राजा ढाले ! फक्त चार अक्षरी नाव ! पण या नावाने गेली चारपाच दशके, किंबहुना त्याहून अधिक काळ महाराष्ट्राच्या समाजजीवनात विधायक स्वरुपाचा हलकल्लोळ माजवला होता. त्यांचे विचार मान्य असोत वा नसोत, त्यांच्या नावाच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये येवोत अथवा न येवोत, त्यांच्या नावाचा लक्षणीय असा दबदबा वैचारिक वातावरणात कायम भरून राहिलेला जाणवत असे. हा दबदबा आता अस्तंगत पावला आहे.
साधारणपणे १९६५ - ६६ पासून महाराष्ट्रात आणि विशेषत: मुंबईत जागोजागी अनेक अँग्री यंग मेन्स् दिसू लागले. हे सारेजण प्रस्थापित व्यवस्थेवर संतापलेले असत. कायम ‘आज मी चिडून आहे’ अशी अवस्था! परिस्थितीच होती तशी! देशाला स्वातंत्र्य मिळून वीस वर्षे होत आली तरी अद्याप ख-या अर्थाने स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता, एकात्मता, न्याय इत्यादी सांविधानिक स्वप्ने सत्यात उतरण्याची लक्षणे दृष्टिपथास पडत नव्हती. बघावे तिकडे उच्चवर्गीय व उच्चवर्णीयच सत्तास्थानी दिसत होते. साहित्यिक-सांस्कृतिक क्षेत्रातही वेगळी स्थिती नव्हती. तिथेही ते आपलीच मूल्यव्यवस्था राबवत होते आणि आपलीच संस्कृती नांदवत होते. हे करताना इतरांना गौण किंबहुना बेदखल ठरवत होते. ही परिस्थिती पार सॅच्युरेशनच्या अवस्थेला पोहोचली होती. परिणामी तिच्याविरुद्ध उद्रेक अटळ होता. या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध सर्वत्रच दबक्या सुरात नाराजी आणि विद्रोह व्यक्त होऊ लागला होता. मुंबईत अनियतकालिकांच्या माध्यमातून या विद्रोहाचा स्फोट झाला. या उठावात अनेकजण आघाडीवर होते. त्यातले एक प्रमुख नाव म्हणजे राजा ढाले !
राजा ढाले यांच्या जीवनाची साहित्यिक, सामाजिक आणि राजकीय वाटचाल ही सरळ आणि प्रामाणिक आहे. तिच्यात सैद्धान्तिक आणि व्यावहारिक या दोन्ही पातळ्यांवरच्या अनाकलनीय कोलांटउड्या नाहीत. उमेदीच्या प्रारंभीच्या काळातला त्यांचा अनियतकालिकांच्या विश्वातला प्रवेश, तिथला झपाटलेला क्रिएटिव्ह वावर, त्यानंतरचा दलित पँथरमधला त्यांचा झंझावाती सहभाग, साधना साप्ताहिकातला त्यांचा वादग्रस्त आणि सनसनाटी लेख, दुर्गा भागवतांबरोबर झालेली वैचारिक चकमक, पँथरच्या फुटीनंतरची मास मुव्हमेंट नावाच्या संघटनेची स्थापना, त्यानंतरच्या काळातले भारिप-बहुजन महासंघातले त्यांचे अध्यक्षपद, हे सारे काही वाजतगाजत राहिले. राजकारणाच्या प्रवाहात उतरलेल्यांच्या अंगाला राजकारणाचे पाणी लागतेच! राजाजी मात्र अगदीच कोरडे राहिले. कमालीचे निष्कलंक राहिले. तत्त्वनिष्ठ, निर्मोही राहिले. अंगभूत चारित्र्याशिवाय हे शक्य नव्हते!
सार्वजनिक जीवनाच्या पदार्पणातच नावाला प्राप्त झालेले वलयांकित स्थान आणि मिळालेली लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी किंवा पदे-पुरस्कार-पारितोषिके असले काही मिळविण्यासाठी त्यांनी कधी कसली तडजोड केली नाही. उलट, फकळपणाच अधिक केला. कुणी काही सवंग, उथळ, बाजारू किंवा तत्त्वाला सोडून केले की त्याची कानउघाडणी केल्याशिवाय त्यांना राहवत नसे. जी गोष्ट कुणीतरी शहाण्या माणसाने करायला हवी असते ती ते कायम करत आले. परंतु अशा गोष्टी बहुतेकांना आवडत नाहीत. त्यामुळेच की काय, त्यांना शत्रू पुष्कळ झाले. या शत्रूंनीच मग त्यांना कधी अनुल्लेखाने मारणे, कधी त्यांच्या भूमिकेचा विपयार्र्स करणे, तर कधी त्यांची टिंगल करणे, अशा मार्गांनी वचपा काढला. परंतु आज ते या जगाचा निरोप घेताना दिसते असे की, या सर्व विरोधाला आणि विपर्यासाला पुरून ते दशांगुळे वर उरले आहेत!
त्यांच्या या पुरून उरण्याला कारण ठरली आहे, बौद्धधम्मप्रणालीच्या स्वीकाराच्या आवश्यकतेसंबंधीची त्यांची द्रष्टी भूमिका! त्यांच्या सामाजिक आयुुष्यातल्या जवळजवळ सर्व घडामोडींच्या, विचारमंथनांच्या, वादविवादांच्या केंद्रस्थानी त्यांची हीच भूमिका राहिली आहे. लॉंग टर्मचा विचार करता, याच भूमिकेत भारतीय समाजाच्या मानसिक आणि सांस्कृतिक अभ्युदयाचे गुपित लपलेले आहे हे स्पष्ट दिसते. परंतु असे असले तरी समाजपरिवर्तनाचा झटपट, तात्काळ विचार करणार्यांना ही भूमिका फारशी अपील होऊ शकली नाही. धर्म ही अफूची गोळी, या प्रचाराला बळी पडलेल्यांनाही त्यांची ही भूमिका आवडली नाही. सुरुवातीला (म्हणजे लघुअनियतकालिकांच्या काळात) त्यांच्याशी असहमत असणार्या अथवा असहमत होऊ शकणाऱ्या मंडळींचाच त्यांच्या अवतीभवती मोठा गराडा असे. त्यामुळे तिथून त्यांच्या विचाराला भक्कम अनुमोदन मिळू शकले नाही. परिणामी, क्रमाने ते अल्पमतात गेले आणि बाजूला पडले.
याच दरम्यान दलित पँथरचे वादळ घोंघावायला सुरुवात झाली. या काळातही त्यांनी आपली भूमिका सोडली नाही. नामदेव ढसाळ हे मार्क्सकडे झुकलेले आंबेडकरवादी, तर राजा ढाले बुद्धाकडे झुकलेले आंबेडकरवादी ! खरेतर, दोघांमध्ये जेवढा झाला तेवढा कडवा संघर्ष उभा राहण्याचे काही कारण नव्हते. कारण बेसिकली दोघेही कट्टर आंबेडकरवादीच होते. परंतु शेवटी, जे व्हायला नको होते ते झाले! दोन प्रतिभावंत परस्परांपासून वेगळे झाले! नुकसान मात्र आंबेडकरी चळवळीचे झाले! या वादात आता पडण्याचे किंवा नव्याने हा वाद उपस्थित करण्याचे काहीच कारण नाही. परंतु तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे, हा वाद दोन माणसांमधला नव्हता, तर तो एक वैचारिक वाद होता. आजही हा वाद ठिकठिकाणच्या वैचारिक कट्ट्यांवर रंगत असतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत मला या वादात नामदेव ढसाळ बरोबर होते, असे वाटत असे. आता मात्र राहून राहून वाटते की, राजा ढालेच अधिक बरोबर होते!
भारतातले शोषण हे औद्योगिक विश्वात असते तसे साधे-सरळ शोषण नाही. ते विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण शोषण आहे. त्याला धर्माचे अधिष्ठान आहे. परंतु एवढेच नाही. या अधिष्ठानाला पावित्र्यसुद्धा आहे आणि ‘हे अधिष्ठान हाच माझा धर्म’ असे केवळ शोषकच नव्हे, तर खुद्द शोषितच म्हणतो आहे. म्हणूनच पावित्र्य बहाल केले गेलेले हे अधिष्ठान नष्ट करणे, हा परिवर्तनाचा मुख्य कार्यक्रम असणार आहे की नाही, शोषणाचा-अन्यायाचा उघड पुरस्कार करणार्या हिंदू धर्मरुपी अधिष्ठानाला नकार देणे आणि समतेची-न्यायाची दीक्षा देणार्या बौद्ध धम्माचा स्वीकार करणे, हा परिवर्तनाचा प्रमुख अजेंडा आपण करणार आहोत की नाही, असे अनेक प्रश्न बाबासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित केले होते. तोच वारसा आणि वसा पुढे चालवावा हा ढाले यांचा पवित्रा होता, जो अगदी योग्य होता. त्यामुळेच शोषितांच्या लढाईत धम्मस्वीकाराचा मुद्दा मध्यवर्ती स्थानी आणण्यास ते उत्सुक होते. धर्मांतराशिवाय शोषितांना खर्या अर्थाने मुक्तीचा श्वास घेता येणार नाही, हे जे बाबासाहेबांनी नीट ओळखले होते त्याचे यथायोग्य आकलन ढालेंना झालेले होते. ‘शोषित’ ही संकल्पना काहीशी फसवी म्हणावी लागेल. शोषितांमध्ये नव्वद टक्के दलित-आदिवासी-ओबीसी-भटकेविमुक्तच कसे काय आढळतात? या मंडळींना ‘शोषित’ या संकल्पनेमध्ये हे जे नव्वद टक्के आरक्षण न मागता प्राप्त झाले आहे, ते फक्त आणि फक्त हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानामुळेच, हे उघड आहे. त्यामुळे अशा अन्याय्य धर्मव्यवस्थेपासून या लोकांना बाजूला केल्याशिवाय त्यांचे शोषण थांबणार नाही, हे स्पष्ट आहे. राजा ढालेंना हे सारे कळत होते. नामदेव ढसाळांनाही हे समजत होते! प्रश्न भूमिका घेण्याचा होता. ढालेंनी ती घेतली. कथित व्यापकता ढळण्याच्या भीतीपोटी ढसाळांनी ती घेतली नसावी.
या ठिकाणी मला हे आवर्जून सांगितले पाहिजे की, एकेकाळी नामदेव ढसाळ हे माझे हिरो होते. किंबहुना, नामदेव ही मा या आणि मा यासारख्या तरुणांसमोरची प्रेरक दंतकथा होती. त्यांच्या कविता आणि बाकी अनेक गोष्टी अंगावर अक्षरश: शहारे आणत आणि रक्त उसळवत. ढसाळांवर बेसुमार प्रेम करणार्यांची संख्या कमी नव्हती. जातीधर्माचे कप्पे बेदरकारपणे धुडकावून नामदेवरावांची कविता हृदयाचा ठाव घेत असे. मी स्वत: त्यांच्या काव्यावर बेङ्गाम प्रेम केले. परंतु माणूस क्रमाक्रमाने स्वप्नातून सत्यात येेतोच! सत्यात आल्यावर समजते की, रोमँटिसिझम काही प्रमाणात आवश्यक असला तरी तो अनुषंगिक प्रमाणातच असलेला बरा! चळवळीच्या पायाभूत आणि गाभ्याच्या गोष्टी म्हणजे तर्कशुद्ध भूमिका आणि साध्यसाधनशुचिता! या गोष्टीच चळवळीला तिच्या उद्दिष्टाप्रत नीट नेऊ शकतात आणि नेतातही! राजा ढालेंपाशी या गोष्टी होत्या. त्यांना यश किती मिळाले हा चर्चेचा मुद्दा असला तरी चळवळीला फार फार आवश्यक असलेल्या वर उल्लेख केलेल्या गोष्टी त्यांनी निष्ठेने जपून ठेवल्या आणि नव्या पिढीकडे हस्तांतरीत केल्या, हेच त्यांचे महत्त्वाचे कार्यकर्तृत्त्व मानायला हवे! यासंदर्भात एकच उदाहरण द्यायचे तर, त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक संपादित केलेल्या ‘धम्मलिपी’ चे जुने अंक काढून पाहिल्यास (ज्यांना आजही मागणी आहे) ढालेंनी किती मोठे काम करून ठेवलेले आहे, याची साक्ष पटल्याशिवाय राहत नाही.
ढाले व्हर्सेस ढसाळ हा वाद आता इतिहासजमा झालाय. परंतु त्यात शिकण्यासारखा एक धडा आहे. कार्ल मार्क्स हा फार मोठा विचारवंत असला, समाजपरिवर्तनाची शास्त्रशुद्ध मेथडॉलॉजी तो देत असला, त्यातून घेण्यासारखे बरेच काही असले, तरी अंतिमत: बुद्धाचा विचारच प्रमाण मानला पाहिजे, हा तो धडा! ढाले आणि ढसाळ या दोघांच्याही जन्मापूर्वी कित्येक वर्षे अगोदर खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी हाच धडा घेतला होता. आंबेडकर काही मार्क्सचे शत्रू नव्हते. मार्क्सच्या विचारांचा जितका सूक्ष्म अभ्यास त्यांनी केला होता तितका एखाद्या जीवनदायी कार्डहोल्डर कम्युनिस्टानेही केलेला नसेल. युरोपात मार्क्स निधन पावल्यानंतर आठ वर्षांनी इकडे भारतात आंबेडकरांचा जन्म झाला. आंबेडकरांनी वाचायला सुरुवात केली त्यावेळी मार्क्सचे साहित्य जगात सगळीकडे पोचले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या अभ्यासाच्या टेबलावर मार्क्स उपलब्ध झाला होता. बाबासाहेब अनेक विचारवंतांचे साहित्य जसे वाचत होते तसे मार्क्सचेही वाचत होते. विशेष म्हणजे, मार्क्स त्यांना इतर विचारवंतांपेक्षा जवळचाही वाटू लागला होता. सर्वहारा, शोषित, दलित, पीडित वर्गाची बाजू घेणारा मार्क्स आंबेडकरांना अप्रिय किंवा परका कसा वाटू शकेल? स्वाभाविकच, बाबासाहेबांवर इतर विद्वानांचा प्रभाव पडला तसा मार्क्सचाही प्रभाव पडला. परंतु या प्रभावाचीही एक मर्यादा होती! बाबासाहेब जसे इतर कुठल्याच विद्वानाच्या आहारी गेले नाहीत तसे मार्क्सच्याही आहारी गेले नाहीत! वाचनात आलेल्या सर्व देशी-विदेशी विचारवंतांच्या मांडणीचे त्यांनी सम्यक आकलन करून घेतले आणि त्यातून आपली स्वतंत्र वाट चोखाळत राहिले. कुठलाही अभ्यासू आणि स्वयंप्रज्ञ नेता असेच करेल आणि असेच करतो! तो सर्वांचे वाचतो मात्र आपले स्वतंत्र स्थान आणि स्वतंत्र वैशिष्ट्य निर्माण करतो! तो भूतकाळातही रमत नाही आणि विशिष्ट विचारात अडकतही नाही ! आपल्यासमोर काय समाजस्थिती आहे आणि या समाजाच्या उत्थानासाठी काय योग्य आहे, एवढेच तो पाहतो आणि त्यादृष्टीनेच विचारमंथन व कृती करतो. बाबासाहेबांनी असेच केले. त्यामुळे त्यांना मार्क्सच्या विरोधात उभे करणे योग्य नव्हे! मार्क्सच्या काही गोष्टी, उदा. कामगार सत्तेत आल्यानंतर कामगारांची हुकूमशाही किंवा प्रसंगी हिंसेचा अवलंब, यासारख्या गोष्टी बाबासाहेबांना पटण्यासारख्या नव्हत्या. परंतु म्हणून मार्क्सशी हुज्जत घालत बसण्यात अर्थ नव्हता. तेवढा वेळही त्यांच्याकडे नव्हता. कुठलाही सूज्ञ माणूस समोर जे उपलब्ध आहे त्यातले काही घेण्यासारखे असेल ते घेऊन बाकीचे सोडून देतो आणि आपला मार्ग धरतो. बाबासाहेबही सूज्ञ होते. म्हणूनच त्यांचा मार्ग हा मार्क्सच्या मार्गापेक्षा वेगळा आणि विधायक ठरला. अधिक सनदशीर आणि सुसंस्कृत ठरला. अधिक लोकशाहीवादी आणि मानवी ठरला. परंतु म्हणून त्यांनी स्वत:च्या विचारविश्वातून मार्क्सला अगदीच हद्दपार केले, असे म्हणता येणार नाही. आणि मुळात बासनात गुंडाळून ठेवावा वा फेकून द्यावा, इतका मार्क्स निरुपयोगी नक्कीच नव्हता. शोषणाविरुद्धची प्रचंड चीड त्याच्या मनात खदखदत होती आणि समतेची महाप्रचंड तहान त्याला लागली होती. फुले-आंबेडकरांच्या समताधिष्ठित समाजरचनेच्या भव्य स्वप्नाशी इतक्या मोठ्या प्रमाणात समविचारी असलेल्या मार्क्सविषयी त्यामुळेच कृतज्ञ मृदुभाव बाळगणे आवश्यक ठरते.
या गोष्टी राजा ढाले यांना ठाऊक नसणार अशातला भाग नाही. परंतु तरी त्यांचा कम्युनिस्टविरोध सतत प्रकाशझोतात येत राहिला आणि टीकेचा धनी बनला. वास्तविक, ढाले यांच्या मार्क्सवरच्या टीकेचा एकूण सूर पाहता स्वत: मार्क्स हा त्यांना शत्रूवत वाटतो आहे, असे दिसत नाही. इथले कम्युुनिस्ट, त्यांचे एकूण वर्तन, विशेषत: धर्म, संस्कृती, वैदिकत्त्वाबद्दलची त्यांची छुपी प्रीती, त्यांनी वेळोवेळी आंबेडकरी चळवळीच्या विरुद्ध घेतलेल्या लबाड (खरे म्हणजे जातीयवादी) भूमिका, यासारख्या अनेक कारणांमुळे सातत्याने कम्युुनिस्टांवर बरसत राहणे त्यांना भाग पडले, असेच आढळते. हे सारेजण तोंडाने मार्क्सचे नाव घेत असत, मात्र गळ्यात जानवं घालायला विसरत नसत! त्यामुळे त्यांच्यावर वैचारिक वार करताना रागाच्या भरात ढालेंचा एखाद्दुसरा फटका बिचाऱ्या मार्क्सलाही लागला असेल, नाही असे नाही! परंतु म्हणून मार्क्स हा त्यांचा दुश्मन नव्हे! त्याचे नाव घेऊन भलताच व्यवहार करणारे हे त्यांच्या रागाचे विषय होते.
दलित पँथरच्या माध्यमातून एका समाजशक्तीने चित्त्यासारखी उसळी घेतली होती. फुले-आंबेडकरवाद हा या शक्तीचा मुख्य वैचारिक आधार होता. हा फुले-आंबेडकरवाद पुढे न्यायचा असेल तर त्यांनी सांगून ठेवलेल्या गोष्टी नव्या संघटनेच्या उद्दिष्टांमध्ये प्रतिबिंबित आणि आविष्कारीत होणे ढाले यांना अपेक्षित होते. यात बौद्ध धम्माचा स्वीकार हा मुद्दा अपरिहार्यपणे अंतर्भूत होत होता. मात्र हाच मुद्दा संघटनावाढीच्या आड येऊ शकतो, असे इतरांचे मत होते. याच मुद्यावर ठिणगी उडाली आणि संघटना बुडायला लागली. धर्म हा विषयच मधे येऊ न देता संघटन वाढवावे, हा दृष्टिकोन संघटनकर्त्यांना कितीही व्यापक वाटला तरी इतरांना तसे वाटेलच असे नाही. ज्यांना आपण संघटनेत सहभागी करून घ्यायचे म्हणतो ते तर ‘ही संघटना कुणाची, त्याची जात कोणती, तो आपल्यापेक्षा खालचा की वरचा’, याच गोष्टी मनोमन तपासत असतात आणि त्यानुसार निर्णय घेत असतात! मागच्या पाचसहा वर्षांआधीच्या काळात (म्हणजे प्रतिमा उजळ असतानाच्या काळात) रामदास आठवले यांनी अक्षरश: असंख्य वेळा ‘मा या पक्षात अन्य जातीधर्माचे साठ टक्के पदाधिकारी घेणार’ असे जाहीर केले होते. या साठ टक्के जागा भरल्या गेल्यात, असे चित्र मात्र कधीच दिसले नाही. यात आठवलेंचा दोष नाही! दोष आहे त्यांच्या जातीचा! ते भले दलितेतरांना त्यांच्या पक्षात घ्यायला तयार असतील पण कुणी त्यांच्याकडे यायला तर हवे ना? परिवर्तनाचा विचार जपणार्या आणि रात्रंदिवस माणसांमध्ये असलेल्या आठवले, प्रकाश आंबेडकर इत्यादींकडे ओपन समाजातली माणसं आपुलकीने पाहत नाहीत, हे कशाचे लक्षण आहे? हे द्योतक आहे, सवर्णांच्या मनात वसत असलेल्या चिवट अशा जातीयवादाचे ! हा जातीयवाद जोपर्यंत लयाला जात नाही तोपर्यंत फार व्यापक भूमिका घेण्यात अर्थ नसतो. शब्द व्यापक वापरले म्हणून व्यवहार व्यापक होत नाही. व्यवहारात लोकांची जातीग्रस्त मानसिकता हाच मुख्य अडथळा असतो!
हा चिवट जातीयवाद जन्माने पदरात पडलेल्या जातीच्या आयडेंटिटीतून येतो आणि मग पुढे आयुुष्यभर त्याच्या मेंदूवर स्वार होऊन राहतो. अशा तर्हेने, जातीयवादाचा उगम जातीच्या ओळखीतून, आयडेंटिटीतून पिढ्यान्पिढ्या होत आलेला आहे. म्हणून जातीयवाद संपुष्टात आणायचा असेल तर मुळात जातीच्या आयडेंटिटीचे विसर्जन करणे अनिवार्य ठरते. मी जातपात मानत नाही, असे केवळ म्हणून चालत नाही. ‘मनातून जात गेली पाहिजे’ या लोकप्रिय आणि टाळ्या घेणार्या वाक्याचा अर्थ मला तरी अजून कळलेला नाही! अशी विधानं करणारे अनेक लोक मला ठाऊक आहेत, जे जात, धर्म, संस्कृती, राखीव जागा इत्यादी संवेदनशील विषयावरील चर्चा अटीतटीला आली की कशी आपापल्या जातीच्या ममत्त्वाने उचंबळून येतात! जातीचा फक्त शाब्दिक राजीनामा देऊन जात जात नाही. मुख्यमंत्र्याने राजीनामा दिला तरी जोपर्यंत नवा मुख्यमंत्री नेमला-निवडला जात नाही, शपथविधी करून कार्यभार स्वीकारत नाही, तोपर्यंत राजीनामा दिलेल्या जुन्या मुख्यमंत्र्यालाच राज्यकारभार करावा लागतो, तसे हे आहे. माणसाची सांस्कृतिक आयडेंटिटी ही मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसारखी असते. ती कधीही रिकामी (व्हेकेंट) राहत नाही. तिथे काहीतरी लागतेच! नवी आली की मगच जुनी तिथून काढता पाय घेते! अन्यथा जुनीच तिथे रेंगाळते आणि काही काम असेल तर तीच ऍक्टिव्हेट होते! म्हणून नुसता जातीचा धिक्कार करून भागत नाही, तर जातीच्या आयडेंटिटीच्या जागेवर नव्या आयडेंटिटीची अपॉईंटमेंट करावी लागते. ही नवी अपॉईंटमेंट करताना एक सर्वोत्कृष्ट पर्याय म्हणून बौद्ध धम्म उपलब्ध आहे. तो स्वीकारण्यासंबंधी सकारात्मक निर्णय केला की पुढचा मार्ग सुकर होतो. एकदा माणसं बौद्ध झाली की मग त्यांच्या मागच्या सर्व ओळखी बौद्धधम्मरूपी समुद्रात विसर्जित होतात आणि ते समुद्राच्या नावाने ओळखायला लागतात! जातीअंताचा हा सर्वात चांगला, किंबहुना एकमेव मार्ग आहे. बाबासाहेबांनी उगाच नाही आकाशपाताळ एक करून तो स्वीकारला!
प्रारंभीच्या काळात राजा ढाले ज्यांच्या सोबतीने धडपडत होते त्या नेमाडे-चित्रे-कोलटकर-ढसाळ-ओक-शहाणे इत्यादींच्या व्यापक म्हणविल्या जाणाऱ्या वर्तुळात नुसतीच रोमँटिक चर्चा चालू असे. विद्रोही कविता कराव्यात-वाचाव्यात, प्रस्थापितविरोधी सूर असणार्या कथा-कादंबर्या लिहाव्यात, विविध प्रकारची रंग-रेखा-अर्क-चित्रं काढावीत, अनियतकालिकं प्रकाशित करावीत, फारच वैताग आला की व्यवस्था उलथून टाकण्याची भाषा बोलावी, असे अनेक उद्योग त्यात उत्साहाने चालत. हे सारे करण्याने वातावरणनिर्मिती जरूर होते, पण पुढे काय, हा प्रश्न उरतोच! प्रत्यक्ष परिवर्तनाचा कृतिकार्यक्रम कोणता, हा प्रश्न ठायी ठायी आ वासून समोर येऊन उभा राहतो. अशा अतिशय निर्णायक वेळी राजा ढाले धर्माचा आणि संस्कृतीचा अत्यंत मूलभूत मुद्दा घेऊन उभे राहू पाहात होते. भारतीय समाजाच्या समग्र परिवर्तनातला सर्वात कळीचा प्रश्न धर्म हाच होता. आणि याच प्रश्नाला राजाजी भिडू इच्छित होते. खरेतर, त्यापूर्वीच बाबासाहेब आंबेडकर या प्रश्नाला भिडलेले होते आणि दीर्घ-चौफेर-सर्वंकष-मूलगामी विचारमंथनातून त्यांनी या प्रश्नाचे ‘धर्मांतर’ हे सर्वांगसुंदर आणि समर्पक उत्तर शोधून काढलेले होते. ही घटना राजा ढालेंच्या उदयाच्या दहा-पंधरा वर्षे आधीच घडून गेली होती. म्हणजे पुरेशी ताजी होती. त्यामुळे तोच धागा पुढे नेण्याची आवश्यकता होती. नेमाडेंसारख्या मोठ्या लेखकाला जेव्हा ‘धर्मांतर करावेसे वाटले तर कोणता धर्म स्वीकाराल’ असा एका मुलाखतीत थेट प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनीही विनाविलंब ‘बौद्ध’ हेच उत्तर दिले होते. म्हणजे त्यांच्यासारख्या समाज-संस्कृतीचा व्यासंग करणार्यांनाही बौद्ध धम्म हेच सर्वोत्तम ‘देशी संचित’ वाटत होते. त्यामुळे ढालेंचा मुद्दा मुळीच चुकीचा नव्हता! गरज होती हाच मुद्दा प्रमुख करण्याची आणि त्याभोवती चळवळ केंद्रित करण्याची! बाबासाहेबांचे तेच तर मुख्य स्वप्न होते!
राजा ढाले यांनी समाजाला काय दिले, असा प्रश्न विचारण्यात आला तर त्याला आशयपूर्ण उत्तर देता येेते. बुद्धिझम भारतभर करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न त्यांनी सतत जिवंत ठेवले आणि त्यासाठी अत्यंत गरजेची असलेली परंतु दुर्मिळ मानली गेलेली तत्त्वनिष्ठा अखंडपणे तेवत ठेवली, हे ते उत्तर होय! जो विचार पटला तोच विचार कसल्याही तडजोडीशिवाय आयुष्यभर निर्भीडपणे मांडत राहणे, ही साधीसोपी गोष्ट नाही! बहुमताच्या विरुद्ध बोलण्यालाही अपरिमित धाडस लागते. त्यात अल्पमतात येण्याचा, बहिष्कृत ठरण्याचा, एकाकी पडण्याचा, नष्ट होण्याचा धोका असतो. हा धोका त्यांनी पत्करला. त्याची पुरेपूर किंमतही मोजली, परंतु हार मानली नाही. उलट, आज अशी वेळ आली आहे की, त्यांच्याच विचारांची कास धरण्याशिवाय, ज्यांना खरोखरच काही परिवर्तन करावयाचे आहे, त्यांना गत्यंतर नाही, अशी परिस्थिती आहे. हनुमंत उपरे आणि त्यांच्या ओबीसी सहकार्यांनी ज्यावेळी बौद्ध धम्माच्या वाटेवर येण्याची घोषणा केली त्यावेळी त्यांचे मन:पूर्वक स्वागत आणि अभिनंदन करण्यासाठी तमाम आंबेडकरी नेत्या-कार्यकर्त्यांनी धाव घेतली. हेच तर राजा ढाले केव्हापासून सांगत होते! हेच घडवून आणण्यासाठी ते पहिल्यापासून प्रयत्नरत होते.
राजा ढाले यांच्या काळात अनेक लेखक, कवी, विचारवंत उदयाला आले. नंतरही असंख्य आले. त्यापैकी अनेकजण आज चांगलेच नावारूपाला आलेले आपण पाहतो, वाचतो, ऐकतो. त्यापैकी अनेकांनी नाव मिळवले, पैसा, प्रतिष्ठा कमावली. परंतु भूमिका घेण्यात बहुतेकांनी कच खाल्ली! तडजोडी करत, भूमिका पातळ बनवत, वैचारिक दबावांपुढे झुकत, फुले-आंबेडकरी विचारांशी बेमालूमपणे फारकत घेत ते स्वत:चे करीअर सजवत राहिले! राजा ढाले यांनी यापैकी काहीही केले नाही! इथेच ते इतरांपेक्षा कितीतरी सरस ठरले! एखादा राजा असतो तसा ‘राजा’ ठरले! बुद्ध-फुले-आंबेडकरी चळवळींच्या अवकाशात आणि एकूणच पुरोगामी विचारविश्वात राजा ढाले यांचे स्थान आकाशातील त्या ध्रुवता-यासारखे अढळ आहे. अगदी स्वयंभू, स्वयंप्रज्ञ आणि स्वयंप्रकाशित! ते आता शरीराने नसले म्हणून काय झाले? त्यांचा विचार, त्यांची तत्त्वनिष्ठा आता त्या ध्रुवता-याची भूमिका बजावत राहील, हे नक्की!
संदीप सारंग मो - ९७७३२८९५९९
0 टिप्पण्या