मागच्या दाराने आलेली भांडवलशाही


 दोन ते अडिच वर्षे कोरोना महामारीच्या रुपाने निसर्गाने संपूर्ण मानवजातीला आपला इंगा दाखवला. संपूर्ण जगच हतबल झाले होते. या जागतिक नैसर्गिक संकटात भारतीय माणसाने देवाचा धावा करणे अपेक्षित होते. मात्र या महामारीने देवालाही बंदिस्त केले. कोरोना महामारीने इतका कहर केला की, सर्वशक्तिमान देव मंदिरातच स्तब्ध झाले. सर्वत्र `सन्नाटा' पसरला. खरं तर माणसांवर येण्राया प्रत्येक संकटप्रसंगी कोणत्या ना कोणत्या देवाचे दरवाजे  सर्वप्रथम ठोठावण्याचा भारतीयांचा प्रघात यावेळी मात्र  निरुपयोगी झाला. घरापासून ते मंदीरापर्यंत विराजमान असलेले सर्व शक्तीमान देव आपआपल्या ठिकाणी बंदिस्त झाले. इतका प्रभाव कोरोना महामारीचा होता.  

इथल्या प्रत्येकाच्या घरात एक देवघर असतं, त्यात किमान एक देव असतो. माणूस जर अधिक भावनिक असेल, तर एकापेक्षा अधिक देव तिंथं समानतेनं नांदतात; पण या स्वत:च्या देवघरातल्या देवावर त्या माणसांचं समाधान होत नाही. त्याला गावात निदान ग्रामदेवतेचं तरी एक मंदिर लागतंच. त्यातच काही वर्षापूर्वी खेडोपाडी हनुमानाचं एक मंदिर अधिक वाढलं. गाव मोठ असलं, तर त्या गावात परंपरेनं चालत आलेली प्रत्येक वसाहतीत पुन्हा एक नवं मंदीर येतंच. इतकच काय  हल्ली बुद्धिप्रामाण्यवादी रुढ असं गणपतीचं, हनुमानाचं मंदीर बांधण्याऐवजी शारदेचं मंदीराचा प्रघात सुरु झाला.  पण एवढ्यावर मंदिराची भूक भागत नाही. जेजूरीचा खंडोबा, पंढरपूरचा विठोबा, काशीचा विश्वेश्वर, कोल्हापूरची अंबा, तुळजापूरची भवानी ही मंदीरंही सोबतीला असतात. जरी घरात यांच्या प्रतिमा असल्या तरी याही मंदिरांना भेट दिल्याशिवाय पुण्य पुरेपूर मिळणार नाही हे मनात ठाम बिंबले असल्याने मग त्यांच्या मंदिरांना भेट देणे क्रमप्राप्तच. त्यातच स्वप्नात त्याची कुलस्वामिनी येते ती म्हणते, तू आता थकलास, मीच तुझ्याकडे येते. म्हणून मग त्या गावात देव देवींची ठाणी उभी राहतात. रेणूकेचे मुळ मंदीर असते महुरला, पण तिच्या भक्तासाठी तिचे ठाणे येते जोगाईच्या अंब्याला. अधूनमधून जत्रा भरतात त्या निराळ्या. जेजुरीला खंडोबाची यात्रा भरते ती निराळी आणि माळेगावला पुन्हा खंडोबाचीच जत्रा भरते ती निराळी.  

या सर्व देवांच्या जोडीला अष्टविनायक, बारा ज्योर्तिलिंग आहेत ती निराळीच. आता खरं तर एवढी देवळे निर्माण केल्यावर थांबायला काय हरकत आहे? साधू पुरुषांची देवस्थानं निर्माण होतात ती वेगळीच. तथाकथित शेगावचे गजाजन महाराज, शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे स्वामीसमर्थ अशी कितीतरी नावं सांगायची. चोखोबा, ज्ञानोबा, नामदेव, तुकाराम ही तर मग जुनी जाणती मंडळी, यांचीही देवालये हवीतच ना! त्यात त्यांचे भक्त थकले की, पुन्हा यांचीही ठाणी अर्थात देवालये त्या त्या गावात निर्माण होतात. असा हा देवाचा पसारा दिवसेंदिवस वाढतच आहे.  अशी वाढलेली मंदिरांची संख्या पाहता देव सर्व शक्तीमान आहे आणि तो आपल्याला प्रत्येक संकटातून वाचवेल अशी धारणा लहानपणापासूनच प्रत्येकाच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न इथल्या व्यवस्थेमार्फत करण्यात आला आहे. मात्र कोरोनाने हा सारा भ्रम दूर केला. कोरोना महामारीने वास्तव दाखवून दिल्याने कदाचित आता हे सारं थांबेल असं वातावरण निर्माण झालं होतं. 

प़ण भारतीय राजकारणी मंडळी किंवा इथली प्रस्थापित व्यवस्था हा प्रकार कसा थांबवू शकेल. कारण यावरच तर त्यांचे वर्चस्ववादी राजकारण अवलंबून आहे. इथला देव संपला तर इथली अंधश्रद्धा संपेल, इथली अंधश्रद्धा संपली तर वर्षानूवर्षे बहुजनांवर आपण करीत असलेले राज्य संपूष्टात येईल. त्यामुळे या देवाला जिवंत ठेवण्याशिवाय प्रस्थापित व्यवस्थेला गत्यंतर नाही. म्हणून पुन्हा इथल्या बहुजनांच्या माथी देव मारण्यात इथली व्यवस्था यशस्वी झाली. हनुमान चालिसा प्रकरण हे त्यातील सर्वात मोठे उदाहरण.  जगात अनेक धर्म आहेत. जसे ख्रिस्ती धर्म, इस्लाम धर्म, बौद्धधम्म.  ख्रिश्चनांना गावात एक चर्च पुरतं. इस्लाम धर्मियांचं एका मस्जीदवर भागतं. गाव मोठंच झालं तर अंतराच्या दृष्टीनं या प्रार्थना स्थळामध्ये भर पडते एवढंच. हे चित्र सर्वत्रच दिसते. मानवी जीवनातले सगळेच प्रश्न तर्काने सुटत नाहीत. त्यामुळे श्रद्धेच्या जोरावर आपल्या मनातल्या अघटीत गोष्टींचा उलगडा करुन घेणे ही मानवी प्रवृत्ती आहे आणि ती अस्वाभाविक आहे मात्र त्याचा फायदा इथल्या व्यवस्थेला का करून द्यायचा हा प्रश्न आता प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवा. 

पिढ्यान् पिढ्या त्याच समस्या घेऊन मंदिरात जायचं घंटा वाजवत रहायचं आणि भलं मात्र इथल्या प्रस्थापित वर्गाचेच होणार असेल तर ही परंपरा का जोपासायची हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.  मानवी अहंकाराचा, देव-धर्माचा निसर्गाने पराभव केला. संकटकाळी देवाचा धावा करतांना कोरोनामुळे उलटेच झाले. `कोरोना' प्रकरणात स्वत देवांनाच विषाणूंपासून संरक्षण द्यायची वेळ आली.  महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील `देवळे' कोरोनाच्या भीतीने बंद करावी लागली. मग कसले देव आणि कसले देवत्व? कोरोनाच्या दोन अडिच वर्षात देव कोणाच्याच मदतीला धावला नाही. तरीही देवालये उघडी करण्यासाठी आंदोलने झाली. यामागे व्यवसायिक वृत्ती होती की श्रद्धेचा भाग होता हे आता प्रत्येकाने तपासायला हवं. देवाच्या नावाखाली आपली लूट तर होत नाही ना? आपल्याला फसवलं तर जात नाही ना? आपल्याला प्रस्थापित व्यवस्थेचे गुलाम तर बनवले जात नाही ना? या सर्व प्रश्नाची उत्तरे स्वत:लाच विचारायला हवीत. तरच आपण या प्रस्थापित भांडवलशाहीला शह देऊ अन्यथा मागच्या दाराने आलेली भांडवलशाही आपल्या पिढ्या बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही. आपण मात्र हनुमान चालिसा म्हणत बसू. कारण 

आज धर्म हा  राजकारणाचे सगळ्यात मोठे भांडवल झाले आहे.   गाडगेबाबा आपल्या किर्तनातून नेहमी सांगत असत,  नवस, आवस, देव-धर्म खरा नाही. मानवता हाच धर्म आहे. देवळात जाऊ नका. मूर्तीची पूजा करू नका. देवापुढे पैसा, फूल ठेवू नका. तीर्थी धोंडा पाणी! सत्यनारायण पुजू नका. पोथी पुराणातल्या चमत्कारांवर विश्वास ठेवू नका. प्राण्यांची हत्या करू नका. दारू पिऊ नका. सावकारांचे कर्ज काढू नका. आपल्या मुलांना जास्तीत जास्त शिक्षण द्या. कोरोना काळात त्याचा प्रत्यय आला. देव हा केवळ भावनेचा खेळ आहे.  लोकांना घरी बसावे लागले. लोकांचा रोजगार गेला.  पण लोकांच्या मदतीला या देव-धर्माची कोणतीही शक्ती आली नाही. याचा प्रत्यय मानवाला विशेष करून भारतीयांना अनेक वेळा आला आहे. शेवटी देव दगडाचाच! पण पुन्हा पुन्हा आपल्या माथी मारण्याचा हा प्रस्थापित व्यवस्थेचा डाव आपण ओळखला पाहिजे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1