पुन्हा एकदा पंजाब हरियाणा आमने सामने ...


बेळगाव कारवार या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शहरावरून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात मागील साठ वर्षांपासून संघर्ष चालू आहे. ही शहरे सध्या कर्नाटकात असली तरी महाराष्ट्राने ही शहरे आमचीच असल्याचा दावा केला आहे. तेथील नागरिकही स्वतःला महाराष्ट्रीयनच समजतात. मात्र कर्नाटक या शहारांवरील दावा सोडायला तयार नाही. त्यामुळे दोन्ही राज्यात अनेकदा टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला आहे. अर्थात असा संघर्ष केवळ महाराष्ट्र कर्नाटक यांच्यातच आहे असे नाही तर देशातील अनेक राज्यात असा संघर्ष चालू आहे. आताही चंदीगड शहारावरून पंजाब आणि हरियाणा ही दोन राज्ये आमने सामने आली आहेत. चंदीगड हे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्वप्नातील शहर. नियोजनबद्ध रित्या हे शहर वसवण्यात आले असून नगर रचनाकारांनी हे शहर वसवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. या शहरातील स्वच्छता, हिरवाई, निसर्ग डोळ्यात भरणारे आहे म्हणूनच या शहराला ब्युटीफुल सिटी असे म्हटले जाते.  भारतातीलच नाही तर जगातील एक सुंदर शहर म्हणून या शहराची ओळख आहे. 

चंदीगड हे शहर पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांची राजधानी आहे. पूर्वी हरियाणा हा  पंजाब राज्याचाच एक भाग होता. तेंव्हा चंदीगड ही पंजाबची राजधानी होती. १९६६ मध्ये भाषावार प्रांत रचनेच्या आधारे पंजाबचे दोन राज्यात विभाजन करण्यात आले. पंजाबी भाषिक पंजाब आणि हिंदी भाषिक हरियाणा असे ते विभाजन करण्यात आले. जेंव्हा दोन्ही राज्य निर्माण करण्यात आली तेंव्हा दोन्ही राज्यांनी चंदीगडवर दावा केला. तेंव्हा तात्पुरता मार्ग काढण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी चंदीगडला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. मात्र ही तात्पुरती व्यवस्था असल्याने दोन्ही राज्यांचा चंदीगडवरील दावा कायम होता. 

दोन्ही राज्ये चंदीगडवरील दावा सोडत नाही हे पाहून १९७६ मध्ये केंद्रसरकारने चंदीगडला संयुक्त दर्जा दिला. म्हणजे या शहरावर दोन्ही राज्यांचा समान अधिकार राहील आणि चंदीगड ही दोन्ही शहरांची संयुक्त राजधानी राहील. राजीव गांधी पंतप्रधान बनल्यावर त्यांनी अकाली दलाचे प्रमुख लोंगोवाल यांच्याशी एक करार केला. या करारानुसार चंदीगड शहर पंजाबला देण्यात येईल व अबोहर आणि फाजिल्का सारखी काही शहरे चंदीगडला देण्यात येईल. मात्र हा करार अस्तित्वात येण्यापूर्वीच लोंगोवाल यांची हत्या झाली आणि हा करार कागदावरच राहिला. त्यानंतर अनेक पंतप्रधानांनी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला मात्र कोणालाही यश आले नाही त्यामुळे चंदीगड ही दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानीच राहिली. 

आता हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला कारण नुकत्याच झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने सत्ता मिळवली. या पक्षाचे भगवंतसिंग  मान हे मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्री बनताच त्यांनी चंदीगड शहर  पंजाबला मिळावा असा ठराव विधानसभेत संमत करून घेतला. त्या ठरावाला विरोधी पक्षांनीही एकमुखी पाठिंबा दिला. हा ठराव करण्यामागेही एक कारण आहे ते म्हणजे केंद्राने एक अधिसूचना काढली. या अधिसूचनेनुसार चंडीगडमधील बावीस हजार कर्मचाऱ्यांना केंद्रीय श्रेणीत टाकण्यात आले. हे कर्मचारी जरी चंडीगडमधील असले तरी आधी ते पंजाब सरकारच्या सेवेत होते त्यामुळे केंद्र सरकार अशाच खेळी करू लागले तर एक दिवस चंदीगड केंद्रशासित होईल असे पंजाब सरकारला वाटले तसे होऊ नये म्हणून त्यांनी हा ठराव केला अर्थात त्यांच्या या ठरावाला हरियाणा सरकारने विरोध केला.

 पंजाब सरकारने चंदीगडवर केलेला दावा चुकीचा असून चंदीगड हरियाणाचे होते, आहे आणि राहील. चंदीगड हरियाणा पासून कोणीही तोडू शकणार नाही तसा जर कोणी प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यांवर उतरू असा इशारा हरियाणाचे मुख्यमंत्री मोहनलाल खट्टर यांनी दिला आहे. एकूणच चंदीगडवरून हरियाणा आणि पंजाब आमने सामने उभे ठाकले असून भविष्यात हा संघर्ष आणखी तीव्र होणार आहे. पंजाब आणि हरियाणा यांच्या वादात केंद्र सरकार कोणती भूमिका घेते हे पाहणे देखील रंजक ठरेल कारण हरियानामध्ये भाजपचे सरकार आहे तर पंजाबमध्ये भाजप विरोधी आम आदमीचे पक्षाचे सरकार आहे. 

श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA