सुरुवातीपासूनच चे राष्ट्रसेवादलाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होते. मेधा पाटकरांच्या आंदोलनापासून क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कष्टक-यांच्या चळवळीपर्यंत त्यांनी स्वत:ला जोडून घेतले होते. निवडणुकीच्या काळात डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांच्या प्रचारासाठी जात होते. सामाजिक कृतज्ञता निधीच्या माध्यमातून डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबत कार्यरत होते. अशा ठिकाणी त्यांच्यातला नट कधीच अस्तित्वात नसायचा. विनम्रता आणि भिडस्तपणा एवढा की, आजूबाजूच्या माणसांना संकोच वाटावा. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण करत ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर त्यांनी साकारलेली ‘झेलेअण्णांची’ भूमिका निळू फुलेंना चित्रपट जगतात एक वेगळीच ओळख देउन गेली. मराठी चित्रपट सृष्टीत ‘सामना’, ‘शापित’, ‘सोबती’, ‘पुढचं पाऊल’, ‘सिंहासन’, ‘भुजंग’ यांसारख्या चित्रपटातून निळूभाउंनी साकारलेल्या भूमिका आजतागायत अजरामर आहेत. नाटक आणि सिनेमामधून त्यांनी साकारलेल्या नायकी-खलनायकी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली खरी, पण निळू फुलेंनी साकारलेल्या जवळपास सर्वच खलनायकी पात्रांना प्रेक्षकांची खास पसंती मिळाली. नाट्यक्षेत्रातही त्यांची ‘सखाराम बाईंडर’, ‘जंगली कबूतर’, ‘सूर्यास्त’, ‘बेबी’ ही नाटके विशेष उल्लेखनीय.
कराड येथे एकदा नाट्यसंमेलन भरले होते तेव्हा मनोहर जोशी हे संमेलनाध्यक्ष होते आणि लोकसभेचे देखील अध्यक्ष होते ते विजय तेंडुलकर यांची महती सांगत गुणगान करीत होते तेव्हा निळूभाऊ त्यांचे भाषण वाचून आले आणि दुसऱ्या दिवशी कडाडले की .... . . . ‘काल लोकसभेचे सभापती माननीय मनोहर जोशी म्हणाले की, तेंडुलकर हे मोठे नाटककार होते. पण याच जोशींना मी पंचवीस वर्षापूर्वी निदर्शनं करताना आणि नाटय़गृहातल्या खुच्र्याची, लाइटची मोडतोड करताना पाहिलंय. कलावंतांना स्टेजवर शॉक बसायचे म्हणून कलावंत घाबरायचे. आणि आज हे सांगताहेत तेंडुलकर थोर नाटककार होते म्हणून. तेंडुलकर मोठे होते, हे समजायला यांना पंचवीस वर्षे लागली. म्हणून म्हणतो, अहो जरा वाचत जा. विचार करीत जा. समजत नसेल ते समजून घेत जा...’ असा होता हा माणूस....... सज्जन परंतु रोखठोकपणे सामाजिक बांधिलकी जपत प्रहार करणारे. बंदिस्त नसलेल्या लोकनाटय़ात हजरजबाबीपणाचे दर्शन घडविणारे निळूभाऊ.. एरवी नम्र असलेले मात्र, रंगमंचावर दरारा असलेले..
ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांना अभिनय क्षेत्रात असल्यामुळे मुलगी गार्गीला पुरेसा वेळ देता येत नसे. मात्र, तरीही वेळ मिळाल्यावर गार्गीशी नाटक, चित्रपट, अभिनय या विविध विषयांवर चर्चा करण्यास फुले प्राधान्य देत. त्यांनी गार्गीला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले होते. वडिलांच्या बऱ्या-वाईट भूमिकेबद्दल ती त्यांच्याशी स्पष्टपणे बोलायची. वडीलांच्या नावाचा प्रभाव न वापरता तिने जिद्दीने नाटक-सिनेमा क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण केले. तुला पाहते रे मध्ये गार्गी फुले यांना तुम्ही पाहिलं असेलच.
जाता जाता एक घटना सांगतो आणि तुम्हीच ठरवा की हा मोठा माणूस होता की नाही ते....
... राम नगरकर यांनी ‘रामनगरी’मध्ये त्या संदर्भातली आठवण लिहिलीय. १९७२च्या दुष्काळातली ही घटना आहे. त्या काळात राम नगरकरही निळूभाऊंच्या घरी राहायला, जेवायला होते. निळूभाऊ त्यांच्याकडून काहीही घेत नव्हते. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सेवादलानं गोळा केलेलं धान्य निळूभाऊंच्या घरी ठेवलं होतं. एके दिवशी संध्याकाळच्या वेळेस निळूभाऊ आणि राम नगरकर बाहेर जायला निघतात,तेवढय़ात निळूभाऊंची आई त्यांना हाक मारून बोलावते. म्हणते, थोडे पैसे दे. निळूभाऊ म्हणतात, माझ्याकडं पैसे नाहीत. आई म्हणते, घरात धान्याचा कण नाही, काय करायचं? त्यावर ते म्हणतात, काहीही कर. त्या माऊलीला साहजिकच घरातल्या धान्याच्या पोत्यांची आठवण येते. ती सहज म्हणते,यातलं पायलीभर धान्य घेऊ का, दोन दिवसांनी पैसे आल्यावर त्यात ते परत टाकूया. त्यावर निळूभाऊ तिला सांगतात, ‘ते लोकांचं आहे. उपाशी मेलो तरी चालेल, पण त्यातल्या दाण्यालाही हात लावायचा नाही.’
सार्वजनिक जीवनात काम करताना कार्यकर्त्यांनं कसं वागावं, यासाठी निळू फुले यांचं उदाहरण देता येईल... वयाच्या ७८ वर्षी गळ्याचा कॅन्सर (oesophagal cancer) होऊन ते आजच्याच दिवशीच २००९ साली आपल्यातून गेले. निळूभाऊ त्यांची पत्नी रजनी फुले या निळू भाऊंनंतर एक वर्ष्यातच निवर्तल्या होत्या, एक भक्कम आधार असायचा निळूभाऊंचा तो गेला आणि पाठोपाठ त्याही...
खरंच या थोर माणसाला आज त्यांच्या जयंती दिवशी नमन करून श्रद्धांजली अर्पण करावीशी वाटली.
--------------------------
ज्या अभिनेत्याचा खलनायक नायकापेक्षा कांकणभर सरस ठरायचा, आणि सकारात्मक भूमिका साकारताना त्यांचा मृदू आवाज तितकाच भावायचा अशा निळू फुलेंचा आज जन्मदिवस म्हणजे 4 एप्रिल. आज त्यांच्या जन्मदिनी अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक याने एक मोठी घोषणा केली आहे. त्याने स्वत: इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्याने असे म्हटले आहे की, 'निळूभाऊ...आज तुमचा वाढदिवस...!!! तुमच्या सहवासातली ती दोन अडीच वर्ष माझ्या आयुष्यातली सर्वात अविस्मरणीय होती भाऊ. तुम्हाला खूप जवळून पाहता आलं...अनुभवता आलं... तुमच्याकडून बरंच काही शिकलो... तुम्हाला न सांगता तुम्हाला मनोमन "गुरु" च मानलं... तुमचा आशीर्वाद म्हणूनच कि काय तुमच्यावरचा जीवनपट दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली आहे. तो फक्त एक चित्रपट नसेल तर मी तुम्हाला दिलेली "गुरुदक्षिणा" असेल...!!! फक्त पाठीवर तुमचा हात कायम राहू द्या भाऊ...!!!'
0 टिप्पण्या