Top Post Ad

डॉ.आंबेडकर आणि पंढरीचा पांडुरंग -- राजा ढाले

'


चार हातांचा मिशीवाला विठोबा! अशा अभिनव शीर्षकाचा विठ्ठल' या महाराष्ट्राच्या दैवतावरील एक लेख  वाचण्यात आला. आषाढी वारीच्या पर्वावर वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेल्या आणि एका जगावेगळ्या विठ्ठलरूपाची ओळख करून देणाऱ्या या लेखाचा लेखक म्हणतो: ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली त्या नेवाश्यापासून अवघ्या बारा मैलांवर एक छोटेखानी गाव आहे, टाकळीभान नावाचे. या गावात एक साधेसुधे विठ्ठल मंदिर आहे. पण यातील मूर्ती थेट यादवकाळाशी नाते सांगणारी. विठ्ठल या देवतेच्या उगमाचा शोध घेणारी... जगभरातल्या (?) इतर मूर्तीपेक्षा संपूर्णत: वेगळी.

या वेधक सुरुवातीनंतर, या लेखाच्या समारोपाकडे वळताना हा चिंतनमग्न लेखक आवर्जून म्हणतो; विठ्ठल या दैवताचा उगम अद्यापही सापडलेला नाही. त्याच्या पंढरपूरनिवासाआधी तो कसा उत्क्रांत झाला त्याचा शोध अद्यापही संपलेला नाही. त्यामुळेच विठ्ठलाचा अभ्यास करणारे अनेक देशी-विदेशी संशोधक या मूर्तीचा अभ्यास करताहेत. कदाचित या अभ्यासातून विठ्ठलाच्या या रूपाचे कोडे उलगडू शकेल. लेखकाचे हे म्हणणे अत्यंत चिंत्य आहे.

एक तर तो या लेखात, ही विठ्ठलमूर्ती वेळोवेळी 'उत्क्रांत' होत आल्याचे उघडपणे मान्य करतो. आणि आपल्या लेखात शेवटी तो, 'या अभ्यासातून विठ्ठलाच्या या रूपाचे कोडे उलगडू शकेल' असा प्रबळ आशावाद व्यक्त करतो. विठ्ठलमूर्तीच्या वेळोवेळी उत्क्रांत होत जाणाऱ्या रूपाचा वेध घेताना, नेवाश्याजवळच्या टाकळीभान गावी, लेखकाला आढळलेल्या तिथल्या विठ्ठल मंदिरातील मूर्तीचे विश्लेषण करताना तो म्हणतो: 'चार हात आणि मिशीवाला हा विठोबा म्हणजे विठ्ठलाचे विष्णुरूपात घडणारे दर्शन’ होय. साहजिकच त्याला त्या वेळी आपल्या संतसाहित्यातून वावरणाऱ्या 'मानवी' विठ्ठलरूपाची सय होते; आणि तो विचारतो:

नाम्याची खीर खाणारा, चोखोबाची गुरे राखणारा, जनाईचे दळणकांडण करणारा आणि कोट्यवधी वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेला विठोबा सर्वत्र दोन हातांच्या मानवी रूपात दर्शन देतो. पण इथेच असा परमेश्वररूपात का बरं उभा आहे? या घोळातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधणारा तो मग  स्वतःच उतरत्तोः याचे संशोधन फक्त विठ्ठलाच्याच नाही, तर महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रकाश टाकेल, कारण शेवटी दगडातला देव त्याला घडविणाऱ्या माणसांची गोष्ट सांगतो हे विसरता येत नाही. म्हणूनच मला वाटते की, महाराष्ट्राच्या निखळ इतिहासावर प्रकाश • टाकण्याच्या दृष्टीने याविषयी अधिक खल होणे आज नितांत आवश्यक आहे. 

आजमितीला शंभर वर्षांनी जुन्या असलेल्या 'भारत इतिहास संशोधक मंडळ' या पुण्यातील संस्थेत; आजपासून तब्बल पंचावत्र वर्षांपूर्वी, म्हणजेच इ.स.१९५५मध्ये 'पंढरीचा विठ्ठल कोण होता?' या विषयी विद्वानांत वाद रंगला होता. त्याच दरम्यान, पुण्याजवळच्या देहू रोडच्या परिसरात उभ्या राहत असलेल्या आधुनिक भारतातील पहिल्या बुद्धविहाराचे उद्घाटन करताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भाषणात, या वादाला जाता जाता स्पर्श केला होता. दिनांक २५ डिसेंबर १९५५ रोजी दिलेल्या या देहू रोडच्या त्यांच्या भाषणाचा वृत्तपत्रातील यासंबंधीचा गोषवारा असा

पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळातील लोकांची 'पंढरीचा विठ्ठल कोण होता?' यावर हुज्जत चालू आहे. पण माझा त्यांना खडा सवाल आहे की, विठ्ठलाची भानगड सोडून देऊन पंढरीचा पांडुरंग कोण? याचे पहिल्यांदा उत्तर द्या. तो होता कुठे? त्याला पळविलं की डुबविलं? या प्रश्नाचं उत्तर देताना (छाननी करताना) डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “पांडुरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी त्यांना सिद्ध करून देईन. (प्रचंड टाळ्या) पुंडलिक या शब्दापासून पांडुरंग हा शब्द झाला. पुंडलिक याचा अर्थ कमळ."

अर्थात, वयाची पत्राशी उलटल्यानंतर, डॉ. आंबेडकरांनी 'पाली 'इंग्लिश डिक्शनरी' रचण्याचा जो प्रचंड उपक्रम हाती घेतला, त्याचे प्रतिबिंब यात उमटलेले आढळेल.

भाषणाच्या या सारांशात, पंढरीच्या पांडुरंगाचे पुढे काय झाले हे सांगताना, या भाषणाचा पुढील अंश सांगतो: बौद्धधर्मात मूर्तिपूजा नव्हती. हे मी तुमच्यासाठी केले आहे. अज्ञानी लोकांना तत्त्वज्ञान काय कळे? कमळाला पाली भाषेत पांडुरंग म्हणतात. तुम्हांला भुलविण्यासाठी ब्राह्मणांनी बुद्धाच्या नावाचा लोप केला. हे वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की, पंढरीच्या पांडुरंगाविषयी ऊहापोह करणारा हा शोधप्रबंध डिसेंबर १९५५ अखेरपर्यंत, डॉ. आंबेडकरांच्या रूपात पूर्णत: तयार होता. तो अखेरपर्यंत कागदावर मात्र उतरू शकला नाही. कारण त्यांचं कार्यबाहुल्य आणि प्रकृती-अस्वास्थ्य त्याच्या आड आलं. या संदर्भात, त्यांचे चरित्रकार धनंजय कीर हे अधिक माहिती पुरविताना सांगतात: "

 मार्च १९५५ मध्ये लोणावळे येथे असताना आंबेडकरांनी पांडुरंगावरील पंढरीच्या विठोबावरील प्रबंध लिहिण्यास सुरुवात केली. त्यांनी वहीची फक्त चार-पाच पानेच लिहिली होती. पुढे प्रबंध अपुराच राहिला. त्यामुळे, 'पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती ही वस्तुत: बुद्धाची आहे आणि या विषयावर मला एक प्रबंध लिहावयाचा आहे.' हा त्यांचा मनोदयः  आणि 'तो पूर्ण झाल्यावर पुणे येथील भारत संशोधन मंडळाच्या पुढे मी तो वाचणार आहे'; ' हे त्यांचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले. ती वाट पुढे कुणीच धुंडाळली नाही- हेही एक वास्तव आहे.

वास्तविक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे इतिहास, संस्कृती आणि मानव्यशास्त्रासारख्या आधुनिक ज्ञानशाखांचे व्यासंगी असे आजन्म विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांच्या तल्लख बुद्धिमत्तेला, त्यांच्या जीवनाच्या अंतिम पर्वात भारतीय साहित्य, संस्कृती आणि इतिहास यामध्ये शतकानुशतके नांदत आलेली अनेक 'कोडी' , विसंवाद, त्याचबरोबर भारतीय समाजात होत आलेली 'क्रांती आणि प्रतिक्रांती' REVOLUTION AND COUNTER REVOLUTION) यांचे तीव्र भान आलेले होते, हे त्यांनी आपल्या जीवनाच्या अखेरच्या कालखंडात लिहिलेल्या आणि बहुतांश अप्रकाशित राहिलेल्या, मृत्योपरान्त प्रकाशित झालेल्या  त्यांच्या साहित्यावरून लक्षात देते. जीवनाच्या याच कालखंडात त्यांचा ताबा 'बुद्ध आणि त्याच्या धम्मा' ने पाली भाषेच्या व्यासंगाने घेतलेला आढळेल. त्यामुळे, 'पुंडलिक' आणि 'पांडुरंग' या अर्थाच्या दृष्टीने समान असलेल्या दोन पाली शब्दांतील अंतर, त्यांच्या मनातून लीलया गळून पडतं आणि त्यांना 'साक्षात्कार'  होतो : 'पुण्डलिक' या शब्दापासून 'पांडुरंग' झाला. पुण्डलिक याचा अर्थ कमळ. मग त्या 'कमळा'च्या जागी 'विट' कशी आलो आणि तो 'विठोबा' कसा झाला? 

म्हणूनच, डॉ. आंबेडकर हे- 'पंढरीचा विठ्ठल कोण होता?' - अशी हुज्जत घालणाऱ्या एकांगी दृष्टिकोनाच्या, पुण्यातील 'भारत इतिहास संशोधन मंडळा' मधील जाड्या विद्वानांना प्रश्न करतात, पण माझा त्यांना खडा सवाल आहे की, विठ्ठलाची भानगड सोडून देऊन पंढरीचा पांडुरंग कोण? याचे पहिल्यांदा उत्तर द्या! अन्यथा, आपल्या प्राचीन मराठी संत वाङ्मयात त्याला 'पांडुरंग' या दुसऱ्या नावाने का हाकारले जाते? आणि या प्रश्नाचे या परंपरेकडे आज तरी उत्तर नाही. परंतु पंढरीचा विठ्ठल हा मुळात कोण होता, याची कुणकुण इथल्या ब्रिटिशकालीन परकीय विद्वानांना लागली होती; असे इतिहास सांगतो. खरं तर, 'पांडुरंग हा बुद्धच' असल्याचा निर्वाळा एकट्या डॉ. आंबेडकरांनी दिलेला नाही. तर ही वाट चोखाळणारे त्यांचे पूर्वसुरी हे त्यांच्या आधीही या देशात होऊन गेलेले आढळतील. उदाहरणार्थ, १८४३साली, जे. स्टीव्हनसन या लेखकाने 'रॉयल एशियाटिक सोसायटी'च्या जर्नलमध्ये - An Account of the Buddha Vaishnavas or Viththal Bhaktas of the Dakhan THT लेख लिहून, त्या वारकरी संप्रदायाबद्दल तो आपले मत नोंदवतो: 'A Buddha-Vaisnavite sect of the ground that its followers worship Buddha under the local name of Viththala.' तर स्टीव्हनसनच्या मताला दुजोरा देताना हॉपकिन्स म्हणतो: 'Viththala Panduranga is the Buddha.' म्हणजेच, बाबासाहेबांच्या आधीही विद्वान लोकांत तशा तऱ्हेचा मतप्रवाह होता. परंतु, बाबासाहेबांनंतरच्या काळात ती वाट नव्याने धुंडाळताना कुणीच आढळत नाही, हे वास्तव आहे. 

डॉ. आंबेडकरांनी पुण्याजवळच्या देहू रोड येथील २५ डिसेंबर १९५५ रोजी पार पडलेल्या ज्या सभेत आपला 'पांडुरंगा'वरील शोध-प्रबंध लिहिण्याचा मनोदय व्यक्त केला, त्याला तात्कालिक कारण जरी पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळा'तील विद्वानांत, ‘पंढरीचा विठ्ठल कोण?’ या संशोधन विषयावरून झडत असलेला वाद असला तरीही, त्या आधी तो विषय बीजरूपाने त्यांच्या सुपीक डोक्यात घोळत असावा, हे त्यांच्या त्याआधीपासूनच लोणावळ्याच्या दिशेने चाललेल्या येरझाऱ्यांवरून लक्षात येते. एकतर हा टापू लेण्यांनी वेढलेला होता. त्यावरून 'लयनावली' अथवा 'लेण्यावळ' हे त्या ठिकाणाला नाव पडले आणि त्याच्या अपभ्रंशातूनच 'लोणावळा' हे ग्राम नाम सिद्ध झाले आहे. या 'लोणावळ्या'च्या परिसरातच 'कार्ला' आणि 'भाजा'सारखी जगप्रसिद्ध बौद्ध लेणी आहेत. या लेण्यांच्या ओढीने डॉ. आंबेडकरांचे पाय त्या दिशेने आपोआप खेचले जाणे अपरिहार्य होते. आणि त्यातच त्यांना प्रबंध लेखनासाठी अशा एखाद्या 'एकांत' जागेची आवश्यकता भासत होतीच. त्यादृष्टीने, त्यांचे परममित्र असलेले नि मुंबईतल्या 'इंडियन एक्स्प्रेस' •या दैनिकाचे संपादक असलेले श्री. सदानंद नायर यांचा लोणावळा येथील बंगला त्यांच्या स्वागताला सज्जच होता.

'पंढरीचा पांडुरंग हा बुद्धच आहे', हे देहू रोड येथील ठणकावून सांगणाऱ्या भाषणापूर्वीच त्या वर्षीच्याच मार्च महिन्यात या  नायरांच्या बंगलीत (छोटा बंगला) पांडुरंगावरील आपली विचारमालिका कागदावर उतरविण्यासाठी डॉ. आंबेडकर उतरल्याचे; नि तिथे वहीची चार पाने भरतील एवढाच मजकूर लिहिल्याचे, आपण लिहिलेल्या डॉ. आंबेडकरांवरील मराठी चरित्रात कीर नमूद करतात. तर डॉ. आंबेडकर यांचे त्या वेळचे अत्यंत जवळचे सहकारी आणि शे.का.फे. महाराष्ट्र प्रदेशचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी शंकरराव खरात यांनीही, डॉ. आंबेडकर हे त्याच नायर बंगल्यात त्याआधीही मुक्कामास असल्याचे सांगताना 'तो मार्च १९५४ चा दुसरा आठवडा होता... अशी आपल्या आठवणीची सुरुवात करतात. त्यामुळे डॉ. आंबेडकरांच्या मनात 'पांडुरंगा' विषयीचे विचार त्या आधीही घोळत असावेत, असे ध्वनित होते. कारण हा त्यांचा मुक्काम तब्बल आठवड्याभराचा होता; असे शंकरराव खरात नमूद करतात. खरं तर ज्या महापुरुषाला आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्यात, आणि त्यातही १९५० नंतरच्या त्याच्या जीवनप्रवासात बुद्धविचारांची आणि लेण्यांच्या सावलीत विसावण्याची ओढ लागलेली आहे, ज्याचे मनन, चिंतन, अध्ययन, लेखन आणि संभाषण हे बुद्धाची एकच दिशा धरून चाललेले आढळते. ज्याला महाराष्ट्राच्या दरीखोऱ्यांत पसरलेल्या हजारभर लेण्यांतून बुद्धच भरून उरलेला दिसतो आहे; त्या डॉ. आंबेडकरांना फक्त महाराष्ट्रातच आढळणाऱ्या 'विठ्ठला'तही बुद्धच आढळला, तर नवल ते काय? कारण हा सर्वत्र दिसणारा बुद्ध, जगभर पसरलेला बुद्ध महाराष्ट्रात असा अचानक लोप कसा पावला, हा त्यांच्या मनाला टोचणारा प्रश्न होता. 

डॉ. आंबेडकरांसारख्या ' अनुत्तर' पुरुषाच्या जीवनाच्या सायंकाळी, त्याच्या तल्लख डोक्यात चमकलेली ही जगावेगळी कल्पना होती; आणि म्हणून डॉ. आंबेडकरांना ती लवकरात लवकर साकारावयाची होती; म्हणून त्यांनी त्या कामी एक सहाय्यक निवडला होता. आणि त्याला तातडीने 'समग्र प्राचीन मराठी संतवाङ्मया'तील काव्यामधून कुणा कुणा कवीच्या अभंगातून कितीदा 'पांडुरंग' म्हणून, आणि कितीदा 'विठ्ठल' म्हणून, उल्लेख आलेले आहेत; याची मोजदाद व वर्गवारी करावयाची कामगिरी सोपविली होती." असे मी माझ्या विद्यार्थिदशेत ऐकले होते.  त्या योजनेचे पुढे काय झाले हे कळावयास मार्ग नाही. परंतु, • डॉ. आंबेडकरांच्या या 'अभंग उत्खननामागे कोणती शक्कल दडलेली होती, हे आपणाला कळावयास वेळ लागत नाही काय? 'पांडुरंग' अथवा ‘विठ्ठल' हे शब्द कुणाच्या अभंगातून कितीदा स्रवले याची मोजदाद करणे याचा अर्थ सरळच असा होतो की, या देवस्थानातील दैवतासाठी कुठल्या काळात कोणते नाव अधिक प्रचारात होते : 'पांडुरंग' की 'विठ्ठल'? •त्यावरून त्या दैवताचे मूळ नाव काय, ह्या निष्कर्षाप्रत आपण येऊ शकणार • होतो. आणि ही विश्लेषणाची आणि विमर्शाची पद्धती अतिशय नवीन होती, एवढे मात्र लक्षात येते. त्याचबरोबर डॉ. आंबेडकरांनी 'पांडुरंग' या नावाचा पक्ष उचलून धरल्याचे, त्यांच्या देहू रोड येथील भाषणातून स्पष्ट होते.

इथे 'पांडुरंग' हा मुळात बुद्धच असल्याचा निर्वाळा देत असलेले डॉ. आंबेडकर हे त्यांचे पूर्वसुरी असलेल्या स्टीव्हनसन आणि हॉपकिन्स या पाश्चात्त्य विद्वानांच्या मतांमागून वाटचाल तर करत नाहीत ना, अशी शंका कुणाच्याही मनात उद्भवणे शक्य आहे. परंतु, ते त्यांच्या विद्यार्थिदशेपासूनच गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांचे बोट धरून बुद्धाच्या दिशेने मार्गस्थ झालेले दिसतात. त्या दृष्टीने 'बौद्ध धर्माचे माझे वेड बरेच पुरातन आहे' हे त्यांचे १४ जानेवारी १९५५ रोजी काढलेले उद्गार" अतीव महत्त्वाचे आहेत. आणि त्यांच्या वरील विचाराला प्राचीन काळापासून अव्याहत चालत आलेल्या सामाजिक क्रांती आणि प्रतिक्रांतीची भेदक धार आहे असे मला वाटते. 'पांडुरंगा' विषयक बांधलेल्या वरील सर्व अटकळीवरून आणि डॉ. आंबेडकरांनी त्याविषयी केलेल्या विधानावरून, डॉ. आंबेडकरांच्या या प्रबंधाची दिशा काय होती, हे आपल्या. लक्षात येते. ही दिशा आज लोकांनी स्वीकारलेल्या दिशेविरुद्ध जाणारी होती; हे आपण लक्षात घेतले पाहिजे. खरं तर लोकांच्या मनात, पारंपरिक अवगुंठनात वावरणारा 'विठ्ठल' स्थिर झाला होता. त्या पदावरून त्याला पदमुक्त करणे ही आता अशक्य कोटीतली बाब होती. कारण ह्या दैवतावर चढलेली काळाची पुटे खरवडून काढणे अवघडच होते. त्यामुळे डॉ. आंबेडकरांपलीकडे एक अ. रा. कुलकर्णी यांचा सन्मान्य अपवाद करता, ही अनघड नि अवघड वाट पुढे कुणीच धुंडाळली नाही हे एक भीषण वास्तव आहे. म्हणून यातले खरे काय नि खोटे काय हे नीर-क्षीर न्यायाने तपासणे अगत्याचे झाले आहे. 

संग्राहक : अरुण वाघ................ 92232 03545

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com