माता रमाईं... स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन


माता रमाई म्हणजे पतीच्या पडत्या काळामध्ये पतीसाठी कष्ट करणाऱ्या, परिवर्तनाच्या लढ्यामध्ये पतीला अक्षरश: दान देणाऱ्या एखाद्या समर्थ स्त्रीचं रूप. साऱ्या स्त्रियांनी माता रमाईंकडून कष्ट करणाऱ्या हातांचं बळ घ्यावं,  तर समाजासाठी स्वत:च्या सुखाचा त्याग करतांना मनामध्ये जराही तक्रारीचा सूर उमटू न देणाऱ्या मनाचं मोठेपण घ्यावं. माता रमाईंचं जीवन म्हणजे साऱ्या मानवी भावभावनांना बाजूस सारून फक्त करुणेने थबथबलेले जीवन! त्यांच्या हृदयातील ही करुणा साऱ्या शोषित समाजासाठी होती. ती फक्त घराच्या चार भिंतींपुरती मर्यादित नव्हती. म्हणूनच तीन मुलगे आणि एक मुलगी अशा चार लाडक्या बाळांना गमावण्याचं दु:ख पचवून रमाईंनी बाबासाहेबांची होता होईल तेवढी जपणूक केली. त्यांना शोषितांसाठी चळवळ उभारायला बळ दिलं. कौटुंबिक अडचणीमध्ये बाबासाहेबांना गुतंवून ठेवलं नाही. या अडचणी स्वत:च्या हिंमतीने सोडविल्या. भले त्यासाठी शेणाच्या गोवऱ्याही थापल्या.  

माता रमाईंच्या त्याकाळच्या गोवऱ्यांची किमंत आजच्या आंबेडकरी समाजाला खूप मोठी आहे. कारण त्यांनीच बाबासाहेबांना मोठं करण्यासाठी आधार दिला. बाबासाहेबांनी उभारलेली चळवळ मोठी करण्यासाठी आधार दिला. रमाईंची चळवळीतली ही मोठी साथ आहे. रमाईंच्या या अप्रत्यक्ष साथीने उभ्या राहिलेल्या चळवळीची फळं आम्ही आज चाखतो आहोत. बहुजन समाजातील स्त्री-पुरुषांना याची जाणीव हवी.  आज भारतीय समाजातील स्त्रिया बाबासाहेबांच्या चळवळीमुळेच शिकून सवरुन स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या बनलेल्या आहेत. आर्थिक स्थैर्याचं सुख अनुभवत आहेत. पण संपुर्ण भारतीय समाज आज या स्थितीला पोचला आहे का? अजूनही ह्या देशात खैरलांजी घडते आहे, अजूनही रमाबाईनगर हत्याकांड राजरोसपणे घडत आहे आणि आरोपी मोकाट सुटताहेत. अजूनही खेडोपाडीच नव्हे तर शहरात देखील अत्याचाराची प्रकरण घडत आहेत. स्त्रियांची नग्न धिंड काढली जात आहे. अजूनही देवदासी प्रथांमधून विशिष्ट जातीतील स्त्रीलाचं गावातील धनदांडग्यांसाठी भोगदासी बनविण्याची कारस्थाने सुरूच आहेत. आज या साऱ्यांच्या विरुध्द उभे राहून लढण्यासाठी सशक्त चळवळीची गरज आहे. या चळवळीत फक्त पुरुषच असून चालणार नाही. तर प्रत्येक स्त्रीचा सहभाग असायला हवा. काहींचा सावित्रीमाई फुलेंसारखा प्रत्यक्ष सहभाग तर काहींचा माता रमाईंसारखा अप्रत्यक्ष सहभाग. स्त्रियांच्या सहभागानेच चळवळीला ताकद येते. ती खऱ्या अर्थाने समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचते. म्हणूनच स्त्रियांनी आपल्या जबाबदारीचं भान ठेवायला हवं.  

माता रमाई बाबासाहेबांच्या आयुष्यात आल्या तेव्हा पूर्णपणे अशिक्षित होत्या. पण त्यांनी या महामानवाचं मन समजून घेतलं, त्यांची महान चळवळ समजून घेतली, त्यांची  कर्तव्यं समजून घेतली. कोण म्हणेल या माऊलीला अशिक्षित? आजच्या शिकलेल्या स्त्रियांकडे तरी ही समज आहे का? चळवळीत काम करणाऱ्या आपल्या पतीला समजून घेण्याची कुवत त्यांच्यात आहे का? स्वत: आर्थिक स्थैर्य उपभोगणाऱ्या स्त्रियांनी तरी घरातील पुरुषांना चळवळीसाठी मोकळं सोडायला हवं. घरातल्या जबाबदाऱ्या स्वत: हिंमतीने पेलायला हव्यात. ज्या स्त्रियांमध्ये घराच्या बाहेर पडून काम करण्याची कुवत आहे, त्यांनी तर उंबरठ्याबाहेर पडायलाच हवं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुध्दांचा वारसा दिलाय. त्यातील थेरींचा वारसा आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांनी पुढे न्यायचा आहे. समाजासाठी आपला वेळ, पैसा, बुध्दीमत्ता आणि श्रम उपयोगात आणायचे आहेत. तरच समाज वेगाने पुढे जाईल. पुढच्या पिढीच्या वाटचालीसाठी रस्ता सोपा होईल.  

माता रमाईंच्या त्यागाचं मोल डॉ. बाबासाहेबांना किती होतं याचीही जाणीव आंबेडकरी पुरुषांना असायला हवी. `बहिष्कृत भारत' या साप्ताहिकात बाबासाहेबांनी रमाईंचं वर्णन पुढील प्रमाणे केलेलं आहे. `प्रस्तुत लेखक परदेशी असतांना रात्रंदिवस जिने प्रपंचाची काळजी वाहिली व जिला ती अजूनही करावी लागत आहे व स्वदेशी परत आल्यावर त्याच्या विपन्न दशेत शेणीचे भारे स्वत:च्या डोक्यावर वाहून आणण्यास जिने मागेपुढे पाहिले नाही अशा अत्यंत ममताळू, सुशील व पूज्य स्त्रीच्या सहवासात दिवसाच्या चोवीस तासातून अर्धा तासही त्याला घालविता येत नाही.' रमाईंच्या निधनाच्या सात वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. 27 मे 1935 रोजी रमाईंचं निधन झालं आणि पहाडी व्यक्तिमत्वाचे बाबासाहेब मुळापासून हादरले. रमाईंच्या हयातीत बाबासाहेबांनी आपल्या पत्नीवरचं हे इतकं अगाध प्रेम तिच्यापाशी बोलून दाखविलं होतं का कुणास ठाऊक? पण हे अबोल प्रेम, ही अबोल निष्ठा 1940 मध्ये लिहिलेल्या `थॉट्स ऑन पाकिस्तान' या ग्रंथातील अर्पण पत्रिकेतून उभ्या दुनियेपुढे जरूर व्यक्त होतं.    

As a token of my appreciation of her goodness of Heart, nobility of mind and her purity of character-- ही या अर्पणपत्रिकेतील काही वाक्ये.  

रमाईंवरचं हे अबोल प्रेम बाबासाहेबांनी त्यांना लिहिलेल्या अनेक पत्रातूनही व्यक्त होतं. पतीपासून कोसो दूर असलेल्या आपल्या पत्नीवरच्या विश्वासाची पावती बाबासाहेबांनी लंडनहून पाठवलेल्या पत्रातून दिली आहे. बाबासाहेबांच्या रमाईंवरच्या या विश्वासाने, आदराने, प्रेमाने आणि निष्ठेने जशा रमाई कितीतरी मोठ्या होतात. तसेच बाबासाहेबही `माणूस' म्हणून कितीतरी मोठे होतात. बाबासाहेबांनी आपल्यापेक्षा कितीतरी कमी शिकलेल्या आपल्या पत्नीला आत्यंतिक आदराने वागविले. रमाईंना ते `रामू' म्हणत. आपल्या `रामू'चा त्यांनी कधीही अपमान केला नाही. बुद्धांच्या स्त्री-पुरुष समानतेचा वारसा अशा पद्धतीने बाबासाहेबांनी जोपासला. आजच्या स्वतला आंबेडकरी म्हणवणाऱ्या पुरुषांनी हा वारसा लक्षात घेणे गरजेचे आहे. घराघरात रमाईंचा आदर्श आपल्या पत्नीला सांगू इच्छिणाऱ्या पुरुषांनी स्वत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हा आदर्श स्वतला सांगणे अत्यंत आवश्यक आहे. चळवळीत प्रत्यक्ष काम करणाऱ्या स्त्रीला पतीच्या मनातील स्वतबद्दलच्या विश्वासाची नितांत गरज असते. तर घराच्या जबाबदाऱ्या पेलत अप्रत्यक्ष काम करणाऱ्या स्त्रीला पतीच्या मनातील स्वतबद्दलच्या सन्मानाची किवा आदराची नितांत गरज असते. घराघरामध्ये हे सारं सांभाळलं जाईल तर आंबेडकरी चळवळ झपाट्याने पुढे जायला वेळ लागणार नाही. माता रमाईंच्या स्मृतींना उजाळा देतानाच दुसरीकडे प्रत्येकाने आंबेडकरी चळवळ पुढे नेण्याचा संकल्प करायला हवा. 

-------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------

      *माता रमाई: बाबासाहेबांची शीतल छाया!*

    भारतरत्न डॉ.बाबासाहेब तहानभूक विसरून पुस्तक वाचनात दंग असत. एकदा जेवणाची वेळ झाली असता रमाईंनी त्यांच्यापुढे जेवणाचे ताट ठेवले. साहेबांचे जेवण आटोपले असेल वाटून ताट उचलण्यासाठी त्या खोलीत जरा वेळानेच गेल्या, मात्र ताट तसेच उघडे. न राहून माईंनी त्यातल्या एका पुस्तकाचे पान उघडले आणि म्हणाल्या- या पुस्तकात नवऱ्याने आपल्या बायकोशी कसे वागावे, कुटुंबाशी कसे वागावे हे लिहिले असेल तेवढेच मला वाचून दाखवा. डॉ.बाबासाहेब म्हणतात- अगं वेडे, नवऱ्यानं संसार कसा करायचा, हे काही पुस्तकात लिहिलेल नसतं. डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक संकटात रमाई संघर्षरत राहिल्या, हे सर्वश्रुत आहे. त्यांनी आपल्या वैवाहिक जीवनात अत्यंत हालअपेष्टा, दु:ख, गरिबी सोसत त्यांवर मात केली. बाबासाहेबांपर्यंत दु:खाची झळ पोहचू दिली नाही. आपल्या संसारात आदर्श पत्नी, सून, माता या भूमिका त्यांनी अपार कष्टाने पार पाडल्या. कधी तक्रार नाही की कुठे त्याची वाच्यता नाही. अथांग दु:खाचे कधी भांडवल केले नाही. घरातील आर्थिक संकटाचा कोणासही थांगपत्ता लागू दिला नाही. एका मातेसाठी तिचा मुलगा मृत्यू पावणे यासारखे जगात दुसरे दु:ख नाही. त्यांचे तर एकापाठोपाठ तीन मुलगे आणि एक मुलगी औषधपाण्याविना तडफडून दगावले. म्हणूनच माईंच्या त्यागाची थोरवी गाताना कवी यशवंत मनोहर म्हणतात- रमाई मातृत्वाचे महाकाव्यच होय, जीवनाचा तो एक संपूर्ण दु:खाशय होता.
  
   माता रमाई भीमराव आंबेडकर या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत. डॉ.आंबेडकर अनुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात. माता रमाई आंबेडकर यांचा जन्म दि.७ फेब्रुवारी १८९८ रोजी एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकूजी धुत्रे- वलंगकर व आई रुक्मिणी यांच्यासह रमाई दाभोळजवळील वणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ- शंकर अशी चार भावंडे होती. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकूजी दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यं पोहचवत असत. त्यांना छातीचा त्रास होता. रमाई लहान असतानाच त्यांच्या आईचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाईच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकूजी यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले. 

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन घडविण्यात रमाईंचा सिंहाचा वाटा आहे. रमाई म्हणजे बाबासाहेबांची सावलीच होती. त्यांनी आपले जीवन बाबासाहेबांच्या कार्यांप्रती समर्पित केले नसते तर बाबासाहेबांना शून्यातून जग निर्माण करता आले नसते, हे नाकारता येत नाही. मुंबईतील भायखळा मार्केटमधील मासळी बाजार येथे बुधवार दि.४ एप्रिल १९०६ रोजी त्यांचे भीमरावांसोबत लग्न झाले. त्यांच्या जीवनाच्या अनेक हृदयदायक घटना सांगता येतील. एका प्रसंगी बाबासाहेबांच्या सत्कार समारंभात माईंना नेसायला लुगडे नव्हते. तेव्हा त्यांनी बाबासाहेबांचा फेटा लुगडे म्हणून घातला. गरिबीची केवढी मोठी शोकांतिका! पण रमाईंच्या त्यागामुळे आज देशातील लाखो महिलांचे जीवनच बदलून गेले आहे. माई संसारात रमल्या, परंतु भीमराव पुस्तकांत रमले.

    डॉ.बाबासाहेब व माता रमाई राजगृहात राहत असताना बाबासाहेबांना अचानक विदेशात जावे लागत होते. बाबासाहेबांनी धारवाडच्या वराळे या आपल्या मित्राकडे काही दिवसासाठी माईंना पाठविले. वराळे काका लहान मुलांचे वसतिगृह चालवित होते. त्यांच्या आवारात लहान मुले नेहमी खेळायला येत असत. दोन-चार दिवसांत माईंना त्या लहान मुलांचा लळा लागला. दोन दिवस झाले मुले आवारात दिसली नाहीत, म्हणून माईंनी काकांना विचारले. काका म्हणाले की मुले तीन दिवसांपासून उपाशी आहेत. वसतिगृहाला अन्नधान्यासाठी मिळणारे अनुदान अजून मिळालेले नाही. हे सांगताना वराळे काकाचा कंठ दाटून आला. तत्क्षणी रमाईने कपाटातील डब्यातील सोन्याच्या बांगड्या वराळे काकांना दिल्या आणि म्हणाल्या, या बांगड्या विका किंवा गहाण ठेवा, पण मुलांच्या जेवणाची त्वरित सोय करा. यावर बाबासाहेब काय म्हणतील याचा त्यांनी क्षणभरही विचार केला नाही. सोन्याच्या मूल्यापेक्षा त्यांच्या मनातील मुलांप्रती करुणा मौल्यवान ठरली. 

अशिक्षित असूनही बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला साजेशी व स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता माईंत होती. कष्ट, त्याग, संघर्ष, मातृत्व, प्रेम हे सर्व गुण त्यांच्यात असल्यामुळे बाबासाहेबांचे त्यांच्यावर निस्सीम प्रेम होते. माईंच्या त्यागाविषयी डॉ.बाबासाहेब बहिष्कृत भारतमध्ये लिहितात- आपण परदेशी असताना रात्रंदिवस जिने प्रपंचाची काळजी वाहिली व जिला ती अजूनही करावी लागत आहे. मी स्वदेशी परत आल्यावर माझ्या विपन्नावस्थेत गवताचे भारे स्वत:च्या डोक्यावर वाहण्यातही जिने मागेपुढे पाहिले नाही, अशा अत्यंत ममताळू, सुशील व पूज्य स्त्रीच्या सहवासात दिवसाच्या चोवीस तासातून अर्धा तासही मला घालविता येत नाही. बाबासाहेबांनी व्यक्त केलेली ही खंत मन हेलावून टाकते. सन १९४०मध्ये लिहिलेला थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ बाबासाहेबांनी माईंना अर्पण केला आहे. अर्पणपत्रिकेत ते लिहितात- हृदयाचा चांगुलपणा, मनाचा मोठेपणा, चारित्र्याचे शुद्धत्व आणि याशिवाय त्याकाळी कोणी मित्र नसलेल्या दिवसात आमच्या वाट्यास आलेले दारिद्र्य आणि विवंचना मनोधैर्याने व तत्परतेने सहन करण्याची जिने तयारी दर्शाविली त्या रामूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा ग्रंथ मी तिला अर्पण केला आहे.

    विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांच्या जीवनात अत्यंत कठीण काळात रमाईने त्यांना खंबीरपणे साथ दिल्यामुळेच अस्पृश्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेबांना आपल्या कोट्यवधी अस्पृश्य बांधवांचे जीवन फुलविता आले. दि.२७ मे १९३५ रोजी जगन्माता रमाईंचे मुंबई येथे निर्वाण झाले.  
!! माता रमाई व त्यांच्या अपूर्व त्यागाला त्रिवार अभिवादन !!


 - संकलक -
एन. कृष्णकुमार,    ७४१४९८३३३९.
से.नि.अध्यापक. (भारतीय थोरपुरुषांचे जीवनचरित्र अभ्यासक)
गडचिरोली, 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA