Top Post Ad

महाराष्ट्रातील जवळपास 400 बुद्धलेणींवर अतिक्रमण


 महाराष्ट्रातील जवळपास 400 बुद्ध लेणींवर अतिक्रमण झाले आहे. काहींचे "नामकरण" ही झाले आहे. भारतीय लोककथेमध्ये 'पांडव' व त्यांच्याशी जोडलेल्या अनेक लोकप्रिय कथा आहेत. अनेक बुद्ध लेणींचे नामकरण ही याच नावाने झालेले आहे. याचा आढावा घेणार आजच्या लेख आहे.....इतिहासाचा शोध आणि त्याचे पुनर्लेखन का गरजेचे आहे हे लक्षात येईल..

ज्ञान हे प्रवाही असले पाहिजे, नव्हे तसे ते असतेच. तसेच ते परिवर्तनीय देखील असते. नवनवे संशोधन जसे पुढे येत जाते, तसे जुने ज्ञान किंवा विचार बदलणे अपेक्षित असते. प्रत्येक ज्ञानशाखेत असे प्रवाह निर्माण होत असतात. इतिहास किंवा पुरातत्त्वशास्त्र या शाखेत अविरत संशोधन चालू आहे. मात्र तरीही काही इतिहासप्रेमी, तज्ञ अथवा पुरातत्वविद हे जुन्या शब्दांना किंवा कंसेप्ट्स यांना बदलायला तयार नसतात. मग भले तुमचे संशोधन कितीही ताकदीचे, तर्कशुद्ध पुराव्यांसकट असोत! उदा. बुद्ध लेणींच्या नावाच्या संदर्भात...

भारतामध्ये सर्वात प्रथम, सम्राट अशोक यांनी डोंगरात लेणीं कोरून ती दान दिली. त्यानंतर ही शिल्पकला बिहार, ओरिसा, बंगाल, आंध्र प्रदेश मार्गे महाराष्ट्रात आली आणि येथे तिचा उत्कर्ष झाला. भारतात जवळपास १२०० लेणीं आहेत ज्यात मुख्यतः ८५% बुद्ध लेणीं आहेत. लेणीं व त्यातील शिल्पकाम आणि शिलालेख हे बौद्ध संस्कृतीची देणं आहे. इ.स. पूर्व २०० ते इ.स. ८०० या कालावधीत अनेक राजांनी, व्यापाऱ्यांनी, शेतकरी किंवा सामान्यजनांनी आणि भिक्खू-भिक्खुणींनी या लेणीं कोरून, बौद्ध भिक्खूंसाठी दान दिल्या.  साधारणतः १० ते ११व्या शतकानंतर, भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील अनेक बुद्ध लेणींवर, इतर पंथीयांनी अतिक्रमण केले. काही ठिकाणी तर संपूर्ण लेणींच विद्रुप करून, तिचे प्राचीनत्व नष्ट करण्याचा प्रयत्न देखील केला आहे. 

या लेणीं मधील शिलालेखांच्या अभ्यासातून कळते कि प्रत्येक बुद्ध लेणींना तेथील नगराच्या, अथवा भिक्खू संघाच्या किंवा ज्या डोंगरावर कोरली असेल त्या डोंगराच्या नावाने ओळखले जात असे. अतिक्रमण केल्यानंतर या लेणींमधील अनेक विहारांची किंवा स्तूपाची नासधूस करत, या बुद्ध लेणींचे "नामकरण" देखील करण्यात आले. काही ठिकाणी यांना एकविरा, लेण्याद्री, पालपेश्वर किंवा पांडव लेणीं आणि अशा अनेक नावांनी ओळखले जाऊ लागल्या. हे "नामांतर" साधारणतः 18व्या शतकानंतर झाल्याचे दिसते. याला जरी अनेक कारणे असली तरी बुद्ध लेणींवर अतिक्रमण करून या सर्व देवता, लेणींत नंतर स्थापन करण्यात आल्या हे सत्य आहे आणि मग हे स्थान या देवीदेवतांची कसे यांचे माहात्म्य सांगणाऱ्या कथा रचण्यात आल्या. अशीच कथा रचून यातील अनेक लेणींना "पांडव लेणीं" म्हणायला सुरुवात झाली. 

इतिहास किंवा पुरातत्त्वशास्त्र हे प्रत्येक गोष्टींचे पुरावे मागत असते. त्यांच्या दृष्टीने श्रद्धा ही एक मान्यता आहे जी मानसिक असते; मात्र ही श्रद्धा पुरावा होऊ शकत नाही. ऐतिहासिक किंवा पुरातत्वीय दृष्ट्या, पांडव होऊन गेले याचा कुठलाही पुरावा सध्यातरी उपलब्ध नाही. मग बुद्ध लेणींना पांडव लेणीं का संबोधण्यात येऊ लागले? 

प्राचीन काळी पालि भाषेला मागधी आणि प्राकृत भाषेला अर्धमागधी या नावाने संबोधण्यात येत असे. तसेच या दोन्हीही भाषा, राजभाषा म्हणून मानण्यात येत होत्या. मगधाचे राज्य जवळपास संपूर्ण भारतवर्षावर होते आणि म्हणूनच पालि ही या सर्व प्रदेशात बोलली जायची. पालि भाषेत "पंडू" या शब्दाचा अर्थ पिवळा किंवा फिकट पिवळा असा आहे (उदा.पंडुरोग). त्याकाळी सामान्यजणांना, बौद्ध भिक्खूंना, "भिक्खू" म्हणतात हे माहित नव्हते. त्यांना जर कोणी विचारले कि या डोंगरातील लेणींवर कोण राहते, तर त्यांचे उत्तर असे - पंडू वस्त्रधारी राहतात. बौद्ध भिक्खू हे "चीवर" घालतात जे पिवळ्या किंवा गडद भगव्या रंगाचे असते. त्यामुळे या लेणींना "पंडू वस्त्रधारी राहणाऱ्यांची लेणीं" असे नांव पडले. 

कालांतराने अनावश्यक शब्द टाळून या लेणींना "पंडू लेणीं" म्हणायला सुरुवात झाली. पुढे याच पंडू लेणींना, अपभ्रंशाने "पांडू लेणीं"  म्हटले जाऊ लागले. याचेच पुढे "पांडव लेणीं" हे नामांतर करण्यात आले. जेव्हा हा शब्द रूढ झाला त्यानंतर हे नांव कसे योग्य आहे, यासाठी आधीच अस्तित्वात असलेल्या पांडवांच्या लोककथेशी या लेणींचा संबंध जोडला जाऊ लागला. या लेणींच्या निर्मितीच्या सुरस कथा जनसामान्यात प्रसारित करण्यात आल्या जसे कि भीमाने गदेने एका रात्रीत हा डोंगर फोडला, किंवा बोधिसत्त्वाच्या शिल्पाला एखाद्या पांडवांचे नांव देणे आणि ते तेथे कसे याचे रसभरीत वर्णन करणे, इत्यादी. या लोककथा अनेक शतके रूढ झाल्याने सामान्य लोकांनी या बुद्ध लेणींना सहजपणे पांडव लेणीं म्हणायला सुरुवात केली. मात्र जेव्हा इतिहासकार, पुरातत्वविद किंवा अभ्यासक या नामांतरित बुद्ध लेणींना, त्यांचे मूळ नाव न शोधता, पांडव लेणीं म्हणून सादर करतात, तेव्हा त्यांच्या ज्ञानाची कीव करावीशी वाटते!  

भारतात ज्या बुद्ध लेणींना, पांडव लेणीं म्हणण्यात येऊ लागले त्याची काही ठळक उदाहरणे पाहूयात -        

१. मध्य प्रदेशातील पचमढी येथील "श्री पंच पांडव लेणीं" ही इ.स पहिले शतक आणि इ.स. सहा ते सातवे शतक या दोन कालखंडात बौद्ध भिक्खूंसाठी कोरली गेली. इथे सहा बुद्ध लेणीं असून, मिथकानुसार या ठिकाणी पांडवांनी १२ ते १३ वर्षे वनवास केला होता व त्याच दरम्यान प्रत्येक भावासाठी एक आणि द्रौपदी साठी एक अशा सहा लेणीं कोरल्या होत्या!

२. गोवा येथील बिचोलिम या ठिकाणी असलेली बुद्ध लेणीं ही ६व्या शतकातील आहे. पांडव लेणीं म्हणून नामकरण करण्यात आलेल्या या लेणीतील भ.बुद्धांचे एक मोठे शिल्प होते जे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. मात्र उरलेल्या शिल्पातून बुद्धांच्या शिल्पाची जाणीव होते. मिथकानुसार पांडवांनी येथे लेणीं कोरून त्यात आश्रय घेतला होता. या लेणींचे नामकरण रुद्रेश्वर मंदिर असे करण्यात आले आहे.

३. नाशिकची प्रसिद्ध आणि सर्वात प्राचीन वास्तू असलेली बुद्ध लेणींला साधारणतः १८व्या शतकानंतर पांडव लेणीं म्हणायला सुरुवात झाली. शिलालेखानुसार ही लेणीं त्रिरश्मी डोंगरावर कोरली असल्यामुळे तिचे नांव त्रिरश्मी बुद्ध लेणीं आहे. ही लेणीं इ.स.पूर्व २०० ते इ.स. ८०० या कालावधीत कोरून बौद्ध भिक्खूंना दान देण्यात आली आहे असे येथील सत्तावीस शिलालेख स्पष्ट सांगतात. मात्र तरीही मिथकानुसार, पांडवांनी नाशिकमध्ये वनवास केला आणि त्याच दरम्यान ही लेणीं कोरून राहू लागले.

४. कर्नाटक राज्यातील मंगळूर येथे ६व्या शतकातील विहार असून, त्याच्या जवळच्या डोंगरात असलेल्या बुद्ध लेणींला आता पांडव लेणीं म्हटले जाते. प्राचीन काळी "कंदरिका" नावाच्या बुद्ध विहारात, बोधिसत्त्व अवलोकितेश्वराचे शिल्प होते ज्याचे नामकरण आता लोकेश्वर झाले आहे. मात्र या शिल्पाच्या पायथ्याशी असलेल्या शिलालेखानुसार हे मूळ बोधिसत्वाचे शिल्प असल्याचे प्रमाण मिळते. आता या बुद्ध विहाराचे रूपांतर शैव मंदिरात झाले असून पूर्वीच्या कंदरिका विहाराचे नामांतर आता “कद्री मंजुनाथ मंदिर” असे झाले आहे. मिथकानुसार येथील डोंगरातील लेणीं ही पांडवांनी कोरली असून त्यात शंकराची मूर्ती कोरली कारण पांडव शैव पंथाचे होते. 

वर दिलेली उदाहरणे हे फक्त काही बुद्ध लेणींची आहेत. या व्यतिरिक्त भारतात अशा अनेक बुद्ध लेणींचे अतिक्रमण होऊन नामकरण झाले आहे. तो एक वेगळाच विषय होऊ शकतो. कोंकणात व इतरत्रही अशा अनेक बुद्ध लेणीं आहेत ज्यांचे नामकरण पांडव लेणीं म्हणून झाले आहे.  गंमतीचा भाग म्हणजे या लेणीं कोरण्याचा काळ जर पहिला तर पांडवांनी एवढ्या कमी वेळात, एवढे मोठे भौगोलिक अंतर पार पडून, एवढे डोंगर फोडून, त्यात लेणीं कोरून तेथे किती दिवस राहिले हा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अर्थात या प्रश्नांची उत्तरे कुणी इतिहासकार किंवा पुरातत्वविद देईल अशी आशा बाळगणे चुकीचे आहे!

आजचे  संशोधन आपल्याला सांगते कि मुळातूनच या बुद्ध लेणीं आहेत आणि त्यातील शिलालेखांनुसार या लेणीं समूहांना काही विशिष्ट नांवे त्याकाळात दिली होती. ज्या दानदात्यांनी अतिशय श्रद्धापूर्वक या लेणीं कोरून बौद्ध भिक्खूंना दान दिल्या, त्यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी, त्यांनी या लेणींना दिलेले नांव आम्हीं का बरे अंमलात आणू शकत नाही? मुळातच या लेणींना, पांडव लेणीं म्हणायचा अट्टाहास का? आमचे इतिहासतज्ज्ञ, पुरातत्वविद आणि इतिहास व संस्कृती प्रेमी एवढ्या कोत्या मनाचे कसे? 

जाता जाता - जर पांडवांनी या लेणीं कोरल्या असतील असे मान्य केले तर त्यांनी सगळीकडे फक्त भगवान बुद्धांच्याच किंवा बौद्ध संस्कृतीशी निगडित प्रतिमा का बरे कोरल्या असतील?

अतुल मुरलीधर भोसेकर  -  ९५४५२७७४१०
----------------------------------------------------


प्राचीन बुध्दधम्म अडीच हजार वर्षापुर्वीची भारतभूमी ही बुध्द भूमी अाहे. अापल्याला बुध्द" चार भींतीच्या विहारात कोंडुन न ठेवता, सम्राट अशोकाने बुध्द धम्माचा एतिहासिक इतिहास प्राचीन काळातील डोंगराच्या दरी खोर्यातून पाषाणात चैत्य, स्तूप, बुध्दमुर्ती, शिलालेखात लेणी रुपात कोरुन ठेवला अाहे. त्या लेणींमधी बुध्दाच विद्रुपीकरण करुन (प्रतिक्रांती देव देवताचे रुप दिले, अनेक लेणी उध्दस्त केल्या अाहेत अापणास त्याचा शोध घेऊन बुध्द धम्माचे संवर्धन करायचे अाहे. तो जगाच्या समोर अाणायचा अाहे. त्यासाठी प्रत्येक बौध्द, बाबासाहेबांच्या अनुयायी तरुणाने पुढारकार घेतला पाहीजे, बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब अांबेडकर प्रत्येक लेणींना अावर्जून भेट द्यायचे. बाबासाहेब म्हणाले, मी धम्म इथपर्यंत अाणून ठेवला अाहे अाता इथून पुढे घेऊन जायच कार्य येणार्या तरुणांच्या हाती अाहे. प्रत्येक युवानी बुध्द धम्म अाणि बावीस प्रतिज्ञा संवर्धन करुन समाजा पर्यत पोहचवण्याचे कार्य अापल्या सत्याच्या मार्गाने तनमन लावून केले पाहिजे. यातून डाॅ. बाबासाहेबांना अपेक्षीत असलेला अनुयायी समता सैनिक दलात सहभागी होऊन डाॅ. बाबासाहेबाचा सैनिक म्हणुन ऐतिहासिक इतिहासातील वास्तूच, समाजाच संरक्षण करण्यास जोखीम स्विकारली पाहीजे.बुध्द पौर्णिमा, महापुरुषांची जयंती शक्यता अापल्या जवळपास असलेल्या बुध्द लेणीवर जाऊन साजरी कराव्यात.
एक पाऊल धाडसाच बुध्द धम्म अाणि
लेणी संशोधन अाणि संवर्धणाठी.
-सुरेश हि. महाडीक (क्रांतीभूमी)
समता सैनिक दल. मुंबई.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com