देशाचे दुश्मन


भारताच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत  महाराष्ट्राचे योगदान फार मोलाचे राहिलेले आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या काळात होऊन गेलेल्या वेगवेगळ्या वैचारिक चळवळी यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर मोठा प्रभाव टाकला आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन्ही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हे वैचारिक मंथन अनेक मार्गाने होत राहिले.याच वैचारिक मंथनातून मोठ्या प्रमाणात वैचारिक संघर्षाचे प्रसंगही महाराष्ट्राने बघितले आहे. याच वैचारिक संघर्षाच्या प्रसंगांमध्ये ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर संघर्ष अधिक ठळकपणे दिसणारा आहे.एकीकडे विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि बाळ गंगाधर टिळक यांचे नेतृत्व मानणारा ब्राम्हणांचा पक्ष तर दुसरीकडे महात्मा ज्योतिराव फुले आणि राजर्षी शाहू छत्रपती यांचे नेतृत्व मानणारा ब्राह्मणेतर पक्ष असे चित्र ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्षात प्रामुख्याने दिसून येतो.पुणे शहर हे या संघर्षाच मुख्य केंद्र.त्याच्या झळा मात्र अख्या महाराष्ट्राने अनुभवल्या आहे.याच ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्षतील अनेक अंकांमधला एक अत्यंत गाजलेला अंक म्हणजे "देशाचे दुश्मन" या पुस्तकावर भरलेल्या खटल्याचा अंक...     

      या वादाची सुरुवात झाली,ती पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा व्हावा या मागणीने. 1925 सालच्या पुणे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ब्राह्मणेत्तर पक्षाचे केशवराव जेधे हे नगरसेवक म्हणून पालिकेवर निवडून गेले. 43 सभासद संख्या असलेल्या पुणे नगरपालिकेत 5 जागा ह्या मुस्लिमांसाठी राखीव होत्या. उरलेल्या 38 पैकी दहा ब्राह्मण, 21 बहुजन, दोन मारवाडी, 3 गुजराती भाषिक आणि दोन दक्षिण भारतीय ब्राह्मणेतर होते. ब्राह्मणेतरांच्या भरणा मोठा असला तरी पालिकेवर वर्चस्व होते ते टिळक पक्षाचेच. बाबुराव फुले, नारायणराव गुंजाळ,किराड, रंगोबा लडकत इ.सदस्य ब्राह्मणेतर असले तरीही त्यांचा पाठिंबा टिळक पक्षाला होता. बाबुराव झेंडे, वायाळ, केशवराव जेधे, सणस, मानूरकर असे ब्राह्मणेत्तर नगरसेवक पालिकेत अल्पसंख्यच होते. पालिकेमध्ये ब्राह्मणेत्तर पक्षाची भिस्त प्रामुख्याने केशवराव जेधे यांच्यावर होती. नेमस्त पक्षाचे लक्ष्मणराव आपटे हे व्यवसायाने वकील व पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष होते. अशा परिस्थितीत ब्राह्मणेत्तर गटांकडून आणले जाणारे  ठराव सभेत पारित होण्याची शक्यता तशी धुसरच होती.याची पुरती जाणीव असणाऱ्या केशवराव जेधे यांनी एकापाठोपाठ एक असे अनेक ठराव सभेत आणून त्यावर चर्चा घडवून आणल्या.

      अशाच एका ठरावाचा प्रसंग मोठा उद्बोधक आहे. नगरपालिकेच्या खर्चाने चालणारे सार्वजनिक हौद, विहिरी, नळ हे स्पृश्यास्पृश्य भेद न ठेवता सर्वांसाठी खुले करण्यात यावे, हा ठराव जेधे यांनी सभेत आणला. 31 जुलै 1925 रोजी त्यावर वादळी चर्चा झाली या ठरावाच्या विरोधात संतापत खुद्द पालिका अध्यक्ष आपटे म्हणाले," या ठरावाने शहरात गोंधळ माजेल. आमची बायकामाणसे या गोष्टीला तयार होणार नाहीत. हा ठराव सर्व सभासदांनी नापास करावा." अशी सूचना देताच लवाटे,चंद्रचूड, दामले, दंडवते, डॉ. फाटक यांनी ठरावाला कडाडून विरोध केला. यावर मतदान होऊन बारा विरुद्ध पंधरा मतांनी ठराव पडला. ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर या संघर्षाच्या काळात  दुसऱ्या आघाडीला जहाल आणि नेमस्त यांच्यामध्ये सुद्धा संघर्षाच्या ठिणग्या पडत राहिल्या. नेमस्त गटाचे मुखंड गोपाल कृष्ण गोखले यांचा उपमर्द करण्याची संधी जहाल पक्षाने म्हणजे टिळक अनुयायांनी कधीच सोडली नाही.गणेशोत्सव मेळाव्यांमधून टिळक पक्षाने गोखल्यांची निंदा करण्यासाठी रचलेली पदे पाहण्यासारखी आहे. "गोपीकृष्ण हा नाच्या। सजला नारी वेषा।।"

जुलै 1925 मध्येच केशवरावांनी, पालिकेने वीस हजार खर्च करून सार्वजनिक ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा बसवावा असा ठराव 9 सदस्यांच्या सहीनिशी पालिकेकडे पाठवला. एकावर्षाआधी शहरातील रे मार्केटमध्ये टिळकांचा आणि विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या पुतळा पालिकेने बसवला होता. तेव्हा पालिकेचे अध्यक्ष न. चि. केळकर होते. केळकर हे टिळकांचे पट्टशिष्य होते. फुले यांच्या कर्मभूमीत त्यांचा पुतळा असावा ही ठरावकर्त्यांची इच्छा होती.या विषयावर पुन्हा ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाक् युद्ध सुरू झाले.

 "भाला"कार भोपटकर म्हणाले, "कै.ज्योतिराव फुले यांनी पुण्यातील नागरिकांची अशी कोणती सेवा केली,की त्यामुळे त्यांचे सार्वजनिक स्मारक व्हावे."  भोपटकर यांच्या या विधानामुळे शहराचे वातावरण तापले. या ठरावाला टिळक पक्षातील ब्राह्मणेत्तर मंडळींनीही विरोध केला. भोपटकर यांनी यापूर्वीही आपल्या विधानांनी अनेकदा वाद ओढवून घेतल्याचा इतिहास आहे. महात्मा गांधींच्या अनुयायांना "गांधाळ" म्हटल्याने केसरीचे  संपादक  न. चि. केळकर यांना त्याबाबत 23 सप्टेंबर 1924 मध्ये दिलगिरी व्यक्त करत माफी मागावी लागली होती. कोल्हापूर संस्थानाच्या चौथ्या छत्रपती प्रकरणात टिळक-आगरकरांवर जेव्हा बदनामी प्रकरण दाखल झाले. तेव्हा टिळकांची बाजू म्हणून 1906 मध्ये भोपटकर यांनी "नरकाचा दरबार" हा लेख लिहिला  आणि त्यांच्यावर  राजद्रोहाचा खटला दाखल झाला. तेव्हा बॅ. दावर यांच्याकडून स्वतःला वेडा, मूर्ख ठरवून सुटका करून घेण्याचा प्रयत्न भोपटकरांनी केला खरा, पण तो फसला आणि त्यांना शिक्षा झालीच.

       पुतळ्याच्या या राजकारणामध्ये ब्राम्हणेतरांचे प्रतिनिधित्व "मजूर"पत्र करत होते तर  तर "संग्राम" पत्र ब्राह्मण पक्षाचे. अशा धामधूमीमध्ये सन 1925 च्या जुलै अखेरीस "विजयी मराठा" या श्रीपतराव शिंदे यांच्या पत्रात "देशाचे दुश्मन"पुस्तकाची जाहिरात प्रसिद्ध झाली. लेखक होते दिनकरराव जवळकर, प्रकाशक केशवराव जेधे, प्रस्तावना होती केशव गणेश बागडे यांची. पुस्तकात भोपटकरांचा उल्लेख नाव न घेता," बुलेटरी वानाचे विप्रवड्डू!"असा केला होता. तर टिळकांचा उल्लेख करताना,
"कुठे बाबु चित्तरंजन दास आणि कुठे टिळकांसारखे खाबु निपटनिरंजन डास!",
 "महाराष्ट्राच्या हाती पुराणाच्या कापूसवाती देणारा चिपळूणकर आणि टिळक दुरात्मा!"
 असे मजकूर होते. "देशाचे दुश्मन" ची भाषा जळजळीत होती. त्यामुळे भडका उडणारच होता. जवळकरांची शब्दकळा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या शब्दकळे सारखी तिखटजाळ आणि प्रतिपक्षाला ठसका लावणारी असल्याने  हे पुस्तक ठाकरे यांनीच लिहीले अशी समजूत टिळक अनुयायांची न झाली तरच नवल.परंतू प्रबोधनकारांनी "ज्ञानप्रकाश" पत्रातून तो "तो मी नव्हेच" हा खुलासा केला.

       "सैतान, राष्ट्रीय दरोडेखोर,पाजी, फंड गुंड", अशा शेलक्या शब्दांचा जवळकरांनी टिळकांवर अक्षरशः वर्षाव केला. या पुस्तकाने पुण्यात एकच गहजब माजला. चिपळूणकरांबद्दल लिहिताना जवळकर लिहीतात," विष्णूभट चिपळूणकराने  जोतिरावांवर आपल्या निबंधमालेत जे शिंतोडे उडवले आहेत. ते पाहता या मग्रुर कुत्र्याला गोळी घालून कोणी मारले असते तर तो देवाघरी अन्याय ठरला नसता."  या भडक आणि तिखट लिखाणाचे जे परिणाम व्हायचे ते झालेच. पुणे नगरपालिकेत प्रकाशक केशवराव जेधे यांचा आणि पालिकेबाहेर जवळकर यांचा निषेध करण्यात आला. त्यांच्यावर सिटी मॅजिस्ट्रेट फ्लेमिंग यांच्या न्यायालयात विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे पुतणे  कृष्णराव चिपळूणकर आणि टिळक यांचे सुपुत्र श्रीधर बळवंत टिळक यांनी चिपळूणकर व टिळक यांची बदनामी केल्याचा खटला दाखल केला. ऑक्टोबर 1925 रोजी सुरू झालेल्या या खटल्यात डॉ. त्र्यंबक चिपळूणकर, लक्ष्मणशास्त्री लेले, वा.गो. आपटे यांच्या साक्षी झाल्या. 15 सप्टेंबर 1926 रोजी या खटल्याचा निकाल लागून न्यायमूर्ती फ्लेमिंग यांनी पुस्तकाचे लेखक जवळकर आणि मुद्रक रामचंद्र लाड यांना प्रत्येकी एक वर्ष साधी कैद आणि अडीचशे रुपये दंड तर प्रकाशक केशवराव जेधे  व प्रस्तावना लेखक बागडे यांना सहा महिन्यांची कैद सुनावली. "ब्रह्मलाळोत्पन्न, कुत्रा, जंत, नीच कोटीतले." या शब्दामुळे चिपळूणकर यांची बदनामी होते असे फ्लेमिंग म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे कृष्णराव चिपळूणकर आणि त्र्यंबक चिपळूणकर हे विष्णुशास्त्री यांचे निकटचे नातेवाईक असल्याने त्यांच्या भावना दुखावल्या, असे मत न्या. फ्लेमिंग साहेबांनी नोंदविले.

    या खटल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असतानाच याच खटल्याशी साधर्म्य सांगणार्‍या  एका अन्य खटल्यामध्ये निकाल मात्र याच फ्लेमिंग साहेबांनी वेगळा दिला होता. जानेवारी 1926 मध्ये,"जोतिबा ख्रिस्ती झाला.तो गुंड, पुंड, मुखंड होता." असं विधान करणाऱ्या बाबुराव फुलेंवर महात्मा फुले यांच्या चुलतभावाच्या नातवाने बदनामीचा खटला दाखल केला होता. परंतु या खटल्याचा निकाल देताना फ्लेमिंग यांनी बाबुराव फुले यांनी बदनामी केली नाही तसेच फिर्यादी गजानन फुले हे जोतीरावांच्या चुलतभावाचे नातू असल्याने ते जोतीरावांचे निकटचे नातेवाईक नाही असा निकाल दिला होता. "देशाचे दुश्मन" खटल्यातील विष्णुशास्त्री यांच्या चुलत भावाचे नातू हे विष्णूशास्त्रींचे निकटचे नातेवाईक ठरतात. तर अशाच बदनामीच्या खटल्याचे फिर्यादी महात्मा फुले यांच्या चुलत भावाचे नातू निकटचे नातेवाईक ठरत नाही, ही न्यायादानातील विसंगती बॅ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्यासारख्या निष्णात वकिलाने हेरले आणि जेधे- जवळकर यांच्या शिक्षेविरुद्ध सेशन कोर्टात अपील दाखल झाले. 18 सप्टेंबर 1926 जेधे आणि बागडे यांना जामीन मिळाला.

         सेशन कोर्टाचे जज जे.डी. लॉरेन्स यांनी "देशाचे दुश्मन" खटल्यातील सर्व आरोपींना दोषमुक्त केले. लॉरेन्स निकालात म्हणतात,"विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची बदनामी करण्याचा व कुटुंबीयांच्या भावना दुखावण्याचा हेतूने पुस्तक लिहिले गेलेले नाही.हे पुस्तक म्हणजे सर्वसामान्यतः ब्राह्मणमतां विरुद्ध लिहिलेले आहे." 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात लढवलेल्या अनेक महत्त्वाच्या खटल्यात पैकी महाराष्ट्रात प्रचंड गाजलेला "देशाचे दुश्मन"नावाचा हा खटला होता. बाबासाहेब आणि हा खटला यासंदर्भात ब्राह्मणेत्तर कार्यकर्ते शंकरराव मोरे आपल्या आठवणीत लिहितात," डॉ. बाबासाहेबांचा आणि माझा परिचय टिळक-चिपळूणकर यांच्या मतांविरुद्ध जवळकर यांनी लिहिलेल्या "देशाचे दुश्मन" पुस्तकाच्या खटल्यामुळे झाला. या खटल्यातील बाबासाहेबांची कामगिरी त्यांच्या अगाद बुद्धिमत्तेची आणि कर्तृत्वाची साक्ष देणारी होती."

 राहुल धनराज बरडे
 गव्हाणकुंड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1