Top Post Ad

माणगाव परिषद म्हणजे मानवमुक्तीच्या लढ्याची सुरुवात

  • ॲड. प्रकाश आंबेडकर;  शाहूराजे भोसले यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या शतकमहोत्सवी समारंभाचा समारोप


कोल्हापूर 
 सुमारे १०२ वर्षांपूर्वी दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत वर्गाची  माणगाव या गावी झालेली परिषद म्हणजे  डॉ .बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची सुरुवात होती.आज मुजोर प्रस्तापित  व्यवस्थेसमोर  टिकायचे असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक राहून सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन राष्ट्रीय आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.  माणगाव (ता. हातकणंगले) येथे ऐतिहासिक माणगाव परिषदेच्या शतकमहोत्सवी समारंभ समारोपप्रसंगी ते बोलत होते.

कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे 21 आणि 22 मार्च, 1920 रोजी झालेल्या परिषदेला शंभर वर्षे पूर्ण झाली. या परिषदेचा शतकमहोत्सवी भव्य सोहळा राज्य शासनाने माणगाव येथेच आयोजित केला होता. मात्र कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तो पुढे ढकलण्यात आला. तो शताब्दी समारोप समारंभ  गुरुवारी (२८ एप्रिल ) माणगाव येथे पार पडला. या  सोहळ्याला शाहू महाराजांचे वंशज  शाहूराजे भोसले, तर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, तसेच तत्कालीन माणगाव परिषदेचे आधारस्तंभ आप्पासाहेब पाटील यांचे वंशज विक्रमसिंह पाटील, तत्कालीन स्वागताध्यक्ष दादासाहेब इनामदार यांचे वंशज मिलिंद इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

 माणगाव परिषदेमुळे  या देशातील सामाजिक राजकीय संदर्भच बदलून गेले. एवढेच नव्हेतर राजर्षी शाहूंराजांच्या दूरदृष्टीने बाबासाहेबांच्या संबंधाने ते "संपूर्ण हिंदुस्थानचे पुढारी होतील" असे केलेले विधान तंतोतंत खरे ठरले. ते देशाचे तर पुढारी झालेच याच बरोबर विश्वातील मानवमुक्ती लढ्याचे मार्गदर्शक ठरले.  माणगाव परिषदेमुळे भारताचा  इतिहास बदललेला आहे , परिषदेमुळे सर्व समाजाचा चेहरामोहरा बदलल्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा जागर आवश्यक असून  सध्याच्या काळात समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याची गरज आहे. त्यांना सेवा संस्था या माध्यमातून मदत केली पाहिजे असे आवाहन यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केले.

 वंचित बहुजन समाजाच्या उद्धारासाठी डॉ. आंबेडकर यांचे कार्य मोठे असून त्याचा वारसा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाहून दिसून येतो, असे मत श्रीमंत शाहू महाराज यांनी  यावेळी व्यक्त केले. अंजलीताई आंबेडकर यांनी मनोगत व्यक्त केले. संयोजन समितीचे अध्यक्ष माजी प्राचार्य बापूसाहेब माने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रामाणिक व एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा दिली. यावेळी तीन पुस्तकांचा  प्रकाशन सोहळाही पार पडला. त्यात माणगाव परिषद शतकोत्तर चिंतन, प्रा. संभाजी बिरांजे लिखित आप्पासाहेब पाटील व्यर्थ न होवो बलिदान, डॉ. प्रा. अमर अभिमान पांडे लिखित क्रांतीचे साक्षीदार या पुस्तकाचे प्रकाशन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीत माने यांनी केले. पी. एन. कांबळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य पी. एन. कांबळे, आर. बी. कोसंबी, जी. बी. आंबपकर, बाळासो कांबळे, ए. पी. कांबळे, एम. एम. कांबळे , मधुकर माणगावकर , भीमराव माणगावकर , अनिल कांबळे आदींनी परिश्रम घेतले होते .

परिषदेत विविध ठराव ठरावामध्ये प्रमुख ठराव,
कोल्हापूर शहरात गौतम बुद्धांचे राष्ट्रीय स्मारक, रेल्वे स्टेशनसमोरील रेस्ट हाऊसमध्ये आंबेडकरांचे स्मारक, माणगाव येथे छत्रपती शाहू महाराज व डॉ. आंबेडकर यांचे पुतळे, माणगाव प्राथमिक शाळेचा पुनर्विकास करून स्मारक, माणगाव ऐतिहासिक पर्यटनस्थळ जाहीर करावे, शिवाजी विद्यापीठात पाली भाषा विकास स्वतंत्रपणे सुरू करावा, माणगाव परिषदेसाठी जाहीर केलेला ५०० कोटी निधी द्यावा 

अचानक आलेल्या  पावसाने जाग्या केल्या जुन्या आठवणी  
विचारमंचावर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर जेव्हा भाषण करण्यासाठी उभे टाकले तेव्हा विजांच्या कडकडाटासह पाऊसाने आगमन केले. १९२० मध्ये भरलेल्या पहिल्या माणगाव परिषदेलाही अशीच पावसाने हजेरी लावली होती. त्याच पद्धतीने आज सुमारे १०२ वर्षांनंतर झालेल्या माणगाव परिषद शताब्दी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमालाही पावसाने हजेरी लावली. निसर्गानेही माणगाव परिषदेला उपस्थिती दर्शवल्याचे निवेदकांनी सांगताच जनसमुदायाने टाळ्यांच्या गजरात पावसाचे स्वागत केले.
  • माणगांव येथे ऐतिहासिक माणगांव परिषदेचा शताब्दी समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. अमर पांडे यांनी संपादित केलेल्या ‘क्रांतीचे साक्षीदार’ या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  पुस्तकामध्ये सन १९२० मध्ये माणगांव परिषद आयोजित करण्यात ज्यांचा मोठा वाटा होता, ते आप्पासाहेब पाटील यांच्यावर व त्यांच्या समाजकार्यावर आधारित लेख आहेत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजर्षि शाहू महाराज यांची परिषदेतील भाषणे व ठरावांचा उहापोह यामध्ये करण्यात आला आहे. आप्पासाहेब पाटील हे सत्यशोधकी विचाराचे तसेच दानशूर व्यक्तीमत्व होते. हत्ती सहज फिरु शकतील एवढा मोठ्ठा त्यांचा वाडा होता. त्यांचे अस्पृशोद्धाराचे कार्य व परिषदेतील सहभाग गावकऱ्यांना सहन झाला नाही, गावाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. स्वतःच्या घरातही त्यांना कुणी घेईना. शेवटी त्यातच आजारी पडून त्यांचा मृत्यू झाला. शाहूराजे व बाबासाहेब असते तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. सन १९२२ ला शाहू महाराजांचे निधन झाले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडन मध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले होते.पुस्तकाच्या मुखपृष्ठावर 300 वर्षपूर्वीचे पिंपळाचे झाड असून, त्या झाडा शेजारीच ही परिषद संपन्न झाली होती. आप्पासाहेब पाटील हे या प्रसंगी उपस्थित होते. त्यामुळे वृक्ष, तसेच आप्पासाहेब पाटील हे माणगांव परिषदेच्या क्रांतीचे साक्षीदार ठरतात, असे संपादकाचे मत आहे. हे पुस्तक प्रा. डॉ. नितीन गायकवाड यांनी प्रकाशित केले असून, पुस्तकासाठी माजी महापौर सुरेश पाटील, प्रा रवी ढाले, प्रा आप्पासाहेब केंगार, डॉ. भगवान मींचेकर यांचे सहकार्य लाभले आहे
- प्रबोध माणगावकर: 
------------------------



 'दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत (अस्पृश्य) वर्गाची परिषद'. अर्थात माणगाव परिषद

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक चळवळीसाठी 'माईलस्टोन' ठरणारी ही माणगाव परिषद होती. तशीच ती प्रस्थापितांना धक्का देणारीही होती. महाराजा सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या आर्थिक मदतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बडोद्यातील नोकरीत त्यांना अस्पृश्यतेचे अत्यंत वाईट अनुभव आले. नोकरीचा राजीनामा देऊन ते मुंबईत परतले. डॉ.आंबेडकर प्राध्यापक झाले. 'माझ्या गरीब आणि अस्पृश्य, अज्ञानी बांधवांना मला जागृत केले पाहिजे', असा त्यांचा मनोदय होता. समतेचा पुरस्कार करणारे शाहू महाराजही याच विचारात होते. आपल्या संस्थानातील कागल इलाख्यात अस्पृश्यांसाठी एखादी परिषद घ्यावी, असे त्यांच्या मनाने निश्चित केले. वेदोक्त प्रकरणामुळे समस्त ब्रह्मवृंदात त्यांच्याबद्दलचा असंतोष खदखदत होताच. अशा परिस्थितीत त्यांचे विश्वासू असलेले माणगावचे आप्पाराव पाटील यांच्यावर त्यांनी परिषदेची जबाबदारी सोपवली. 

आप्पाराव पाटील हे जैन समाजाचे असले तरी अस्पृश्य समाजाप्रती त्यांच्या मनात कणव होती. ते पुरोगामी विचारांचे होते. माणगाव येथे दलित समाजाची लोकवस्तीही बऱ्यापैकी होती. आप्पाराव आणि नाना मास्तर, नागोजी कांबळे, गणू सनदी, कासीम मास्तर आदी गावकरी कार्यकर्त्यांनी परिषदेची जबाबदारी स्वीकारली. तत्कालीन परिस्थिती पाहता ही किती अवघड गोष्ट होती, हे आपल्या लक्षात येईल. दळणवळण आणि प्रसार माध्यमांची कमतरता असतानाही आप्पाराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 21 आणि 22 मार्च, या दोन दिवशी परिषदेचे आयोजन केले. गुढीपाडव्याच्या दिवशी ही परिषद सुरू झाली. आज आपण या परिषदेचा नामोउल्लेख  'माणगाव परिषद' असाच करतो, परंतु परिषदेचे नाव होते 'दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत (अस्पृश्य) वर्गाची परिषद'. 

इथल्या प्राथमिक शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केला. (सध्या मात्र मुक्कामाच्या खोलीची पूर्णतः पडझड झाली आहे. तिथे नव्याने बांधकाम करून स्मारक करता येईल.) डॉ.आंबेडकरांना गावात येण्यासाठी रुकडीच्या रेल्वे स्थानकावरून पायी यावे लागले, हे लक्षात घ्या.  बाबासाहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, "उपाशी रहा, मरा, परंतु मुलांना शिकवा." 
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी अत्यंत प्रभावी भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी आंबेडकरांचा गौरव केला. "डॉक्टर आंबेडकर  तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत आणि एक वेळ अशी येईल की ते भारताचे पुढारी होतील", असे दूरदृष्टीचे सूचक उद्गार  छत्रपतींनी यावेळी काढले होते. 

परिषदेत एकूण पंधरा ठराव संमत करण्यात आले. त्यात, बहिष्कृत लोकांना मानवी हक्क मिळावेत, सर्व मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे देण्यात यावे, मेलेल्या जनावरांचे मांस कोणत्याही जातीच्या माणसाने खाणे गुन्हा आहे, भावी कायदे कौन्सिलात बहिष्कृत वर्गाचे प्रतिनिधी लोकसंख्येच्या प्रमाणात निवडून देण्यात यावेत, असे महत्त्वपूर्ण ठराव मांडण्यात आले.

मूकनायक अंकाच्या वृत्तांतानुसार सभेला 5000 लोक उपस्थित होते, अशी नोंद आहे. त्या काळाच्या मानाने ती खूपच होती. तत्पूर्वी सदर परिषद ही बाटलेल्या लोकांची आहे आणि बाटलेला माणूसच तिचा अध्यक्ष आहे,असाही प्रसार करून अनेकांना परिषदेस जाण्यास रोखले होते. तरीही कार्यकर्त्यांनी गावोगावी परिषदेची पत्रके वाटली होती. 

परिषदेचे तत्काळ पडसाद प्रथम गावावर उमटले. ज्यांनी पुढाकार घेऊन आपल्या समाजाच्या विरुद्ध जाऊन अस्पृश्य परिषदेसाठी योगदान दिले, त्या आप्पाराव पाटील यांना स्वजातीने अक्षरशः वाळीत टाकले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांना कोल्हापुरातच रहावे लागले. तिकडे  माणगावातील अस्पृश्यांना स्पृश्यांनी अडचणीत आणले. त्यांच्यावर चहुबाजूनी अघोषित बंदी आणली. अस्पृश्यांना पाणी मिळेना, गुरांसाठी चारा मिळेना, सरपणासाठी लाकूड मिळेना, की अन्नधान्य मिळेना. जणू गुलामगिरीच. शाहूराजांनी गावकऱ्यांना सक्त ताकीद देऊन अस्पृश्यांवरील गावकऱ्यांची बंदी उठवली. 

डॉ.आंबेडकर हे वादळी तुफान प्रस्थापिताना धक्का देणार, हे या परिषदेमुळे निश्चित झाले. ही परिषद म्हणजे त्यांच्या सामाजिक चळवळीचा आरंभबिंदू ठरला. आंबेडकरांनी आपल्या भाषणात मुंबई इलाख्यातील अशाप्रकारची ही पहिलीच परिषद असल्याचे नमूद केले आहे. असे असूनही आश्चर्य एका गोष्टीचे वाटते की, या परिषदेची छायाचित्रे उपलब्ध होत नाहीत. परिषदेच्या मूळ पत्रिका आढळत नाहीत. मूकनायक आणि जुन्याजाणत्या माणसांच्या आठवणींवरून परिषदेचा वृत्तांत जपला जातोय. यातून नव्याने उभारत असलेल्या माणगावने धडा घेतला पाहिजे. आपल्या ऐतिहासिक अभिलेख, वस्तूंचे जतन जाणीवेने केले पाहिजे. किमान शतकमहोत्सवी कार्यक्रमानिमित्ताने उपलब्ध होत असलेले सर्व पुरावे, अभिलेख, वस्तू यांचा संग्रह करावा, त्यांचे जतन करून निगा राखावी. ग्रामपंचायत, गावचावडी, शाळा, संस्था व माध्यमांनी ही जबाबदारी घ्यावी. पुढच्या पिढीला अस्सल इतिहास आणि सामाजिक परिस्थितीचे आकलन व्हावे, यासाठी एवढे करणे आवश्यकच नाही, तर अनिवार्य आहे!

   - विश्वास सुतार, कोल्हापूर



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी शाहू महाराजांशी जो घनिष्ट संबंध आला, तो मार्च १९२० मध्ये कोल्हापूर संस्थानात माणगाव या ठिकाणी भरलेल्या परिषदेत. ही परिषद महाराजांच्या प्रेरणेनेच भरली होती आणि तिच्यासाठी खास सवड काढून महाराज परिषदेला उपस्थित राहिले होते. बाबासाहेब परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या रूपाने अस्पृश्य समाजास एक उमदे नेतृत्व मिळत आहे, याचा महाराजांना मोठा आनंद झाला होता. आपला आनंद व्यक्त करताना महाराजांनी म्हटले होते, ‘तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला, याबद्दल मी तुमचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ. आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील. माझी मनोदेवता मला असे सांगते.’ इतिहासाने हे दाखवून दिले आहे की, शाहू महाराजांनी दूरदृष्टीने बाबासाहेबांविषयी केलेले भाकीत अचूक होते.
याच परिषदेत बाबासाहेबांच्या पुढाकाराने परिषदेने ‘शाहू छत्रपतींनी आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभिल्याबद्दल अभिनंदन करून त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा,’ असा खास ठराव मंजूर केला. २६ जून हा शाहू महाराजांचा वाढदिवस. हा वाढदिवस अस्पृश्य समाजाने सणाप्रमाणे साजरा करावा, असा ठराव बाबासाहेबांच्या प्रेरणेने माणगाव परिषदेने केला होता


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com