Top Post Ad

उदासिन समाज... दुर्लक्षित बुद्धलेण्या...


 भारतात सुमारे  1200 लेणी (गुंफा, गृहा) सापडल्या आहेत. यापैकी सुमारे 615 लेण्या महाराष्ट्रात विविध ठिकाणी बौद्ध संस्कृतीचा वारसा जतन करीत आहेत. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून देशाच्या विविध विभागात बौद्ध लेणी अस्तित्वात आहेत. याचे पुरावे पुरातत्व विभागात पहायला मिळतात. खरं म्हणजे लेणी खोदण्याची मूळ कल्पना बौद्धांचीच या लेण्यांमुळेच बौद्ध धम्माचा इतिहास हजारो वर्षानंतरही आजही अस्तित्वात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 1956च्या विजयादशमीला आपल्या लाखो अनुयायांसमवेत स्वीकारलेल्या बौद्ध धम्मामुळे भारतातून हद्दपार झालेल्या या धम्माला नवी संजीवनी मिळाली आणि आपसूकच बौद्ध लेण्यांमध्ये असलेला बौद्धांचा इतिहास पुसून टाकणें जातीयवाद्यांना अशक्य होऊन गेलें, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिन्दू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म स्वीकारनें येथील कर्मठ सनातनी हिन्दूंना रुचलें नाही. आणि म्हणूनच बौद्ध धम्माच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी लेणी उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान सुरु झाले. 

कान्हेरी लेणी मुंबई उपनगरीय पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवली या स्थानकापासून पाच मैल व समुद्रसपाटीपासून सुमारे 1500 फूट उंचीवर आहे. ही ही लेणी कन्हागिरी या डोंगरात कोरलेली असून तेथे एकूण 128 लेण्यांचा समूह आहे. त्यात 27 लेण्या या सुस्थितीत आहेत, 128 लेण्यांपैकी 56 लहान विहार त्यापेकी 15 मोडकळीस आलेल्या स्थितीत. तर 1 चैत्यगृह, 1 सभामंडळ  आहेत. कान्हेरी येथील लेण्यासंबंधीचे संशोधन डॉ.जेम्सबर्ड यांनी केले आहे. डॉ.जेम्सबर्ड यांना इ.स.1839 मध्ये दोन ताम्रपट सापडले.  त्यातील एका ताम्रपटावर कन्हागिरी महाविहारात सूर्यचंद्र आणि  समुद्र असे पर्यंत राहणारा हा स्तूप आहे असा उल्लेख आहे. कन्हगिरी या नावाचा कान्हेरी असा अपभ्रंष झाला असून त्यावरून या लेण्यांस कान्हेरी लेणी म्हटले जाते. 

प्राचीन काळी कोकणाचे व्यापारी बंदर व राजधानी असलेले सुप्पारक (सोपारा) कल्याण, चेंमुलद्वीप (चेंबूर), ठाणे वस्य (वसई) घोडबंदर इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणच्या मध्यावर असलेल्या साष्टी बेटातील अरण्यात कान्हेरी लेणी इ.स.पूर्व दुसऱया दशकापासून खोदण्यास सुरुवात झाली. इ.स.11व्या शतकापर्यंत या लेण्यांचे खोदगाम सुरु होते.लेण्यातील चैत्यगृह गौतमीपुत्र सातकर्णी (इ.स.173 ते 211) या राजाच्या काळात खोदण्यात आले. कान्हेरी लेणीचे सुरुवातीचे खोदकाम गजसेन व गजमिल यांनी केले. सातवाहनांनंतर शीलहार राजे यांच्या आश्रयाने बौद्ध भिक्खू, उपासक अनेक व्यापारी यांच्या धम्मदानातून विहार, पाण्याचे हौद, बैठक कक्षा इत्यादीचे काम पूर्ण केले असा उल्लेख कान्हेरी लेण्यांच्या संदर्भात सापडलेल्या 58 शीललेखावरून आढळतो. लिपी व अक्षराच्या वळणावरून 10 शीलालेख 5 व 6 व्या शतकातील,  1 लेख 8व्या शतकातील, 3 शीलालेख 9व्या शतकातील असल्याचे मानले जाते.  

त्याचप्रमाणे पुणे-मुंबई मार्गावर पुण्याहून 57 कि.मी.अंतरावर मळवली (जि.पुणे) स्थानकापासून 3 कि.मी.उत्तरेला एका डोंगरात कार्ले-गुंफा खोदलेली आहे. याला विहारगाव असेही म्हणतात. कारण गुंफेजवळ बौद्ध भिक्खूना राहण्यासाठी खोदलेले विहारही आहेत.ही गुंफा इ.स.च्या 1ल्या शतकात खोदलेली असावी. हे एक चैत्यगृह आहे. त्याच्या गाभाऱयात स्तूप (दागोबा, धातुगर्भ) आहे. तोही खडकात खोदून काढलेला आहे. या गुंफेच्या प्रवेशद्वाराजवळ डाव्या हाताला एक मोठा स्तंभ असून त्याला चार सिंह आहेत. स्तंभाच्या कळ्या छताच्या खडकाला भिडलेल्या आहेत. या स्तंभावरील एका शिलालेखात ही महारथीची देणगी असल्याचे लिहिले आहे. चैत्यगृहाचे दर्शनी तोरण अत्यंत भव्य असून त्याची बाह्यरेषा गतिमान झेपावर वर वर जाते अशी वाटते. त्याची दोन्ही टोके थोडी आत खेचलेली असल्यामुळे त्याला घोड्याच्या नाल्यासारखा आकार प्राप्त झाला आहे. गुंफेसमोर भिंतीच्या खालच्या बाजूला पूर्णाकार हत्तीची मोठी रांग आहे. या भिंतीच्या आत लांबचौकोनी सोपा असून चैत्यगृहात जाण्यासाठी तीन दरवाजे आहेत. मधल्या दरवाज्यावर तोरण आहे. चैत्यगृहाची लांबी अडतीस मीटर, रुंदी चौदा मीटर व उंची तेरा मीटर आहे. दरवाज्याच्या वरील बाजूस एक अर्धचंद्राकृती गवाक्ष असून त्यातून सूर्यप्रकाश अंतर्भागात जातो. 

अंतर्भागातील नक्षीकाम साधेच असून त्याच्याभोवती जाळीचे कुंपण कोरलेले आहे. या गुंफेत बुद्धाच्या अनेक मूर्ती आहेत. हे शिल्पकाम अप्रतिम आहे. मुख्यद्वाराच्या उजव्या बाजूला सिंहास्तंभावर बसलेला बुद्ध दिसतो. या चैत्यगृहात अनेक शिलालेख कोरलेले आहेत. एका शिलालेखात ही गुंफा अखिल जम्बूद्विपात (भारतात) अद्वितीय असून ती वैजयंतीच्या भूतपाळ नामक सावकाराने पुरी केली असे शब्द आहेत. वैजयंती म्हणजे कर्नाटकातील वनवासी होय. कमानीच्या शेवटचा् भिंतीवर तीन भव्य गजराज उभे असून त्यांच्या खाली आणि वर जाळीदार नक्षी कोरलेली आहेत. गुंफेतील स्तूपावर एक लाकडी छत्री दिसते. त्याच्या समोर भव्य सभा मंडप आहे. त्याची लांबी 38 मीटर, रुंदी 14 मीटर व उंची 14 मीटर आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना 15-16 स्तंभ असून त्यामुळे दोन्ही बाजूंना नासिका तयार झाल्या आहेत. हे स्तंभ अष्टकोणी असून त्यांचा पायथा कुंभाकृती आहे. त्यांच्या एका बाजूला हत्ती दुसऱया बाजूला घोडस्वारांच्या मूर्ती आहेत. या स्तंभाच्या माथ्यावर घटाकार मथले असून त्यांवर आमलक आणि त्यावर वाढत्या आकाराचे फलक आहेत.  

सर्वात वरच्या पाठ्यांवर सिंह, हत्ती, घोड व त्यांच्या पाठीवर आरूढ अशा स्त्री-पुरुषांच्या पूर्णाकृती कोरलेल्या आहेत. या चैत्यगृहासाठी ज्यांनी दान दिले त्यांच्या मुर्तीही आहेत. दरवाज्यावरील गवाक्षाच्या दोन्ही अंगी विविध प्रकारच्या मूर्ती असून अनेक मजले, सज्जे यांच्या प्रतिकृतीही कोरलेल्या आहेत. या सर्व शिल्पकामात सफाई आहेच. मात्र ही वास्तू अत्यंत भव्य असूनही प्रमाणबद्ध खोदलेली आहेत. चैत्यगृहाच्या डाव्या बाजूकडील खडकात अनेक लहान खोल्या खोदून काढलेल्या आहेत. एका खोलीत एक बुद्धमूर्ती असून दोन्ही बाजूला बोधिसत्व उभे आहेत. दुसऱ्या विहाराच्या तळघरात पाण्याची टाकी आहे. चैत्यगृहाच्या दक्षिणेस एक मोठे विहार असून त्याच्या मागल्या भिंतीत एक बुद्धमूर्ती आहे. ती कमळाधिष्ठित असून कमळाखाली दोन हरिणांच्यामध्ये चक्र आहे. मागे दोन पूजक आणि वर दोन विद्याधर आहेत. एकेकाळी इथल्या सर्व खांबावर मातीच्या पातळ गिलाव्यावर काढलेली चित्रे असावी असे वाटते. उजव्या बाजूला दहाव्या खांबावर असे एक चित्र आढळते. इतर काही खांबावरही अशी चित्रे दिसतात. 

अशाच काहीशा कमी-अधिक फरकाने महाराष्ट्रात लेण्यांचे जाळे पसरले आहे. मात्र सध्या या लेण्यांकडे शासनाच्या पुरातन खात्याचेच नव्हे तर बौद्ध समाजाचेही दुर्लक्ष झाले आहे.  महाराष्ट्रात बहुतेक डोंगराळ भागात ज्या काही कोरीव लेण्या व गुंफा आहेत त्या सर्व बौद्धभिक्खूंनी आपल्या आश्रयासाठी कोरल्या. बौद्ध संस्कृतिमध्ये वर्षावासाला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. त्याकाळी अनेक ठिकाणी वर्षावास होत असत व सारे वातावरण धम्ममय होऊन जात असे. वर्षावास हा आघाढी पौर्णिमेला सुरु होतो व अश्विनी पौर्णिमेला संपतो. हा कालखंड पावसाळ्याचा कालखंड असतो. वैशाखाच्या कडक उन्हाचा ताप कमी कमी होत जातो. वातावरणात सुखद गारवा असतो. म्हणून हा कालखंड धम्मश्रवणास योग्य असतो. 

चरथं भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय बहुजन सुखाय, या बुद्धांच्या आदेशाला अनुसरून बुद्धांचा भिक्खूसंघ वर्षभर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चारिका करीत धम्म प्रचाराचे व प्रसाराचे कार्य करीत असत. पावसाळ्यात या चार महिन्याच्या काळात त्यांच्या या धम्म प्रचाराला मर्यादा पडत असत. पावसाळ्यामुळे भिजलेले एकमेव चिवर लवकर वाळत नसे व ओले चिवर वापरल्याने आजारी पडण्याचे संभवत असे. पूर्वी येण्याजाण्यासाठी आजच्याप्रमाणे वाहने उपलब्ध नव्हती पायी प्रवास करावा लागत असे. रस्त्यात पाणी साठलेले असल्याने रस्त्याने चालणे कठीण असे. पावसात वाढलेल्या गवतातून व झाडाझुडपातून अनेक जीवजंतू आढळत असल्याने रस्त्याने चालणे कठीण होत असे. या अडचणी लक्षात घेऊन चरथ भिक्खवे चारिकं आदेशाऐवजी भिक्खू या वर्षावासाच्या कालखंडात एखाद्या विहारात किंवा लेण्यात वर्गाभ्यास, प्रवचने व तेथील आसपासच्या लोकांत धम्माचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य करीत असत. 

मात्र काळाच्या ओघात या लेण्यांकडे दुर्लक्ष झाले. बौद्धधम्मावर झालेले ब्राह्मणी आक्रमण याला कारणीभूत ठरले. बौद्धधम्म भारतातून परांगदा झाला आणि लेण्याही लोकांना दिसेनाश्या झाल्या.  बौद्ध संस्कृतीचे अस्तित्व सांगणाऱ्या   या लेण्यांना कोणी पांडव लेणी तर कोणी महाकाली या नावाने संबोधू लागले इतकेच नव्हे तर प्रचंड गुंफा असलेल्या डोंगराला पाटणादेवीचा डोंगर म्हणण्यात येऊ लागले आहे. लेण्यांची मोडतोड करून प्रचंड मंदिराची निर्मिती होऊ लागली कान्हेरी लेण्यांमध्ये आणि मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या कार्ले येथील लेण्यांमध्ये सर्व कायदे आणि नियम धाब्यावर बसवून राजरोसपणे मंदिराची उभारणी करण्यात आली.. या साऱ्या प्रकाराकडे शासनाच्या पुरातन विभागाने लक्ष्य द्यायला हवे. मात्र तेथील अधिकारीही हिन्दु संस्कृतीशी संबंधित असल्यामुळे  या गोष्टींकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसतात. 

जेथे जेथे लेण्या आढळतात तेथे तेथे हिन्दू संस्कृती धार्जिण्या लोकांनी आपली मंदीर उभारली आहेत. ही बांधकामे हल्लीच झालेली आहेत हे स्पष्टपणे दिसते. नाशिक येथील पांडवलेणी ओळखण्यात येणाऱया लेणी जवळ एका हिन्दू देवतेचे मंदीर आहे. विरार येथील जीवदान मंदीर, जोगेश्वरीच्या लेण्यांचे रुपांतर शिव मंदिरात, दहिसर पूर्वेला असणाऱया गुंफेत शंकराच्या पिंडीची स्थापना, पूर्वी त्या ठिकाणी तथागत बुद्धांची भव्य उभी मूर्ती होती मात्र ती छाटून काढली असल्याचे स्पष्टपणे दिसते. तसेच बाहेर दरवाजाजवळ दोन्ही बाजूस सिंहाच्या दोन मुर्त्याही तोडून टाकण्यात आल्या. आहेत. व त्या मुर्त्या  नंदीच्या होत्या असा कांगावा करण्यात आला आहे. अंधेरी जवळील महाकाली गुंफा ही सुद्धा बुद्धगुंफा मात्र तिथे आता महाकालीचे मंदीर आहे. पूर्वी तिचे नाव वेरावली असे होते. या गुंफेवर पुरातन विभागाने बुद्धगुंफा म्हणून देखरेखीची व्यवस्था केली आहे. पण त्याला कोणीही जुमानत नाही. अगदी अलिकडे तर तिथे बांधकाम झाल्याचेही वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाले होते. 

बोरिवली येथील कान्हेरी गुंफेबाबत तर न बोलणे बरे. या गुंफेच्या मध्यभागीच कोणत्यातरी बाबाचे दुमजली मंदीर निर्माण करण्यात आले. लेण्यांच्या आजूबाजूच्या परिसरात नवीन बांधकाम करण्यास परवानगी नसतानाही गुंफेच्या मध्यभागी दुमजली मंदीराचे बांधकाम होईपर्यंत पुरातन खाते काय करीत होते. हा मोठा गहन प्रश्न आहे. यासाठी अनेक संस्था संघटनांनी आंदोलने झाली  मात्र ही तात्विक आंदोलने बेडकाप्रमाणे ठरली. पावसाळा आला की बेडूक ओरडतो आणि पावसाळा संपला की त्याचे डरावणे लुप्त होते. असाच काहीसा प्रकार या आंदोलनाबाबत झाला. मात्र मंदिर जैसे थे राहिले. आजही या परिसरात वर्षाला एक धम्म मेळावा आयोजित करण्यात येतो. मात्र या मेळाव्यामधून कोणतेही ठोस आंदोलन उभे राहू शकले नाही. लोक मेळाव्याच्या निमित्ताने जमतात, सहल म्हणून आनंद घेतात. आणि घरी जाऊन आप-आपल्या कामाला लागतात. मेळाव्याच्या संयोजकांकडूनही याबाबतीत काही ठोस पावले उचलली असल्याचे निदर्शनास येत नाही.  

मेळाव्याच्या सुरुवातीच्या काळात अनेक तरुणांनी हा मेळावा हिन्दुंच्या महाशिवरात्री दिनीच घेण्यात यावा असा अट्टाहास केला होता. मात्र संयोजकांचे पळपुटे धोरण याला कारणीभूत ठरले. हिन्दुंच्या महाशिवरात्री दिनी या ठिकाणी हिन्दु लोक या बुद्धमुर्त्यांनी नारळ फेकून मारतात. स्तूपावर पैसे चिकटवतात त्यावर गुलाल उधळतात.  सुरुवातीच्या दोन तीन वर्षे याविरोधात संयोजकांनी यावर आवाज उठविल्यामुळे हा प्रकार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र आंदोलनाची धार कमी होताच पुन्हा एकदा जोमाने हा प्रकार होत आहे. जर शिवरात्रीच्या दिवशी हा मेळावा आयोजित करण्यात आला तर बौद्ध समाज उपस्थित असल्यामुळे या प्रकाराला काही प्रमाणात आळा बसल्याशिवाय राहणार नाही. मेळाव्याच्या दिवशी या ठिकाणी जायला बस सेवा उपलब्ध नसते मात्र शिवरात्रीच्या दिवशी अधिक संख्येने बस उपलब्ध करून या ठिकाणी सोडल्या जातात. शिवरात्रीला जत्रेच्या निमित्ताने येणाऱ्या लोकांना येथे तिकीट लागत नाही. मात्र बुद्धपौर्णिमेला येणाऱ्या उपासक-उपासिकांना तिकीट घ्यावे लागते.  त्यामुळे याच दिवशी मेळावा घेतल्यास येणाऱ्या बौद्ध समाजालाही या संधीचा फायदा घेता येईल. यासाठी संयोजकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

पुण्याच्या कार्ला लेण्यांची स्थिती तर आता अधिक दयनीय आहे. काही काळाने तेथे कदाचित लेण्या होत्या का हा प्रश्न पडेल. तेथे असलेल्या मंदिर संस्थानाने हळू हळू आपला पसारा वाढवायला सुरुवात केली आहे. काही वर्षापूर्वी छोटेसे असलेले हे मंदिर भव्य रूप धारण केले आहे. इतकेच नव्हे तर येथील परिसरात अतिथी गृह बांधण्यात आले आहे. अशा तऱ्हेने येथील लेण्याही नामषेश होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठीही 31 जानेवारी 1998 रोजी भदन्त विशुद्धानंद बोधी महाथेरो (औरंगाबाद) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी मंदिर कमिटीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या राजकीय जोरावर हे आंदोलन चिरडून टाकले. येथे वंदना घेणाऱ्या तरुणांना मारहाण केली. इकडून पोलिस तर तिकडून जातियवादी मंडळी अशा चक्रव्युहात अडकलेल्या बौद्ध अनुयायांना त्यावेळी अखेर माघार घ्यावी लागली होती. 

बौद्ध असलेल्या समाजाला त्यांच्याच संस्कृतीचा एक भाग असलेल्या लेण्यावर न जाता तसेच परत यावे लागले. याचा धिक्कार नंतर अनेक स्तरावर झाला..त्यानंतर 30 जानेवारी 1999 रोजी पोलिस अधिकारी, मंदिर विश्वस्त, पुरातन विभागाचे अधिकारी आणि अखिल भारतीय बुद्धलेणी बचाव समितीचे अध्यक्ष यांच्यात चर्चा झाली आणि सर्वानुमते असे ठरविण्यात आले होते की बुद्धमूर्तीसमोर बसविलेले शिवलिंग काढून टाकण्यात येईल आणि विहाराची/लेण्यांची देखभाल करण्यात येईल. मात्र या गोष्टीचे भान आजही आंदोलनकर्त्यांना किंवा बौद्ध अनुयायांना झाले नाही. याचा पाठपुरावा करता आला नाही आणि या लेण्यांकडेही दुर्लक्ष झाले. अशा तऱहेने अधुनिक युगात या लेण्यांची जागा प्रचंड मंदिरांनी घेतली आहे. येणाऱ्या पिढीला येथे लेण्या होत्या का? हा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही? 

------

सुबोध शाक्यरत्न


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com