Top Post Ad

प्रतिक्रांती विरुद्ध क्रांती म्हणजे दलित पँथर

आजकाल आपण सर्रार्सपणे एक गोष्ट नेहमी ऐकतो  , जो तो उठतो आणि म्हणतो की , मी डोक्याला कफन बांधून मैदानात उतरलो. पण , क्रांतिमित्रहो , तसं कधीही घडताना आपल्याला दिसत नाही.जेव्हा खरोखरीच कफन बांधून मैदानात उतरण्याची वेळ येते तेव्हा कफन बांधलेले तथाकथित वीर गायब झालेले आपल्याला दिसून येईल .पण ,खरोखरीच कफन बांधून मानवतेच्या वैऱ्याविरोधात  बिनधास्तपणे लढणारी आणि प्रसंगी मृत्यूचे चुंबन घेणारी एक आख्खीच्या आख्खी पिढी ह्या भारतात १९७२ च्या दरम्यान जन्माला आली होती हे सुर्यप्रकाशापेक्षाही लख्ख सत्य आजच्या पिढीला सांगितलं तर त्यांचा विश्वास बसणार नाही. कफन बांधून प्रत्यक्षात मैदानात उतरणारी निधड्या छातीच्या जांबाज तरुणांची फौज ह्या देशाने पाहिली.कारण ही फौज याच मातीत जन्माला आली होती.

तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या जन्मानंतर सुमारे २५० वर्षानंतर जन्माला आलेले चक्रवर्ती विश्वसम्राट प्रियदर्शी महान अशोक यांचे महान दानी शूरवीर पणतू ब्रहद्रथ यांच्या राजवटीपर्यंत म्हणजे बौद्ध धम्माच्या उगमापासून ते मौर्यवंश साम्राज्य पतनापर्यंत सोने की चिडीया असा बहुमान प्राप्त केलेला भारत मौर्य , सम्राट हर्षवर्धन , सम्राट कनिष्क यांच्या राजवटीपर्यंत ह्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणत्याही परकीय शक्तीची हिम्मत झाली नाही.परंतु ज्यावेळी ह्या देशातून मौर्य साम्राज्य अत्यंत कपटाने ब्राम्हणी सरदार असलेल्या पुष्यमित्र शुंग ह्या नीच नालायकाने संपुष्टात आणले त्यानंतर ह्या देशातली सामाजिक एकता लयाला गेली , एकसंध रहाणाऱ्या समाजात सामाजिक भेदाभेदीला सुरवात झाली.ही भेदाभेद अधिक घट्ट करण्यासाठी , माणसामाणसांत कायमची नफरत निर्माण करण्यासाठी हजारो नीच जातींना जन्म देण्यात आला.ह्या देशातील बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले. तिथूनच ह्या देशाच्या अधोगतीला सुरवात झाली होती.अधर्म वाढीला लागला होता , नेमका याच गोष्टीचा फायदा परकीय शक्तींनी उचलत ह्या देशावर आक्रमणे करायला सुरुवात केली आणि पाहता पाहता हा देश गुलाम झाला तो थेट १९ व्या शतकापर्यंत म्हणजे इंग्रजांच्या राजवटी पर्यंत.हे झाले परकीय शक्तीची भारतावरील सत्ता , परंतु त्यानंतर आलेल्या एतद्देशीय शक्तींनी तर कहरच केला.परकीयांच्या जोखडातून भारत स्वातंत्र्य झाला पण ह्या देशातील बहुजनांना मात्र मानवी अधिकार मिळालेच नव्हते.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रक्ताचं पाणी करून , प्रकृतीची जराशीही तमा न बाळगता भव्यदिव्य आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही भारताला  बहाल करणारे भारतीय संविधान लिहून प्रत्येक भारतीयांना समान मानवी अधिकार मिळवून दिले परंतु ह्या देशातल्या नालायक आणि नाकर्त्या राज्यकर्त्यांनी बाबासाहेबांनी दिलेले समान मानवी अधिकार कधी दिलेच नाही.परिणामी ह्या देशातील सर्वहारा समूहावर प्रचंड अत्याचार वाढू लागले , संपूर्ण देशात नीच जातीयतेने थैमान घातलं , साधे गावातल्या सार्वजनिक पाणवठ्यावर सुद्धा दलितांना पाणी घेण्यास मज्जाव करण्यात आला , पीठ गिरणीत पीठ दळण्यास मनाई करण्यात आली , पाशवी अत्याचार होऊ लागले , सारा भारत ह्या हरामी नीच जातीयवाद्यांच्या तावडीत सापडला होता.

म्हणूनच १९६५ साली केंद्र सरकारने त्यावेळच्या दाक्षिणात्य खासदार  एलिया पेरूमल यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती नेमली ,ह्या समितीने ३० जानेवारी १९७० रोजी जो अहवाल सादर केला तेव्हा एखादा बॉम्बस्फोट झाल्यासारखा हा देश हादरला.बहिरे झालेल्या समाजमनाच्या कानठळ्या बसल्या , इथल्या नीच विषमतावादी व्यवस्थेचे मनुवादी कपडे टराटरा फाडत नागडे भोंगळे करणारा हा पेरूमल अहवाल प्रत्येक वंचितांना , शोषितांना , सर्वहारा समूहाला जागृत करण्याचं काम करून गेला.मला वाटते हाच अहवाल खऱ्या अर्थाने दलित पँथर ह्या ज्वलंत इतिहासाचा संस्थापक ठरला.त्याचवेळी  पुण्याच्या इंदापूर मधील बावडा ह्या गावात शहाजी पाटील याने त्या गावातील दलितांवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा फतवा काढला , फर्मान काढलं.हा शहाजी पाटील दुसरा तिसरा कोणीही नसून तो त्यावेळच्या महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री असणाऱ्या  शंकर बाजीराव पाटलाचा भाऊ होता.त्यामुळे साहजिकच शंकर पाटलाने राजीनामा द्यावा म्हणून दलित समुदाय आग्रही होता.

संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण गरम असतानाच परभणीच्या ब्राम्हणगावात सोपान दाजीबा ह्या जातीयवाद्याच्या विहिरीवर पाणी पिले , फक्त पाणी प्यायल्याने १४ मे १९७२ रोजी दोन दलित महिलांना नग्न करून गावातून त्यांची धिंड काढण्यात आली तर दुसरीकडे गवई बंधूंचे डोळे फोडण्यात आले , काढण्यात आले.अत्याचार करण्याच्या पद्धती अत्यंत क्रूर होत्या.आणि हे अत्याचार करणाऱ्या भडव्यांना इथलं सरकार शासन करण्यास असमर्थ होतं ,त्यामुळे दलित समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती , दलित तरुण प्रचंड पेटले होते , त्यांच्या संतापाचा कधीही स्फोट होऊन वणवा भडकणार अशी परिस्थिती निर्माण झाली.त्यावेळी राजा ढाले , वसंत कांबळे , भगवान झरेकर ,लतिफ खाटीक ,अनंत बच्छाव , काशिनाथ तुतारी सारख्या विद्यार्थी असणाऱ्या काही युवकांनी एकत्रित येत दलित युवा आघाडी स्थापन केली , हीच ती दलित पँथरच्या स्थापनेची पहिली वीट होती असं म्हणल्यास काहीही वावगं होणार नाही.

ह्या दलित युवक आघाडीने ह्या सर्व अत्याचाराच्या विरोधात मोर्चा काढला , त्यावेळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला बावडा ह्या ठिकाणी जाऊन रिपोर्ट द्यायला सांगितल्यावर ,मग पोलीस काय कामाला आहे? असा रोकडा सवाल नामदेव ढसाळ व ज.वी.पवार ह्या तरुणांनी मुख्यमंत्र्यांना करत तिथून ते निघून गेले आणि रस्त्याने चालत असताना त्यांच्या डोक्यात दलित पँथर ही संकल्पना आली.......आणि पुढचा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे.

मर मिटणाऱ्या कफनधारी कार्यकर्त्यांची फौज असणारी जगातली एकमेव संघटना म्हणजे दलित पँथर  दलित पँथर आणि तिने केलेल्या  भीमकार्याचा ज्या ज्यावेळी आपण आढावा घेऊ त्या त्यावेळी त्यातून फक्त आणि फक्त प्रेरणा.....प्रेरणा......प्रेरणाच मिळेल.अहो , विचार करा , अवघे दोन चार वर्षाचे आयुष्य जगलेली संघटना , आज पन्नास वर्षानंतरही , दोन पिढ्या गेल्यानंतरही प्रेरणा द्यायचे काम करत आहे , इतकेच नव्हे तर ही दलित पँथर समस्त भारतीय शोषित पीडितांच्या काळजात एक वेगळेच स्थान निर्माण करून आहे.ज्यांनी पँथरचा काळ पाहिला आणि ज्यांनी पाहिला नाही , अशी सगळीच मंडळी स्वतःला पँथर म्हणवण्यात अभिमान बाळगू लागली ,यातच दलित पँथरचे प्रचंड यश दडलेले आहे.

एकच उदाहरण देतो ते म्हणजे गेल्या ५५ वर्षांपासून शिवसेना नावाची संघटना कार्यरत आहे आणि तिचे कार्यकर्ते स्वतःला शिवसैनिक म्हणवून घेण्यात धन्यता मानत आले ,परंतु हेच कार्यकर्ते ज्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बॅनर खाली काम करतात त्यावेळी ते मनसैनिक बनतात , काँग्रेस मध्ये गेले की ते काँग्रेसी बनतात , भाजपात गेले की भाजपाई बनतात.पण जगात  दलित पँथर हीच एकमेव अशी एकमेव संघटना आहे की तिचे कार्यकर्ते आज कोणत्याही पक्ष संघटनांत काम करत असतील परंतु स्वतःच्या नावापुढे ते पँथर हीच बिरुदावली लावून अभिमानाने मिरवत असतात.एखादा प्रफुल्ल शेंडे रिपाई मध्ये असो की भीम आर्मीत असो , भाजपात असो की काँग्रेस मध्ये असो , शिवसेनेत असो की राष्ट्रवादीत असो तो नेहमीच पँथर म्हणूनच जगला ,पँथर म्हणूनच राहिला.हीच पँथरची प्रचंड ताकद आहे आणि तिच्याबद्दल सर्वसामान्यांना असणारा आदर आणि आपलेपणा आहे.जगात कोणत्या संघटनेला हे भाग्य प्राप्त झालंय हो ? 

राजा ढाले निर्वतले ते पँथर म्हणूनच निर्वतले , नामदेवदादा ढसाळ निर्वतले ते पँथर म्हणूनच निर्वतले , एस. एम.प्रधान गुरुजी निर्वतले ते पँथर म्हणूनच निर्वतले , भाई संगारे शहिद झाले ते पँथर म्हणूनच शहिद झाले , भागवत जाधव रक्ताच्या थारोळ्यात पडून शहिद झाले ते पँथर म्हणूनच शहिद झाले.कवी दया हिवराळे असो की मनोहर अंकुश असो , शाहीर विलास घोगरे असो की औरंगाबादचे मोरे गुरुजी असो ,किती किती नावं घ्यायची की जे मेले सुद्धा पँथर म्हणूनच आणि जगले सुद्धा पँथर म्हणूनच.आजचे संदर्भ द्यायचे झाले तर भारताचे सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष असले तरी ते सर्वप्रथम पँथर आहेत , आमचे मार्गदर्शक असणारे ज.वी.पवार आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आधारस्तंभ असले तरी सर्वप्रथम ते पँथर आहेत.आमचे परममित्र पँथर राहुल प्रधान हे आजघडीला आझाद समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असले तरी ते सर्वप्रथम पँथर आहेत , अविनाश महातेकर राज्याचे माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री असले तरी ते एक पँथर आहेत , अर्जुनराव डांगळे कितीही मोठे विचारवंत साहित्यिक असले तरी ते सर्वप्रथम पँथर आहेत , मनोजभाई संसारे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक प्रमुख असले तरी ते सर्वप्रथम पँथर आहेत , भिमपँथर मा.राजेश गवळी हे संविधान रक्षक दल भीम आर्मीचे मुख्य राज्यप्रवक्ते असले तरी सर्वप्रथम ते पँथर आहेत, दीपक केदार , भाई जाधव , निलेश मोहिते  हे सुद्धा सर्वप्रथम पँथर आहेत.लाखो भीमसैनिक आहेत की जे सर्वप्रथम पँथर आहेत.फक्त तेच नव्हे तर त्यांची मुले सुद्धा पँथर आहेत , उदाहरणार्थ एस. एम.प्रधान गुरुजींचा मुलगा राहुलदादा हा पँथर आहे.......होय , पँथर असण्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

आदरयुक्त दहशतीचे दुसरे नाव म्हणजे दलित पँथर भारतात ,जगात रोजच्या रोज ढीगभर संघटना जन्माला येतात आणि मरतात सुद्धा.त्या कधी जन्माला आल्या ,कधी मेल्या हे त्यांच्या संस्थापकांनाही माहीत नसते.परंतु दलित पँथर ही सामाजिक संघटना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही राजकीय संघटना लाखो लोकांच्या हृदयात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.ह्या संघटनांचे लाख शकले झाली असतील पण आजही ह्याच संघटना लाखो दिलांवर अधिराज्य गाजवत आहे.काय कारण असावं ह्या दिवानगीला ? ज्यावेळी मी दलित पँथरचा विचार करतो त्यावेळी मला दलित पँथरने उभारलेले लढे दिसू लागतात.संपूर्ण परिवर्तन आणि समग्र क्रांतीचा नारा देत दलित पँथरने सामाजिक भान जपलं , विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर विधानसभा हादरवून टाकली , गायरान जमिनीच्या मालकी हक्कासाठी महाराष्ट्रात लढे उभारले , स्वातंत्र्याचा सरनामा मांडला.भारताच्या इतिहासात जे जे लढे आतापर्यंत कोरल्या गेले ,त्या लढयांमधील एक प्रमुख असा मराठवाडा विद्यापीठाचा लढा हा आहे.

मराठवाडा विद्यापीठाला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी हा नामांतराचा  लढा दलित पँथरने सुरू केला ,लढला.ह्या लढ्यात कित्येकांना आपल्या प्राणाचं मोल मोजावे लागले , कित्येकांचा बाप शहिद झाला , कित्येकांचा पोरगा शहीद झाला ,कित्येक घरांची राखरांगोळी झाली , कित्येक माय बहिणींच्या कपाळाचे कुंकू पुसल्या गेले , बाबासाहेबांचे कैक लेकरं कापल्या गेले ,पण........पण नामांतर घडवूनच आणले.फक्त इतकंच करून पँथर थांबली नाही तर इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या डोळ्यात डोळे घालून त्या व्यवस्थेलाच जाब विचारला की आम्हाला स्वातंत्र्य मिळालेच नाही मग तुमचे ते तकलादू स्वातंत्र्य आमच्या काय कामाचं ? जे स्वातंत्र्य आम्हाला माणूस म्हणून जगू देत नाही , माणूस असण्याचे अधिकार नाकारत आहे असले स्वातंत्र्य तुमच्या चुलीत घाला......पँथरचा दरारा काय असतो ,हा दरारा त्यावेळच्या भारताने चांगलाच अनुभवला आहे.रडणाऱ्या मुलाला झोपविण्यासाठी आई म्हणते "बाळा झोप आता , नाहीतर राक्षस येईल." परंतु तसा राक्षस कधीच येत नव्हता , पण ह्या महाराष्ट्रात मात्र दलित पँथरचा इतका दरारा आणि दहशत होती की , एखाद्या गावात एखादा जातीयवादी गावगुंड माजला असेल तर त्याला फक्त इतकंच बोलायचं की ,"बेट्या सुधर , नायतर पँथर येईल", पँथर येईल इतका शब्द जरी त्याच्या कानी पडला तरी तो जातीयवादी गावगुंड गाव सोडून पळून जायचा.ही दहशत होती पँथरची.(आता कुठे गेली ती दहशत ?) 

सांगण्याचा मुद्दा इतकाच की दलित पँथरच्या लढ्यानी मरगळलेल्या आंबेडकरी चळवळीत प्राण फुंकला.होय ,आम्ही चार जरी असलो तरी चारशे जणांना आम्ही भारी आहोत हे स्व-भान जागृत झाले , अन्याय अत्याचाराची चामडी चिरण्याची आणि लोळवण्याची एक नवी ऊर्जा मिळाली , जीव गेला तरी बेहत्तर पण आम्ही कोणाचीच गुलामी करणार नाही हा जाज्वल्य स्वाभिमान प्रज्वलित झाला.ही सारी आयुधं ,हत्यारं , शस्त्र आम्हाला बाबासाहेबांनी ऑलरेडी कधीच देऊन ठेवली होती पण बाबासाहेबांच्या नंतर रिपाईच्या भांडणात आम्ही ती वापरायची विसरलो होतो , ते हत्यारं वापरण्याची हिम्मत ,ताकद आम्हाला पँथरने दिली , ती कला आम्हाला पँथरने शिकवली , आमच्या मनगटात एक शक्ती ओतली , नसानसांत क्रांती पेरली , आमच्या लढण्याला एक नवी दिशा दिली......... THANKS DALIT PANTHER.

प्रफुल्लभाई.म.शेंडे              ८६००१०९३०२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com