मुंबई - नुकत्याच झालेल्या औरंगाबादेतील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचा खळबळजनक दावा करत आता त्यांच्याकडेही जातीय दृष्टीकोनातून पाहणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला होता. मात्र राज ठाकरे यांच्या दाव्यानंतर लोकमान्य टिळकांचे खापर पणतू कुणाल टिळक म्हणाले की, टिळकांच्या घरातील कोणीही शिवाजी महाराजांची समाधी बांधल्याचा दावा केला नाही. मात्र समाधी उभारण्यासाठी पैसे गोळा केले होते असा खुलासा केला. आता कुणाल टिळकांनीच यासंदर्भातील खुलासा केल्याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या दाव्यातील फोलपणा उघडकीस आला आहे.राज ठाकरे यांच्या दाव्यानंतर समाजमामध्यमावर मोठ्या प्रमाणावर टिळकांची आणि राज यांच्या दाव्याची मोठ्या प्रमाणावर टिंगल उडविण्यास सुरुवात झाली. तसेच त्यावरून टीका टीपण्णीही सुरु झाली. यापार्श्वभूमीवर एका दूरचित्रवाणीने कुणाल टिळक यांचीच प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी कुणाल टिळकांनी माहिती दिली. लोकमान्य टिळक असताना शिवाजी महाराजांच्या समाधी उभारणीबाबत तळेगावचे दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात एक बैठक झाली होती. त्याचे अध्यक्षही दाभाडेच होते. समाधी उभारण्यासाठी राज्यातील जनतेकडून पैसे गोळा करण्याचे ठरले. त्यानुसार त्यावेळी काही हजार रूपयेही गोळा करण्यात आले आणि ते त्यावेळच्या डेक्कन बँकेत ठेवण्यात आले. त्या पैशातूनच सरकारी प्रॉमिसरी नोट वगैरे खरेदी करण्यात आली होती.
0 टिप्पण्या