या कल्याणाचा तो कधीही बंदीस्त होऊ शकत नाही. सत्याचा नेहमीच विजय होतो. भले त्याला काही काळ जातो. पण विजय निश्चितच असतो. अनेक प्रकारे इथल्या सडलेल्या विचारांनी बाबासाहेबांच्या मुर्तीला अपमानित केले. आजही करत आहेत. एकीकडे राजकीय फायद्यासाठी बाबासाहेबांचा उदो उदो करायचा आणि दुसरीकडे बाबासाहेबांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यास मेंदूं गहाण ठेवलेल्या अंधभक्तांना प्रवृत्त करायचे हे राजकारण आता नवीन राहिलेले नाही.  संविधानाचा उदो उदो करून त्याच्यातील एक एक कायदा पायदळी तुडवण्याचे षडयंत्र सध्या कसे छुप्या पद्धतीने सुरु आहे हे आता न कळायला इथली आंबेडकरप्रेमी जनता खुळी नाही. मात्र शासन आणि प्रशासनावर आंबेडकरद्वेष्टी व्यवस्थेचा पगडा असल्याने आंबेडकरप्रेमी जनता हतबल आहे. खरं तर बाबासाहेब त्यासाठीच म्हणाले होते. शासनकर्ती जमात बना. त्यासाठी सर्व मार्ग तयार करून ठेवले होते. फक्त त्यावर मार्गक्रमण करणं आपलं कर्तव्य होतं. परंतु ते काही आमच्याकडून झाले नाही. किंवा आम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम आज सर्वत्र दिसत आहे. 

जमैका सारख्या देशात बाबासाहेबांचे नाव पूर्ण राजधानीच्या रस्त्याला दिले जात असताना भारतातील एका राज्यात बाबासाहेबांच्या नावावरून आक्रंदण माजल. आंध्रप्रदेशात सरकारनं राज्याच्या पुनर्रचनेनंतर पूर्व गोदावरी जिह्यातील अमलापूरम मतदार संघाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोनसीमा असं नामांतर केल्याने येथे हिंसाचाराने थैमान घातले. केवळ नामांतराची घोषणा झाली आणि जनक्षोभ उसळला कि उसळ?वल्या गेला हे कालांतरानं बाहेर येईलच. पण आंदोलनाने संपुर्ण  शहरच व्यापलं. इतकच काय या आंदोलनाच्या आगीचे चटके जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्री आणि आमदारांच्या बंगल्यालाही सोसावे लागले.   

आंध्र प्रदेशातील विविध जिह्यांची नुकतीच पुनर्रचना झाली. यानुसार 13 जिह्याचं विभाजन करून तो 26 नव्या जिह्यांमध्ये विभागला गेला. नव्या रचनेवर झोन आणि शहरांची नावं बदलण्यासह 7 मार्चपर्यंत तब्बल 12,600 हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या. या सर्व गोष्टी विचारात घेऊन रेड्डी सरकारने किरकोळ बदल करत जिह्यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केलं. यातच पूर्व गोदावरी जिह्यातील अमलापूरम् मतदार संघाला आंबेडकर कोनसीमा असं नाव देण्यात आलं. जिह्यात अनुसूचित जाती जमातींची संख्या मोठी आहे. त्यामुळे आंबेडकर साधना समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर जिह्याचं नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोनसीमा असं देण्यात आलं. मात्र बाबासाहेबांना सहज पचवतील ते विरोधक कसले. बाबासाहेब जिवंत असताना तर त्यांच्या पचनी पडलेच नाहीत. पण मृत्यूनंतर तर बाबासाहेबांवरचा रोष अधिकच तीव्र झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातही तो मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वेळी दिसून आला. अखेर नामांतर  न करता नामविस्तारावर समाधान मानावं लागलं. इतकी बाबासाहेबांच्या नावाची अॅलर्जी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला आहे. 

आंध्रप्रदेशमध्येही याच प्रवृत्तीने जिह्याच्या नामांतराच्या निर्णयाचा निषेध केला. याच वादातून जिह्यातील काही ठिकाणी आधीच हल्ले देखील करण्यात आले होते.  याचा अर्थ वातावरण पेटवण्याची सुरुवात आधीच करण्यात आली होती. आंदोलन इतके उग्र होते की यामध्ये आंदोलकांनी अमलापूरमचे एसपी सुब्बा रेड्डी यांच्यावर दगडफेक केली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. डीएसपी बेशुद्ध पडले. जमावाने केलेल्या दगडफेकीत 20 पोलीस कर्मचारी जखमी झाले.  मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. 3 RTC बसची जाळपोळ. तर दोन खासगी बसही पेटवल्या गेल्या. वाढत्या रोषाच्या पार्श्वभूमीवर येथे आता 144 कलम लागू करण्यात आले. एवढा टोकाचा विरोध बाबासाहेबांच्या केवळ नावाला. खरे तर देशाचे संविधान लिहून प्रत्येक नागरिकाला जगण्याचा स्वतंत्र अधिकार देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव एका जिह्याला किंवा एखाद्या भागाला दिले जाणे ही अभिमानास्पद बाब. आज सारे विश्व ज्यांच्या अगाध ज्ञानापुढे नतमस्तक होते  परंतु अशा बाबासाहेबांबद्दल भारतीयांमध्ये किती रोष आहे हे या घटनेवरून दिसून येते. विशेष करून त्या वर्गाला ज्या वर्गाला बाबासाहेबांनी गुलामगिरीतून बाहेर काढले. अशा वर्गाची या जिह्यात संख्या जास्त आहे.  हा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. 2,081 स्क्वेअर किमी भागात या सामाजाचं प्राबल्य असून त्यांची लोकसंख्या सुमारे 17 लाख इतकी आहे. त्याच ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाला विरोध व्हावा हे म्हणजे न समजणारे कोडेच.  

एखादा विचार जर खोडता येत नसेल तर त्या व्यक्तीलाच खोडायचे हि घाणेरडी आणि पळपुटी वृत्ती इथल्या तथाकथित प्रस्थापित व्यवस्थेमध्ये ठासून भरलेली आहे. म्हणूनच गुजरात सरकारने डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रकरणच शालेय पुस्तकातूनत काढून टाकले. इतका पराकोटीचा द्वेष आजही प्रस्थापित व्यवस्था बाबासाहेंबांच्या प्रति बाळगत आहे. प्रस्थपित व्यवस्थेला आजही बाबासाहेबांची  भीती वाटत आहे.   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com