Top Post Ad

डॉ.बाबासाहेबांचे क्रांतिकारी अनुयायी... भन्ते विशुद्धानंदबोधि महाथेरो


 डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मक्रांतीने इथल्या प्रत्येकात बौद्ध धम्माबद्दलची आस्था निर्माण झाली. प्रत्येकाला धम्माची ओढ निर्माण झाली. यामधूनच अनेकांनी धम्माप्रती आपले जीवन वाहून घेतले. धम्माच्या प्रचार आणि प्रसार कार्यासाठी आपले घरदार सोडले आणि धम्माप्रती वाहून घेतले. यामध्ये अनेकांची नावे घेता येतील ज्यांनी भिक्खूजीवन स्विकारून धम्माचा प्रचार आणि प्रसारासाठी जीवन समर्पित केले. त्यामध्ये एक नाव आहे भदन्त विशुद्धानंद बोधि महाथेरो. ९०च्या दशकात भन्तेसोबत माझा परिचय झाला. बांद्रा शासकीय वसाहतीतील प्रज्ञा बुद्धविहारात त्यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होता. त्या दरम्यान ओळख झाली आणि ती नंतर वृद्धींगत होत गेली. त्यावेळी आमच्या मित्रमंडळींचा एक ग्रुप होता. प्रबुद्ध परिवार या परिवारातील सर्वच सदस्य आपआपल्या परिने धम्मकार्यात सहभागी होत असत. भन्तेजी देखील आमच्या या मित्र परिवाराला नेहमीच मार्गदर्शन करीत असत. तेव्हाच भन्तेंचे काहीसे जीवनकार्यही माहिती झाले. 

धम्माबद्दल असीम श्रद्धा आणि बाबासाहेबांच्या कार्याबद्दल आपुलकी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पूज्य भिक्खू विनय वात्स्यायन महाथेरी यांच्याकडून त्यांनी १९७९ साली श्रामनेर दीक्षा घेऊन ते पुढील शिक्षणासाठी औरंगाबाद येथे आले. येथूनच त्यांनी आपल्या वास्तव भिक्खू जीवनाला सुरुवात केली. टाकळी वतपाळ, तालुका -नांदुरा जिल्हा बुलढाणा येथे जन्मलेले भन्तेजीनी औरंगाबादला डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मागे  धम्मभूमी लेणींच्या पायथ्याशी असलेला सुमारे ११० एकर जमिनीवर ओसाड रानातून धम्मकार्यास प्रारंभ केला. हा परिसर सुशोभित करून सुंदर अशा भव्य बुद्धविहाराची निर्मिती केली. इतकेच नव्हे तर या ठिकाणी एक प्रशस्त भिक्खूनिवासही बांधले. जेणेकरून देशविदेशातील भिक्खूसंघ औरंगाबादच्या लेण्यांना भेट देण्यासाठी आला असता त्यांचे गैरसोय होऊ नये. त्यांच्या अपार कष्ट मुळे धम्मभूमी बुद्धलेणी हे प्रेक्षनिय स्थळ म्हणून बौद्धांचे काळीज बनले आहे. आज हा परिसर  नंदनवन झाला आहे. 

बुद्धपोर्णिमा, डॉ. बाबासाहेब जयंती, आंतरराष्ट्रीय महिला धम्मपरिषद, नामांतर दिन, आणि नियमितपणे श्रामनेर दीक्षा कार्यक्रम असे सातत्याने कार्यक्रम राबवले जात आहेत.  नियमितपणे समाजहिताचे  विविध कार्यक्रम आखून तसेच विजयादशमी महोत्सवाच्या माध्यमातून विविध जाती धर्मातील लोकांना धम्माची महती सांगून त्यांना धम्मात सामिल करून घेण्याचे कार्य देखील या ठिकाणी नियमित होते. आजपर्यंत लाखो लोकांना भन्तेंजींनी धम्मदीक्षा देऊन बुद्ध धम्म संघाची ओळख करून दिली आहे. विविध कार्यक्रमातून प्रवचनाच्या माध्यमातून हजारो उपासकांना श्रामनेर दीक्षा देऊन भिक्खु जीवनाची प्रेरणा दिली. आजही त्यांचे अनेक शिष्य धम्माप्रति आपले योगदान देत आहेत.  इतकेच नव्हे तर अनेक अनाथ मुलांना शिक्षण देऊन त्यांचा सांभाळ करून डॉक्टर, इंजिनीअर, वकील, प्राध्यापक, तसेच राजकीय क्षेत्रातही उभे करण्याचे कार्य भन्तेजी आजही करीत आहेत. 

या ठिकाणी नियमितपणे भन्तेजींचे शिष्यगण असतात. ९०च्याच दशकात आम्ही मित्रमंडळी औरंगाबादला गेलो होतो. तेव्हा भन्तेजी दौऱ्यावर होते. दुसऱ्या दिवशी येणार होते. मात्र तेथील भन्तेजींच्या शिष्यांनी आम्हाला भन्तेजींची अनुपस्थिती भासवून दिली नाही. आमचा व्यवस्थित पाहूणचार केला. याआधीही काही मंडळी त्या ठिकाणी आली होती. ती देखील या सर्व पाहुणचाराने भारावून गेली होती. खरे तर उपासक या नात्याने ही सेवा आम्हाला करणे भाग होते. मात्र तुम्ही पाहूणे आहात असे म्हणून त्यांनी आम्हाला कोणतही काम करून दिलं नाही.  यावरून भन्तेजींनी धम्मकार्याचा वारसा पुढील पिढीला कशा प्रकारे शिकवला आहे याची अनुभूती मिळाली. दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजताच आम्हाला जाग आली. भन्तेजी सर्व श्रामणेर संघाला देसना देत होते. त्यांच्या भारदस्त आवाजाने बुद्धविहाराचा सारा परिसर भारावून गेला होता. पहाटेच्या त्या शांततेच्या वातावरणात भन्तेजींची मंगलवाणी कानी पडताच काही काळापूरते तरी जीवन सार्थक झाल्यासारखे वाटले. एरव्ही या धकाधकीच्या आयुष्यात असे क्षण येणे दुर्लभच झाले आहे. सकाळचे सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर भन्तेजींनी आम्हाला विद्यापीठ आणि विद्यापीठातील मान्यवरांची ओळख करून दिली. विद्यापीठात असलेल्या बाबासाहेबांच्या दुर्मिळ वस्तू जसे, त्यांची खूर्ची, त्यांचे पायजोडे, काठी आदींचे दर्शनही भन्तेजींमुळे आम्हाला लाभले.

भन्तेजींचा एक महत्वपूर्ण गुण म्हणजे ते नेहमीच म्हणतात, आपण बाबासाहेबांच्या क्रांतीकारी धम्माचे पाईक आहोत. एका ठिकाणी बसून धम्मकार्य होणार नाही. त्यासाठी भन्तेजी नेहमीच क्रियाशील असतात. औरंगाबादचा एवढा मोठ्ठा परिसर, त्यात निर्माण केलेले बुद्धविहार. भन्तेंजींना खरे तर आता कुठे जाण्याची गरजच नव्हती. पण स्वस्थ बसतील ते भन्ते विशुद्धानंदबोधि नव्हेत. त्यांनी आपला मोर्चा मुंबईकडे वळवला. मुंबईच्या लगत असलेल्या ठाण्यात स्टेशनच्याजवळ १५ ते २० गुंठा जागेवर एक मोडकळीस आलेले बुद्धविहार होते. माझ्या विनंतीला मान देऊन भन्तेजी त्यांच्या ट्रस्टीला भेटण्यास आले. आणि विहाराचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र हेवे-दावेच्या राजकारणात अडकलेल्या ट्रस्टीनी त्यास नकार दिला. त्यानंतर काही दिवस भन्तेजींचा संपर्क नव्हता एक दिवस अचानक फोन आला सुबोध आपल्याला पवईच्या बुद्धविहाराकरिता आंदोलन करायचे आहे. तुम्ही उपासक मंडळी या. 

आम्ही दुसऱ्याच दिवशी तिथे गेलो. पाहतो तर पवईच्या जयभीम नगरात एक झोपडेवजा बुद्धविहार होते. जे हिरानंदानी बिल्डर पाडण्यासाठी प्रयत्नशील होता. मात्र भन्तेंजींना हे कळताच त्यांनी आपला मोर्चा तिकडे वळवला आणि ते विहार ताब्यात घेऊन त्यासाठी लढा उभा केला. अनेक वेळा हिरानंदानी बिल्डरसोबत खटके उडाले तरी भन्तेजी न डगमगता आजही तिथे घट्ट पाय रोवून उभे आहेत.  आशिया खंडातील सर्वात सुंदर शहरांपैकी पवई हे एक शहर आहे. उच्चभ्रू वस्तीच्या या नगरात बुद्धविहार नको म्हणून अनेक कारणाने भन्तेजींना त्रास देण्याचे काम आजही सुरु आहे. मात्र भन्तेजींनी  असीम त्यागातून, कष्टातून जयभीम नगर बुद्ध विहार कोलगेट ऑफिस समोर, हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई येथेही बुद्धविहाराची निर्मिती केली. संपुर्ण वर्षभरात लाखो अनुयायी या बुद्धविहाराला भेट देतात. या बुद्धविहाराच्याद्वारे भिक्षू संघांना चीवरदान साहित्यदान, भोजनदान विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून केले जाते. या ठिकाणीही भन्तेजींचे शिष्यगण भन्तेजींच्या अनुपस्थितीत या विहाराची देखभाल करीत असतात. इतकेच नव्हे तर अनेक कार्यक्रमही यशस्वीपणे पार पाडत असतात.   

पवईच्या विहारानंतर भन्ते स्थिरस्थावर होतील असे वाटत असतानाच त्यांनी आपला मोर्चा थेट बोधगयेकडे वळवला. या ठिकाणी भारतीय भिक्खूसंघाचे अस्तित्व सांगणारे एकही बुद्धविहार नाही याची खंत त्यांनी अनेकवेळा बोलून दाखवली होती. कारण महाराष्ट्रातील उपासक-उपासिकांसाठी ते बोधगये पर्यटन करीत असत. त्या माध्यमातून त्यांचे नेहमीच बोधगयेला जाणे होत असे. तिथून आल्यावर ते नेहमीच ही खंत बोलत असत. तिथेही आज त्यांनी आपले अस्तित्व निर्माण केले.  जागतिक बौद्धांचे श्रद्धास्थान बुद्धगया या ठिकाणी आपली स्वतःची एक कुटी असावी, अशा विचाराने काम सुरू करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्णमहोत्सव स्मारक, आनंद नगर, महुवाबाद, रामपूर रस्ता, हॉटेल- रॉयल रेसिडेन्सीच्या मागे, बोधगया रोड, तालुका - बोधगया, जिल्हा गया, राज्य बिहार. या ठिकाणी आजमितीस चारशे लोक आरामात राहू शकतील असे भव्य लाखो रुपयांचे बांधकाम कोट्यावधी रुपयांच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुवर्णमहोत्सव स्मारक मोठ्या दिमाखात उभारले. तिथे वर्षभरात महाराष्ट्रातून हजारो अनुयायी जातात व बोधगया परिसरातील बोधी वृक्षाचे, वज्रासनाचे दर्शन घेऊन स्मारकामध्ये निवास करतात आणि पुण्य अर्जित करतात.  

संघर्ष तर भन्तेजींच्या जणू रक्तातच आहे. विदेशामध्ये जाऊन जागतीक बौद्ध धम्म परिषदेमध्ये भारतातील बौद्धांचे प्रश्न मांडणे, कार्ला लेण्याचे संघर्ष, बुद्धमूर्तीच्या विटंबनेचा संघर्ष, एलिफंटा लेणीचा संघर्ष विद्यापीठाच्या नामांतराचा संघर्ष, असे एक ना अनेक प्रश्नात ते अगदी अग्रभागी होती. अनेक आंदोलनात आम्हीही त्यांच्यासोबत असल्याने. आंदोलनादरम्यान त्यांची वेळप्रसंगी आक्रमकता पाहून सर्वचजण अवाक् होत असत. त्यांच्या मते आजच्या भिक्खूमध्ये तथागतांच्या करुणा सोबत बाबासाहेबांची क्रांती आवश्यक आहे. तेव्हाच तो टिकू शकतो. कारण आपण काही मुळचे बौद्ध नाहीत. मुळचे बौद्धांमध्ये मोठे मोठे बुद्ध विहार आणि भिक्खू संघासाठी सर्व सुविधा उपलब्ध असतात. परंतु भारतात मूलभूत गरजांसाठीच संघर्ष करावा लागतो. कधी परक्यांसोबत तर कधी आपल्या लोकांसोबत संघर्ष करावा लागतो. असे या संघर्षानेच भन्तेंचे जीवन उजळून आले. अशा या कर्तृत्वाचा महामेरुं असलेले  अखिल भारतीय भिक्खू संघाचे सदस्य, महाराष्ट्र भिक्खू संघाचे कोषाध्यक्ष पूज्य भिक्खू विशुद्धानंद बोधी महाथेरो यांचा आज १७ मे रोजी जन्मदिन. त्यांना जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्मक्रांतीला अधिक गतिमान करण्याकरिता भावी जीवनात त्यांना उदंड आयुष्य, आरोग्य, प्राप्त होवो

 सुबोध शाक्यरत्न... ठाणे - ९९६९७४७४७६


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
   
G PAY : 8108603260


बातम्या तसेच संस्था संघटनांचे वृत्त प्रसिद्धीकरिता इमेल....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रतिनिधी / पत्रकार होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1