आजचा दिवस संबंध देशाच्या कानाकोपऱ्यात एका महापुरुषाचे स्मरण आणि सन्मान करण्याचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे या देशासाठीचे योगदान हे वादातीत आहे. या देशाला राजकीयदृष्ट्या स्थैर्य देण्याचे काम कुणी केले असेल तर ते बाबासाहेबांनी केले, असे मी नेहमी सांगत असतो. आपण १९४७ साली स्वतंत्र झालो, घटना समिती त्यानंतर झाली. १९५० ला आपण घटना स्वीकारली. आज भारताच्या आजूबाजूला काय स्थिती आहे, ती आपण पाहत आहोत. शेजारी श्रीलंकेतील लोकशाही संकटात आली की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरा शेजारी देश पाकिस्तानमध्येही आज तशीच स्थिती आहे. आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये एकप्रकारची स्थिरता राहिलेली नाही, ती अनेकदा उद्ध्वस्त होते, हे आपण पाहिले. पण आपला एवढा मोठा खंडप्राय देश असताना, अनेक जाती-जमाती, भाषा, प्रांत असताना सुद्धा या देशामधील स्थैर्य टिकून राहिलं. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान. त्यामुळे खऱ्या अर्थाने देश आज एकसंघ राहिलेला आहे.
आपण नेहमीच संविधानाबद्दलच्या त्यांच्या योगदानाचा उल्लेख करतो. तो महत्त्वाचा देखील आहे. पण तितकेच महत्त्वाचे या देशाच्या अर्थकारणाला दिशा देण्याचे काम बाबासाहेबांनी केले. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आज आपण बघतो आहोत, महाराष्ट्रात विजेचा प्रश्न गेले काही दिवस सतत चर्चेला येत आहे. तो म्हणजे विद्युत निर्मितीच्या कमतरतेचा. आज वीज कमी आहे, त्याचे दुष्पपरिणाम आज पाहायला मिळत आहेत. पण स्वातंत्र्याच्या आधी एक सरकार बनले गेले, त्या सरकारमध्ये विद्युत निर्मिती आणि जलसंधारण विभागाची जबाबदारी बाबासाहेबांकडे होती. बाबासाहेबांनी आपल्यादृष्टीने तो विचार त्याच वेळेला केला होता. या संकटाबद्दलची जाण त्यांनी मनामध्ये ठेवली आणि योग्य प्रकारचे निर्णय घेतले. या देशातील सर्वात महत्त्वाचे भाक्रा-नांगल या धरणाचा निर्णय बाबासाहेबांच्या सहीने झाला. नुसता पाण्याचा प्रश्न सुटला नाही. तर आपण कोळशापासून वीज तयार करतो, तेव्हा पाण्याच्या माध्यमातून वीज तयार करण्याची संकल्पना भाक्रा-नांगल परियोजनेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी मांडली आणि तिथे विद्युत निर्मितीचे काम केले.
बाबासाहेबांनी त्यावेळी नुसते निर्णय घेतले नाहीत, तर देशाला दिशा दिली. त्यावेळी देशात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या प्रमाणात विद्युत निर्मिती होत होती. त्यावेळची मुंबई राज्य आणि अशा अनेक राज्यात विजेची कमतरता होती. काही ठिकाणी अधिक वीज आणि काही ठिकाणी विजेची कमतरता होती. यातून मार्ग काढण्यासाठी त्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या आधी बाबासाहेबांनी एक निर्णय घेतला, तो म्हणजे देशातील सगळ्या राज्यातील विजेचे एकत्रिकरण कसे करता येईल आणि कुठलीही वीज कुठेही कशी पाठवता येईल, याबद्दलची उपाययोजना केली गेली. त्या माध्यमातून या देशातील विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत झाली. वीजनिर्मिती आणि विजेची उपलब्धता हे प्रगतीचे महत्त्वाचे साधन आहे. वीज असली तर अनेक गोष्टी होऊ शकतात. वीज नसेल तर अनेक अडचणी येतात. हा दृष्टीकोण त्याकाळात बाबासाहेबांनी ठेवला होता.
बाबासाहेब घटनेचे निर्माते होते, ही गोष्ट तर आपण विसरू शकत नाही. पण त्यांनी अधिक महत्त्वाचे कोणते काम केले असेल तर ते स्वतः अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचा पीएचडीचा थिसिस 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' हा प्रबंध लिहून त्यांनी रुपयाची अडचण मांडली होती. हा प्रबंध परदेशात स्वीकारला गेला. आज आपला देश उद्योगधंद्याच्या बाबतीत स्थिर झाला. एक काळ असाही येऊन गेला, जेव्हा उद्योगधंद्याच्या ठिकाणी काही ना काही कारणांमुळे संप व्हायचे. त्या ठिकाणी लोकांचा संघर्ष व्हायचा. स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये कामगारांच्या मूलभूत अधिकारांवर कधीही गदा येता कामा नये. यासाठी कामगारांना पोषक आणि उत्पादनवाढीला मदत करणारी कामगार नीती बाबासाहेबांनी देशासमोर ठेवली. त्याचा उपयोग नंतरच्या काळात संबंध देशाला झाला.
अशा अनेक गोष्टी आज सांगता येतील. या देशाच्या उभारणीसाठी ज्यांचे प्रचंड योगदान होते, असा नेता कोण असा जर प्रश्न विचारला तर एकच नाव आठवते. आपल्या देशात अनेक मोठे नेते होऊन गेले, त्यांचा अनादर नाही. पण आज तुम्ही देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला तर गावागावात एका महामानवाचा पुतळा पाहायला मिळतो, ते महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ते गावागावात पोहोचले त्यामागे होती त्यांची दृष्टी आणि सर्व समाजाचा त्यांनी केलेला विचार. अनेकांना त्यांनी दृष्टी दिली, शक्ती दिली. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेकांची साथ लाभली.
शाहू महाराजांनी बाबासाहेबांना साथ दिली. शाहू महाराजांनी आपल्या भाषणात उपेक्षित समाजाच्या घटकांना संदेश दिला की, तुम्हाला विचारी नेता भेटला आहे. हा नेता तुमचे जीवन बदलेल. जन्मभर त्याच्याशी प्रमाणिक राहा, असे आवाहन शाहू महाराजांनी केले होते. बाबासाहेब यांनी आयुष्यात काही लोकांना आपल्या जीवनात आदर्श मानले. त्या आदर्शांच्या मालिकेमध्ये एक नाव प्रकर्षाने येते, ते नाव म्हणजे महात्मा जोतिबा फुल्यांचे. बाबासाहेबांनी जोतिराव फुल्यांच्या बाबतीत आदर आणि सन्मान कायम ठेवला होता. त्यामुळे आम्ही अनेकवेळेला फुले-शाहू-आंबेडकर हा विचार मांडतो, तेव्हा त्यामागे काहीतरी दृष्टी असते. कारण फुलेंचे या देशासाठी योगदान आहे, शाहू महाराजांचे योगदान आहे. सर्वात महत्त्वाचे योगदान हे बाबासाहेब आंबेडकरांचे होते. त्यामुळे ही नावे आपण कायमची अंतकरणात ठेवलेली आहेत. यांनी जे आदर्श आपल्याला दिले त्याचे नुसते स्मरण करून चालणार नाही. तर आपल्या व्यक्तिगत जीवनात त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. समाजातील कोणताही लहान घटक, उपेक्षित घटकाकडे पाहताना फुले-शाहू-आंबेडकरांचा संदेश लक्षात ठेवून या सर्व घटकांकडे पाहिले पाहिजे. या समाजांची उंची वाढविण्याची अपेक्षा बाबासाहेबांची होती, त्यात यश आल्याशिवाय राहणार नाही. या कामात सर्वांनी सहभागी होऊन, पुढची पावले टाकली पाहीजेत.
0 टिप्पण्या