बौद्ध दर्शन शास्त्राचे महान अभ्यासक व धम्मप्रचारक मा. शं. मोरे

  बौद्ध दर्शन शास्त्राचे महान अभ्यासक व धम्मप्रचारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांद्वारे स्थापित पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष, माजी आयकर आयुक्त आदरणीय मानसिंग शंकरराव मोरे ( मा. शं. मोरे) यांनी आपल्या योग्यतेने धम्मक्रांतीनंतर बुद्ध धम्माच्या वाङ्मयीन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी निभावली आहे. स्वतः एक उच्चपदस्थ आय. ए. एस. अधिकारी असताना सुद्धा सामान्यजणांमध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यात ते अग्रणी होते. त्यांच्याद्वारे लिखित, संपादित आणि अनुवादित ग्रंथसंपदा येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी मार्गदर्शक राहणार आहेत. त्यांच्याद्वारे अनुवादित तिपिटकातील काही भागांमुळे मागील तीन दशकांपासून धम्म समजून घेणारे बौद्ध उपासक ज्ञान प्रकाशात न्हाऊन निघत आहेत. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्ष 1990 - 91 साली त्यांनी पालि तिपिटकाच्या मुख्य भागांचा अनुवाद करण्याचा संकल्प केला. अंगुत्तरनिकाय - चार भाग, संयुक्तनिकाय - चार भाग, मज्झिम निकाय - तीन भाग, विनयपिटक - तीन भाग, अभिधम्मसंगहो या ग्रंथाचा त्यांनी मराठी अनुवाद केला. त्याशिवाय वि. का. राजवाडे अनुवादित दीघ्घनिकाय - 3 भाग आचार्य धम्मानंद कोसंबी अनुवादित सुत्तनिपात, पि. वि. बापट / लाड संपादित - अनुवादित धम्मपद या ग्रंथाच्या अनुवादित प्रति सामान्यजणांना उपलब्ध व्हाव्या याकरिता त्याचे प्रकाशन केले. तिपिटक ग्रंथासोबतच नवदीक्षित बौद्धांची ज्ञानतृष्णा भागविण्यासाठी त्यांनी 'जगातील बुद्ध धम्माचा इतिहास', 'भारतातील बुद्ध धम्माचा इतिहास', 'महाराष्ट्रातील बुद्ध धम्माचा इतिहास', 'गुजरातमधील बुद्ध धम्माचा इतिहास', 'बौद्ध शिक्षण पद्धती' या ग्रंथांचे स्वतंत्र लेखन केले ज्यात इतिहासाचे बुद्धकालीन आधारसूत्र आणि भारतात धम्माचा विकास त्यांनी समजावला आहे. 

एका संशोधकाच्या नजरेतून 'History Of Buddhism in Gujrat' हा ग्रंथ लिहण्यासाठी त्यांनी भारतीय पुरातत्व विभागाचे ग्रंथालयच नाही तर देवनी मोरी, वल्लभी सारख्या पुरातत्वीय स्थळ आणि स्मारकाचा बारकाईने अभ्यास देखील केला. या ग्रंथांमध्ये संदर्भसूची मोठ्या प्रमाणात दिली गेली आहे. त्यामुळेच 'History of Buddhism in Gujrat' हा भारतासह युरोपियन देशांत सुद्धा ह्या विषयातील मान्यताप्राप्त ग्रंथ सिद्ध झाला आहे. बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित आद. मा. शं. मोरे साहेबांद्वारे लिहिले गेलेले 'भगवान बुद्धांचा मध्यममार्ग', 'बुद्ध धम्माचे मूळ सिद्धांत', हे ग्रंथ तत्वज्ञान आणि जीवनमार्ग यांचा ताळमेळ सांगून बौद्ध उपासकांना धम्म शिकवीत आहेत. त्यांची 'मुलांना बुद्ध धम्म कसा शिकवावा', 'बुद्धं सरणं गच्छामि', ' पालि साहित्य परिचय', 'मराठी भाषेचा उगम पालि भाषेतून', हे ग्रंथ खूपच उपयुक्त सिद्ध होत आहेत.

आंबेडकर इंटरनॅशनल मिशन द्वारे त्यांनी धम्मप्रबोधन या नावाचे एक मासिक दीर्घकाळपर्यंत प्रा. विनय कांबळे आणि अशोक चक्रवर्ती यांच्या सहकार्याने प्रकाशित केले. याकरिता त्यांनी स्वतः पुण्यात प्रिंटिंग प्रेसची स्थापन केली. पुणे, मुंबई, अहमदाबाद इत्यादी ठिकाणी धम्मकेंद्र स्थापन करून त्यांनी तेथील सदस्यांना लेखन करण्यास प्रवृत्त केले. महाबोधी सोसायटी of India च्या "Mahabodhi" या विश्वप्रसिध्द नियतकालिकात अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाच्या 'अनुत्तर जनविधानात' मध्यममार्ग - The Middle Path मध्ये त्यांचे लेख नियमित प्रकाशित होत होते.  त्यांनी गुजरात राज्य संस्कृती विभागाद्वारे आयोजित 2014 च्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात "History of Buddhism in Gujrat" या विषयावर पेपरवाचन केले. 

अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाच्या नालंदा, नांदेड, बुद्धगया येथील अधिवेशनात धम्मप्रचारकांना मार्गदर्शन केले तसेच पूर्णा, किनवट, मनमाड इत्यादी छोट्या छोट्या शहरात आणि गावातील धम्मपरिषदा, धम्मसंमेलनांमध्ये मौल्यवान मार्गदर्शन केले. बुद्धगयेत धम्मदीक्षा समारोहात सहभाग घेऊन बहुतेकांना धम्ममार्गावर आरूढ होण्यासाठी प्रोत्साहित केले. अनेक बौद्ध देशांत जाऊन त्यांनी समकालीन बुद्ध धम्माचा अभ्यास केला. ते जेव्हा पुणे, औरंगाबाद येथे राहत तेव्हा पद्मपाणी महाविद्यालय आणि बोधगया येथे राहत तेव्हा पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयात बौद्ध दर्शन शास्त्रावर त्यांची स्वतःची ग्रंथसंपदा उपयोगी येत. 

ते जेव्हा आयकर आयुक्त या पदावर बदली होऊन अहमदाबाद येथे आले. तेव्हा स्वतःच बौद्धसमाज कुठे राहतो ? इथे बुद्ध विहार आहे की नाही ? इत्यादींचा शोध घेत अहमदाबाद येथे निर्माण होत असलेल्या 'पंचशिल बुद्धविहार' जे पंचशिल बौद्धविहार ट्रस्ट व बौद्ध समता संघ या संघटनेतील युवांद्वारे व कर्मठ कार्यकर्त्यांद्वारे निर्माण होत होते त्यांच्याशी संपर्क साधून पंचशिल बुद्धविहाराच्या निर्माण कार्य आणि विकासात खूपच महत्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या नेतृत्वात प्रत्येक रविवारी धम्मसभेचे आयोजन होऊ लागले त्यात त्यांनी मराठी, हिंदी व गुजराती बौद्ध उपासकांना कुशलतेने एकत्र करून धम्मसभेचे संचलन केले. त्यांच्या या अनमोल कार्यात पंचशिल बौद्ध विहाराचे ट्रस्टी आयु. शंकरराव वडे, आयु. चंद्रभान निगांवकर आणि बौद्ध समता संघाचे आयु. ताराचंद पाटील, आयु. रमेशचंद्र हाडके, आयु. अनिलकुमार पाटील, आयु. माधव फुलझेले, आयु. रावजी जाधव, आयु. गंगाराम मून व अन्य गुजराती बौद्ध उपासक आयु. मिलिंद प्रियदर्शी, आयु. सचिन प्रियदर्शी, आयु मनुभाई परमार इत्यादी उपासकांनी आपले अनमोल योगदान दिले. याशिवाय अशोक विजयादशमी दिनी धम्मदीक्षा कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केले जे आजपर्यंत अविरत चालू आहे. 

मळवली ( जि. पुणे ) येथे धम्मप्रशिक्षण विहार तसेच मुंबईस्थित अनेक विहार त्यांच्या अनमोल योगदानाची ग्वाही देतात. आद. मा. शं. मोरे साहेबांनी आपले जन्मस्थळ कवडे ( वाई ) येथील वडिलोपार्जित जमीन बुद्ध विहार निर्माण कार्यासाठी दान दिली तसेच मुंबई येथील सर्वोदय बुद्धविहार, बावरीनगर येथील महाविहाराच्या निर्माण कार्यात महत्वाचे योगदान दिले. तरुण कार्यकर्त्यांविषयी साहेबांना फार जिव्हाळा व अपेक्षा होत्या. पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या निर्माणावेळी ते बाबसाहेबांद्वारे निर्मित रेस्ट हाऊस गोल हॉस्टेलमध्ये मुक्कामास असत. नागसेन वनातील विविध संस्थेच्या विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन त्यांनी भदन्त गुरूधम्मो थेरो यांच्या सहकार्याने यंग मेन्स बुद्धिस्ट असोसिएशन ( YMBA ) या संघटनेची स्थापना केली ज्याचे ते स्वतः अध्यक्ष होते. 

मागील जवळ जवळ तीस वर्ष ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे ट्रस्टी या पदावर होते. तसेच शेवटच्या काही वर्षात त्यांनी अध्यक्ष म्हणून देखील कार्यभार सांभाळला. औरंगाबाद येथील पि. ई. एस. पॉलिटेक्नीकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्थापनेत आणि निर्माणात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. यासाठी ते या कॉलेजांचे निर्माण होईपर्यंत तेथेच राहिले होते आणि त्यामुळेच आज ह्या भव्य इमारती उभ्या आहेत व संपूर्ण भारतातून विद्यार्थी इथे येऊन शिक्षा प्राप्त करत आहेत. या भव्य इमारतींसमोर तथागत बुद्धांची प्रतिमा भव्य स्वरूपात स्थापन करण्याची त्यांची इच्छा मात्र अपूर्ण राहिली. आद. मा. शं. मोरे साहेब आपल्या सहधम्मचारिणीच्या ( पत्नी ) निधनानंतर सुद्धा लिखाण व शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत राहिले. 

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाने जेव्हा बुद्धगया ( बिहार ) येथे कॉलेज स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो आदेश समजून सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन बुद्धगयेत भाडे तत्वावर जागा घेऊन तेथील कार्यकर्त्यांची एक टीम तयार केली व बी. एड. कॉलेजची स्थापना केली. तेथूनच काही किमी अंतरावर जमीन विकत घेऊन सामान्य शिक्षण व इंजिनिअरिंग शिक्षण संकुलाची स्थापना केली. दोन माळ्यांची ही इमारत बिहार आणि इतर हिंदी भाषिक राज्यातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची भूक भागवत आहेत. याच दरम्यान मा. शं. मोरे साहेब अहमदाबाद येथे आले होते. पुणे येथे जेव्हा सिद्धार्थ को - ऑ - बँकेची स्थापना करण्याचा निर्णय झाला तेव्हा त्यात ही त्यांनी आपले बहुमूल्य योगदान दिले आणि काही वर्ष त्या बँकेचे अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळला. 

जीवनातील 80 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता माझ्याकडून धम्म आणि समाजासाठी आणखी काही होऊ शकणार नाही याची चिंता त्यांना सतावत होती तरीही धम्मकोशाचे सहा भागाचे प्रकाशन व विशुद्धीमार्गचा अनुवाद करण्याचे कार्य ते करीत राहिले. वृद्धत्व आणि अस्वस्थता असली तरीही तथागत बुद्ध आणि बाबासाहेबांच्या प्रति समर्पण भाव त्यांना नेहमी कार्यरत ठेवत असे. मुंबईत गेल्यानंतर आयकर आयुक्त पदावरून निवृत्त होऊन जेव्हा ही आद. मा. शं. मोरे साहेब अहमदाबादला येत तेव्हा माझ्या निवासस्थानावरच मुक्काम करत. माझे आणि पंचशिल बुद्ध विहाराचे ट्रस्टी आयु. शंकरराव वडे यांच्यासोबत साहेबांचे पारिवारिक संबंध होते. माझी सहधम्मचारिणी पुष्पाजी ( जी आयु. शंकरराव वडे यांची सुपुत्री आहे ) तिला त्यांनी मुलगी मानली होती व सख्ख्या मुलीसारखे जीव लावत. ते आमच्या घरी असले की नेहमी आमच्यासोबत धम्म व समाजकार्य या विषयावर चर्चा व विचारविनिमय करत.  

. 5 जुलै, 1932 रोजी सातारा जिल्ह्यातील वाई जवळील कवडे नावाच्या गावात एका सामान्य कुटुंबात जन्म झालेल्या अशा महान व्यक्तीमत्वाचे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी वैशाख पौर्णिमेच्या सायंकाळी 8 मे, 2017 रोजी दुःखद निधन  झाले. अखेरच्या दोन वर्षात त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यांच्या जाण्याने बुद्ध धम्माचे आंदोलन व बाबासाहेबांच्या बुद्ध धम्माच्या शिक्षा कार्याला अपरिमित हानी पोहचली  मा.शं.मोरे यांच्या स्मृतीला वंदन व श्रद्धा सुमन अर्पित करून विनम्र अभिवादन. त्यांचे कार्य बुद्ध धम्माच्या आसमंतात तेजस्वी ताऱ्याप्रमाणे सर्वदा चमकत राहील. 

मूळ लेख व संकलन - अनिलकुमार पाटील, अहमदाबाद

मराठी अनुवाद - अरविंद भंडारे पालि रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई. 18/02/2022

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1