Top Post Ad

अण्णांचे स्वप्न असलेले रयत शिक्षण संस्थेचे विद्यापीठ लवकर साकारणार- शरद पवार


सातारा :  कर्मवीर अण्णांनी शिक्षणाचे काम हाती घेऊन त्यात आपले आयुष्य झोकून दिले. सर्वसामान्यांच्या मुलांना भविष्यात यशप्राप्तीसाठी प्रोत्साहित करायचे असेल तर ज्ञानाचा आधार घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. कर्मवीर अण्णांनी शिक्षणाचे काम हाती घेतले आणि आपले सर्वस्व त्यांनी झोकून दिले. अण्णांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात झाले आणि त्याला खत देण्याचे काम समाजातून झाले असून अण्णांचे स्वप्न असलेले रयत शिक्षण संस्थेचे विद्यापीठ लवकर साकारणार आहे, ही ज्ञानप्राप्तीची संधी त्याकाळी सर्वांना मिळत नसे. ही संधी देणे आपली जबाबदारी आहे,  असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी  सातारा येथे केले.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ९ मे रोजी 63 वा पुण्यतिथी कार्यक्रम त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.  या कार्यक्रमाचे औचित्य साधून दानशूर व्यक्तींचा सन्मान, तसेच गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.त्याचबरोबर संस्थेतील उत्कृष्ट शाखांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी खासदार शरद पवार बोलत होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ.अनिल पाटील, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल चे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सचिव विठ्ठल शिवणकर, सातार्‍याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्य मंत्री विश्वजित कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार आशुतोष काळे, आमदार शशिकांत शिंदे, संस्थेचे सहसचिव संजय नागपुरे, ऑडिटर शिवलिंग मेनकुदळे, तसेच जनरल बॉडी सदस्य अरूणशेठ भगत, पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर, पी.जे.पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, पदाधिकारी आणि रयत सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवार पुढे म्हणाले की, इस्माईलसाहेब मुल्ला यांनी संस्थेसाठी, अण्णांसाठी आयुष्य दिले. अशांचे स्मरण संस्थेने केले आणि आपल्या सहकाऱ्यांचा सन्मान करण्याची कल्पना आपण पुढे आणली. मागील दोन वर्षांपासून ९ मे रोजी आपण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त एकत्र जमू शकलो नाही. दोन वर्षांत अनेक पुरस्कार द्यायचे राहून गेले होते, ते आज देण्यात आले, मला आनंद आहे की, रयत शिक्षण संस्था मातृसंस्था मानून सदैव रयतेच्या विकासासाठी कार्य करणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेला यावर्षी 01 कोटी 95 लाख रुपयांची देणगी, शकुंतला रामशेठ ठाकूर यांनी 01 कोटी 30 लाख रुपये, तर पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी 59 लाख 90 हजार रुपयांची भरघोस देणगी रयत शिक्षण संस्थेला दिली. 

त्यांच्यासोबत राज्याच्या गृहमंत्र्यांचा सन्मान आपण इथे केला. गेली अनेक वर्षे त्यांचाही संस्थेच्या कामात त्यांचा हातभार असतो. विविध क्षेत्रांमध्ये त्यांचे योगदान आहे. ते योगदान आणि संस्थेबद्दलचे त्यांचे योगदान या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊनच ही निवड करण्यात आली. आजच्या कार्यक्रमात एका गोष्टीची मला अस्वस्थता वाटते. इतके वर्ष ९ मे चा कार्यक्रम आणि एन. डी. पाटील हजर नाहीत, असे कधी झाले नाही. गणपतराव देशमुख, शंकरराव कोल्हे नाहीत. त्यांनी अण्णांसाठी पडेल ते कष्ट घेण्याची तयारी ठेवली. म्हणूनच आजचा दिवस आपण पहात आहोत. 

अण्णांचे स्वप्न असलेले रयत शिक्षण संस्थेचे विद्यापीठ लवकर साकारणार आहे, ही ज्ञानप्राप्तीची संधी त्याकाळी सर्वांना मिळत नसे. ही संधी देणे आपली जबाबदारी आहे,  हे सूत्र अण्णांनी आपल्या अंतःकरणामध्ये ठेवले आणि घरादाराचा यत्किंचितही विचार न करता अखंड आयुष्य ज्ञानदानासाठी त्यांनी खर्ची घातले. त्याचाच परिणाम आज ही संस्था देशातील महत्त्वाची संस्था झाली आहे. 

राज्यात आणि राज्याबाहेर ७४९ शाखा, चार लाख ४६ हजार विद्यार्थी आणि १५ हजार शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी एवढा मोठा रयतेचा संसार आज उभा राहिलेला आहे. अण्णांनी जे रोपटे लावले, त्याचे खऱ्या अर्थाने वटवृक्षात रूपांतर झाले. सेंद्रीय खत असेल किंवा अन्य खत असेल त्याची जबाबदारी तुम्ही सर्वांनी घेतल्यामुळेच या वृक्षाची वाढ निरोगीपणाने झाली. त्याची फळे आज आपण महाराष्ट्रात पाहतो आहोत. आपण नवनवीन काही कार्यक्रम हाती घेतो. त्याच्या अंमलबजवाणीसाठी अनेक दानशूर लोक पुढे येतात. त्यांचे अर्थसहाय्य आपल्याला होते. यंदाच्या वर्षी अण्णांच्या इच्छेप्रमाणे संस्थेचे स्वतःचे विद्यापीठ काढावे. 

विद्यापीठासाठी केंद्र आणि राज्य सरकारची परवानगी मिळाली आहे. मा. राज्यपालांकडून काही बाबींची पूर्तता झाल्यानंतर येत्या जूनपासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे आपण याठिकाणी सुरु करू शकू, याबद्दलची खात्री मला वाटते. देशातील विविध औद्योगिक संस्थांशी संपर्क साधण्याचा रयत प्रयत्न करत असते. एका फ्रेंच कंपनीचा उल्लेख याठिकाणी केला गेला, या संस्थेमध्ये एक लाखापेक्षा अधिक लोक काम करतात. या कंपनीचे मुख्यालय पुण्यात हिंजवडी येथे आहे. 

त्यांच्याशी आपण रयतेचा संपर्क जोडून दिला. इथल्या शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्या कंपनीचे लोक इथे येतील, मार्गदर्शन करतील. त्या माध्यमातून जे विद्यार्थी शिकतील त्यातील जवळपास एक लाख विद्यार्थ्यांना सेवेमध्ये घेण्याचा करार करण्यात आला आहे. विचार करा, जर एक लाख मुला-मुलींना आपण रोजगाराची, नोकरीची खात्री देत असू तर केवढं प्रचंड काम आपण करत आहोत. हेच काम अखंडपणे आपल्याला करायचे आहे. आज आपण याठिकाणी अनेकांचा सत्कार केला. राहीबाई पोपेरेंचा माझ्याकडून आज दुसऱ्यांदा सत्कार होत आहे. सेंद्रीय शेतीबद्दलचा एक आदर्श जनमानसामध्ये पोहचवण्याचं काम त्या करत आहेत. शिक्षणाची संधी न मिळालेली व्यक्ती शेतकऱ्यांचे जीवन बदलण्याच्या दृष्टीने काही काम करते, याचे उत्तम चित्र राहीबाईंच्या कामाच्या रूपाने आपल्याला दिसते. 

एक काळ असा होता की आम्ही लोक सत्तेमध्ये नव्हतो. त्या काळात संस्थेचे कोणतेही काम असेल तेव्हा मंत्रालयात जाऊन तो प्रश्न सोडवून घेण्यासाठी एन. डी. पाटील यांनी उभं आयुष्य काम केलं. अण्णांचा आवडता विद्यार्थी म्हणून संबंध आयुष्य त्यांनी संस्थेसाठी दिलं. गणपतराव देशमुख यांनी सार्वजनिक जीवनात, महाराष्ट्राच्या विधानसभेत अनेक वर्ष सामान्य माणसाचे दुःख मांडण्याचे काम केले. तसेच या संस्थेशी देखील बांधिलकी ठेवली, त्यांचेही आज स्मरण होत आहे. 

शंकरराव कोल्हे, शंकरराव काळे, पी. बी. कडू असतील या सगळ्यांनी अण्णांचा विचार गावोगाव पोहचवण्यासाठी कष्ट घेतले. या तिघांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून दोन वर्षांची भरपाई आपण केली, याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करत पवार यांनी आपले भाषण संपवले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com