Top Post Ad

पुन्हा एकदा... एक मराठा...

 भाजपाशी फारकत घेऊन संभाजीराजे भोसले यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ही बाब स्वागतार्ह आहे. मराठा आरक्षण प्रश्न आणि इतर प्रश्नांवर कायम आपली भूमिका ठामपणे मांडणारे संभाजीराजे सध्या मराठा समाजाचे आयडॉल झाले आहेत. विविधांगी भूमिकेतून त्यांनी राजेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या राज्यसभेची कारकिर्द संपल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाच्या नेत्यांसोबत भेटी घेतल्या आणि विविध प्रश्नांवर चर्चा केल्या. त्यांच्या या चर्चेमधूनच कदाचित त्यांनी राज्यसभेकरिता स्वतंत्र अस्तित्व जपण्याची भूमिका घेतली. मात्र यासाठी त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला नाही. केवळ एका संघटनेची बांधणी केली. तीला देखील मूर्त स्वरूप समाजाच्या विविध थरातील नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा करू मग देऊ असे स्पष्ट केले. यावरून संभाजीराजे भविष्यातील राजकारणाचा वेध घेऊन  पावले सावधरित्या टाकत असल्याचे दिसत आहे.  

 

छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संतांच्या विचारांची बैठक असणारा हा महाराष्ट्र या विचारांवरून ढळू नये यासाठी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत झटत राहिलो. जनकल्याणालाच नेहमी व एकमेव प्राधान्य दिले. मात्र, हे सर्व करताना लोकहिताची कामे करण्यासाठी हाती सत्तापद असणे हे किती सोयीस्कर असते, हे खासदारकीच्या कारकिर्दीत लक्षात आले. याचमुळे राज्यसभेच्या या सहाव्या जागेवर मी दावा करीत आहे. यासाठी मला अपना सर्वांच्या मदतीची आवश्यकता आहे, अशी भावनिक साद पत्राद्वारे घालत संभाजीराजें भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अनेक मुद्यांची व्यवस्थितपणे हाताळणी करीत त्यांनी सर्वच आमदारांना पत्राद्वारे आवाहन केले आहे. त्यांच्या भावनिक आवाहनामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.  

एरव्ही राज्यपाल नियुक्त विधानसभेच्या बारा आमदारांचा तिढा अद्यापही सोडवू न शकलेले महाआघाडी सरकार, राज्यसभेकरिता मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहे. मात्र संभाजीराजेंनी अपक्ष उमेदवारी जाहीर केल्याने या निवडणुकीला मोठ्ठा राजकीय रंग आला आहे. मला महाआघाडीचा उमेदवार म्हणून जाहीर करण्याची मागणी संभाजीराजेंनी केली, ती अगदी स्वागतार्हच आहे. जर तीन्ही पक्षांचे मिळून सरकार चालवत असेल तर तिन्ही पक्षांनी मिळून एक उमेदवार द्यायला काय हरकत असावी असा सहज प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मात्र राजकारणात तसे होत नाही. प्रत्येक पक्ष हा आपण कसे वरचढ आहोत अथवा आपले बलाबल कसे अधिक राहील याकरिता धडपड करीत असतो.  संभाजीराजे यांना राज्यसभेवर जाण्यासाठी 42 मतांची गरज आहे. महाविकास आघाडी सरकारमुळे शिवसेनेचे मताधिक्य पूर्ण होणार आहे. त्यामुळे शिवसेनेने संभाजीराजेंना शिवबंधन घाला आणि उमेदवारी घ्या असे जाहिर केले आहे. मात्र संभाजीराजेंनी या प्रस्तावाला नकळत नकारच दिला असल्याचे दिसून येते. असे असले तरी  संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा नाकारून शिवसेनेने दीर्घकालीन राजकारणासाठी आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे ? हा प्रश्न देखील डावलून चालणार नाही. संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने टाकलेल्या जाळ्यात मात्र शिवसेना अडकली नाही, हीच आजची राजकीय वस्तूस्थिती आहे !!  

संभाजीराजे यांनी  उमेदवारीची घोषणा केली असली तरी पुर्वाश्रमीचे भाजप आणि आता त्यांचा मूलभूत राजकीय कल राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिल्याचे लपून राहिलेले नाही. त्यामुळे ते अपक्ष उमेदवार म्हणून शिवसेनेच्या पाठिंब्यावर निवडून आले तरी राज्यसभेत शिवसेनेला अनुकूल अशी भूमिका घेतीलच हे कशावरून? म्हणूनच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे त्यांना शिवसेनेत यायचे निमंत्रण दिले.   2022 च्या राज्यसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या 2 उमेदवारांना राज्यसभेवर निवडून देण्याचा शब्द शरद पवारांनी दिला असला तरी अपक्ष उमेदवारीच्या निमित्ताने संभाजी राजे हे प्रत्यक्षातले राष्ट्रवादीचेच समर्थक नेते शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून जातील असे राजकारण पवारांनी आखून ठेवले आहे. इथेच खरी राजकीय मेख आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाची राजकीय चतुराई वेळीच ओळखून आपली रोखठोक भूमिका घेतली आहे. याबाबत शिवसेनेचे प्रवत्ते संजय राऊत यांनी शिवसेनेला आपला कट्टर शिवसैनिक राज्यसभेवर पाठवायचा आहे. शिवसेनेचे 2 उमेदवार राज्यसभेवर निवडून जातील, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही मग ते कोणीही असो. हे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने सांगतो आहे, असे स्पष्ट केले. त्यामुळे आता शिवसेना वरचढ झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.   

हा सारा राजकारणाचा भाग असला तरी संभाजीराजे अपक्ष लढणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी मराठा संघटनां करीत आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यासह अनेक छोट्या-मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याचे काम मराठा संघटनां करीत आहेत.  मराठा संघटनांकडून सर्वच राजकीय पक्षांवर आगामी निवडणुकांची भीती दाखवत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. संभाजीराजे भोसले लढले आणि त्यांचा जर पराभव झाला तर छत्रपती घराण्यातील व्यक्तीचा पराभव केला म्हणून मराठा समाज नाराज होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगामी निवडणुकीत संबंधित आमदार किंवा राजकीय पक्षांना याची किंमत मोजावी लागेल, असा मतप्रवाह देखील शिवसेनेसह इतर पक्षांच्या मराठा आमदारांमध्ये आहे. 

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर यांनी तर संभाजीराजे भोसले यांना पाठिंबा द्यावा, अन्यथा सर्वच राजकीय पक्षांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा धमकी वजा इशाराच दिला आहे. इतकेच नव्हे तर संभाजीराजे भोसले यांना राज्यसभा उमेदवारी नाकारणे आपल्याला राजकीयदृष्ट्या परवडणारे नाही, असे शिवसेनेतीलच एका आमदारांच्या गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत हे आमदार काय भूमिका घेतात. हे आमदार शिवसेनेच्या भूमिकेवर किती ठाम राहतील, याविषयी शंका उपस्थित झाली आहे. काहीआमदारांनी मातोश्रीला देखील धोक्याचा इशारा दिला आहे. खरंच शिवसेनेतील ही मराठा मंडळी आपल्या भूमिकेवर ठाम राहीली तर...  महाविकास आघाडी सरकारमधील सर्वांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. मराठा आमदार देखील शिवसेनेच्या पाठीशी उभे आहेत. या गदारोळात आता आता पुन्हा एकदा एक मराठा... असा प्रश्न उपस्थित करून राजकीय वातावरण पेटवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना.... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com