Top Post Ad

बौद्ध धम्म आणि दैनंदिन जीवन


 बौद्ध धम्माचं सूत्र असं आहे की, बौद्ध तोच माणूस असतो, की जो सतत जागृत असतो, गौतम बुद्धाचं ते वैशिष्ट्य होतं की ते सतत जागृत होते. तसे वागणारे आजसुद्धा काही लोक आहेत. दीक्षा घेऊन  चीवर घालत नसेल, गृहस्थी असतील, पण तरी सुद्धा ते सतत जागृत आहेत. त्यांचा मेंदू हा सतत जागा असतो. सतत जागा, म्हणजे खट्ट जरा झाले तरी त्यांना लगेच स्ट्राईक होतं, अरे, हे आपल्या विरोधी आहे, आपल्या बाजूचं आहे, आपल्याला समांतर आहे वगैरे वगैरे. तेव्हा धम्माचं आचरण हे काळाशी बांधलेलं नाही, ते विवेकाशी बांधलेले आहे. प्रत्येक वर्तन विवेकाने करणे, हे मला वाटतं दैनंदिन जीवनातलं महत्त्वाचं आहे. नुसतंच विवेकाने जगणे आहे का? तर नाही. दुसरी गोष्ट आहे ती, इंग्लीशमध्ये त्याला (morality) असं म्हणतात. म्हणजे बुद्धाने म्हणा किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं इंटरप्रिटेशन (interpritation) केलं म्हणून म्हणा.  

जगाच्या इतिहासामध्ये ही पहिली क्रांतीकारक गोष्ट आहे की नैतिकतेला प्रज्ञेच्या पायावरती उभे केलेले आहे. नाहीतर थोड्याफार प्रमाणामध्ये सगळ्याच धर्मामध्ये नैतिकतेने वागावे असे म्हटलेलं आहे. मग मृत्यूनंतर तेथे जाब द्यावा लागतो. म्हणून असेल किंवा अन्य काही कारणामुळे असेल. म्हणजे भयापोटी, श्रद्धेपोटी किंवा स्वार्थापोटी माणसाने नैतिकतेने वागावे असे सांगितलेले आहे. त्यांचं एक साधं सूत्र असं आहे की, सर्वांनी सदाचारानं का वागावं? तर त्यांचं म्हणणं असं आहे की, सगळ्यांनी सदाचारानं वागावं, सगळ्यांनी पुण्य करावं, नैतिकतेने वागावं त्याचं कारण असं आहे की, मृत्यूनंतर चांगल्या चांगल्या गोष्टी केल्यानंतर जे पुण्य तिथे साठलेले असते. ते तिथे, गेल्यानंतर त्याचं वाटप होतं, त्यांची एक कल्पना. म्हणजे जसं काय शेतीमध्ये उत्पन्न निघावं आणि जेवढे लोक काम करतील त्या प्रमाणात ते वाटावं तसं आहे. म्हणजे शेतीमध्ये सगळ्यांनी जास्त काम केलं तर जास्त उत्पादन मिळेल आणि जास्त उत्पादन मिळाले की, सगळ्यांच्या वाटणीला जास्त येईल. म्हणून सगळ्यांनी पुण्यं करावं, म्हणजे मेल्यानंतर तेथे सगळ्यांच्या वाटणीला अधिक अधिक पुण्य येईल. अशी ती कल्पना आहे. गौतम बुद्ध हा इतिहासामधला असा एकमेव मनुष्य आहे की, ज्याने नैतिकतेला विवेकाचा आधार दिला. विवेकाधिष्ठित नैतिकता महत्त्वाची. हा विवेक सार्वत्रिक आहे. विवेकाला देशाची बंधन नसतात. विवेकाला भाषेची बंधनं नसतात. विवेकाला लिंगभेद माहीत नसतो. तेव्हा विवेकावरती आधारलेली नैतिकता आणि मग त्या अनुषंगाने वर्तन हे दैनंदिन जीवनामध्ये असलं पाहिजे. 

तुम्ही आतापर्यंत 12 पौर्णिमा जागवल्या. पंचशील आहे आणि अष्टांगिक मार्ग आहेत. हे दैनंदिन जीवनात आणले की दैनंदिन जीवनामध्ये धम्माचं पालन झालं, याच्या पलीकडे काहीच नाही. पण त्याची नाळ जी तत्त्वज्ञानाशी जोडलेली आहे. तसे प्रत्येकाच्या वर्तनाला एक पाठबळ असते. ते विवेकाधिष्ठीत असेल नसेल, चुकीचं असेल बरोबर असेल.  माझा मुद्दा असा आहे की, समर्थनाशिवाय कोणतंही वर्तन मनुष्य करीत नाही चांगलं किंवा वाईटही. केल्यानंतर समर्थन होत असेल किंवा करण्यापूर्वी. त्याची तयारी म्हणून समर्थन असेल. म्हणून दैनंदिन जीवनामध्ये जे आपण वर्तन करतो. साधं चालणं, बोलंण असेल, एकमेकांशी वागणं असेल, या सगळ्या गोष्टीला एक समर्थन असणं गरजेचं असतं आणि ते समर्थन जर धम्माचं असेल तर मग धम्माच्या अनुषंगानं तुम्ही ते वर्तन केलं, असा त्याचा सरळ अर्थ होतो. मग तुमचं तुम्ही तपासून बघायचं आहे की, या कृतीला धम्माचं पाठबळ आहे का? धम्माची मान्यता आहे का? असा जर आपण विचार केला तर आपण धम्माच्या अनुषंगाने दैनंदिन जीवन जगू शकतो. इकडं तिकडं चुकण्याचा प्रयत्न केला असेल तर दुरुस्त करू शकतो. 


  1956 च्या धम्म क्रांतीचे अनुसरण करणारे आपण लोक आहोत आणि आता 2006 साली त्याला 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. आता या 50 वर्षांमध्ये धम्माच्या संदर्भात कुणी काय केलं? त्याचा लेखाजोखा द्यायचा आहे. म्हणजे जमाखर्च मांडायचा आहे. 1956 ला जे कळणारे लोक होते, त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये काय केले? आणि आपणाला कळायला लागल्यानंतर आपण काय केले? त्याचा लेखा जोखा द्यायचा आहे. तेव्हा त्याची तयारी जर तुम्ही करत असाल तर तुम्ही योग्य मार्गाला आहे, असं मी म्हणेन. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं धम्म क्रांतीनंतर लगेच महापरिनिर्वाण झालं. बुद्ध आणि त्याचा धम्म, नंतरच प्रकाशित झाला. त्यांनी अगोदर लिहिला, पण नंतरच प्रकाशित झाला. पण बाबासाहेबांना उपासकांच्यासाठी एखादी आचारसंहिता निर्माण करता आली असती; तर मग आपणाला तपासून बघता आलं असतं. आपलं वागणं धम्माच्या विरोधी आहे किंवा बरोबर आहे. आज कसं झालेलं आहे की ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार व ज्याच्या त्याच्या आकलनानुसार हे धम्मात बसत आहे आणि हे धम्मात बसत नाही. अशा प्रकारची चर्चा गेल्या 45-46 वर्षांपासून चालू आहे आणि त्यामुळे धम्म क्रांतीला अनुसरणारा बौद्ध समाज, समहू म्हणून त्याची एक स्वतंत्र अशी अस्तित्त्वाची सिद्धी सिद्ध व्हायला पाहिजे होती, ती काही अजून झालेली नाही.  

मी एक, बाबसाहेबांनी दिलेलं उदाहरण देतो ब्रह्मदेशातलं. तेथे एक सार्वजनिक रस्ता खाजगी जमिनीतून जाता होता. तर मग बाबासाहेब म्हणाले की, इथे तक्रार कोण करतयं काय? तर मग `नाही' म्हणाले. तर हे सर्व अनित्य आहे, याची जाणीव तिथल्या बौद्ध लोकांना झाल्यामुळे ते म्हणाले, तक्रार करण्याचा काही प्रश्नच नाही. आपल्याकडे त्यासाठी आंदोलन होतात आणि राज्य शासनसुद्धा बदलू शकते. रस्ता आमच्या शेतातून गेला आणि आमचं पुनर्वसन झालं नाही वगैर याच्यासाठी. तर बौद्ध लोकांचं आयडेंटीटी, बौद्ध लोकांची अस्तित्त्वाची सिद्धी ही दैनंदिन जीवनामधूनसुद्धा होत असते. पण तशा प्रकारची लिखित स्वरुपाची रचना नसल्यामुळे ते राहून गेलेले आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये जो काही उपासकांसाठी विनय सांगितलेला आहे; आपण सगळे वाचणारे लोक असल्यामुळे ते काही मी रिपीट करत नाही. खरं तर मला व्यक्तिगत `उपासक' हा शब्द सुद्धा खटकलेला आहे. पण त्याच्यासाठी पर्यायी शब्द काय काढायचा हे अजून ठरवायचं आहे. उपासनेशी जोडलेला उपासक असेल तर तो बौद्ध उपासक कसा? असा प्रश्न आहे, पण ठीक आहे इतक्या खोलात जायला नको. आज आपण एकमेकाला समजून घ्यायला `उपासक' हा शब्द वापरू.  

बाबासाहेबांनी धम्मामध्ये उपासकांना जे स्थान बदलंय ते मात्र क्रांतीकारक असं आहे. त्यांनी बौद्ध धम्माचा ऱहास भारतातून झाला त्याची जी अनेक कारणे दिलेली आहेत. त्यामध्ये जे एक अत्यंत महत्त्वाचं कारण दिलेलं आहे, ते म्हणाजे, बुद्धानंतर हा जो धम्म होता तो प्रामुख्याने भिक्खू संघापुरता मर्यादित राहिल्यामुळे आणि उपासकांना धम्म दीक्षा देण्याची, उपसंपदा देण्याची सोय नसल्यामुळे. अनेक शतकं जरी बौद्ध धम्म भारतामध्ये राहिला तरी बौद्ध भिक्खूपुरताच राहिला आणि उपासकांना बौद्ध धम्माव्यतिरिक्त अन्य धर्माचं पालन करण्याचीसुद्धा मुभा असल्यामुळे भिक्खू संघाचं अस्तित्त्व संपल्यानंतर लगेचच बौद्ध धम्म संपला. त्याचे तत्त्वज्ञान मात्र वेगवेगळ्या रुपाने पुढे चालू राहिले. म्हणजे परकीय आक्रमणं आली आणि काही भिक्खूंच्या कत्तली झाल्या आणि काही जीव वाचवून परदेशी निघून गेले. तो जर उपासकांच्यापर्यंत रुजला असता तर कदाचित ज्या प्रमाणामध्ये तो असा नष्ट झाला त्या प्रमाणात नष्ट झाला नसता आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला धम्म दीक्षा घेतल्यानंतर लगेच ते उभे राहिले आणि म्हणाले, `आता मी दीक्षा घेतली आहे आता मी तुम्हाला दीक्षा देतो' आणि तो वादही झाला. 

आपणा सगळ्यांना माहीत आहे. तुम्ही धम्माची दीक्षा घेतली, पण धम्माची दीक्षा देण्याचा अधिकार कोणी दिला? आणि लगेच त्यांनी शेवटचं वाक्य उच्चारलं, `इथून पुढे आता दर एक उपासकाला दुसऱया उपासकाला धम्म दीक्षा देण्याचा अधिकार देतो.' ही एक बौद्ध धम्माच्या इतिहासातील क्रांतीकारक गोष्ट आहे. माझ्या माहितीनुसार भदन्त आनंद कौसल्यान यांनी देखील आयुष्याच्या अखेरीस संघाची व्याख्या करताना भिक्खू संघ असं म्हटलेलं नव्हतं. उपासक अधिक भिक्खू मिळून संघ होईल असं म्हटलं होतं आणि त्यांच्या शब्दाला मान्यता असल्यामुळे आपण ते स्वीकारायला हरकत नाही. तेव्हा धम्माचं अस्तित्त्व जर टिकवून ठेवायचं असेल तर आता आपणाला भिक्खूंना दोष देण्यात अर्थ नाही. म्हणजे इतिहासामध्ये भिक्खूंना दोष दिले असतीलही. बाबासाहेबांनीदेखील काही प्रमाणामध्ये भिक्खूंना दोषी धरलंय. सम्राट अशोकानं देखील 60 हजार भिक्खूंची चीवरं काढून घेतल्याचा उल्लेख सापडतो. हे सगळं जरी खरं असलं तरी 1956 च्या धम्म क्रांतीनंतर बौद्ध धम्माचं जर काही बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार भिक्खू असणार नाहीत. त्याला जबाबदार उपासक असणार आहेत. याची जाणीव मला वाटतं प्रत्येक उपासकाला असली पाहिजे. 

अडीच हजार वर्षांपूर्वीचा गौतम बुद्धांचा धम्म आहे, त्यानं तत्त्वज्ञान दिलं, भिक्खूंसाठी का असेना परंतु एक आचारसंहिता दिली. मनुष्य आहे तो प्रवाही आहे. त्यांचे जगणं प्रवाही आहे आणि त्याच्या डोक्यात जो एक मेंदू आहे तो जिज्ञासू आहे आणि जिज्ञासेपोटी अनेक शोध लागतात. विज्ञानामधले थक्क करून सोडणारे शोध लागतात. वेगवेगळ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती अस्तित्त्वात आहेत. विज्ञानाने प्रगती केलेली आहे, म्हणजे ते भौतिक शास्त्रातलं असेल मानसशास्त्रातलं विज्ञान असेल, तेव्हा या इतक्या बदललेल्या जगामध्ये वावरताना अडीच हजार वर्षांपूर्वी सांगितलेल्या बौद्ध धम्माचं अनुसरण करताना त्याच्यामध्ये कुठे विसंगती येते का? याचाही शोध घ्यायला पाहिजे. आणि मला सांगायला आनंद वाटतो किंवा आपणा सगळ्यांना अभिमान वाटेल की विज्ञानाची थक्क करून सोडणारी किती जरी प्रगती झाली तरी गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून वर्तन करायला ते अडथळा ठरत नाही. आपल्याकडे काय किंवा युरोपमध्ये काय, अनेक शतकं मानवी समूहाच्या वर्तनाचं नियंत्रण करणारा प्रमुख घटक हा धर्म होता. मी मुद्दाम युरोपचं उदाहरण देतो की, तिकडे धर्मसत्ता श्रेष्ठ की राजसत्ता श्रेष्ठ? असा जवळजवळ दीड हजार वर्षापेक्षा जास्त संघर्ष झालाय. म्हणजे पहिली एक दोन शतक सोडून द्या, तिसऱया चौथ्या शतकापासून संघर्ष सुरू झाला. 

कारण तिकडे प्रमुख चर्च होतं. चर्चचा प्रमुख जो पोप, त्याच्या अधिपत्त्याखाली राजा आणि त्याच्या अधिपत्याखाली प्रजा. म्हणजे राजालाही स्वतंत्र अस्तित्त्व नव्हतं आणि प्रजेलाही स्वतंत्र अस्तित्त्व नव्हतं. त्या चर्चमधून आदेश निघायचे त्या प्रमाणे लोकांनी वर्तन करायचं. पण जीवन प्रवाही आहे आणि जिज्ञासू आहे. तिकडेही प्रगती होत गेली आणि चौथ्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत संघर्ष झाला आणि पंधराव्या शतकाच्या प्रारंभी पहिल्यांदा राज्यशासन किंवा राजसत्ता ही धर्मसत्तेपासून अलग केली. धर्म सत्तेला म्हटलं तुम्ही पारलौकिक बघा आणि राजसत्तेला सांगितलं की तुम्ही ऐहिक माणसाचं जीवन बघा. यातली एक गंमत सांगतो आणि मी दुसऱया मुद्याकडं येतो. आपल्याकडे ही ती गंमत आहे. धर्माचं काम हे पारलौकिक जगाशी निगडीत असेल, तर लौकिकजगामध्ये धर्माने ढवळाढवळ करायची काही गरज नाही. पण आपल्याकडे अस्पृश्यता पाहावी इथंपासून ते जातीव्यवस्था पाळावी, ते स्त्रियांना सगळ्याच बाबतीमध्ये मागासलेले ठेवत, 

तिथपासून ते सगळ्याच व्यवहारिक गोष्टी धर्माने निश्चित केल्या. म्हणजे धर्म जर, पारलौकिक असेल, धर्माचं काम काय मेल्यानंतर त्या माणसाचं काय करायचं ते बघा, मरेपर्यंत तुम्ही काय ढवळा ढवळ करू नका, असं म्हणता येतं. तुम्ही दैनंदिन जीवनात लुडबुड कशाला करता? धर्माचे लोक, जसं की, आता गंमतीने म्हणतात की, परमेश्वर सगळ्यांचा कर्ता करविता असेल तर मग कुठल्या मंदिराला आता एवढा सैन्याचा वेढा देऊन संरक्षण करायची काय गरज आहे? म्हणजे देवळाला, मंदिराला जर संरक्षणाची गरज असेल, तर म्हणजे आता त्या लोकांना सांगायला पाहिजे की, देव आता तुमचं काय रक्षण करणार नाही तर आता देवालाच बंदूकधारी लोकांच्या रक्षणाची गरज निर्माण झालेली आहे. हे जसं आहे त्याप्रमाणेच की पारलौकिक जीवनामध्ये तुम्ही काय करत असाल तर ते तुमचं तुम्ही पाहून घ्या, लौकिक जीवनात तुम्ही काय ढवळा ढवळ करू नका. 

धम्माच्या बाबतीत मात्र हे स्पष्ट आहे की, जन्मल्यापासून मृत्यूच्या क्षणापर्यंत धम्माचं स्थान आहे. त्याच्यानंतर धम्माचं काही स्थान नाही. त्यामुळे पारलौकिकतेचा संबंध येत नाही. पण आपल्याकडेसुद्धा बौद्ध धम्माचं काम बऱयापैकी चालतं. बौद्ध धम्माचं ते चालायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. आणि बाबासाहेबांनी `बुद्ध आणि त्याचा धम्म' यामध्ये एक प्रकरण टाकलय की रीलिजन आणि धम्मामध्ये काय फरक आहे? अनेक ठिकाणी आम्ही पाहतो की, जोरात काम चालू आहे, ते बौद्ध धम्माचं काम चालू आहे. बरं आमच्यासारखी काही मंडळी बोलू लागली तर ते म्हणतात की, आता आम्ही कुठं सुरुवात केलेली आहे आणि लगेच कशाला तुम्ही लागलाय टीका करायला. `बघू हळूहळू' म्हणून सांगतात. पण बाबासाहेबांनी याच कारणामुळे धम्म भारतातून निघून गेला म्हटलंय. कारण धम्माला धर्माचं स्वरुप प्राप्त झालं म्हणून. म्हणून आपल्या वर्तनातून धम्माचं अनुसरण करताना ते धर्माचं अनुसरण होणार नाही याची आपण खबरदारी घ्यावी.  

दुसरा जो मुद्दा आहे तो अधिक महत्त्चाचा आहे. आपल्या वर्तनावरती कायद्याचे एक नियंत्रण असते. म्हणजे कायदा आणि धम्म याच्यामध्ये फरक काय आहे? तर धम्म हा कसं वागावं हे सांगतो आणि कुठल्याही देशातला. आपण आपल्या देशापुरतं बोलू. आपल्या देशातला कायदा असं म्हणतोय की, असं वागलास तर तुला शिक्षा आहे. पंचशीलबद्दल मी बोलणार नव्हतो, पण आता या अनुषंगानं बोलतो. आपल्यामध्ये दुसरच एक शील आहे की, `चोरी करू नये' असं आहे. हे धम्माच्या पंचशीलात आहे की चोरी करू नये. पण समाज एखाद्यानं म्हटलं की, मी चोरी करणारच तर आपल्याकडे असं काही घडलेलं नाही की समजा `अ' ने चोरी केली. तो बौद्ध धम्मातला आहे आणि `ब' ही बौद्ध धम्मतला आहे. तर `अ' आ `ब' जावून म्हणत नाही, अरे, तू बौद्धधम्मीय आहेस ना? मग तू चोरी केलेली आहेस. तुला दोन महिने शिक्षा आहे. म्हणजे भारतीय राज्यघटनेमधला, लोकशाहीमधला जो कायदा आहे की, जो तुम्हाला वर्तनावरती नियंत्रण करतो. तो धम्माशी सुसंगत आहे.  

दोन महिन्यांपूर्वी दिवाळी साजरी झाली. त्यावेळी नियम आला की फटाके जोरात उडवू नये, वाजवू नये. काय आहे हे? म्हणजे एका धर्मामध्ये फटाके जोरात वाजवण्याचा सण आहे. पण कायदा म्हणाला की नाही, तुम्हाला इतक्या मोठ्यानं फटाके वाजवता येणार नाहीत. तात्पर्य काय की, कायदा धम्माचं अनुसरण करताना आड येत नाही. त्याप्रमाणेच बौद्ध धम्माप्रमाणे वागताना भारतीय लोकशाहीमधला, राज्य घटनेमधला कोणताही कायदा तुम्हाला उल्लंघन करण्याची आवश्यकता नाही. उलट धम्माचं वर्तन, विज्ञानाची प्रगती आणि भारतीय कायदा या सगळ्याशी सुसंगत आहे. ही सगळ्यात मोठी क्रांतीकारक गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला कायदा काय म्हणेल? असं म्हणण्याची काही गरज नाही. तेव्हा भारतीय लोकशाही राज्य घटनेमधला कायदा, विज्ञानाची प्रगती आणि धम्मानं सांगितलेलं वर्तन यामध्ये कुठेही विसंगती नाही. हे मी एवढ्यासाठी सांगतो आहे की, एवढं मोठं  पाठबळ, समर्थन तुमच्या वर्तनाला  लाभणार आहे. 

आणखीन एक गोष्ट आहे. आता मी कायदा, विज्ञान आणि धम्म सांगितला त्यात आणखीन एक गोष्ट आहे, आता साधं कुठलं झाड जरी तोडायचं असेल तर वन खात्याचे लोक येऊन सांगतात तुम्हाला शिक्षा होईल म्हणून. म्हणजे `पर्यावरण' त्याला एक शब्द आहे, म्हणजे इतर अनेक धर्मामध्ये नाव घ्यायची गरज नाही आणि कुठल्याही धर्मावर टीका करण्याची आता काही करज नाही. पण इतर अनेक धर्म असे आहेत, त्यांचे सामूहित वर्तनच असे आहे की, जेथे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होतो. आता मला वाटतं की नाशिकला पुंभमेळा भरला होता. बाबासाहेबांचे एक भाषण त्याच्यासंबंधी आहे. ते म्हणाले की, `किती घाणेरडे लोक आहेत हे, नागडे लोक आंघोळ करतात आणि तेच पाणी पितात हे. माझ्याकडे अधिकार असता तर मी यांना हाकलून दिलं असतं. नाहीतर मी गोळ्या घातल्या असत्या.' इतके चिडले, इतकं चीड येणारे हे वर्तन आहे. म्हणजे बौद्ध धम्माच्या व्यतिरिक्त धर्मामध्ये कायद्याचा प्रश्न येतो. विज्ञानाचा तर प्रश्न येतोच येतो. त्यांचं कुठलंही वर्तन, त्यांचे कुठलेही तत्त्वज्ञान हे विज्ञानाशी सुसंगत नाही. धम्मानुसार वर्तन केल्याने तुम्ही भारतीय राज्यघटनेचे पालन कराल. एका अर्थाने विज्ञानाशी सुसंगत राहून विज्ञानाच्या प्रगतीबरोबर तुम्ही जाल आणि पर्यावरणाला देखील धक्का न लावता, पर्यावरण निरोगी ठेवण्याचं कार्य करू शकाल. इतकं मोठं काम, इतकं व्यापक काम बौद्ध धम्माच्या अनुसरणामध्ये आहे आणि ते दैनंदिन जीवनातून आपणाला करता येतं. 

प्रा.गौतमिपुत्र कांबळे 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com