“ प्रबोधनकारांचं लेखन मी नीट वाचलेलं आहे ” असं सांगणारे राज ठाकरे यांनी आज औरंगाबादमधल्या सभेत प्रबोधनकार ठाकरेंच्या पुस्तकांची नावं चक्क ‘वाचून’ दाखवली (म्हणजे त्यांनी प्रबोधनकारांची पुस्तकं वाचली असतीलही, पण त्यांची नावं लक्षात न राहिल्यानं ती एका कागदावर लिहून आणून वाचून दाखवावी लागली, असं झालं असावं कदाचित!). तर... आजच्या सभेत त्यांनी टिळकांचाही उल्लेख केला. त्यावरून आठवलं ते प्रबोधनकार ठाकरे यांचं ‘हिंदुधर्माचे दिव्य आणि संस्कृतींचा संग्राम’ हे पुस्तक! त्यातील हा अंश जसाच्या तसा...
...............
“ हिंदु मुसलमान प्रश्नाकडे ख-या राष्ट्रीय दृष्टीने पहाण्याची जी व्यापक वृत्ति आज प्रचलीत झाली आहे, तिचा लवलेशहि टिळकांच्या अंतःकरणाला शिवलेला नव्हता. उठल्या सुटल्या भल्याबु-या पातकाचे खापर इंग्रेजांच्या माथ्यावर फोडून, आपल्या नेभळ्या तोंडपाटिलकीचे मंडण करण्याचा कैसरीने महाराष्ट्रात रूढ केलेल्या परिपाठाचा उगम याच लेखांत पाहावा.
या दोन समाजांच्या एकीकरणानेच भावी हिंदी राष्ट्राचे दृढीकरण केल्याशिवाय गत्यंतर नाही, अशी जागृति तत्कालीन अनेक विचारवंत हिंदु-मुसलमान पुढा-यांना झाली नव्हती, असे नव्हे. परंतु अखिल हिंदुस्थानात व्यापक धोरणाच्या व अभेदभावाच्या राष्ट्रीय जागृतीची पुण्याई कै. टिळकांच्या पदरी बांधण्याचा उपद्व्यापी अट्टहास करणा-या शहाण्यांना इतकेच सप्रमाण बजावणे अवश्य आहे की हिंदूंचा विशेषतः महाराष्ट्रातल्या हिंदूंचा स्वाभिमान जागृत करण्याचा कै. टिळकांनी यत्न केला, असे सामान्य विधान केल्यास काही हरकत नाही; पण सध्यां विकसित झालेल्या हिंदु मुसलमानांच्या ऐक्याच्या व्यापक कल्पनेचा धागासुद्धा कै. टिळकांच्या पादुकांना किंवा पगडीला गुंडाळताना मात्र जरा दहा अंक मोजा. टिळकांनी मुसलमानांचा प्रश्न जर त्यावेळी ख-याखु-या व्यापक उदारबुद्धीने, सोडविण्याचा यत्न केला असता, तर आज महाराष्ट्रांत तरी निदान चित्पावन चित्पावनेतर वादाइतके हिंदु मुसलमान वादाला तीव्र स्वरूप खास आले नसते!
‘‘इंग्रजांनी हिंदुस्थानात पाऊल ठेवण्यापूर्वीच मुसलमानांची सत्ता मोडत चालली होती व इंग्लिशांनी हिंदुस्थानचे राज्य कमावले ते मुसलमानांपासून नव्हे, तर मराठे व शीख लोकांपासून होय.’’ हा ऐतिहासिक पुरावा युरोपियन टीकाकारांच्या मुस्कटावर झुगारताना, मुसलमानांविषयी तुंकार दर्शवीत कै. टिळक मुसलमानांना व त्यांच्या पाठिराख्या इंग्रज अधिका-यांना बजावून लिहितात की, ‘‘इंग्रज सरकारचा जर या देशात रिघाव झाला नसता तर आज जी एक दोन मुसलमान संस्थाने राहिली आहेत, तीहि केव्हाच नामशेष होऊन गेली असती.’’ [टिळकांचे लेख, पृ. २०६] हिंदु मुसलमान प्रश्नाचा परीघ केवढा विस्तृत आहे, त्याच्या विरोधी तपशीलाचा दूरवर धोरणाने समन्वय कसा करतां येईल आणि हिंदी राष्ट्राच्या भावी पुनर्घटनेसाठी दोघांनीहि काही ठळक क्षेत्रात समरस निदान समगामी कसे व्हावे, याची रूपरेषा आखण्याऐवजी कै. टिळकांनी हिंदु मुसलमानांत यदृच्छेने उत्पन्न झालेल्या गुलामगिरीच्या क्षुद्र भावनांची तेढ अधिकाधिक तीव्र करण्याची कामगिरी मात्र बरीच बजाविली, यांत मुळीच संशय नाही. इतकेच नव्हे, तर मुंबईस दंग्याचा धडाका उडाल्यानंतर त्याचा तितकाच जोराचा व भयंकर पडसाद येवले, बेळगांव, मालेगांव, राजापूर वगैरे ठिकाणी उमटताच, ही दंग्याची साथ अधिक पसरू नये म्हणून हिंदुमुसलमानांच्या जबाबदार प्रतिनिधींची एक सभा भरविण्याचा कै. जस्टिस रानडे यांनी प्रयत्न केला.
त्यावेळीसुद्धा टिळकांच्या केसरीने या संयुक्त सभेची हेटाळणी करून, ‘फक्त हिंदूंची’ सभा बोलवावी असा हट्ट धरला आणि कै. रानडे व त्यांच्या अनुयायांची आपल्या कुप्रसिद्ध ‘राष्ट्रीय’ भाषेत संभावना केली. कै. टिळकांची खुमखुम येथेच थांबली नाही. हिंदु मुसलमानांची तेढ मुंबईच्या दंग्याने व्यक्त करताच आणि येवले मालेगावच्या प्रतिध्वनीने ती विशेष स्पष्ट सिद्ध होताच, देशातले हिंदु मुसलमान पुढारी त्यांच्या ऐक्याचा प्रश्न यथामति यथाशक्ति सोडविण्याचा यत्न करू लागले. या प्रयत्नांची दिशा व पद्धत वेळोवेळी कार्यकर्त्यांच्या आंगभूत गुणावगुणांप्रमाणे कधी बरी, कधी वाईट, कधी ऐक्यवर्धक तर कधी बेकीचे भगदाड अधिकच दुणावणारी, अशी होत गेली. त्यातच कै. टिळकांनी गणपतीच्या मेळ्याची नवीन टूम काढली व शिवाजीउत्सव सुरू केला.
या दोनहि गोष्टी जर उदार व्यापक धोरणावर चालविल्या असत्या, आणि त्यांचे राष्ट्रीय महत्त्व सर्वस्पर्शी मुत्सद्देगिरीने महाराष्ट्रीय जनतेवर बिंबविण्याचा त्यांनी यत्न केला असता, तर हिंदु संस्कृतीला व हिंदु रक्ताला फारसा पारखा न झालेला अखिल महाराष्ट्रीय मुसलमान समाज त्यांना खात्रीने आपलासा करता आला असता! पण!! जात्याच अत्यंत महत्वाकांक्षी व वरचढ प्रवृत्तीच्या टिळकांना स्वदेशी मुसलमानांच्या संस्कृतीसाम्याचे भान राहिले नाही, आणि गणपतीचे मेळे व शिवाजी उत्सव या दोन दुधारी पात्याच्या तलवारीच्या हातवा-याने त्यांनी हिंदु मुसलमानांच्या भावना अधिकच क्षुब्ध व छिन्नभिन्न केल्या. मेळ्यांतून व शिवाजीउत्सवांतून मुसलमानांची यथास्थित निर्भत्सना होऊ लागताच, महाराष्ट्रांतले बरेचसे उनाड कवि व नाटककार एकामागून एक भराभर उदयास येऊ लागले, आणि त्यांच्या इस्लामद्रोही कवितांचा व ‘ऐतिहासिक’ (?) गद्यपद्य नाटकांचा केसरीकडून जाहीर सन्मान होऊ लागला. महाराष्ट्रात असा एक काळ होता की मुसलमानांची निर्भत्सना केल्याशिवाय आम्हा हिंदुंचा एकहि ‘राष्ट्रीय’ उत्सव यथासांग पार पडत नसे. एकहि ‘सार्वजनिक’ सभा घसघशीत व ठसठशीत वठत नसे. आणि केसरी सांप्रदायिक एकाही नियतकालिकाला आपले कर्तव्य नीटपणे बजावल्याची कंडु शमत नसे. त्या वेळी गिलचांचा सूड या सारखी मुसलमानांच्या आईमाईचा उद्धार करणारी हलकट नाटके सुद्धा कै. टिळकांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या खास आशीर्वादामुळे यशस्वी होत असत.
शिवाजीउत्सवाचा तर या कामी अनेक बोलघेवड्या दे. भ. नीं खुद्द टिळकांच्या नाकासमोर मनमुराद खेळखंडोबा केला. सन्मित्र समाज नावाच्या एका पुणेरी मेळ्याने तर पुणे शहरच्या चव्हाट्या तिवाट्यावर ऐतिहासिक हिंदु मुसलमान पात्रे प्रत्यक्ष नाचवून, आपल्या केसरी प्रासादिक देशभक्तीचा शिमगा वृत्तपत्री धुळवड शेणवडीपेक्षा रेसभरसुद्धा कमी इरसाल नसल्याचे सिद्ध केले. या फाजील मेळ्याचा फाजीलपणा अजूनहि कमी झाला नसून, मुसलमानांवर भुंकण्यास सवकलेले हे ‘राष्ट्रीय’ कुतरडे कै. नामदार गोखले प्रभृति उदारमतवादी स्वकीयांचे लचके तोडता तोडता, आता तर कुलीन स्त्रियांची इज्जत जाहीर रीतीने घेत असते. सारांश, टिळकांच्या प्रोत्साहनाने भरवंसाट भडकणा-या तत्कालीन राजकारणी वातावरणाचे निःपक्षपणे समालोचन केले तर असे स्पष्ट विधान करणे भाग पडले की त्या वेळच्या महाराष्ट्रीय हिंदूंच्या राजकीय मोक्षप्राप्तीच्या कल्पनांचे भांडवल मुसलमानांच्या बीभत्स निर्भत्सनेतूनच काढले जात असे. याचा परिणाम फार वाईट झाला आणि त्याची कडुजहर फळे महाराष्ट्राला अझून भोगावयाची आहेत.
………..
ती कडुजहर फळे महाराष्ट्रानं नंतर भोगली आहेत. त्यात नुकसान अंतिमत: महाराष्ट्राचंच झालं. त्यामुळे आता कुणाचं तरी (अगदी प्रबोधनकारांचे नातू असले तरी) राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी त्याची पुनरावृत्ती नको!
0 टिप्पण्या