Top Post Ad

हिमालयाची सावली ; त्यागमूर्ती माता रमाई


हिमालयाची सावली ; त्यागमूर्ती माता रमाई              

आज  २७ मे, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई यांची पुण्यतिथी. ७ फेब्रुवारी १८९७ रोजी माता रमाई यांचा जन्म एका गरीब कुटूंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धोत्रे ( वलंगकर  ) तर आईचे नाव रुक्मिणी असे होते. दाभोळजवळील वनंदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये त्या राहत होत्या. त्यांना  तीन बहिणी व एक भाऊ होता. त्यांचे वडील दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या पोहचवत असत. रमाई लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. काही दिवसांनी वडिलांचेही निधन झाले. लहान वयातच आई वडिलांचे छत्र हरपल्याने   कोवळ्या रमाईच्या मनावर मोठा आघात झाला. आई वडिलांविना पोरक्या झालेल्या या भावंडांना वलंगकर काका व गोविंदपूरकर मामा यांनी मुंबईला आणले. मुंबईतील भायखळा मार्केटच्या चाळीत ते राहू लागले. त्याच सुमारास सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमरावसाठी मुलगी पाहत होते. वलंगकारांकडे लग्नाची मुलगी असल्याचे त्यांना समजले. सुभेदार रामजी आंबेडकर यांनी रमाईला पाहिले. रमाईला पाहता क्षणिच सुभेदाराने तिला आपल्या भीमरावासाठी पसंत केली.  

रमाई आणि भीमराव यांचा भायखळ्याच्या मार्केटमध्ये विवाह झाला. विवाहाप्रसंगी बाबासाहेबांचे वय चौदा तर रमाईचे वय नऊ वर्ष होत. त्यावेळी बाल विवाहाची प्रथा समाजात रूढ होती. लग्नात पंच पक्वान्ने नव्हती. झगमग रोषणाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह पार पडला. माता रमाईला जीवनात अनेक दुःखे सहन करावी लागली. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले. त्यावेळी रमाईची खुप वाताहत झाली. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना त्यांचे हाल पहावले नाही त्यांनी काही पैसे जमा केले व ते पैसे  रमाईला देऊ केले. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला मात्र पैसे स्वीकारण्यास नम्रपणे नकार दिला. रमाई या बाबासाहेबांप्रमाणेच स्वाभिमानी होत्या. माता रमाई या आयुष्यभर दुःखाशी,  गरीबीशी  जिद्दीने झगडत होत्या मात्र  हार मानत नव्हत्या. मृत्यूसत्र, दुःख, त्याग, समजूतदारपणा , कारुण्य, उदंड मानवता आणि मृत्यू यांचे सर्जनशील ज्वलंत प्रेरणास्थान  म्हणजे माता रमाई. 

रमाईने अनेक दुःखे झेलली. त्यांच्या इतके मरण कोणीही पाहिले नसेल. लहान वयातच आई वडिलांचा मृत्यू, १९१३ साली सासरे शुभेदार रामजी आंबेडकर यांचा मृत्यू, बाबासाहेबांचे मोठे बंधू आनंदराव, त्यांचा मुलगा गंगाधर यांचा मृत्यू, १९२१ साली बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, १९२६ मध्ये राजरत्न असे अनेक मृत्यू त्यांनी पाहिले पण त्या डगमगल्या नाहीत. पती बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकायला गेल्यावर त्या एकट्या घर चालवत होत्या. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवऱ्या वेचल्या. बॅरिस्टर पतीची पत्नी शेण गोवऱ्या गोळा करते असे लोक  नावे ठेवतील म्हणून त्या पहाटे लवकर उठून शेण गोवऱ्या गोळा करत. आयुष्यभर काबाड  कष्ट करून त्यांचे शरीर पोखरून गेले होते. त्यामुळे त्या आजारी पडल्या. जानेवारी १९३५ पासून आजार वाढत गेला. मे १९३५ ला त्यांचा आजार विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. मात्र त्यांचे शरीर औषधोपचारांना प्रतिसाद देत नव्हते. बाबासाहेब त्यांना  फळांचा ज्यूस, चहा, कॉफी पाजत. मात्र त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. 

अखेर २७ मे १९३५ रोजी रमाईची प्राणज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाले. बाबासाहेबांना हे दुःख पचवणे अवघड गेले. ते रमाईच्या पार्थिवाशेजारी बसून ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षे हिमालयासारख्या महामानवाला धैर्याने व प्रेमाने साथ देणारी हिमालयाची सावली सोडून गेल्याने बाबासाहेब एकाकी पडले. हिमालयाची सावली बनलेल्या त्यागमूर्ती माता रमाई यांना विनम्र अभिवादन!     

श्याम ठाणेदार      
दौंड जिल्हा पुणे       ९९२२५४६२९५
--------------------------------------------------

 
  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या रमाई भीमराव आंबेडकर. दीनदुबळ्यांची माऊली महामानवाची सावली होती रमाई. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना कुठल्याही कौटुंबिक समस्येत रमाईंनी गर्तेत न ठेवता , कुटुंबाचं सुखदुःख रमाबाई झेलत आणि सोसत राहिल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दलितांचे दुःख व त्यांच्या आत्मसन्मानासाठी कशाचीही कमी किंवा दुर्लक्ष होता कामा नये, यासाठी रमाईने आपल्या पती राजाला कुठलीही कल्पना न देता, आर्थिक भार तसेच मानसिक या सगळ्या गोष्टी त्यांनी बाबासाहेब परदेशात शिकायला असताना निभावल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर याबद्दल खंत व्यक्त करतात की रामू मी तुला कोणतेही सुख देऊ शकलो नाही. कधीही न रडणाऱा महामानव रमाई च्या जाण्याने धायमोकलून रडताना अनेकांनी पाहिले आहे. त्यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले असतील.सारा समाज बाबासाहेबांची सावली निघून जाण्याने दू:खाच्या सागरात होता. आंबेडकरांचे रामूवर खूप प्रेम होते ते रमाईला लाडाने ' रामू ' या नावाने संबोधत असत. एका बॅरिस्टरची पत्नी असूनही रमाईला घालायला लुगडं देखील नसे.एका बॅरिस्टरच्या पत्नीला लुगडं नसेल याची कल्पना तरी कुणी करू शकेल का? एवढा त्याग एका बॅरिस्टरच्या पत्नीने केवळ समाजाच्या हितासाठी व त्यांच्या आत्मसन्मानासाठी केला.

  रमाई बर्‍याचदा आजारी असायच्या. बाबासाहेबही त्यांना धारवाड येथे घेऊन गेले. पण यात काही फरक नव्हता. बाबासाहेबांचे तीन मुलगे आणि एक मुलगी मरण पावली होती. बाबासाहेब खूप उदास असायचे. २७ मे १९३५ रोजी त्याच्यावर दु: खाचा डोंगर कोसळला त्यादिवशी दलितांची माता आणि आंबेडकरांची सावली निघून गेल्याचे दुःख डोंगराएवढे होते.रमाईं च्या परिनिर्वाणात दहा हजाराहून अधिक लोक उपस्थित होते. बाबासाहेबांना जगप्रसिद्ध महापुरुष बनविण्यात रमाई त्यांच्याबरोबर होत्या. अत्यंत गरीबीतही रमाईंनी अत्यंत समाधान व संयमाने घर सांभाळले आणि प्रत्येक अडचणीत बाबासाहेबांच्या धैर्याला प्रोत्साहन दिले. रमाईंच्या निधनाने त्यांना इतका धक्का बसला की त्याने केस मुंडले. ते खूप दु: खी, दु: खी आणि अस्वस्थ होते. दारिद्र्य आणि दु: खेच्या काळात त्यांच्याबरोबर संकटांशी झगडत असलेला जीवनसाथी पुन्हा मिळणार नव्हती . रमाईंना बाबासाहेबांसोबत सभेला जाण्याची खूप इच्छा होती पण बाबासाहेब वेगवेगळ्या कारणांनी रमाई ची समजूत  काढतात. रमाई  सदाचारी आणि धार्मिक वृत्तीची गृहिणी होती. पंढरपूरला जाण्याची त्यांची प्रचंड इच्छा होती.

  इ.स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले. व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. मृत्युसत्र, दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली.रमाबाई एक आदर्श पत्नी, आई आजच्या महिलांना प्रेरणा देणारी एक आदर्शवत आहे. संसाराच्या जीवनात एवढा त्याग करणारी स्त्री इतिहासात किंवा पुढेही होणार नाही.हे मान्यच करावे लागेल.बाबासाहेबांच्या असामान्य कर्तृत्वात रमाईचा त्याग आहे.आजच्या कुठल्याही महिलांना एवढे हाल समाजासाठी करायची इच्छा होईल का? तर मुळीच होणार नाही. बाबासाहेब आणि रमाबाई यांच्या त्यागामागचं प्रेम जरी कळालं तरी आजच्या  दिनी अभिवादन ठरेल! महामानवाच्या सावलीस, बहुजनांच्या माऊलीस  विनम्र अभिवादन!

तु सोसलेस रमा दुःखाचे डोंगर
त्यागाने तुझ्या घडला आंबेडकर
नव्हती आशा सोन्या- नाण्याची
आंबेडकर दांपत्याला चिंता दुबळ्यांची
तुझ्या स्मृतीस वाहती फुलं
रमा तुझी कोटी कोटी मुलं.

- पदमाकर उखळीकर   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न  M : 8108658970
click here 👉 Join Our WhatsApp Channel
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com