Top Post Ad

संभाजीराजें भोसले यांना तुळजाभवानी मंदीराच्या गाभाऱ्यात जाण्यास मज्जाव

मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक, बोंबमारो आंदोलनाचा इशारा


तुळजापूर-
छत्रपती संभाजीराजे भोसले यांना तुळजा भवानीच्या गाभाऱ्यात जाण्यास नियम दाखवत रोखले गेले. मात्र मंदिरात कुठला ही वाद नको म्हणुन छत्रपती संभाजीराजे हे देवी दर्शन घेवुन गेले. यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले.  छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याशी तुळजा भवानी मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केले असुन मंदिर व्यवस्थापक तहसिलदार , धार्मिक व्यवस्थापक यांना निलंबित करण्याची मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा यांच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच मंदिर संस्थान धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाने तुळजापूरच्या तहसीलदारांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली आहे. तसंच बोंबमारो आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी ज्या पूजाऱ्याची पाळी आहे ते वगळता सर्वांना मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश बंदी केली होती. या नियमाचा आधार घेत छञपती संभाजीराजे यांना अडवण्यात आले होते. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेत छत्रपती संभाजीराजे यांच्याशी फोनवर संवाद साधत घडलेल्या प्रकाराची दिलगिरी व्यक्त केली आहे. यासंदर्भात संभाजीराजे भोसले यांनी देखील फोनवर प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुनावले आहे.

तुळजाभवानी माता हि छत्रपती घराण्याची कुलस्वामिनी वरदायिनी आहे. छत्रपती घराण्यातील सदस्य जेव्हा दर्शनाला येतात तेव्हा ते थेट गाभाऱ्यात जाऊन विधिवत आई तुळजाभवानीचे दर्शन घेतात ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. छत्रपती संभाजीराजे हे सोमवारी (९ मे) रात्री ९ वाजता दर्शनाला आले होते. त्यावेळी त्यांना तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले. आपल्या घराण्याची परंपरा पाळू द्या, अशी विनंती छत्रपती संभाजीराजे यांनी केली, तरी त्यांना प्रवेश दिला नाही. 

या संदर्भात मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवला. जबाबदार असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी. गाभाऱ्यात जाण्यास बंदी करणे हा नियम जरी योग्य असला तरी छत्रपती घराण्याला त्यातून वगळणे गरजेचे होते. महाराष्ट्रातील कोणत्याही मंदिरात छत्रपतींना गाभाऱ्यात जाण्यापासून रोखले जात नाही, ही परंपरा आहे.
 
यासंदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाने तुळजापूरच्या तहसीलदारांना पत्र पाठवले आहे. “संभाजीराजे भोसले तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी आले असता कुठलाही प्रोटोकॉल न पाळता त्यांना दर्शन घेण्यासाठी सहजनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे यांनी गाभाऱ्यात येण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज संभाजीराजे भोसले यांचा अवमान केल्याने छत्रपती प्रेमींचे मन दुखावले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे. या कारवाईची प्रत द्यावी. अन्यथा राज्यभर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार वाट पाहून बोंब मारो आंदोलन करण्यात येईल’, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांची गैरसोय झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंदिर संस्थानने लेखी प्रसिद्धिपत्रक काढून दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या दौऱ्यावेळी त्यांना कुलाचार, पुजा विधी करता याव्यात यासाठी आवश्यक त्या बाबींची काळजी घेण्याचे आदेश काढले आहेत. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात छत्रपती संभाजी महाराज यांना प्रवेश नाकारल्यानंतर महाराष्ट्रात मंदिर संस्थानच्या कारभारावर टिकेची झोड उठली, त्यानंतर मंदीर संस्थानने दिलगिरी व्यक्त केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com