Top Post Ad

महाबोधी महाविहार... आजही कुणाच्या ताब्यात


 महाबोधी महाविहार म्हणजे तथागत भगवान बुध्दाच्या `बुध्दत्व' प्राप्तीचे स्मृतिचिन्ह. ते बिहार राज्यातील गया या ठिकाणी आहे. या पवित्र स्थळी भगवान बुध्दांना बुध्दज्ञान प्राप्त झाले. वर्तमान महाबोधी विहार प्रथम इ.स. 218 साली बांधण्यात आले. या विहारमध्ये इ.स.380 साली तेजस्वी, सर्वांग सुंदर अशी बुध्द प्रतिमा स्थापित करण्यात आली. इ.स. 666 साली भारतात प्रवासाला आलेल्या चिनी प्रवाश्यांनी आपल्या प्रवास वर्णानामध्ये या विषयीचा उल्लेख केला आहे. त्यापैकी प्रमुख प्रवाशी हु-यान-सँग, फायियॉन हे होते. त्यांच्या प्रवास वर्णनामधून मिळालेल्या माहितीप्रमाणे महाबोधी विहाराची उंची साधारणपणे 150 ते 160 फूट असावी. या विहार परिसरात 21 स्तूप असून 3 सरोवरे होती त्यात अनेक भिक्खूंचे वास्तव्य होते. इ.स.पूर्व 260 मध्ये सम्राट अशोकापासून सतत 1500 वर्ष या ठिकाणी बौध्दांचे आवागमन राहिले. बौध्द धर्मिय राजे -महाराजांनी आपल्या दानाने या विहाराला समृध्द केले. या विहाराची प्रतिमा व प्रतिष्ठा वाढवली.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणलेली धम्मक्रांती, त्या क्षणापासुन भारतातील सर्वसामान्य व्यक्तीला बुध्द आणि त्याच्या तत्वज्ञानाचे दर्शन घडले. या दृष्टिमधुनच त्या सर्वांना ज्ञानप्राप्तीचे पवित्र स्थळाचे दर्शन झाले. महाबोधी महाविहार परिसर अखिल विश्वातील बौध्दांचे पवित्र श्रध्दास्थान आहे. मात्र आजही ते शैव पंथीयांच्या अर्थात हिन्द्चूं्या ताब्यात आहे. शैव पंथीय कर्मकांडामुळे या विहाराचे पावित्र्य आणि मांगल्य नष्ट होत आहे.खरंतर विहार आणि आजूबाजूला असणारा परिसर हा शासनाच्या ताब्यात आहे. मात्र प्रशासन व्यवस्था ही हिन्दुत्ववादी असल्यामुळे दाद मागायची कुणाकडे हा प्रश्न निर्माण झाला आहे.  बौध्दांच्या या ऐतिहासिक श्रध्दास्थानाची विटंबना दिवसेंदिवस अधिकच होतांना दिसते व ती पाहिल्यानंतर प्रत्येक बौध्दांचे अंतकरण विदीर्ण हेते. महाबोधी महाविहाराच्या संघर्षाचा इतिहास हा महाबोधी विहार हिंदूंच्या ताब्यातून मुक्त करण्याचा इतिहास आहे.या विहारावर बौध्दांचे अधिपत्य आणि व्यवस्थापन पुन्हा प्रस्थापित करण्याचा इतिहास आहे. बौद्धधम्मात घुसलेल्या ब्राह्मणी हिन्दुत्ववादी षडयंत्रकारांनी  बौध्द धम्माला हिन्दुत्वाचा मुलामा दिला त्यामुळे मुळ धम्माला उतळती कळा लागली. बौध्द धम्माचा ऱहास होऊ लागला. सतत होणाऱया आक्रमण आणि अत्याचारामुळे  बौध्द भिक्खूंना हे महाविहार सोडणे भाग पडले. त्याचा परिणाम असा झाला की, महाबोधी विहार विस्मृतीच्या गर्तेत लोटले गेले. या संधीचा फायदा घेऊन इ.स. 1590 मध्ये हिंदू महन्त गोसावी घमंडगिरी यांनी या ठिकाणी एक मठ स्थापित केला. महन्तांच्या आगमनानंतर बौध्दांचे हे सर्वश्रष्ठ श्रध्दास्थान हिंदूंच्या ताब्यात गेले.ते अद्यापही हिन्दुत्ववादी लोकांच्या ताब्यात आहे. 

महाबोधी विहाराचा प्रश्न हा त्याच्या व्यवस्थापनेचा प्रश्न नसून बौध्दांच्या, त्यांच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे. खरं तर या देशातील लोकांनी आपल्या स्वार्थापोटीची राजनिती बाजुला ठेऊन या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जगातील कोट्यावधी बौध्दांना अत्यंत प्रिय असलेल्या पवित्र अशा महाबोधी विहार आणि परिसरावर महन्तचा ताबा आहे. हा ताबा सोडून त्यांनी मानवतेच्या दृष्टीने समंजसपणे आणि समुपचाराने महाबोधी विहाराचा संपूर्ण अधिकार बौध्दांना द्यावा, अशी प्रामाणिक मागणी अनागारिक धम्मपालांनी व अनेक बौध्द राष्टांनी व राजांनी तसेच बौध्द प्रतिनिधी आणि अनेक विश्वजनांनी केली. तरीसुध्दा या देशातील प्रतिगामी  शक्तींनी त्यांच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही व त्याकडे लक्ष दिले नाही. महाबोधी विहार हे जबरदस्तीने, जुल्माने तसेच चालाकीने आपल्याच ताब्यात ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न चालविला आहे. सर्वधर्मसमभावचा नारा देणाऱया या व्यवस्थेमध्ये उघडपणे  एका समाजावर अन्याय होत आहे. मस्जिदीचा ताबा मुस्लिमांकडे, चर्चचा ताबा ख्रिश्चनांकडे, अगदी हिन्दुंच्या देवळाचा ताबाही ब्राह्मण, पुरोहितांकडेच आहे.(मग मंदीरात त्यांनी लघुशंका केली तरी चालेल) त्यामध्ये कोणता मुस्लिम किंवा ख्रिश्चन अथवा इतर धर्मिय नाही. मात्र बौद्धांच्या बाबतीत दुय्यम भूमिका आजही घेतल्या जात आहे.  

सन् 1893 मध्ये सर एड्विन अर्नोल्ड यांनी नॅशनल हरॉल्डमध्ये East and west- A splendid Opportunity या शिर्षकाखाली एक लेख लिहीला होता आणि त्यात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला की,  ज्या ठिकाणी राजकुमार सिद्धार्थाचा जन्म झाला ते कपिलवस्तू, आत्ताचे भुईल्ला, ज्या ठिकाणी त्याने पहिले प्रवचन दिले ते बनारसच्या बाहेरच्या बाजुला असलेले इसापत्तन. ज्या ठिकाणी त्यांचे महापरिनिर्वाण झाले ते कुशिनारा आणि हे एका झाडाच्या खुणेने निश्चित केलेले स्थळ जिथे 2483 वर्षापूर्वी वैशाखी पौर्णिमेला एक सुसंस्कृत आणि उदात्त असा जीवन मार्ग मनोभावे पटवून देऊन संपूर्ण आशियाखंडातील जनतेला सुस्कृत बनविले ही चार स्थळं बौद्ध धम्माची अत्यंत पवित्र स्थळं होतं. आणि या चारामधील हे बुद्धगया येथील बौधीस्थळ तर आशियातील लोकांना अत्यंत प्रिय आणि पवित्र आहे. असे असातना ज्याला फक्त मालकीहक्क गाजवायचा आहे आणि दान दक्षिणा मिळवायची आहे पण त्या विहाराची जराही कदर नाही अशा ब्राह्मण महन्ताच्या ताब्यात आज ते का आहे?

सर एड्विन अर्नोल्ड ज्यांनी 1879 मध्ये सर्व राष्ट्रामध्ये बुद्ध तत्वज्ञान आणि बुद्ध जीवनावर आधारीत `दि लाईट ऑफ एशिया' या महान ग्रंथाद्वारे बुद्धाबद्दल जागृती निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांनी आपल्या प्रसिद्ध डेली टेलिग्राफ मध्ये वरील लेखात बोधगयेबद्दल माहिती करून दिली. 

अलेक्झांडर कनिंघहॅम यांच्या उत्खननातून उघड होणारे बौद्ध अवशेष व ऱिहस डेव्हिसच्या बुद्धिझम पासून सर एड्विन अर्नोल्ड यांना दि लाईट ऑफ एशिया या ग्रंथाच्या लेखनासाठी प्रेरणा मिळाली.  वयाच्या पंचविसाव्या वर्षी सर एड्विन पुण्यात डेक्कन महाविद्यालयाचे प्रिन्सिपल म्हणून चार वर्षाच्या मुदतीकरिता भारतात आले होते. त्यावेळी भारतातील सर्वच बौद्ध स्थळांना भेट देण्याची त्यांची इच्छा होती. पण त्यावेळी सन् 1857च्या उठावानंतर देशात जे वातावरण निर्माण झाले त्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही आणि ते परत इंग्लंडला गेले. 

त्यानंतर सन् 1884-86या काळात सर एड्विन अर्नोल्ड जेव्हा भारत भेटीवर आले त्यावेळी लाईट ऑफ एशियाच्या भूमिवर प्रवेश करताना ते अत्यंत्य भावनाविवश झाले. त्या अवस्थेमध्ये जेव्हा बोधगया येथील महाविहारातील अकरा वर्षापूर्वी ब्रह्मदेश (म्यानमांर)हून आणलेल्या भगवान बुद्धांच्या प्रतिमेला वंदन करायला गेले तेव्हा त्या खोलीच्या मध्यभागी दगडाचे शिवलिंग प्रस्थापित केल्याचे त्यांनी पाहिले आणि त्यांचे मन खिन्न झाले. काही लोक महाविहाराच्या आवारातच पिंडदान करीत होते. पडझड झालेल्या महाविहाराचे हजारो मौल्यवान शिल्प आणि लेख इतस्तत पसरलेले विखूरलेले होते. पाण्याच्या विहिरीला प्राचीन मूर्ती असलेले दगड  बसविलेले आहेत; अशा कोरलेल्या दगडांचा वापर लोक पायऱयासाठी करीत होती. महन्ताच्या ]िनवासासमोर तीन फूट उंचीची मूर्ती तिथे पडलेल्या दगडमातीत पुरली गेली होती.  अशी अवस्थेत महाबोधी विहार आणि त्याचा परिसर पाहून ते फार दुःखी झाले. त्यांनी जवळच असलेल्या बोधिवृक्षाला वंदन करून त्याची चार पाने घेऊ का म्हणून महन्ताजवळ परवानगी मागितली. तर महन्त म्हणाला चारच काय पाहिजे तेवढी घेऊन जा हे ऐकून तर त्यांना धक्काच बसला. त्यांनी केवळ चारच पाने काढली आणि ती घेऊन ते सिलोनला गेले.  

तिथे त्यांचे; बोधिवृक्षांच्या पानाचे जंगी स्वागत करण्यात आले. कँडीच्या ]िवहाराला दिलेले पान त्यांनी मौल्यवान डबीत ठेवून दिले व त्याची दर आठवड्याला पुजा होऊ लागली. पनादुराच्या भिक्खूंना आणि विशेशत बौद्ध विद्वान वलिगामांना जेव्हा अर्नोल्ड यांनी सूचना केली की, महाविहार आणि त्याचा परिसर हिन्दूच्या हातून काढून घेऊन बौद्धांकडे सुपूर्द करायला हवा. त्यांची ही सूचना सिलोन आणि बौद्ध राष्ट्रात वणव्यासारखी पसरली. महाविहार आणि इतर परिसर हा सरकारी मालकीचा असून मैत्रीपूर्ण चर्चा करून त्याची किंमत ठरविता येऊ शकते व महाविहार बौद्धांच्या ताब्यात देता येऊ शकते असा अर्नोल्डचा समज ाsहता. याबाबत त्यानी जनरल अलेक्झांडर कनिंघहॅम यांच्याशीही चर्चा केली होती. अलेक्झांडर कनिघंहॅमनाही ही कल्पना आवडली होती. अर्नोल्डंनी महंन्ताला हिंदीतून एक पत्र लिहिले. 

सिलोमध्ये सर ऑर्थर प्राचीन बौद्ध अवशेषांचे संशोधन करीत होते. त्यांनी व कलकत्त्याचे डफरीन, मद्रासचे कॉनोमास यांनी अर्नोड्लचा प्रस्ताव मान्य केला होता. परंतु गृहखाते त्यावेर्ळी जर जागरूक असेत तर या प्रस्तावाची अंमलबजावणी होऊ शकली असती. एकदा अर्नोल्ड त्यावेळच्या भारतमंत्री असलेल्या लॉर्ड क्रॉस यांना भेटायला गेले आणि  म्हणाले, ``लॉर्ड क्रॉस तुम्हाला असे वाटते का की पुर्वेकडील चाळीस कोटी लोकांनी तुमचे रांत्रदिंवस स्मरण करावे आणि अलेक्झांडर, सम्राट अशोक, अकबर यांच्यासारखं तुमचही त्यांनी स्मरण करावं''. त्यावर भारतमंत्री उद्गारले, ``याकरिता मला काय करावे लागेल?'' त्यावर अर्नोल्ड म्हणाले, ``महाबोधी ]िवहाराचा ताबा आता जो हिन्दू महन्ताकडे आहे तो त्याच्याकढून घेऊन आशियाच्या बौद्धांच्या प्रतिनिधीक मंडळाकडे सोपवावा. लॉर्ड क्रॉस यांनी याबाबतीत प्रयत्न केले पण त्यांनाही यश आले नाही. 

एड्वीन अर्नोल्ड यांनी सर्व बौद्ध राष्ट्रांना पत्र लिहून या प्रश्नी लक्ष घालण्याबाबत कळविले. अर्नोल्ड सन् 1889 मध्ये याच उद्देशाने जपानला गेले. तिथे बौद्धासमोर व्याख्यान देऊन भारतातील पवित्र बौद्ध स्थळांबाबत उपस्थित बौद्धांच्या मनात औत्सुक्य निर्माण केले. सन् 1892 मध्ये अर्नोल्ड पुन्हा जपानला गेले त्यावेळी त्यांनी व्याख्यानात सांगितले की, ``बुद्धगया महाविहाराच्या मुक्ततेसाठी मी माझे जीवन अर्पण करायला तयार आहे.'' 

डेली टेलिग्राफमध्ये लिहिलेल्या लेखात त्यांनी लिहिले `ज्या  ठिकाणी बुद्ध धम्माचा जन्म झाला त्या ठिकाणी जनतेच्या उन्नतीसाठी, त्यांना मदतनीस होण्यासाठी, त्यांच्या आध्यात्मिक गरजा भागविण्यासाठी तो पुन्हा परतेल हे आशिया खंडातील एक धर्मयुद्धच असेल की ज्याचा विजय दहशत, अश्रू, रक्तपात, इत्यादी विना असेल. आणि तो राणी सरकारला फायदेशीर आणि मानाचा तुरा ठरेल. 

14 मार्च 1904 रोजी एड्विन अर्नोल्ड यांचा मृत्यू झाला. मात्र एड्विन अर्नोल्ड हयात असतानाच त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन श्रीलंकेचे डेव्हिड हेववितरणे उर्फ अनागारिक धम्मपाल यांनी महाविहार मुक्तीसाठी आयुष्यभर संघर्ष केला. 21 जानेवारी 1891 साली अनागारिक धम्मपाल यांनी प्रथम बुद्धगयेला भेट दिली. तेथील दुरावस्थेबद्दल दि.22 जानेवारी 1891च्या दैनंदिनीमध्ये ते लिहितात, ``मैलभराच्या प]िरसरात भगवान बुद्धांच्या मुर्त्या तुटलेल्या अवस्थेत इतस्तत विखुरलेल्या अवस्थेत आढळल्या. महन्तांच्या मठाच्या प्रवेशद्वाराशी दोन्ही बाजुला भगवान बुद्धांच्या ध्यानमुद्रेतील आणि धम्मच्कर प्रवर्तन मुद्रेतील दोन मुर्ती होत्या. पवित्र विहार, वज्रासनावर बसवलेली भगवंतांची मूर्ती आणि आजुबाजुला भयान शांतता पाहून कुणाही उपासकाला रडू कोसळेल असे गंभीर वातावरण!'' 

भगवान बुद्धांच्या मूर्तीच्या विटंबनेचे आणि अत्यंत मौल्यवान अशा अवशेषांच्या पळवापळवीचे अत्यंत दुःखित मनाने निरीक्षण करून तथागतांचा एक निष्ठावंत अनुयायी म्हणून तिथे राहणे आणि पवित्र विहाराचे रक्षण करणे हे आपले नुसते कर्तव्य नसून तो आपला हक्क असल्याचे त्यांना वाटले. खालच्या स्तरावरील सरकारी अधिकाऱयांशी झालेल्या चर्चेवरून त्यांची अशी समजूत झाली होती की, महाबोधी महाविहार आणि त्याच्या आजुबाजूचा परिसर ही सरकारची  मालमत्ता आहे आणि त्यामुळे तो परिसर ब्राह्मणी व्यवस्थापनाकडून बौद्धांकडे सुपुर्द करणे तेवढे अडचणचे होणार नाही. पंरतु गया जिह्याचा कलेक्टर मि.जी.ए.ग्रिअरसन यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून जेव्हा त्यांना समजले की, तो परिसर आणि महाविहार हे महन्ताच्या मालकीचा आहे. मात्र सरकारच्या मदतीने ती विकत घेता येऊ शकेल. हे वास्तव ध्यानात आल्यावर धम्मपाल कलकत्याला आले. आणि महाविहार परिसराची जागा खरेदी करम्याच्या उद्देशाने ब्रह्मदेशातून निधी जमा करण्याच्या कामाला लागले. 

31 मे 1891 रोजी श्रीलकेमध्ये एका सभेचे आयोजन करून महाविहार बौद्धांकडे सुपूर्द करण्याच्या हेतूने आणि ज्या देशात बुद्धधम्माचा उदय झाला तिथे पुन्हा त्या धम्माचा प्रचार आणिप्रसार करावा या हेतूने इ.स. 1891 साली महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी अनागारिक धम्मपालानी महाबोधी सोसायटीची स्थापना केली. सुमारे सात शतकानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिनी बुद्धगयेच्या परिसरात प्रथमच पंचरंगी धम्मध्वजाचे आरोहन धम्मपाल यांनी केले आणि लगेचच महन्ताबरोबर जागेच्या खरेदीबाबत बोलणी सुरु केली. मात्र महन्त जागेचा ताबा सोडण्यास तयार नव्हता. त्याने अगदी छोटीशी जागा विकण्याची तयारी दर्शविली. 

बोधगयेत असलेल्या ब्रह्मदेशाच्या धर्म शाळेत धम्मपालांबरोबर आलेले चार भिक्खू रहात होते. परंतु महन्तांच्या लोकांनी त्यांना बेदम मारहाण करून त्या धर्मशाळेतून हाकलून दिले. धम्मपालांनी ती केस कोर्टात नेली परंतु कलकत्ता हायकोर्टाने आरोपींना निर्दोष सोडून दिले. 

1893 साली जपानी लोकांनी अनागारिक धम्मपालांना महाबोधी विहारात प्रतिस्थापनेसाठी एक बुद्धप्रतिमा दिली. महन्तांनी ही प्रतिमा विहारात स्थापित करतांना विरोध केला आणि महाबोधी विहार हे हिंदूंचे स्थान आहे असा खोटा प्रचार करुन महन्तांनी त्या ठिकाणी बौध्दधर्मप्रचारकावर अन्याय आणि अत्याचार सुरु केले.  अशाप्रकारे महन्त घमंडगिरी या पुरोहिताने, त्यांच्या गुंडांनी शासनव्यवस्थेने आणि  तेथील ब्राम्हणवादी जमिनदारांनी षडयंत्र करुन महाबोधी विहारावर अतिक्रमण करुन महाबोधी विहार आपल्या ताब्यात घेतले. तेथील बौध्दविहारातील मुर्तिची आणि चैत्य व स्तूपची तोडफोड केली, तेथील तथागत बुद्धांच्या विशाल प्रतिमेसमोर  शिवलिंग स्थापित केले. त्या ठिकाणी असणाऱया पाच बुध्द प्रतिमा आणि सिध्दार्थ गौतम बुध्दाच्या आईची प्रतिमा त्याला पाच पांडव आणि द्रौपदी बनवून त्याना विद्रुप केले. त्या ठिकाणी विहारामध्ये 1893 साली 1600 वर्षे जुनी मूर्ती वरच्या माळ्यावर बसवतांना  बुध्दमूर्तीसह महन्तांनी अनाकारिक धम्मपाल यांना बाहेर काढले. त्यांना प्रचंड मारहाण केली.  आणि ती मूर्ती व्हरांड्यात फेकून दिली. त्या केसमध्ये देखील कलकत्ता हायकोर्टाने आरोपींना निर्दोष घोषित करून सोडून दिले. 

महाविहारावर विळखा घालून बसलेल्या महन्तांच्या महिमा वर्णन करताना आचार्य धम्मानंद कोसंबी म्हणतात की, मी जेव्हा महाविहारात गेलो, मला वाटले होते की बुध्दविहार हे बौध्दांच्या ताब्यात आहे पण प्रत्यक्ष ते हिन्दुंच्या ताब्यात होते. महाविहारासमोर असलेल्या हिंदूंच्या मठामध्ये महन्त घमंडगिरीचे लोक नशेमध्ये दारु, गांजा, भांग, मद्यपान करुन त्या ठिकाणी सतत पडून राहात होते आणि त्याच्याद्वारे त्या ठिकाणी गुंडगिरीही केली जात होती, आलेल्या प्रवाशाना तसेच विदेशी पर्यटकांना ठगविणे, त्यांना लुटणे, त्यांच्या सामानाची चोरी करणे, स्त्रियांवर अत्याचार करणे आणि बौध्द प्रतिनिधींकंडून पूजा-अर्चा आणि विहाराच्या नावावर जबरदस्तीने खंडणी वसूल करणे आदी अमानवी प्रकार त्या परिसरामध्ये सुरु असत. त्याची कोणतीही साधी तक्रारसुध्दा पोलिसात घेतली जात नव्हती. आणि त्यांच्या तक्रारींकडे प्रशासनसुध्दा लक्ष देत नव्हते. स्थानिक प्रशासनावर महन्त व त्याच्या गुंडांचा दबाव होता. महाविहारामध्ये हिंदूपध्दतीमध्ये पिंडदान करणे, मुर्तिना शेंदूर लावणे, विद्रुप आणि  विकृत करणे, बळी देणे व हिंदू पध्दतीने पूजापाठ करणे आदी अनेक बौध्द संस्कृतीच्या विपरित कर्मकांड केले जात असे. ही दृश्ये बघून अनागारिक धम्मपालांनी या विरोधात संघर्ष केला त्याचा परिणाम म्हणून भारत स्वतंत्र झाल्यानंतर बुध्दगया अॅक्ट हा कायदा आणण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री डॉ. श्रीकृष्ण सिंह यांनी 18 सप्टेंबर 1948 रोजी विधानसभेत बुध्दगया टेंपल बिल सादर केले होते. त्या बिलप्रमाणे चार बौध्द, चार हिंदू असे आठ सदस्य नववे अध्यक्ष म्हणून गयाचे जिल्हाधिकारी होते. अशी नऊ जणांची समिती बनवून मंदिर त्या समितीच्या ताब्यात देण्यात आले. अशा रितीने अनागरिक धम्मपाल यांच्या अथक प्रयत्नांनी  हिन्दुच्या कर्मठ पुजाऱयाकडून महाविहाराची काही प्रमाणात सुटका झाली.   

`बोधगया मंदिर अॅक्ट 1949' / `बुध्दगया मंदिर बिल 1948' / `बिहार सरकार विधी विभाग' 

बुध्दगया मंदिर कानुन 1949 ला लागू करण्यात आला. 

बुध्दगया मंदिर आणि मंदिरसंबधीत संपत्तीच्या व्यवस्थापनासाठी तसेच प्रबंधनासाठी हा काळा कायदा बिहार सरकारने पास केला. या कायद्यानुसार ह्या विहाराला `मंदिर' या नावाने ओळखल्या गेले. `मंदिर' म्हणजे बोधगया गावातील महाबोधी वृक्षाजवळ असलेले ते स्थळ, त्याच बरोबर मंदिर परिसर, मंदिराची जमीन आणि राज्य शासनाद्वारा निर्देशित केलेला भूखंड. या कायद्यातील महन्त म्हणजे महाविहाराचा शैवपंथीयाचा प्रमुख पुजारी. हा पुजारी तेव्हा गोसावी घमंडगिरी हा होता. या कायद्याने केलेल्या समितीची रचना अशी होती.  

ही समिती बिहार सरकारद्वारा गठित केली जाणार. या समितीला मंदिर तसेच मंदिराची जमिन व मंदिरातील जमा संपत्तीचा प्रबंध करण्याचा, विनियोग करण्याचा अधिकार दिला गेला. या समितीमध्ये 1 अध्यक्ष व 8 सदस्य असे एकंदर 9 सदस्यांची कमिटी आहे.  

हे सगळे भारतीय आहेत. हे भारतीय असावेत अशी अट आहे. तसेच यापैकी 4 सदस्य हिंदू व 4 सदस्य बौध्द असावेत आणि त्या सदस्यामध्ये महन्त प्रमुख असावा आणि अध्यक्ष हा हिंदू असावा अशी मुख्य अट आहे. गया जिह्यातील जिल्हाधिकारी या समितीचा अध्यक्ष असावा आणि तो हिंदू असावा अशी अट आहे. आणि जर तो जिल्हाधिकारी हिंदू नसला तर राज्य सरकार या कालावधीसाठी अन्य हिंदू व्यक्तिचीच अध्यक्ष म्हणून नियुक्ति करेल अशी सुध्दा अट आहे. राज्य सरकार या दोन सदस्यांमधून समितीचा सचिव सदस्य मनोदित करेल. समितीची नियुक्ति सचिव करेल अशी सुध्दा अट आहे. ही समिती बोधगया मंदिर प्रबोधन समिती या नावाने ओळखली जाते. ही समिती तेव्हापासून निरंतर काम करीत आहे. या समितीला आपल्याकडे चल-अचल संपत्ती ठेवण्याचा अधिकार आहे. या समितीचा कार्यकाल 3 वर्षाचा आहे. जर राज्य सरकारला या समितीला गंभीर स्वरुपाच्या व्यवस्थेकरिता दोषी ठरवीत असेल तर त्या सरकारला ही समिती विसर्जित करण्याचा आणि दुसरी समिती नियुक्त करण्याचा अधिकार आहे. एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यास किंवा त्याने राजीनामा दिल्यास किंवा समितीचे कार्य करण्यास मनाही केल्यास किंवा पुर्वानुमती शिवाय निरंतर सहा सभांना अनुपस्थित राहिल्यास किंवा देशत्याग केल्यास, विदेशामध्ये जाऊन राहिल्यास किंवा अन्य कारणाने  दुसऱ्या सदस्याची नियुक्ति करु शकते. 

विशेष म्हणजे त्या समितीच्या स्थापनेसंबंधी काही दोष असल्यास समितीमध्ये एखादे स्थान रिक्त असल्यास समितीच्या निर्णयाला आव्हान देण्याचा अन्य कुणाला अधिकार नाही. जिल्हाधिकारी व्यतिरिक्त अन्य कोणी व्यक्ती अध्यक्ष बनल्यास बिहार सरकार अध्यक्ष आणि इतर सदस्यांच्या नावांची शासकीय गॅजेटमध्ये घोषणा करेल. या गोष्टीचा अंतर्भाव या कायद्यामध्ये आहे. समितीचे मुख्यालय बोधगया येथेच राहावे अशी अट आहे. समितीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचा अध्यक्षच असावा आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपस्थित सदस्यांपैकी एखाद्याला अध्यक्ष बनविल्या जाईल अशी तरतूद आहे. समितीच्या बैठकीला कमीतकमी चार सदस्यांची उपस्थिती आवश्यक आहे. समिती राज्य सरकारच्या पुर्वानुमतीशिवाय कुणाकडूनही  कोणत्याही स्वरुपाचं कर्ज घेऊ शकत नाही. 

या समितीचा खालीलप्रमाणे उद्देश आहे. 

मंदिराची देखभाल करणे, पर्यटकांची सुरक्षा करणे आणि त्यांच्या हिताचे सरंक्षण करणे. मंदिरामध्ये पुजेची व्यवस्था करणे, तसेच मंदिरातील भूमीवर पिंडदान करणे. मंदिर आणि मंदिरातील कोणत्याही भागाला होणाऱया हानीपासून बचाव करणे. मंदिरातील प्रतिमेची नुकसानीपासून सुरक्षा करणे. मंदिरामध्ये प्राप्त होणारे दान, उपहार स्वीकार करणे आणि त्याची व्यवस्था करणे, मंदिराच्या भूमीसंबंधी सर्व दस्तावेज, महत्वपूर्ण कागदपत्रांची सुरक्षा करणे,समितीच्या शासकीय कर्मचाऱयांच्या पगाराची व्यवस्था करणे.पूजा, आराधना करण्यासंबंधीचे अधिकार हिंदू आणि बौध्दांना दिलेले आहेत. तसेच पिंडदान करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. मंदिरात पशुबळी देणे, दारु पिणे, आणि चप्पल-जोडयाचा प्रयोग करण्यास मनाही आहे. परंतु या नियमांचा भंग करणाऱयास फक्त 50 रुपये मात्र दंड भरपाई करण्याची शिक्षा आहे. 

 हिंदू आणि बौद्धातील व्यवस्थापनाच्या निर्णयाविषयी मंदिर किंवा मंदिरातील भूमी अथवा संपत्तीच्या वापराविषयी हिंदू आणि बौध्दांमध्ये विवाद उत्पन्न झाल्यास राज्य सरकारला अंतिम निर्णयाचा अधिकार आहे. या कायद्यातील कोणत्याही कलम अथवा नियमानुसार  शैवपंथीय मठाचा कोणत्याही चल अचल संपत्तीवर या समितीचा अधिकार राहणार नाही. राज्यसरकार याकरिता एक सल्लागार समिती गठित करेल. या सल्लागारांची संख्या सुध्दा सरकार निर्धारित करेल. या सल्लागार समितीचा कार्यकाळसुध्दा सरकार निर्धारित करेल.ही मंडळे फक्त सल्ला देण्याचे काम करेल आणि मंडळाची नियमावलीसुध्दा राज्य सरकारच निर्धारित करील अशी या मंदिर-कायद्याची संरचना आहे.  

या काळ्या कायद्याविषयी भदन्त आनंद कौसल्यायन यांनी 1949 मध्ये खूप तीव्र गंभीर प्रकारची टिका करुन हा कायदा म्हणजे विश्वातील कोट्यवधी बौध्दांच्या भावनांवर अन्याय करणारा कायदा आहे. या कायद्याने संपूर्ण बौध्दांचे अधिकार धोक्यात आले. हा कायदा सरकारने रद्द करावा अन्यथा याचे गंभीर परिणाम भविष्यात होतील, अशी सूचना तेव्हा बिहारराज्याचे मुख्यमंत्री मा. श्रीकृष्ण सिन्हा यांना केली. कारण ही कायदा हिंदू आणि बौध्दांची संयुक्त कमिटी असली तरी या कमिटीचे सर्व निर्णय बहुतमाने घेतले जाणार त्याचा फायदा हिंदूंना होणार. गया जिह्याचा जिल्हाधिकारी अध्यक्ष असल्याने त्याठिकाणी कोणत्याही अबौध्द व्यक्तीला जिल्हाधिकारी म्हणून पाठविले जाणार नाही त्यामुळे सगळे निर्णय हिन्दुंच्या हिताचे घेतले जातील,  

अशाप्रकारच्या कारस्थानाने बौध्दांचे महाबोधी विहार हा 1600 शतकापासून तर पुढील अनेक शतकापर्यंत शासन आणि प्रशासनाचा अप्रत्यक्षपणे हिन्दुंच्या अधिकाराच्याखाली ठेवण्याचा प्रयत्न आहे. बौध्दविहारामध्ये शिवलिंगाची स्थापना करुन त्याठिकाणी हिन्दुत्वाच्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केली आहे. बुध्द पदचिन्हांना विष्णू पद घोषित करुन आणि कपोलकल्पित गया पुराणाच्या आधारावर भगवान बुध्दाला विष्णुचा नववा अवतार म्हणून खोटा आणि भ्रामक प्रचार करुन त्या विहाराला आपल्या ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न विश्व हिन्दु परिषद आणि ब्राम्हणवाद्यांनी केला आहे.  

यामुळे हिन्दु विरुद्ध बौध्द अशाप्रकारची भूमिका तयार होऊन विश्वातील बौध्दांनी आपल्या स्वाभिमानाचा आणि न्यायाचा महाबोधी महाविहार मुक्ती संघर्ष सुरु केला. या संघर्षाचे नेतृत्व करणारे अनागारिक धम्मपाल यांनी या आंदोलनाची सुरुवात करुन महाविहार मुक्तीसाठी प्रथम लढ्यास सुरुवात केली.. हे आंदोलन त्यांनी महाबोधी सोसायटीच्या माध्यमाने आपल्या जीवनभर सुरु ठेवले.  परंतु आपल्या जीवनकाळात त्यांना महाबोधी विहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देता आले नाही. शेवटी त्यांनी 1933 साली सारनाथ येथे चिवर धारण करुन आपली जीवनयात्रा संपविली. मृत्यूच्या दारात असताना ते म्हणत -``महाविहार बौध्दांच्या स्वाधीन करण्याचा संघर्ष सतत सुरु ठेवण्यास व बुध्दांच्या दिव्य संदेशाचा आणि उपदेशाचा प्रचार - प्रसार करण्यास मला भारतात 25 वेळा जन्म घ्यावा लागला तरी चालेल.'' 

या प्रगाढ इच्छेने त्यांनी आपल्या जीवनाचा प्रवास संपविला. संपूर्ण बौध्दविश्व त्या महान धम्म सेनानीला कृतज्ञ भावनेने नतमस्तक होत राहिल. अनागारिक धम्मपालांनी लावलेली क्रांतिची ज्योत अनेक बौध्द भिक्खू आणि उपासकांनी  सतत प्रज्ज्वलित ठेवण्याचा प्रयत्न केला.महाविहार मुक्तीसाठी अनेक आंदोलने केली, जागतिक पातळीवर जनजागृतीही झाली. परंतु भारतामध्ये मात्र या आंदोलनाला विशेष प्रतिसाद मिळत नव्हता. कारण भारतात बौध्द अनुयायांची संख्या अत्यल्प होती. 

 1956 मध्ये ऐतिहासिक धर्मांतराने एकाच दिवशी या देशात कोट्यवधी बौध्द अनुयायी निर्माण करण्याची किमया डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखविली. यापुढे ते होणे नाही. त्या दिवसापासून या देशात पुन्हा बुध्दधम्म पुर्ण प्रकाशित झाला आणि बुध्द संदेशाचे वारे भारतात वाहु लागले. तथागत बुध्द व त्यांचा धम्मोपदेश सामान्य माणसांपर्यंत पोहचू लागला आणि सामान्य माणसाला आपल्या संस्कृतीची जाणीव होऊ लागली. हा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता अनेक युवकांनी परिश्रध्देने गृहत्याग करुन अंगावर चिवर धारण केले आणि धम्म प्रचाराचे कार्य सुरु केले. पु. भदन्त आनंद कौसल्यायन, पु. भदन्त धम्मकिर्ती महाथेरो, पु. भिक्षु जगदीश कांस्य आणि भिक्षु विद्वान पु. भदन्त राहूल सांस्कृत्यायन आदी भारतीय भिक्खूं तसेच पु. भदन्त चंद्रमणी महास्थवीर, तसेच  म्यानमांर, श्रीलंका आदी देशामधील अनेक विद्वान बौध्द भिक्खू भारतातील नवदीक्षित बौध्दांना बुध्दधम्म आणि संस्कृतीचा प्रचार आणि प्रसारासाठी सहकार्य देऊ लागले. जपान, थायलंड, बर्मा, श्रीलंका, तिबेट, तायवान, इंग्लंड, चीन आदी बौध्द राष्ट्रातून बौध्द धम्म आणि प्रचाराला सात्यता मिळू लागली. भारतात बौद्ध धम्माचा वृक्ष फोफावू लागला  

महाबोधी विहार हे संपूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात यावे.. त्यावर बौध्दांचाच संपूर्ण अधिकार असावा आणि आपल्या संस्कृतीचे रक्षण व्हावे. याकरिता भारतातील बौध्दांनी हे आंदोलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीपासून पुन्हा सुरु केले. या महाविहार मुक्ती आंदोलनाचा इतिहास 100 वर्षानंतर पुन्हा घडू लागला  या आंदोलनाची सुरुवात 1992ला नागपुरच्या दिक्षाभूमीवर झाली. हजारो बौध्द उपासक-उपासिका संकल्प करुन बोधगयेला निघाले आणि त्या ठिकाणी आपल्या संवैधानिक मागणीसाठी सत्याग्रह करु लागले. हाचं शंभर वर्षानंतर बोधगयेच्या भूमिवर दुसऱया टप्प्यात सुरु झालेला हा पहिला सत्याग्रह होय. 

महाविहार मुक्ती आंदोलनाचा संघर्ष प्रथम 1992 साली. पु. भदन्त संघरक्षीत महाथेरो-नागपूर यांच्या नेतृत्वात मायनॉरिटीज अॅन्ड डिप्रेस क्लास मिशन अर्थात दलित आणि अल्पसंख्याक अनुशेष या संघटनेच्या माध्यमातून झाला.. संघटनेचे प्रमुख सुत्रधार डॉ. रमेशचंद्र उमरे हे होते.  भदन्त बोधीरत्न यांनी संघटक म्हणून काम पाहिले  

सध्या भन्ते नागार्जुन सुरई ससाई यांना बुध्दगया मुक्ती आंदोलनाचे नेतृत्व करित आहेत. दलित, अल्पसंख्याक मायनॉरिटी कमिटी बरखास्त करुन त्या कमिटीची `बुध्द महाबोधी महाविहार ऑल इंडिया अॅक्शन कमिटी', त्याचें बोधगया मुक्ती आंदोलन समिती या नावाने नामकरण करण्यात आले. 

 14 आक्टोबर 1992 ला महाविहार मुक्ती आंदोलनाच्या जनाजागृतीसाठी मुंबईतील चैत्यभूमी ते बोधगया रॅली काढण्यात आली.  ही धम्मरॅली मुंबई, ठाणे, नगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती मार्गे नागपुरला आली. नागपूरवरुन ही रॅली भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा मार्गे दिल्लीच्या बोट क्लबवर पोहचली. बोटक्लबवर हजारो उपासक आणि उपासिकानी भव्य प्रदर्शन केले. तेथे भारताच्या पंतप्रधानांना महाबोधी विहारमुक्तीचे निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर कानपूर व लखनऊ मार्गे बोधगयेकडे रवाना झाले. अनेक ठिकाणी विरोध करण्यात आला. या रॅलीला अडविण्याचा प्रयत्न झाला.. शेवटी मोठ्या प्रयत्नाने रॅली बोधगया येथे पोहचली. तेथे तत्कालिन मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना निवेदन देण्यात आले. 

 त्यानंतर 23 ऑक्टोबरला दुसरा टप्पा सुरु झाला होता.यामध्ये दिल्लीला धरणे आंदोलनची सुरुवात झाली होती. जवळ जवळ तीन महिने हे धरणे आंदोलन सुरु होते.  परंतु 6 डिसेंबर 93 रोजी बाबरी मस्जिद हिन्दुंनी पाडल्यामुळे या देशात अराजकता निर्माण झाली होती. या कारणमुळे पुढील आंदोलन स्थगित करण्यात आले.  

आयोजनाचा तिसरा टप्पा 1993 या बुध्दजयंतीला सुरु करण्यात आला. देश-विदेशातून येणाऱ्या शेकडो बौध्दांना महाबोधी विहाराची दुर्दशा कळावी आणि बौध्दांवरील अन्यायाला पुन्हा वाचा फोडावी याकरिता बोधगयेचा पर्वावर तिसरा टप्पा देण्यात आला. या तिसऱ्या पर्वामध्ये भंदन्त सुरई ससाई, भिखू आनंद, भंते करुणाशिल आणि भन्ते बोधीरत्न यांच्या प्रखर वाणीने बोधगयेमध्ये लाखो लोकांच्या मनामध्ये याविषयी जागृती करण्यात आली. पुन्हा लालूप्रसाद यादवांना निवेदन देऊन तिसरा टप्पा पूर्ण झाला 

अयोध्येमधील बाबरी मस्जिद पाडल्यामुळे केंद्र सरकारने एक आदेश जाहीर केला की, कोणतेही मंदिर अथवा प्रार्थनास्थळाला सोडविण्याचा अधिकार केंद्राला राहिल. असा केंद्रिय गृहमंत्री यांनी आदेश जाहीर केला होता. या निर्णयामुळे बोधगयेचा प्रश्न अधिक बिकट झाला. बोधगया प्रबंध कायद्याप्रमाणे या विषयी कोणताही वाद मिटविण्याचा अधिकार राज्यसरकारला होता. परंतु या आदेशामुळे बिहार सरकारचा हा अधिकार काढण्यात आला.  

14 ऑक्टोबर 1993 रोजी पाच हजार बौध्द उपासक-उपासिका यांच्यासह पंतप्रधानांच्या निवासस्थानापुढे धरणे  धरण्यात आली.. त्यावेळी निघालेली भव्य  रॅली पाहून केंद्रसरकारचे प्रशासनसुध्दा हादरले. ही रॅली जंतरमंतरजवळ रोखण्यात आली. त्यानंतर प्रतिनिंधींच्या एका शिष्टमंडळाने पंतप्रधानांच्या कार्यालयात जाऊन केंद्रिय मंत्री भुवनेश्वर चतुर्वेदी यांची भेट घेतली त्यांनी ही  समस्या सात दिवसात सोडविण्याचे आश्वासन दिले आणि तोपर्यंत सात दिवस लाल किल्ल्याच्या पाठीमागे सर्वजण तटस्थ राहिले.मात्र सात दिवसानंतर गृहराज्यमंत्री रामलाल राही यांनी एक लिखित पत्र दिले. त्यामध्ये त्यांनी ही समस्या पूर्णपणे  राज्यसरकारच्या क्षेत्रातील आहे असे सांगितले. अशाप्रकारे सरकारने  आंदोलकांना पूर्णपणे फसवले. 

बिहार राज्यसरकार आणि केंद्रसरकार यांनी मिळून बौध्दांच्या न्याय मागणीला कोणताही प्रतिसाद न देता टाळाटाळ करण्याचे काम केले. अद्यापही करित आहेत.  त्यामुळे संतप्त होऊन शेकडो भिक्खूंनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले. शांतीघाट मार्गावर सुरु केलेल्या या आंदोलनामुळे चारही बाजुचे रस्ते बंद झाले. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करुन पंतप्रधानाची भेट घालून देण्याचे वचन देऊन पंतप्रधान निवासस्थानी नेले.मात्र पंतप्रधानाऐवजी पुन्हा भुवनेश्वर चतुर्वेदी यांनी लालूप्रसाद यादवांसोबत चर्चा करुन हा प्रश्न ताबडतोब सोडविण्याबाबत आश्वासन दिले व चौथा टप्पा समाप्त झाला. 

यानंतर पाचवा टप्पा पुन्हा बोधगया येथे सुरु झाला. पाचव्या टप्प्यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी उत्तर दिले की, भगवान बुध्द हे विष्णुचे अवतार असल्याने बोधगयेच्या महाबोधी महाविहारावर बौध्द आणि हिंदू यांचा सारखच हक्क आहे. लालूप्रसाद यांच्या वक्तव्यांने आक्रोश निर्माण झाला. कारण भगवान बुध्द हा विष्णुचा अवतार आहे आणि  या एकाच मुद्यामुळे हिन्दुंनी त्यावर ताबा ठेवला आहे. राज्यसरकारच्या या धोरणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. अॅड. शांतिभूषण हे या खटल्याचे वकील होते. याबरोबर पाचवा टप्पा पूर्ण झाला.  

प्रत्येक टप्प्याला भारताच्या विभिन्न राज्यातून लाखो उपासक-उपासिका या आंदोलनामध्ये सहभागी होत होते. शेकडो युवक या मुख्य आंदोलनाकरिता उभारलेल्या धम्मसेनेमध्ये स्वयंइच्छेने मुंडन करुन बौध्द भिक्खू बनत होते.  

यानंतर 14 आक्टोबर 1994 मध्ये सहावा टप्पा सुरु झाला. या टप्प्यामध्ये आतापर्यंत झालेल्या जनजागृतीमुळे लाखो लोकांच्या उपस्थितीत बोधगयेला 6 डिसेंबर दरम्यान तीन दिवसपर्यंत राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आले. या संमेलनात दोन लाख लोकांनी पाटणा येथे बुध्दधम्मची दीक्षा घेतली अशाप्रकारे भारतभर या आंदोलनाने धम्मक्रांति सुध्दा होऊ लागली.  

सातवा टप्पा पुन्हा बोधगयेमध्ये घेतला.  देशविदेशातील अनेक बौध्द प्रतिनिधी या आयोजनात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकार्य करीत होते. भारताच्या बाहेरील बौध्द राज्यामध्ये या आंदोलनाचे लोन पसरले होते. आतापर्यंत प्रत्येक राज्यातील बौध्दांना या आंदोलनाची माहिती झाली होती. येथील आरएसएस आणि ब्राम्हणवादी संघटनांनी आंदोलनाविषयी खोटा प्रसार सुरु केला आणि हे आंदोलन म्हणजे महाराष्ट्रातील काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी केलेली कृती असा प्रचार केला.  

यानंतर आठवा टप्पा व नववा टप्पा दिल्लीमध्ये घेण्यात आला. लाखेंच्या संख्येने संमेलित होणाऱया आंदोलनकर्त्यांवर अत्याचार होऊ लागले. या आंदोलनाला हिंसक वळण लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही घुसखोर बौध्द भिक्षू (जे आरएसएसचे प्रचारक होते) त्यांनी या आंदोलनाचा वेगळाच वापर केला. काही राजकीय नेत्यांनी याच  बौध्दभिक्खूंना पुढे करुन या आंदोलनाचा वेगळा वापर करून आपलाही राजकीय स्वार्थ साधला.   

भंते सुरई ससाई यांच्या नेतृत्वाबाबतही लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला.आणि महाविहार मुक्ती आंदोलनाला राजकीय स्वरुप देण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे या आंदोलनाचे स्वरुप बदलत गेले. हे आंदोलन ज्या उद्देशाने सुरु झाले होते तो उद्देsश म्हणजे हा महाबोधी विहार संपूर्णपणे भारतीय बौध्द भिक्खूंच्या  स्वाधीन करण्यात यावे आणि बोधगया व्यवस्थापन समिती विसर्जित करण्यात यावी. बोधगयेचा काळा कायदा समाप्त व्हावा आणि या विहारावरुन हिन्दुत्वांचे वर्चस्व पूर्णपणे नष्ट  व्हावे. याकरिता बोधगया मंदिर 1949 बोधगया कायदा रद्द करावा आणि बोधगया कायदा 1991 लागू करण्यात यावा अशाप्रकारे या आंदोलनाचा उद्देश होता. परंतु या उद्देशांना बाजुला सारुन आंदोलनातील काही राजकीय हस्तक्षेप असणाऱया मंडळींनी जाविणपूर्वकरित्या  घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयाने या आंदोलनातील लोकप्रियता व शक्ती कमजोर केली.. त्यामुळे बिहार सरकार  व केंद्र सरकारवर जनशक्तीचा पडणारा दबाब कमी होत गेला. 

या आंदोलनाच्या  नवव्या  टप्प्यात लाखेंच्या संख्येनी संपुर्ण देशातील प्रत्येक राज्यातुन अनेक बुध्द अनुयायी  सहभागी होत होते. अनेक प्रकारच्या यातना आणि हालअपेष्टा सहन करित लाखो स्त्री-पुरुष रेल्वे मार्गानी बोधगया आणि दिल्ली येथे पोहचले. आंदोलनाकरिता स्त्रीयांची संख्या जास्त प्रमाणात होती. मात्र तथाकथित आरएसएस धार्जिण्या  भिक्खूंनी `हे आंदोलनकर्ते दिल्लीला व गयेला केवळ फिरण्यासाठी आले आहेत' असे चित्र निर्माण केले.  त्यामुळे भिक्खूसघात वितुष्टता निर्माण झाली. अनेक आरएसएसधार्जिणे भिक्खू या आंदोलनाद्वारे जनतेची फसवणूक करीत होते. बोधगया आणि बौध्द स्थळांना पाहण्यासाठी त्यांच्याकडुन दान गोळा करीत होते त्या दानाचा दुरुपयोग करीत होते; तर काही आपल्या स्वार्थासाठी  त्याचा वापर करीत होते. त्यामुळे आंदोलनाचा परिणाम कमी कमी होत गेला. केवळ फिरण्यासाठी आंदोलनात संमेलित झालेले लाखो लोक दुसऱया किंवा तिसऱया दिवशी आंदोलन सोडून परत जात होते. आंदोलन कमजोर करण्यासाठी वापरलेल्या नितीचा भाग म्हणजे अनेक हिन्दुत्ववादी तरुण आरएसएसद्वारे तात्पुरते श्रामनेर बनले. असे लोक अनुशासनहीन असल्यामुळे चिवर धारण करुन वाटेल ते अकुशल कर्म करीत असताना इतरांच्या दृष्टिस पडत होते. त्यामुळे विरोधकांना अपेक्षित असलेल्या विचारांप्रमाणे आंदोलन कमजोर होत गेले.  

या आंदोलनाचा मूळ हेतू साध्य व्हावा  आंदोलन पुन्हा गतिशील व्हावे आणि प्रामाणिक कार्यकर्ते योग्य दिशेने कार्य करण्याकरिता पुढे यावे. 

बोधगया कायद्याप्रमाणे चार  हिंदू , चार बौध्द आणि एक जिल्हाधिकारी असे नऊ लोक या समितीचे सदस्य आहेत. त्यापैकी जिल्हाधिकारी हा महाबोधी विहाराचा पदसिध्द अध्यक्ष असल्याने तो हिंदू असावा या प्रमुख अटीमुळे आपोआप पाच सदस्य होतात. बहुमत हिंदूंचे असल्यामुळे सर्व निर्णय हिंदूंच्या हिताचे होत आहेत. त्यामुळे हा कायदा रद्द होणे गरजेचे आहे.. त्यामधील चार बौध्द सदस्य कोणत्याही व्यक्तिला कोणत्याही सोयीनुसार असलेले समर्थन असणारे कोणतेही चार लोक नियुक्त केले जातात. त्यामुळे तथाकथित चिवरधारी जे आरएसएसच्या माध्यमातून भिक्खूसंघात सामिल होतात. ते मानसिक रुपाने हिंदू सदस्य असल्यामुळे तेथील महाबोधी विहाराची विटंबना आणि बौद्ध संस्कृतीची निरंतर हानी करण्याचे कार्य केले जात आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सर्वच बौध्द सदस्य असावेत अशी मागणी अनागारिक धम्मपालांनी केली होती. 

मात्र आजही  हिन्दुचे वर्चस्व कायम आहे आणि काहीजण त्यामध्ये  त्यांचे भागीदार, गुलाम बनले आहेत. याकरिता सामान्य जनतेने जागृत होऊन आवाज उठवला पाहिजे. बोधगया महाबोधी महाविहार आयोजकाची घटनात्मक बाजू मजबूत केली पाहिजे  आणि भारतीय संविधानाच्या अनुसार कायद्याची शक्ती आणि विशाल जनशक्तिच्या जोरावर आपले अधिकार आपण प्राप्त केले पाहिजे. जे अधिकार मागून मिळत नाही, त्याकरिता घटनात्मक संघर्ष करुन मिळवावेत या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या प्रेरणेनुसार; आदेशाप्रमाणे आता आम्ही जागृत झालो पाहिजे. आणि महाविहार मुक्ती आंदोलनाचा संघर्ष घटनात्मक पध्दतीने सुरु ठेवला पाहिजे, जागृत बौद्ध युवक-युवतींनी  या आंदोलनाठी संघटित व्हावे आणि महाबोधी महाविहार संपूर्णपणे बौध्दांच्या स्वाधीन व्हावे याकरिता सर्व मतभेद विसरुन व राजकीय स्तरावरील आंबेडकरी संघटनांनी तसेच भारतातील सर्व भिक्खू आणि त्यांच्या संघटनांनी, उपासक आणि उपासिकांनी  त्या न्याय मागणीसाठी बौध्द संस्कृतीच्या संरक्षणासाठी बौध्दांच्या हिताचे आणि अधिकाराचे रक्षण करण्यासाठी निश्चित भावनेने;  प्रसंगी आपल्या सर्वस्वाचा त्याग करुन; बुध्द शासन चिरकाळपर्यंत प्रतिष्ठित करण्याच्या या महत्वपूर्ण संघर्षात धम्म सैनिक बनून सहभागी होणे आणि बुध्दमय भारताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने आता सज्ज झाले पाहिजे. 

‡‡‡ 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com