ठाण्याची शिवसेना अर्थात आनंद दिघे

 धर्मवीर -मुक्काम पोस्ट ठाणे' च्या निमित्ताने.....


ठाण्याची शिवसेना अर्थात शिवसेनेचे ठाणे हा ठाण्यातील शिवसेनेचा  सत्तेचा राजमार्ग टेंभीनाक्यावरून जातो. जो आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून... धार्मिक अंग असलेल्या आनंद दिघेंनी आपल्याच  पक्षाची सत्ता असतानाही टक्केवारीचे प्रकरण चव्हाट्यावर आणले तरी ठाण्याची सत्ता हातची गेली नाही. इतकं त्याचं धार्मिक अधिष्ठान होतं.  `ठाण्याचे बाबासाहेब ठाकरे' अशी मानाची पदवी मिळणारे आनंद दिघे हे एक अनन्य साधारण व्यक्तिमत्व होते. असं म्हणतात की त्यांच्या पाठीशी एक अध्यात्मिक शक्ती उभी होती. ज्यामुळे कोणत्याही प्रश्नाचं संयमाने उत्तर देणे आणि आक्रमकपणे ते आमलात आणणे, विकास कार्यासोबत आपली धार्मिक वृत्ती जपणे हे त्यांचे वैशिष्ठय होते. टेंभी नाक्यावरचा नवरात्रौत्सव हा त्यांच्या जीवनाचा एक आध्यात्मिक अंगच होता. म्हणूनच  धर्माविरुद्ध कुठेही काही अनुचित घडतांना दिसत असल्यास ते तिथेच थांबवत. असं म्हणतात की, धर्मकार्याबद्दल नुसत्याच घोषणा न देता आपल्या कामाने धर्म  लोकांना शिकवत म्हणूनच शिवसैनिकांनी त्यांना `धर्मवीर' म्हणायला सुरुवात केली. आज पुन्हा एकदा `धर्मवीर' चित्रपटाच्या माध्यमातून आनंद दिघे ठाण्यात अवतरले आहेत.   

27 जानेवारी 1951 रोजी टेंभी नाका, ठाणे येथे जन्मलेले आनंद चिंतामणी दिघे 1966 साली जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा  किशोरवयीन होते. शिवसेनेला पहिली सत्तेची चव ठाण्यानेच दिली. ज्यामध्ये आनंद दिघे यांचा सिंहाचा वाटा होता.  बाळासाहेब ठाकरे यांची ठाण्यातली पहिलीच सभा ऐकून शिवसेनेची धुरा आनंद दिघे यांनी खांद्यावर घेतली. इतकच काय तर यासाठी त्यांनी आई-भाऊ-बहीण असा परिवार असलेलं घर सोडलं.  शिवसेना संपर्क कार्यालय हेच आपलं घर असं म्हणत त्यांनी अविवाहीत राहून आपला संपूर्ण वेळ शिवसेनेसाठी समर्पित केला.   टेंभीनाका परिसरातील `आनंदाश्रम' मधून ते सर्वांच्या तक्रारी ऐकून घ्यायचे आणि त्यावर तात्काळ निर्णय द्यायचे  काम पूर्ण करुन घेण्यासाठी कधी कधी  रोख'ठोक' भूमिका तर काही प्रसंगी हात उचलल्याचेही उदाहरणे आहेत. ठाण्यातील स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी दिघेंनी अनेक प्रयत्न केले अनेकांना स्टॉल उभारुन दिले. तर ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये स्थानिकांना नोक्रया मिळवून देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या याच कामांमुळे त्यांच्या मृत्यूला दीड तप उलटून गेले तरी ठाणेकर त्यांना विसरलेले नाही.  

आनंद दिघेंचे ठाण्यातील कार्य इतके मोठे होते की स्थानिक प्रसारमाध्यमांबरोबर इंग्रजी प्रसारमाध्यमांनीही वेळेवेळी त्यांची दखल घेतली.  परिणामी  प्रशासनापासून सामान्यांपर्यंत एक आदरयुक्त दरारा त्यांच्याबाबत निर्माण झाला होता. इतकेच काय तर त्यांचा `आनंद आश्रम' हे समांतर न्यायालयाच्या भूमिकेत काम करत असल्याची टीका देखील काही मंडळींनी केली होती. त्यांची कामाची आक्रमक पद्धती आणि स्वतच्या बळावर निर्णय घेण्याची क्षमता या सर्वाचा परिणाम त्यावेळी असा झाला होता की,  ही व्यक्ती शिवसेनेत नवीन गट निर्माण करते की काय अशी  शंका निर्माण झाली होती. त्यांच्या लोकप्रियतेचा वाढता आलेख स्वकियांनाच डोईजड होत असल्याची चर्चा नेहमीच त्यावेळी होत असे. बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे आनंद दिघे यांनी कधीच कोणतीही निवडणूक लढवली नाही. पण, त्यांच्या संपर्कात आलेले कित्येक कार्यकर्ते त्यांनी घडवले आणि त्यांना राजकीय पद मिळवून दिले. संपूर्ण ठाणे जिह्यामध्ये 90 च्या दशकात मुख्य शहरांपासून ते थेट वाडा मोखाड्याच्या पाड्यापर्यंत शिवसेना पोहोचवली.   

अशा या लोकप्रिय नेत्याच्या 24 ऑगस्ट 2001 रोजी एका कार्यक्रमाला जात असतांना गाडीला अपघात झाला आणि त्यांच्या पायाला, डोक्याला मार लागला. उपचार घेण्यासाठी त्यांना ठाण्यातील सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करून त्यांच्या जीविताला असलेला धोका टाळण्यात डॉक्टरांना यश आलं होतं. पण, 26 ऑगस्ट 2001 रोजी संध्याकाळी त्यांची प्रकृती खालावली. शिवसेनेचे वरिष्ठ नेते मनोहर जोशी त्यांना भेटण्यासाठी आले होते. तेव्हा कित्येक दिवसांपासून हृदयाचा त्रास होत असल्याची चर्चा डॉक्टरांसोबत झाली. ज्यावर त्यांनी कधीच त्यावर उपचार घेतले नाहीत. संध्याकाळी 7.15 वाजता त्यांना ह्रदयविकाराचा पहिला झटका तर लगेच7 वाजून 25 मिनिटांनी दुसरा तीव्र झटका आला आणि त्यांची प्रकृती आणखीनच खालावली. रात्री साडे दहा वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची हॉस्पिटल प्रशासनाने अधिकृत घोषणा केली.

 आनंद दिघे आपल्याला सोडून गेले हे ऐकताच शिवसैनिकांचे दुःख, राग अनावर झाला. ठाण्यातील शिवसैनिकांनी ठाण्यात एक नेता घडतांना बघितला होता. जो अल्पावधीतच काळाच्या पडद्या आड गेला. आनंद दिघे हे राजकारणात काम करू इच्छिण्राया प्रत्येक शिवसैनिकासाठी एक आदर्श होते आणि आहेत. असा नेता आणि संवेदनशील व्यक्ती पुन्हा होणे नाही हेच खरं. मात्र असं असलं तरी आजही अनेकांच्या मनात त्यांच्या मृत्युचं कोडं काही सुटलेलं नाही. त्यांना कमी वयात म्हणजे वयाच्या पन्नासाव्या वर्षी या जगाचा निरोप का घ्यावा लागला असेल ? त्यांची वाढती लोकप्रियता बघून 2001 मध्ये त्यांचा प्रवास थांबण्यात आला का? हे प्रश्न आजही लोकांच्या मनात आहेत. 2019 मध्ये निलेश राणे यांनी शिवसेना पक्षावर थेट आरोप केला की, शिवसेनेने आनंद दिघे यांचा मृत्यू घडवून आणला, पण, हे सांगतांना त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते. मात्र त्यांच्या आरोपामुळे लोकांच्या मनातील संभ्रमाला अधिक दृढ केले.     

सध्याचे शिवसेना पक्षाचे शहरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे सर्वात जवळचे मानले जातात. त्यांनी `धर्मवीर-मुक्कामपोस्ट ठाणे' या सिनेमाच्या निमित्ताने बोलतांना आनंद दिघे यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या अकाली मृत्यूवर भाष्य केले. मात्र सोशल मिडियावर उमटत असलेल्या प्रतिक्रिया पाहती हे कारण आजही असंख्य शिवसैनिकांच्या पचनी पडत नसल्याचेच दिसत आहेत. 26 ऑगस्ट 2001 रोजी आनंद दिघे यांच्या मृत्युला जबाबदार धरून अख्खं सुनितीदेवी सिंघनिया हे ठाण्यातील इस्पितळ शिवसैनिकांनी जाळलं होतं. ही घटना समर्थनीय नसली तरी यातून आनंद दिघे यांच्याबद्दल त्यांच्या मनात किती प्रेम होतं हे लक्षात येते.  आनंद दिघे यांची लोकप्रियता त्यांच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनी आजही कायम आहे. धर्मवीर या त्यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. तसे ते ठाण्यातील राजकारणात आजही अग्रभागीच आहेत...   

आनंद मरा नही.... आनंद मरते नही...  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1